मुंबई सरकारच्या
दप्तरी अधिकृतपमणे शहरातील ज्या पहिल्या दंग्याची नोंद झाली तो दंगा १८३२ साली
घडवून आणण्यात आला होता. ती दंगल कुत्रे मारण्याच्या
मुद्द्यावरुन झाली होती. या बद्दलचा छोटा लेख मी दै. लोकसत्तामध्ये ९ नोव्हेंबर
१९९५ रोजी लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे
पेटली मुंबईतील १८३२ची दंगल
-समीर परांजपे
मुंबई सरकारच्या
दप्तरी अधिकृतपमणे शहरातील ज्या पहिल्या दंग्याची नोंद झाली तो दंगा १८३२ साली
घडवून आणण्यात आला होता. १८३२ सालच्या सुमारास मुंबई शहरात बेवारशी कुत्र्यांचे
प्रमाण प्रचंड वाढले होते. यातील काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी नगरवासीयांना चावे
घेतल्याने त्यापैकी दोघा-तिघांचा मृत्यू ओढविला होता. पिसाळलेल्या कुत्र्यांपासून
रेबीज रोगाची लागण होण्याचा संभव असल्याने कंपनी सरकारने मुंबईतील सर्वच बेवारशी
कुत्री ठार मारण्याचा आपल्या गोर्या सैनिकांना हुकुम दिला. या कामी बक्षिसादाखल
प्रत्येक कुत्र्यामागे आठ आणे देण्याचेही जाहीर करण्यात आले. प्रारंभी मारलेली
कुत्री पोलिस ठाण्यात दाखवून त्यांच्या संख्येनूसार बक्षिसी गोर्या शिपायांना दिली
जात असे. पण पुढे मारलेली कुत्री वाहून आणणे जिकिरीचे होऊ लागले. त्यामुळे
मारलेल्या कुत्र्यांची केवळ कापलेली शेपटी दाखवून बक्षिसी देण्याचे धोरण कंपनी
सरकारने अमलात आणले. पण गोरे सोजिर भलतेच हुशार! ते बेवारशी कुत्र्यांना न मारता केवळ त्यांच्या
शेपट्या कापून पोलिस ठाण्यात हजर करु लागले व खिसे गरम करुन घेऊ लागले! अधिकार्यांच्या ही बाब लक्षात येताच ही `शेपटी’ची सवलतही बंद
करण्यात आली! तत्कालीन हिंदू व पारशी समाजात गोर्या
शिपायांच्या श्वान हत्या मोहिमेने संतापाची लाट उसळली. पारशी हे धार्मिकदृष्ट्या
कुत्र्यांना पवित्र मानतात, तर हिंदु लोक हे भूतदयावादी. त्यामुळे १८३२ च्या
एप्रिल महिन्याच्या सुमारास फोर्टातल्या (कोटातल्या) हिंदू व पारशी संमिश्र
लोकवस्तीच्या भागात दोन गोरे सोजिर बेवारशी कुत्र्यांना मारण्याच्या मोहिमेवर
हिंडत असताना हिंदू व पारशी जमातीतील तरुणांचा या गोष्टीमुळे इतके दिवस मनात
दबलेला राग अचानक उफाळून आला. हिंदू व पारशांचा संतप्त जमाव त्या दोन गोर्या सोजिरांच्या
पाठी लागला. ते दोघेही बिचारे कसेबसे जीव वाचवून पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर
मात्र बेफाम झालेल्या हिंदू व पारश्यांच्या एकत्रित जनसमुदायाने मुंबई शहराच्या
रस्त्यांतून लष्कराकरिता अन्न घेऊन चाललेल्या गाड्या अडविल्या. त्यातील पाव, मांस
हे पदार्थ कोटाच्या खंदकात फेकून दिले. सरकारी अंमलदारांवर माती, कचरा इ. घाण
जमावाने फेकली. शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाल्याने मुंबई शहरात
लष्कराने गस्त घालायला सुरुवात केली. दंगलखोरांवर वेळप्रसंगी गोळ्या घालण्याचा
आदेश लष्कराला देण्यात आला होता. परिणामी दंगेखोर पांगून परिस्थिती ताळ्यावर आली.
ज्या दंगेखोरांना पकडले त्यांना वर्ष-दोन वर्षांची कारावासाची शिक्षा इंग्रज
अंमलदाराने ठोठावली.
No comments:
Post a Comment