Sunday, April 6, 2014

नव्या ग्रंथालय संस्कृतीची चाहूल (आपलं महानगर - २५ जुलै १९९७)

लेखाचा मुळ भाग.


 लेखाचा उर्वरित भाग.



भारतातील ग्रंथालयांच्या अनेक अंधारलेल्या बाजू त्यामुळे उजेडात आल्या आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच आम्ही पुस्तके आणि पुस्तकेतर साहित्याला सामावून घेणारी ग्रंथालये चालविणार आहोत की नव्या पाऊलवाटेने जाणार आहोत, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. २१ व्या शतकातील लायब्ररी कल्चरचे आव्हान आपण स्वीकारलेच पाहिजे. असे मत व्यक्त करणारा लेख मी आपलं महानगर या सायंदैनिकाच्या २५ जुलै १९९७च्या अंकात लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


नव्या ग्रंथालय संस्कृतीची चाहूल

 - समीर परांजपे

paranjapesamir@gmail.com

इंग्लंडहून लायब्ररी कल्चर या नावाचे जगातील ग्रंथालयविश्वातील ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे एक नियतकालिक प्रसिद्ध होते. भारतातील हजारो ग्रंथालयांपैकी किमान १३, ००२ ग्रंथालये ही शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली असून या ग्रंथालयांमध्ये पाचशे-सातशे वर्षांपूर्वीच्या पुस्तकांपासून ते अनेक पुस्तकेतर बहुमुल्य गोष्टी संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. ग्रंथालयशास्त्रातील पंधरा मान्यवर ब्रिटिश विव्दानांनी यापैकी हजार ग्रंथालयांना गेल्या अडीच वर्षांच्या काळात भेटी देऊन तिथे पुस्तके आणि पुस्तकेतर वस्तु जतन करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात याचा पद्धतशीर अभ्यास केला. त्यात अभ्यासगटाला जी वस्तुस्थिती आढळली त्याचा निष्कर्ष लेखरुपाने लायब्ररी कल्चरच्या जून १९९७च्या इंटरनेट आवृत्तीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतातील जुन्या ग्रंथालयांमध्ये पुस्तके आणि पुस्तकेतर वस्तूंच्या जतनाबाबत अनास्था आहे. पुस्तकांच्या ढिगार्यात कडुलिंबाची पाने, वेखंडाचे चूर्ण, डांबराच्या गोळ्या असले तद्दन निरुपयोगी घटक ठेवून पुस्तकांना लागलेली कीड हटवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना ग्रंथालयचालक दिसतात. पुस्तके आणि पुस्तकेतर वस्तूंच्या जतनासाठी वापरायचे सी.डी., डी.व्ही.डी., मायक्रोफिल्मिंग सारखे तंत्रज्ञान दिल्लीचे त्रिमुर्ती भवन ग्रंथालय किंवा भाभा अणुसंशोधन केंद्र ग्रंथालय यासारख्या मोजक्या संस्थांतच वापरले जाते. इतर ग्रंथालयांमध्ये पारंपारिक उपाय योजत राहिल्यास पुरातन, अमूल्य ग्रंथसंपदा नष्ट होईल, अशी भीती या अभ्यासगटाने व्यक्त केली आहे.
लायब्ररी कल्चरच्या अंकातील निष्कर्ष पारंपारिक ग्रंथालय चळवळ्यांनी मनाशी ठसवण्यासारखा आहे. भारत हा विकसनशील देश असून तिथे आर्थिक चणचण असल्याने समाजकल्याण कार्यक्रमांनाच निधी अपुरा पडत असतो. त्यामुळे ग्रंथालयांसाठी पैसा उपलब्ध करणे शक्य होत नाही अशा युक्तिवाद राज्यकर्ते करतात. मुळात देशाच्या विकासात ग्रंथालय हा एक महत्त्वाचा घटक असून ग्रंथालयशास्त्राच्या आधारे विकास पूरक अशा कामांचा झपाट्याने प्रसार होऊ शकेल, अशी दृष्टीच आमच्याकडे रुजविली गेली नाही. आज ग्रंथांच्या जतनासंदर्भात आपल्याकडे इतके अज्ञान आहे की, त्या संदर्भात प्रबोधन होणे आवश्यक बनले आहे.
