Monday, April 14, 2014

खैरनार, मध्यमवर्गीयांचे नायक बनू नका! (दै. नवशक्ती - १३ जुलै १९९४)




मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी आचारसंहितेचा भंग केल्यावरुन त्यांना आयुक्त शरद काळे यांनी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अलीकडेच महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित केले. या निलंबनानंतर खैरनार यांनी महाराष्ट्रव्यापी दौरे आखून राज्यातील नोकरशहांच्या तथाकथित भ्रष्टाचाराविरुद्ध व या भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण देणार्या मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध व्यापक जनजागृती करण्याचा विडा हाती घेतला होता. त्या अनुषंगाने मी लिहिलेला हा लेख दै. नवशक्तीमध्ये १३ जुलै १९९४ रोजी प्रसिद्ध झाला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


खैरनार, मध्यमवर्गीयांचे नायक बनू नका!


-    समीर परांजपे
-     
मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी आचारसंहितेचा भंग केल्यावरुन त्यांना आयुक्त शरद काळे यांनी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अलीकडेच महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित केले. या निलंबनानंतर खैरनार यांनी महाराष्ट्रव्यापी दौरे आखून राज्यातील नोकरशहांच्या तथाकथित भ्रष्टाचाराविरुद्ध व या भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण देणार्या मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध व्यापक जनजागृती करण्याचा विडा हाती घेतला आहे. या आंदोलनास सहाय्य करण्यासाठी माजी सनदी सेवक, समाजसेवक पुढे सरसावले आहेत. गेल्या एक-दीड वर्षांतच महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट पवार शासनास उलथवून क्रांती घडवेल अशी अपेक्षा केली जात आहे. खैरनार व त्यांचे साथीदार त्यांच्या अशा वक्तव्यांतच त्यांनी छेडलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. ते व त्यांचे सवंगडी यांना गतेतिहासाचा विसर पडलेला दिसतो. या शब्दबंबाळतेच्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या मर्यादा व उणीवांची जाणीव करुन देणे योग्य ठरावे.
काळे दोषी नाहीत
खैरनार यांना निलंबित केल्यानंतर माजी महापालिका आयुक्त सदाशिवराव तिनईकर यांनी खैरनार यांच्या नथीतून मुख्यमंत्री शरद पवार व महापालिका आयुक्त शरद काळे यांच्याविरुद्ध शरसंधान केले आहे. शरद पवारांच्या दबावाला बळी पडून शरद काळे यांनी खैरनार यांना निलंबित केले व भ्रष्टाचार्यांना पाठीशी घातले असा स्पष्ट आरोप तिनईकरांनी केला आहे. तिनईकरांना हे निवृत्तीनंतर सुचलेले शहाणपण आहे असे समजावयाचे काय? मुख्यमंत्री पवार भ्रष्ट आहेत सा आरोप करणारे खैरनार त्यासंदर्भातील विश्वासार्ह पुरावे द्यायची जबाबदारी स्वीकारत नाहीत. ही पुरावे देण्याची व शरद पवार दोषी असल्यास राज्यपालांकडे रितसर परवानगी मागून मुख्यमंत्र्यांविरुद्ध खटला दाखल करण्याची जबाबदारी खैरनारांची पाठराखण करणारे तिनईकर स्वीकारण्यास तयार आहेत का? खैरनार यांना साथ देणारे विख्यात कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी ही जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घ्यावी असे विचार तिनईकरांना का सुचू नयेत? तिनईकर आज महापालिका आयुक्त असते तर खैरनारांनी चालविलेला कारभार त्यांनी तरी सहन केला असता काय? शिवसेना नगरसेवकांच्या