लेखाचा मुळ भाग
लेखाचा उर्वरित भाग.
छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडवरील राज्याभिषेकाला ६ जून १९९९ रोजी ३२५ वर्षे पूर्ण
झाली. त्यानिमित्त दै. सामनाच्या उत्सव या रविवार पुरवणीत ६ जून १९९९ रोजी मी लिहिलेला हा लेख.
त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
शिवराज्याभिषेकाची
विजयगाथा
- - समीर परांजपे
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक १६७४ साली स्वराज्याची राजधानी किल्ले
रायगडावर पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्र व देशाच्या इतिहासात विशेष ऐतिहासिक
महत्त्व असून ६ जून १९९९ रोजी या घटनेस ३२५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त शिवशाहीर
बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिवशी पहाटेपासून रायगडावर
शिवकाळाची स्मृती जागविणारे विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. छत्रपती शिवराय
यांच्या जीवनाची गाथा ही स्वतंत्र राज्यनिर्मितीची असली तरी या स्वराज्याचे
सार्वभौमत्व सिद्ध करणे ही त्याकाळी अवघड बाब होती. शिवरायांच्या कित्येक शतके
आधीपासून आक्रमकांनी महाराष्ट्रावर वारंवार आक्रमणे करुन येथील धार्मिक,
सांस्कृतिक वातावरण उजाड केलेले होते. या आक्रमकांनी स्थानिक राजांना मांडलिक
केलेले असल्याने त्यांचे स्वत्व नष्ट झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्रीय किंवा
कोणाही हिंदू राजाने अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर स्वत:स राज्याभिषेक करुन घेतल्याची घटना घडली नव्हती.
अकबराच्या कारकिर्दीत कृष्ण नरसिंह शेख या ग्रंथकाराने काशी येथे `शुद्रशिरोमणी’ हा ग्रंथ
परिश्रमपूर्वक तयार केला. त्याचे प्रतिपादन असे की, कलियुगात परशुरामाने सर्व
पृथ्वी क्षत्रियविहिन केल्याने भारतात केवळ ब्राम्हण व शुद्र हे दोनच वर्ण
अस्तित्वात आहेत. तसेच कोणाही राजाला राज्याभिषेक करुन घ्यावासा वाटला तर
राज्याभिषेक विधी करण्याची पात्रता असलेली विव्दान व्यक्ती त्यानंतर उपलब्ध
नव्हती. शिल्लक होते ते पोटार्थी भटभिक्षुक. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे जे कार्य १६४७ सालापासून सुरु केले ते निश्चितच
क्रांतिकारी होते. पातशाह्यांना टक्कर देऊन जे स्वराज्य निर्मिले त्याचे
सार्वभौमत्व सिद्ध करणे हा शिवरायांच्या राज्याभिषेकामागील मुख्य उद्देश. परंतु
तत्कालीन सामाजिक परिस्थितीने यामध्ये अनेक अडथळे आणले.
१६७१-७२च्या सुमारास शिवरायांनी राज्याभिषेक करुन घेण्याचे मनात योजले
होते. पण कलियुगात क्षत्रिय नाहीत या सिद्धांतामुळे `गोब्राम्हणप्रतिपालक’ छत्रपतींनाही त्याकाळचे सनातनी ब्राम्हण शुद्र
समजत असत. त्यामुळे त्यांना छत्रसिंहासनाचा अधिकार नाही, अशा आशयाचे काशीचे
वेदसंपन्नशास्त्री गागाभट्ट यांचे पत्र घेऊन केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पंडित व
सोमनाथभट्ट कागे महाराष्ट्रात आले होते. तेव्हा शिवरायांनी निळो येसाजी पारसनीस
यांना काशीस पाठविले. त्यानंतर गागाभट्ट यांनी स्वत: रायगडास येऊन सर्व स्थिती जाणून घेतल्यावर
त्यांचे मत शिवरायांप्रति अनुकूल झाले.
