Thursday, April 10, 2014

एव्हरेस्ट चढाई मोहिमांतील विक्रमांनी गाठली `जागतिक’ उंची! (दैनिक सामना - २५ मे २००१ )




भारतीय लष्कराच्या निष्णात गिर्यारोहकांनी २३ मे २००१ रोजी सकाळी साडेसात वाजता जगातील सर्वोच्च उंचीचे (२९,०२८ फूट) एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदाच सर करुन लष्करी इतिहासात आणखीन एका मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे २२ मे २००१ रोजी एका फ्रेंच जोडप्याने एव्हरेस्ट शिखराच्या माथ्यावरुन पॅराशूटव्दारे उडी घेऊन पायथा गाठला. मे २००१च्या अखेरीच्या आठवड्यात एव्हरेस्टच्या कुशीत विक्रमांची लयलुटच झाली. त्याची माहिती देणारा लेख मी दैनिक सामनामध्ये २५ मे २००१ रोजी लिहिला होता. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.


एव्हरेस्ट चढाई मोहिमांतील विक्रमांनी गाठली `जागतिक उंची!


-    समीर परांजपे
-     
काही व्यक्ती, काही ठिकाणे ही त्यांच्यातील अंगभूत गुणांमुळे कायम प्रसिद्धीच्या वलयातच वावरत असतात. भारतीय लष्कराच्या निष्णात गिर्यारोहकांनी २३ मे २००१ रोजी सकाळी साडेसात वाजता जगातील सर्वोच्च उंचीचे (२९,०२८ फूट) एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदाच सर करुन लष्करी इतिहासात आणखीन एका मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे २२ मे २००१ रोजी एका फ्रेंच जोडप्याने एव्हरेस्ट शिखराच्या माथ्यावरुन पॅराशूटव्दारे तळछावणीच्या दिशेने उडी घेतली. त्याच दिवशी काही तास अगोदर नेपाळमधील शालेय विद्यार्थी तेंबा तशरी याने एव्हरेस्ट शिखर सर केले. एव्हरेस्टचा माथा गाठणारा तो जगातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे. थोडक्यात या आठवड्यात एव्हरेस्टच्या कुशीत विक्रमांची लयलुटच झाली.
एव्हरेस्ट शिखर सर करण्यामध्येच अनेकांची दमछाक होते. त्या शिखराच्या माथ्यावरुन तळाला पॅराशूटव्दारे उडी मारण्याचा ध्यास बर्टरँड व कलॅरे रोचे या फ्रेंच जोडप्याने घेतलेला होता. एव्हरेस्टचा माथा सर केल्यानंतर २२ मे रोजी या दोघांनी पॅराशूटव्दारे या शिखराच्या तळछावणीच्या दिशेने उडी घेतली. एव्हरेस्ट माथ्यापासून ते तळछावणीपर्यंत खाली येण्याचे अंतर त्यांनी पॅराशूटच्या साहाय्याने अवघ्या १० मिनिटांत पार केले होते. या प्रकारचा विश्वविक्रम पहिल्यांदाच केला गेला आहे.
एव्हरेस्टचा माथा सर करणारा जगातील सर्वात लहान मुलगा असण्याचा मान नेपाळमधील शालेय विद्यार्थी तेंबा तशरी याने २२ मे रोजी मिळविला आहे. तेंबा अवघ्या १५ वर्षे वयाचा आहे. याआधी तीन वेळा एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या थुबतेन शेर्पाच्या नेतृत्वाखाली तशरी याने हा विक्रम केला. तेंबा तेशरीचा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. त्याच्या पहिल्या अयशस्वी प्रयत्नामध्ये २००० साली मे महिन्यात हिमव्रणांमुळे तेंबा तेशरीला आपल्या हाताची तीन बोटे गमवावी लागली होती. तरीही खचून न जाता तेंबाने अखेर २००१ साली यश खेचून आणलेच.
एव्हरेस्ट शिखराच्या सान्निध्यातील मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्याची घटना म्हणजे भारतीय लष्कराने या शिखराचा माथा सर केला. कर्नल के. कुमार या अत्यंत कुशल सेनाधिकार्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच जवानांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. २२ मे २००१च्या मध्यरात्री भारतीय लष्करी गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्यास सुरुवात केली. २३ मे २००१ रोजी सकाळी साडेसात वाजता भारतीय लष्कराने एव्हरेसटचा माथा गाठला. याआधी १९८४ साली भारतीय लष्कराने एव्हरेस्टची मोहिम हाती घेतली होती. पण खराब हवामानामुळे हा प्रयत्न अर्ध्यातच सोडून द्यावा लागला होता.
जागतिक गिर्यारोहकांना पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर एव्हरेस्ट वारंवार खुणावू लागले होते. १९२० ते १९४०च्या दरम्यान अमेरिका, ब्रिटन व युरोपातील देशांमध्ये गिर्यारोहणाबद्दल विशेष कुतुहल निर्माण झाले होते. एव्हरेस्ट शिखरावर १९२१ ते १९३८च्या दरम्यान ब्रिटिशांनी १९२१, १९२२, १९२४, १९३३, १९३५, १९३६, १९३८ अशा सात मोहिमा केल्या, पण त्यांच्या पदरी साफ अपयश आले. मात्र गिर्यारोहकांच्या जिद्दीपुढे अखेर एव्हरेस्टला मान झुकवावीच लागली. सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे या दोघांनी २९ मे १९५३ रोजी जगातील अत्युच्च शिखर एव्हरेस्ट अखेर पादाक्रांत केले. या घटनेला २००३ साली ५० वर्षे पूर्ण होणार आहेत.