महाराष्ट्र या पूर्वीच्या मुंबई प्रांताचा विचार करायचा झाल्यास ग्रंथालय संचालनासाठी आवश्यक असे शास्त्रीय अभ्यासवर्ग उघडण्याचा मान बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे जातो. अमेरिकेहून बाँर्डर नावाच्या ग्रंथालयतज्ज्ञाला अाणून त्यांनी बडोद्यात ग्रंथपालनाचे वर्ग सुरु केले. विद्यापीठामध्ये ग्रंथपालनाचा अधिकृत अभ्यासक्रम प्रथम लाहोर विद्यापीठात डिक्सनने सुरु केला. भारतीय ग्रंथालयांत वाचकांना उत्तम ग्रंथसेवा देता यावी म्हणून डाँ. शियालाी रामामृत रंगनाथन यांनी सुमारे शंभर ग्रंथालयांचा अभ्यास करुन ग्रंथवर्गीकरणासाठी व्दिबिंदू पद्धती शोधून काढली. ग्रंथ उपयोगासाठी आहेत, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक आहे, प्रत्येक वाचकास त्याचा ग्रंथ मिळावा, वाचकांचा वेळ पर्यायाने ग्रंथालय सेवकांचाही वेळ वाचावा, ग्रंथालय ही वर्धिष्णू आहेत ही पंचसूत्री तयार करुन ग्रंथालये कशी चालवावीत याचे दिग्दर्शन रंगनाथन यांनी केले.
त्यानंतर ग्रंथालय व्यवस्थापन हा विषय भारतात विकसित होऊन ग्रंथालय स्थापत्य, ग्रंथ ठेवण्यासाठी लागणारे फर्निचर, वाचकांना बसायला लागणार्या मेजखुर्च्यांची व्यवस्था या सर्व घटकांचा बारकाईने विचार होऊ लागला.
१७६० सालापर्यंत सगळ्या जगात संशोधनाला वेग मिळत नव्हता. मात्र त्यानंतर होणार्या संशोधनातून इतकी माहिती निर्माण झाली की, ती साठवायला आणि वाचकाला ती वेळेवर पुरविण्याकामी ग्रंथालये अपुरी पडू लागली. ग्रंथालय क्षेत्राबाहेरील व्यक्तींकनी मग या सर्व संदर्भांचे संकलन आणि एकत्रीकरण करण्यासाठी सूचीलेखन आणि सारलेखन अशा दोन पद्धती शोधून काढल्या. एखाद्या विशिष्ट विषयावरील ग्रंथ हे त्यांच्या विषयानूसार, लेखकांच्या नावानूसार वर्गीकृत करुन त्यांच्या सूची बनवल्या जाऊ लागल्या. य़ा सूचींचे वेगळे ग्रंथ प्रकाशित झाले. एक प्रकारे हे दस्तऐवजीकरण किंवा प्रलेखन होते. या पद्धतीतूनच पुढे माहितीशास्त्राचा उगम झाला. ग्रंथालयक्षेत्रातील जाणत्यांनी मग प्रलेखन पद्धतीला दत्तक घेतले. अमेरिकेत १८९० साली संगणकाचा जनक हर्मान होलेरिथ याने जनगणनेच्या कामासाठी सर्वप्रथम संगणकात पंचकार्ड पद्धतीने माहिती साठविली. आता संगणकाची पाचवी पिढी कार्यरत होणार आहे. माहितीशास्त्राच्या परिस्फोटाने ग्रंथ असलेली ठिकाणे म्हणजे ग्रंथालये ही संकल्पनाच बाद झाली आणि ग्रंथालयांच्या प्रकारात आणखी भर पडली. सध्या ग्रंथालयांमध्ये संगणकांव्दारे माहिती साठविण्यासाठी Computerised Documentention Service/Integrated Service Of Information (CDS/ISIS)  हा कार्यक्रम सर्रास वापरला जातो.