राज्याभिषेकाची तयारी
गागाभट्ट यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी `राज्याभिषेक प्रयोग’ व `तुला पुरुषदानविधी’ या दोन खास पोथ्या तयार केल्या. राज्याभिषेकाची
जंगी तयारी रायगडावर सुरु झाली याच दरम्यान १६ मार्च १६७४ला शिवरायांची एक पत्नी
काशीबाई यांचे रायगडावर निधन झाले व त्या आधी २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मराठ्यांचे
सेनापती प्रतापराव गुजर एका लढाईत मारले गेले. या घटनांमुळे शिवराय काहीसे विचलित
झाल्याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रांमध्ये बघायला मिळतात. ज्येष्ठ शुद्ध १३ शके
१५९६ हा राज्याभिषेकासाठी मुहूर्त ठरविण्यात आला. राज्याभिषेक करुन घ्यायचा असला
तरी स्वराज्यवर्धनाचे शिवरायांचे कार्य मात्र अखंड सुरुच होते. २४ एप्रिल १६७४
रोजी केळंजाकोर येथे मोठी लढाई मारुन शिवराय चिपळूण येथे परतले. तेथे आपल्या
लष्करी तळाची पाहाणी करुन ते रायगडावर आले. १९ मे ६७४ ला प्रतापगडावर जाऊन
शिवरायांनी भवानीमातेचे दर्शन घेऊन तिच्याकडे आपल्या राज्याभिषेकासंदर्भात
शुभाशिर्वाद मागितले. २९ मे १६७४ रोजी गागाभट्टांच्याच मार्गदर्शनाखाली शिवरायांचे
मौजीबंधन करण्यात आले. त्याच दिवशी प्रायश्चित्त विधी म्हणून तुला पुरुषदान
करण्यात आले.
शिवरायांच्या राज्याभिषेक समारंभासाठी देशाच्या निरनिराळ्या भागांमधून
सुमारे ११हजार लोक किल्ले रायगडावर जमा झालेले होते असे डच वखारवाला अब्राहम याने
लिहिले आहे. त्याच्या माहितीप्रमाणे तुलादानाच्या वेळी शिवरायांचे वजन १७००० पगोडे
(सुमारे १६० पौंड) इतके भरले. शिवरायांची प्रथम सुवर्णतुला करण्यात आली. त्यानंतर
चांदी, तांबे व अन्य धातू त्याचप्रमाणे साखर, फळे यांसारख्या खाद्यपदार्थांनीही
त्यांची तुला करण्यात आली.
राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा झाला ५ जून व ६ जून १६७४ रोजी. पण त्याआधी
काही दिवस अन्य विधी सुरु होते. ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी आपल्या धर्मपत्नींसह
पुन्हा समंत्रक विवाह केला. कारण मौजीबंधन झाल्यानंतर शास्त्रानूसार पुन्हा लग्न
होणे आवश्यक होते. राजे म्हणून शिवराय व पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना या
विधीमुळे अभिषेकास आवश्यक असणारे सगळे हक्क सशास्त्र प्राप्त झाले. वा. सी.
बेंद्रे यांनी असे मत व्यक्त केले आहे की, लग्नविधी समंत्रक केल्यामुळे वैदिक
पद्धतीमुळे राज्याभिषेक विधी सपत्नीक करण्यास शास्त्रानूसार मोकळीक मिळाली. पुढील
दिवशी म्हणून, ३१ मे १६७४ रोजी शांतीच्या कार्यास आरंभ झाला. अग्निप्रतिष्ठा
करण्यात आली. इंद्राणीची पूजा, चतुष्कुंभ स्थापना अन्य विधी पूर्ण करण्यात येऊन
आचार्य व ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली. १ जून रोजी ग्रहयज्ञ व त्यानंतर
नक्षत्र होम करण्यात आला. २ जून रोजी मंगळवार व नवमी राज्याभिषेकाच्या कार्यास
निषिद्ध असल्याने या दिवशी कोणताही विधी करण्यात आला नाही. ३ जून रोजी नक्षत्रयज्ञ
करण्यात आला. ४ जून रोजी शिवरायांच्या उपस्थितीत निर्ऋतीयाग संपन्न झाला. मांस,
मत्स्य, मदिरा यांची या प्रसंगी आहुती देण्यात आली. यानंतर स्नान करुन
पुण्यवाहवाचन करण्यात आले.
शिवराय छत्रपती झाले
शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या विधींच्या मुख्य कार्यक्रमास तशी
सुरुवात ५ जूनपासून झाली. हा राज्याभिषेकाचा सातवा दिवस. राज्याभिषेकाचा मुहूर्त
या दिवशी सायंकाळपासून ६ जून रोजी पहाटेपर्यंत असल्याने तेथपर्यंत हे विधी चालले.