एव्हरेस्ट शिखर सर करणे ही आनंदाची तशीच मृत्यूला आमंत्रण देणारी मोहिम ठरु शकते. जागतिक गिर्यारोहणामध्ये मोलाची कामगिरी बजावणार्या जपानी गिर्यारोहकांनी १९७०च्या मार्च महिन्यात एव्हरेस्ट चढाईची मोहिम हाती घेतलेली होती. या २३ जणांच्या जपानी पथकातील सहा शेर्पा ५ एप्रिल १९७० रोजी झालेल्या अपघातात बर्फाच्या दरडीखाली चिरडून ठार झाले. इतके प्राणघातक संकट येऊनही जपानी गिर्यारोहक तेरो मंतसोरा व नाओमी उमरा यांनी अखेर १३ मे १९७० रोजी सकाळी साडेनऊ वाजता एव्हरेस्टचा माथा सर केला.
१९७५ साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त जुंको ताबेई या जपानी महिला गिर्यारोहकाने एव्हरेस्टचा माथा सर केला होता. त्याच वर्षी फांटाँग या तिबेटी महिलेने एव्हरेस्ट सर केले. १९७८ साली ३९ वर्षांच्या वांडा रुटकिविस या महिला गिर्यारोहकाने एव्हरेस्टच्या माथ्यावर पाऊल ठेवले. या सर्वांवर कडी म्हणजे रेनाँल्ड मेसनर व पीटर हेबलर या गिर्यारोहकांनी कृत्रिम प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट पादाक्रांत केले. या गोष्टीवर कोणीही विश्वास न ठेवल्याने मेसनर याने पुन्हा २० आँगस्ट १९८० रोजी एकट्यानेच एव्हरेस्ट शिखर कृत्रिम प्राणवायूशिवाय पुन्हा एकदा सर केले व जगाला आश्चर्याचा धक्का दिला.
एव्हरेस्टच्या माथ्यावर सुरेंद्र चव्हाण या पहिल्या मराठी गिर्यारोहकाची पावले उमटली. या मोहिमेचे नेतृत्व हृषीकेश यादवसारख्या मुरब्बी गिर्यारोहकाने केले होते. ही भारतातील एव्हरेस्ट चढाईची पहिली नागरी यशस्वी मोहिम होती. भारताचा फू दोर्जी हा गिर्यारोहक कृत्रिम प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट चढून गेला होता व बच्छेंद्री पाल ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. भारतीय सेनादलान प्रथमच एव्हरेस्ट सर केले ते २००१ साली. या घटनेमागेही एक करुणामय कहाणीही दडलेली आहे.
१९८४च्या आँक्टोबर महिन्यात भारतीय सेनादलाच्या गिर्यारोहकांचे एक पथक एव्हरेस्टकडे रवाना झाले. या महिन्यात एव्हरेस्टची चढाई हे एक दिव्यच असते. आँक्टोबर १९८४च्या पहिल्या पंधरवड्यातच एव्हरेस्टवर पाऊल ठेवण्याच्या दृष्टीने सेनाधिकार्यांनी आखणी केलेली होती. परंतु नियतीला ही चढाई मान्य नव्हती. या मोहिमेचा नेता कर्नल किरणकुमार एव्हरेस्टच्या साऊथ कोलच्या वर ३५० मीटरवर असताना अपघात होऊन सुमारे १५००मीटर दरीत कोसळून ठार झाला. १७ आँक्टोबर १९८४ रोजी सकाळी पाच वाजता प्रकाश, हवालदार इंद्रबहाद्दूर गुरंग व दोन शेर्पा शिबीर क्रमांक २ वरुन साऊथ कोलकडे मार्गस्थ झाले. हे तिघे संध्याकाळी ४ वाजता साऊथ कोलवर पोहोचले आणि बघतात तो काय कोलमडून पडलेल्या तंबूत ले. बक्षी व कॅ. नेगी यांची प्रेते त्यांच्या दृष्टीस पडली. त्यानंतर मेजर जय बहुगुणा व ले. राव यांचा मृत्यू झाला. अशी रितीने सेनादलाच्या पाच निष्णात गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याने भारतीय लष्करी गिर्यारोहकांना १९८४ साली एव्हरेस्ट मोहिम अर्धवट सोडावी लागली. ते ध्येय लष्करी गिर्यारोहकांनी २००१ साली पुरे केले!
१९९२ साली नऊ देशांच्या एव्हरेस्ट मोहिमा आखण्यात आल्या. त्या वर्षी मे महिन्यात ५१ गिर्यारोहकांनी एव्हरेस्टच्या माथ्यावर पाऊल ठेवून विक्रम केला. भारतातील पहिली नागरी एव्हरेस्ट मोहिम डाँ. दीपक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आली होती, पण त्यामध्ये दीपकाचाच मृत्यू ओढविल्याने ती मोहिम अर्धवट सोडावी लागली. त्याच सुमारास भारत-तिबेट सीमा पोलिसांनी १० मे १९९२ रोजी एव्हरेस्ट पादाक्रांतकेले. १९९३मध्ये बच्छेंद्री पालच्या नेतृत्वाखाली भारत-नेपाळ एव्हरेस्ट मोहिम यशस्वी झाली. त्यामध्ये संतोष यादव या महिला गिर्यारोहकाने दुसर्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले.
एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या मोहिमा आता व्यावसायिक पद्धतीने आयोजित केल्या जातात. त्यासाठी अमेरिका, युरोपमध्ये खास एजन्सीजही आहेत. गिर्यारोहकांनीही एव्हरेस्ट सर केल्याच्या सर्वच मोहिमांचा तपशील देता येणे शक्य नाही, परंतु एव्हरेस्ट शिखराच्या उंचीइतकेच त्याचा माथा सर करण्याने मिळणारे यशही भव्य असते.


No comments:

Post a Comment