लायब्ररी कल्चरच्या अहवालाचे गांभीर्य लक्षात घेताना, ग्रंथालयांमध्ये जे विविध प्रकार झाले, ग्रंथांच्या बरोबरीने इतर अनेक वस्तू साठविणारी विशेष ग्रंथालये निघाली, त्या वस्तूंच्या जतनासाठी कोणकोणती आधुनिक तंत्र वापरली जातात याचा गोषवारा समजून घेणे आवश्यक आहे. पारंपारिक ग्रंथालयांच्या बरोबरीने शैक्षणिक ग्रंथालये अस्तित्वात आली. विशिष्ट शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जी पुस्तके लागतात त्यांचा संग्रह शैक्षणिक ग्रंथालयांत केला जातो. यामध्ये महाविद्यालये, विद्यापीठांची ग्रंथालये येतात. ग्रंथालयांच्या दुसर्या प्रकारात विषयानुरुप विशिष्ट ग्रंथालयांचा समावेश होतो. आज जगात विविध ज्ञानशाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु असून ती सर्व माहिती एकाच ठिकाणी संग्रहित करणे शक्य नसते. त्यामुळे विशिष्ट विषयाला वाहिलेली वेगवेगळी ग्रंथालये अस्तित्वात आली. उदाहरणार्थ अणुसंशोधनासंदर्भात अद्ययावत माहिती पुरवणारे भाभा अणुसंशोधन केेंद्राचे ग्रंथालय. ग्रंथालयांचा तिसरा प्रकार म्हणजे फिरती ग्रंथालये. दुर्गम भागात वाहनांमधून पुस्तक घालून ती वाचकांपर्यंत नेणे हा या प्रकारच्या ग्रंथालयांचा उद्देश. हे तीन-चार ठळक प्रकार असून या ग्रंथालयांच्या गरजा अत्यंत वेगळ्या असतात.
ग्रंथालयांत फक्त पुस्तकेच असतात ही पारंपारिक समजूत आता मोडीत निघाली आहे. नवीन युगात पुस्तके, पुस्तकेतर संदर्भ, सुक्ष्म फितीरुपातील साहित्यही ग्रंथालयांमध्ये संग्रही ठेवण्यात येते. ग्रंथालयांच्या गरजेनूसार त्या-त्या विषयांवरील पुस्तके तिथे संग्रही असतात. पुस्तकेतर संदर्भ साहित्यामध्ये दोलामुद्रिते, हस्तलिखिते, भुर्जपत्रे, ताम्रपट, पोथ्या यांचा समावेश असतो. पुस्तकेतर संदर्भ जतन करणे ही अत्यंत खर्चिक बाब आहे. सुक्ष्म पद्धतीच्या साहित्याचा मुख्य उद्देश हा ग्रंथ व इतर गोष्टींचे जतन करणे हा असतो. ग्रंथालयांतील अनेक पुस्तकांना कीड लागून ती खराब होतात. त्यांचे मायक्रोफिल्मिंग होणे वा ही पुस्तके काॅम्पॅक्ट डिस्क (सीडी)वर परावर्तित केल्याने ती योग्य प्रकारे जतन होतात. या मायक्रोफिल्म, मायक्रोफिश, सीडी, डीव्हीडी, विविध चित्रपटांची रिळे, ध्वनिफिती, व्हिडिअोफिती यांत सुक्ष्म पद्धतीचा अवलंब असतो.
ग्रंथालयांत संग्रही असणार्या या तीन प्रकारांतील साहित्यासाठी काही आधुनिक पद्धती वापरात आल्या आहेत. आपण पुस्तकांना वाळवी लागते, असे म्हणतो, तो समज चुकीचा आहे. पुस्तके जितकी जुनी तितका त्या पुस्तकांच्या पानातील तंतूत आम्लाचा अंश अधिक असतो. यामुळे जुन्या काळच्या पुस्तकांची पाने पिवळी पडतात. ती तुटतात. जुन्या पुस्तकांच्या बांधणीत गोंदाचा वापर अधिक असल्याने त्याकडे आकृष्ट होऊन बुक वर्म नावाचा किडा पुस्तक कोरायला सुरुवात करतो. मुंबईच्या दमट हवामानात पुस्तकांना बुरशी लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेही बुक वर्मचा हल्ला होऊ शकतो. त्यापासून