विरुद्ध सतत नियमांचे हत्यार उगारणार्या तिनईकरांनी खैरनारांनाही आचारसंहितेचा बडगा कशावरुन दाखविला नसता? शेवटी प्रत्येकजण आपले स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत असतो. विद्यमान आयुक्त शरद काळे यांनी महापालिका नियमांच्या आधारे खैरनारांच्या प्रवृत्तीस आळा घालण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यात काहीही चूक नाही. सनदी नोकरशाहीच्या तत्वानेच शरद काळे वागले आणि त्यांनी लोकशाही प्रवृत्तीचा मान राखला याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. राजकारण्यांचा दबाव असतानाही आयुक्तांच्या परवानगीने खैरनार हवी ती अनधिकृत बांधकामे पाडू शकले याबद्दल खरेतर खैरनारांनी शरद काळे यांना धन्यवाद द्यावयास हवे होते. पण त्या उलट मुख्यमंत्री शरद पवारांचे हस्तक म्हणून शरद काळेंना रंगवून खैरनार यांनी नीतीमत्तेच्या तत्वांचाही भंग केला आहे. भ्रष्टाचार्यांविरुद्ध शासकीय सेवक नियमाधारे लढल्यास त्याचे अधिक कौतुक करावयास हवे. पण खैरनार यांनी प्रसिद्धीमाध्यमांकडे धाव घेतली ही कृती निषेधार्हच आहे. विशिष्ट पुरावे न देता केवळ शब्दबंबाळ वक्तव्यांनी तात्पुरती सनसनाटी निर्माण होते. त्यातून आंदोलने उभी राहात नाहीत. याचा विवेक खैरनारांना राहू नये यासारखे आश्चर्य दुसरे कुठले?
मध्यमवर्गीयांचे नायक
निलंबित झाल्यानंतर खैरनार यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांना न-नायक करण्याचे ठरविलेले दिसते. खैरनार यांच्या सभांनाही प्रचंड गर्दी होत आहे. पण ही गर्दी म्हणजे सुबुद्ध नागरिकांचा समुह असेलच असे नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे की, लोक आमच्या सभांना गर्दी करतात, पण मत मात्र काँग्रेसला देतात. खैरनार यांच्या सभांना होणारी सध्याची गर्दी काहीशी अशीच आहे.
खैरनारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मंडळी ही बहुतांश मध्यमवर्गीयच आहेत. भारतात आज २० कोटी मध्यमवर्ग आहे. नवे मुक्त आर्थिक धोरण हेदेखील मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षा डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले गेले आहे. तरी या वर्गाचे हितसंबंध आजही सुरक्षित नाहीत. भ्रष्ट व्यवस्थेमुळे, सर्वाधिक मध्यमवर्गीय चिरडला जातो. श्रीमंत वर्गास व दारिद्र्यरेषेखालील लोकांस भ्रष्टतेची झळ पोहोचली तरी या दोन्ही वर्गांतून फारशी प्रतिक्रिया उमटत नाही. अशा समाजात भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उघडपणाने बोलणारा, धडाडी दाखविणारा शासकीय सेवक वा समाजसेवक हा मध्यमवर्गीयांना देवदूताप्रमाणे वाटू लागतो. त्यामुळेच खैरनार यांनी मध्यमवर्गीयांचे नायक बनणे टाळावे असे आग्रहाने सुचवावेसे वाटते. असे व्यक्तिनिष्ठ आंदोलन वा मोहिम भ्रष्ट व्यवस्था बदलू शकत नाही व नोकरशाहीस सन्मार्गावर आणण्याचे पुरेसे प्रशासकीय कौशल्य व संयम खैरनारांपाशी नाही. हे गुण अण्णा हजारेंसारख्या सत्शील समाजसेवकाकडे आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मुलन आंदोलन हे पवारविरोधी आंदोलन बनण्यापेक्षा समाजव्यवस्था परिवर्तन करणारे आंदोलन बनण्यासाठी अण्णा हजारे यांच्याकडे एकमुखाने आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा सोपविली पाहिजे. हे न घडल्यास नंतर येणारा निराशेचा अंधार खैरनारांसारखा आशेचा किरण सहज गिळून टाकेल यात शंका नाही.


No comments:

Post a Comment