शिवराय छत्रपती झाले. सारा महाराष्ट्र धन्य झाला. राज्याभिषेकासंदर्भात जेधे
शकावलीत नोंद आढळते की, `ज्येष्ठ शुद्ध १२ शुक्रवार घटी २१ पले ३४ वि
३८-४० सी ४२ तीन घटिका रात्र उलटली, तेंव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी
बैसले छ १० रबिलाक्ल सु खमस सबैन अलफ.’ या समारंभाचे वर्णन करताना अनंत सभासद आपल्या
बखरीत लिहितो `सर्वांस नमन करुन शिवराय अभिषेकास सुवर्ण चौकीवर
बसले. अष्टप्रधान व थोर-थोर ब्राम्हणांनी स्थळोस्थळीची उदके भरुन सुवर्ण कलशपात्री
अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळींस नमस्कार करुन
शिवराय सिंहासनावर बसले. कित्येक नवरत्नादिक सुवर्णकमळे, नाना सुवर्णफुले, वस्त्रे
उदंड दिधली. दानपद्धतीप्रमाणे महादाने इत्यादी दाने केली. त्या स्थायी सिंहासनास
अष्टखांब जडील केले. तेथे अष्टप्रधानांनी उभे राहावे. पूर्वी कृतायुगी,
त्रेतायुगी, व्दापारी, कलयुगाचे ठायी पुण्यश्लोक राजे सिंहासनी बैसले.’ या
राज्याभिषेकासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी आँक्झिंडेन हा रायगडावर हजर होता. त्याने
आपल्या रोजनिशीत राज्याभिषेक समारंभाचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो ’रायगडाचा मार्ग अतिशय बिकट असताना हत्तीसारखे
प्राणी राज्याभिषेकासाठी गडावर आणलेच कसे याचे आँक्झिंडनला आश्चर्य वाटले. राजा
दानधर्म करण्यात इतका गर्क होता की, इंग्रजांशी करारावर सह्या करण्यास त्याला दोन
दिवसांनंतर सवड मिळाली. ’ राज्याभिषेकाचा अंतिम दिवस हा ६ जून. त्याविषयी
आँक्झिंडेन लिहितो की, `या दिवशी शिवाजी राजे भव्य सिंहासनावर आरुढ
झालेले होते. त्यांनी मौल्यवान पोषाख परिधान केला होता. अष्टप्रधान मंडळ सभोवताली
होते. संभाजी राजे. पेशवा मोरोपंत, एक श्रेष्ठ ब्राम्हण सिंहासनाखाली ओट्यावर
बसलेले होते. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक
अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे होती. सिंहासनाच्या उजव्या हाताला दोन मोठी
मत्स्यांची सुवर्णशिरे होती. डाव्या बाजूला अनेक अश्वपुच्छे व एका मौल्यवान
भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून
तळपत होती. ’
`शिवराई’ नाणे
शिवरायांनी हा राज्याभिषेक करवून घेतल्यानंतर आपल्या सार्वभौमत्वाची
ग्वाही देणारा राज्याभिषेक शक सुरु केला. राज्यारोहणाच्या मुहूर्तावर `शिवराई’ नावाचे नाणे सुरु
केले व `क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती` हे नवे बिरुदही धारण केले. परकीय संस्कृतीचे
सावट दूर करण्यासाठी व फारसी भाषेचा प्रभाव दूर करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून राज्याभिषेकप्रसंगी
रघुनाथ पंडित या संस्कृत पंडितास `राज्यव्यवहार` कोश तयार करण्याची आज्ञा शिवरायांनी दिली.
पंचांगातील दोष दूर करण्यासाठी `करणकौस्तुभ` नामक ग्रंथ लिहिण्यासाठी कृष्ण ज्योतिषाला
शिवरायांनी उत्तेजन दिले. अष्टप्रधान मंडळाला संस्कृत नावे देऊन ती प्रचारात आणली.
या राज्याभिषेकाचे महत्व स्पष्ट करताना वा. सी. बेंद्रे म्हणतात की, `शिवरायांच्या संघटनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात
राजकीय, सामाजिक, पारमार्थिक संस्कृतीची मूल्ये खोलवर रुजली गेली. त्याच
महाराष्ट्राच्या हृदपटलावर राज्यसंस्थेच्या उत्क्रांत संस्कृतीचे प्रतिबिंब
चिरंजीव करण्याचे कार्य या शिवराज्याभिषेकात आहे. कारण त्या घटनेने राज्यव्यवहारात
अखिल समाजाला समानतेच्या पातळीवर आणले. आणि धार्मिक व व्यावहारिक पारतंत्र्याला आळा
घालण्याचे एक तंत्र निर्माण केले.’ शिवरायांचा
राज्याभिषेक पाहून सर्वात आनंदली ती त्यांची माता जिजाबाई. राज्याभिषेक
सोहोळ्यानंतर केवळ बारा दिवसांनी जिजाबाईंचे रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड
या गावी १७ जून १६७४ रोजी निधन झाले. ज्येष्ठ महिन्यातील अभिषेकानंतर या
दुर्घटनेमुळे शिवरायांनी अश्विन मासात पुन्हा एकदा तांत्रिक अभिषेक करुन घेतला.
गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेक विधीमध्ये काही चुका राहिल्याने निश्चल पुरी
नावाच्या एका तांत्रिक ब्राम्हणाने तांत्रिक सिंहासनारोहण विधी करुन घेण्यास
शिवरायांनी राजी केले. त्यानूसार शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त पद्धतीने
अश्विन शुद्ध ५ (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करुन घेतला. शिवरायांनी आपल्या दोन्ही
राज्याभिषेकांच्या विधीवर सुमारे ५ कोटी रुपये खर्च केला असे अनंत सभासदाचे म्हणणे
आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा राज्याभिषेक ही अत्यंत महत्वाची
घटना होती. तरीही शिवराय हे क्षत्रिय नव्हतेच, हा त्यांच्या काळातही सनातनी
भटभिक्षुकांनी लावून धरलेला मुद्दा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातही वादग्रस्त
ठरला. शिवरायांचे वंशज असलेल्या छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे.
शाहूंच्या आश्रयालाही अनेक भटभिक्षुक होते. मात्र, छत्रपती क्षत्रिय नाहीत असे
मानून हे भिक्षुक छत्रपतींकडील धार्मिक कृत्ये पुराणोक्त पद्धतीने करीत. वेदोक्त
पद्धतीने करीत नसत. १८९९च्या आँक्टोबर महिन्यात छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या
पंचगंगा नदीवर कार्तिक स्नानासाठी गेलेले असताना त्यांच्यासोबत राजारामशास्त्री
भागवत होते. महाराज स्नान करीत असताना मंत्र म्हणणारा नारायण भट वेदोक्त मंत्र
म्हणत नसून, पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे भागवतांनी महाराजांच्या लक्षात आणून
दिले. त्यावर नारायण भटाने भोसले घराणे शुद्र असून ते क्षत्रिय नाहीत, असा जबाब
दिल्यानंतर आपले क्षत्रियत्व सिद्ध करण्याचे शाहू महाराजांच्या मनाने घेतले. व
त्यानंतर जे प्रकरण उद्भवले त्याला वेदोक्त प्रकरण असे म्हटले जाते. पुढील वीस
वर्षे या वेदोक्त प्रकरणामध्ये भोसले घराणे क्षत्रिय आहे किंवा नाही, शिवरायांचा
मुख्य राज्याभिषेक योग्य होता की नव्हता अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. या
वादंगातून शाहू छत्रपती व लोकमान्य टिळक हे परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याचेही
चित्र महाराष्ट्राने पाहिले. या वेदोक्त प्रकरणाच्या तपशीलात जाण्याचे येथे कारण
नाही. महत्वाचा मुद्दा इतकाच, छत्रपती शिवरायांच्या काळापासून सनातनी ब्राम्हणांची
जी भयानक धार्मिक मक्तेदारी होती ती या वेदोक्त प्रकरणातून साफ मोडली गेली.
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ३२५ वा वर्धापनदिन साजरा करीत असताना त्यात
केवळ भावनिकता असू नये, तर या एका घटनेने आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासापर्यंत
क्रांतिकारक बदल घडविण्यास कसे सहाय्य केले याचा ओझरता उल्लेख असावा यासाठी
वेदोक्त प्रकरणाचा संदर्भ दिला. शिवरायांचा राज्याभिषेक हा एका अनभिषिक्त
सम्राटाचा होता तसाच प्रजाहितदक्ष राज्यकर्त्याचाही.
( या लेखासाठी (१) शाहू छत्रपती आणि लोकमान्य – डाँ. य. दि. फडके (२)
मराठ्यांचा इतिहास – डाँ. अ. रा. कुळकर्णी (३) श्री शिवछत्रपती –संकल्पित शिवचरित्राची
प्रस्तावना – त्र्यं. ज. शेजवलकर (४) Coronation of Shivaji the Great – v. c. bendre (५) श्री
शिवराज्याभिषेक – कल्पतरु – द. वि. आपटे (६) भगवा ध्वज – ना. ह. पालकर (७) रायगडची
जीवनगाथा – शां. वि. आवळसकर या पुस्तकांचा
संदर्भ म्हणून वापर केला आहे. तसेच ही पुस्तके शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव व पिनॅकल
क्लबचे गिर्यारोहक नितीन जाधव यांनी प्रेमपूर्वक उपलब्ध करुन दिली.)
No comments:
Post a Comment