पुस्तकांचे संरक्षण करण्यासाठी डी-अॅसिडिफिकेशन, लॅमिनेशन, फ्युमिगेशन, बटरिंग अशा बर्याच पद्धती वापरल्या जातात. त्यातली सर्वात आधुनिक डी-अॅसिडिफिकेशनच्या पद्धतीत पुस्तकाच्या पानांतील आम्लाचा अंश कमी करण्यात येतो. त्यामुळे पुस्तक लवकर फाटत नाही. फ्युमिगेशन पद्धतीत एका यांत्रिक पेटीमध्ये बुक वर्म लागलेली पुस्तके ठेवून त्या पेटीत विषारी वायू खेळवला जातो. त्यामुळे पुस्तकातला बुक वर्म नष्ट होतो. अथवा पुस्तकांवर कीटकनाशक द्रव्याची फवारणी वाय-आकाराच्या पेटीत केली जाते. याला वाय-टाईप फ्युमिगेशन म्हणतात. त्यात पुस्तकांची पाने फाटली तर त्यांना बटरिंग अथवा लॅमिनेशन केले जाते.
सुक्ष्म स्वरुपातील साहित्यात पुस्तकांचे परावर्तन करण्यासाठी मायक्रोफिल्म हे तंत्रज्ञान वापरले जाते. या स्लाईडच्या आकाराच्या असलेल्या मायक्रोफिल्मच्या १०० फुटांच्या आणि ३५ एम. एम. रुंदीच्या एका रिळात १८०० पानांचा मजकूर मावू शकतो. तर मायक्रोफिशमध्ये १९२ पानांचा मजकूर मावू शकतो. या मायक्रोफिल्म किंवा मायक्रोफिश रिडरवर बघून वाचकाला ते पुस्तक वाचता येते. तसेच सीडीच्या बाबतीत आहे. ५५०मेगाबाईट क्षमतेच्या सीडीमध्ये दीड लाख पानांचा मजकूर राहातो तर १००० मेगाबाईटच्या सीडीमध्ये अडीच लाख पाने मावतात. संगणकाच्या सहाय्याने सीडीवर परावर्तित केलेले कोणतेही साहित्य आपण वाचू शकतो. त्याशिवाय चित्रपटाची रिळे, ध्वनिफिती, व्हिडीअोफिती या चुंबकीय प्रकर्षणातून बनविलेल्या फिती आहेत. दर सहा महिने, दोन वर्षांनी या फितींचा वापर चालू ठेवला वा विशिष्ट द्रव्याने त्या साफ करीत राहिलो तर या फितींचा संग्रहही अत्यंत उत्तम टिकू शकतो.
२१ व्या शतकातील ग्रंथालयांना वाचकांना माहिती सेवा देताना इंटरनेटचा उपयोग वारंवार करावा लागतो. आँनलाईन सर्चवर जगातल्या अनेक विषयांचे संदर्भ संगणकाच्या पडद्यावर झळकत असतात. माहिती सेवा देताना इंटरनेटवर विविध विषयांवरची पुस्तके, नियतकालिके, लेख, सूची असे सर्व साहित्य स्टोअर केेले जाते. त्याचा संशोधक आणि वाचकांना फायदा होतच असतो. त्याशिवाय फॅक्स, झेराॅक्स, व्हिडिअो काँन्फरन्सिंग, इ-मेल यांसारख्या दळणवळणाच्या नव्या साधनांनी माहिती सेवेच्या संदर्भात ग्रंथालयांना २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. त्या साधनांचाही पुस्तके आणि पुस्तकेतर साहित्याच्या जतनप्रक्रियेत मोठा हातभार असतो. लायब्ररी कल्चरमध्ये ग्रंथालयांच्या व्यवस्थापनामधील एका अंगाचा विचार करण्यात आला. पण भारतातील ग्रंथालयांच्या अनेक अंधारलेल्या बाजू त्यामुळे उजेडात आल्या आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच आम्ही पुस्तके आणि पुस्तकेतर साहित्याला सामावून घेणारी ग्रंथालये चालविणार आहोत की नव्या पाऊलवाटेने जाणार आहोत, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. २१ व्या शतकातील लायब्ररी कल्चरचे आव्हान आपण स्वीकारलेच पाहिजे.

No comments:

Post a Comment