Monday, April 7, 2014

महाराष्ट्रात ग्रंथालय विकास मंडळ हवे – प्रा. अरविंद टिकेकर ( दै. नवशक्ति - २४ जानेवारी १९९५)





जेव्हा मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल प्रा. अरविंद टिकेकर यांच्यासारखी व्यक्ती संपर्कात येते तेव्हा मन प्रफुल्लित होते. ग्रंथांची अत्यंत सरल व तरल बुद्धीने सेवा करणारे प्रा. अरविंद टिकेकर हे या क्षेत्रातील दीपस्तंभच आहेत. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथपालपदावरुन जानेवारी महिन्याच्या अखेरीस प्रा. टिकेकर निवृत्त होत आहेत. सद्यस्थितीत एकूण ग्रंथव्यवहाराबद्दलची त्यांची मते जाणून घेण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न. मी घेतलेली ही मुलाखत दै. नवशक्तिच्या २४ जानेवारी १९९५च्या अंकात प्रसिद्ध झाली होती.

महाराष्ट्रात ग्रंथालय विकास मंडळ हवे – प्रा. अरविंद टिकेकर

-    समीर परांजपे
-    paranjapesamir@gmail.com


महाराष्ट्रात प्रगल्भ वाचनसंस्कृतीचा अभ्युदय झालेला असला तरी या संस्कृतीची बीजे समाजमनात खोलवर रुजली आहेत असे प्रतिपादन करणे धार्ष्ट्याचे होईल. एतद्देशीय ग्रंथव्यवहार हा पाश्चात्यांसमना फारसा प्रायोगिक नाही. संपूर्ण देशाची गोष्ट राहू द्या पण महाराष्ट्रात ग्रंथक्षेत्रात नाविन्यपूर्ण व संशोधनपर प्रकल्प हाताळणारे लेखक व संशोधक, प्रकाशक फारच अल्प आहेत. माणसाच्या जीवनभर सहोदर ठरणार्या या ग्रंथांना जतन करुन ठेवण्यासाठी आवश्यक अशी समृद्ध ग्रंथालये महाराष्ट्रात कमीच आहेत. औदासिन्याने झाकोळलेल्या या वातावरणात ग्रंथालयांत प्रामाणिकपणे सेवा देऊ पाहाणार्या ग्रंथपालरुपी ज्ञानाच्या लहान लहान पणत्यांना कोण पुसतो? उलट वाचकाचा औदासिन्यरुपी अंध:कार या पणत्या विझवित असतो. अशा वातावरणातही जेव्हा मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल प्रा. अरविंद टिकेकर यांच्यासारखी व्यक्ती संपर्कात येते तेव्हा मन प्रफुल्लित होते. ग्रंथांची अत्यंत सरल व तरल बुद्धीने सेवा करणारे प्रा. अरविंद टिकेकर हे या क्षेत्रातील दीपस्तंभच आहेत. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथपालपदावरुन जानेवारी महिन्याच्या अखेरीस प्रा. टिकेकर निवृत्त होत आहेत. सद्यस्थितीत एकूण ग्रंथव्यवहाराबद्दलची त्यांची मते जाणून घेण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न.
प्रश्न ग्रंथपालन क्षेत्रात कसे प्रविष्ट झालात?
प्रा. अरविंद टिकेकर  - माझ्या वडिलांचा ग्रंथपालन हा व्यवसाय होता. सोलापूरला त्यांनी पस्तीस वर्षे ग्रंथालय चालविले. ग्रंथलेखन, ग्रंथविक्री असे सारे व्यवहार केले. १९५३ साली ज्युनिअर बी. ए. मध्ये शिकत असताना मी पुण्याला ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. बी. ए. झाल्यानंतर १९५६मध्ये मुंबई विद्यापीठाचा डिप्लोमा लागलीच पूर्ण केला. सोलापूर येथील तंत्रनिकेतनात त्यानंतर ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ह्या नव्याने निघालेल्या तांत्रिक शिक्षण संस्थेतील ग्रंथालयात पहिले पुस्तक खरेदी करण्यापासून त्याचा विकास करण्याची उत्तम संधी मिळाली. मराठी, इंग्रजी, संस्कृत हे विषय घेऊन पुणे विद्यापीठाची एम.ए. ची पदवी संपादन करुन मी माझीही प्रगती केली. तेथेच जोडीला इंग्रजी शिकवू लागलो. ग्रंथपालन व शिकविण्याच्या जोड कामगिरीची मुहूर्तमेढ येथे झाली. १९६५ला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ग्रंथशास्त्राचा अधिव्याख्याता व सायं. ग्रंथपाल म्हणून माझी निवड झाली. आता ग्रंथपालन व ग्रंथालयशास्त्र शिक्षणक्षेत्र पक्के झाले. नव्याने ग्रंथालय उभारण्याचे काम तेथेही केले. १९७०ला मुंबई विद्यापीठाची एम.लिब. पदवी प्रा. मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविली. आणि १९७३ साली मुंबई विद्यापीठात प्रपाठक व उपग्रंथपाल म्हणून येथे आलो. १९७८ला प्रभारी व पुढे रितसर प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. गेली २२ वर्षे मी मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागामध्ये कार्यरत आहे. डाँ. पु. म. जोशी, प्रा. दारा मार्शल, डाँ. अँडरसन यांनी १९३५ ते १९७८ पर्यंत मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून धुरा सांभाळली होती. त्यांच्या मालिकेत बसण्याचे भाग्य मला लाभले. या तीनही धुरिणांच्या कीर्ती-लौकिकाचा लाभ मला सदोदित झाला.
प्रश्न – ग्रंथपालांना सामाजिक प्रतिष्ठा न मिळण्याची कारणे काय आहेत?
प्रा. अरविंद टिकेकर  - ग्रंथपालांना सामाजिक प्रतिष्ठा जितकी मिळायला हवी तितकी ती मिळत नाही ही गोष्ट खरी आहे. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वेतनश्रेणी व पदश्रेणी महत्वाच्या ठरतात. पुरुष ग्रंथपालाला पूर्वी विवाहमूल्य नव्हते असे सांगणारे खूप जण भेटतात!  जेथे ग्रंथाला प्रतिष्ठा आहे तेथे ग्रंथपालांनाही आहे. मात्र ग्रंथालयांचे विविध प्रकार, आकार, ग्रंथपालाचे कमी जास्ती प्रशिक्षण ह्यामुळे त्यांच्या दर्जात फरक पडत गेला. नव्या विद्यापीठ कायद्यात आता ग्रंथपालांना प्राध्यापकाचा दर्जा दिलेला आहे. ग्रंथपालांची प्रतिष्ठा त्याच्या ग्रंथव्यवहाराच्या ज्ञानाशी व ग्रंथसेवेच्या प्रतीशी निगडित आहे. वेतनश्रेणी व कायद्यातील दर्जाशी नाही. अभ्यासू संशोधकांचा मित्र व मार्गदर्शक, जिज्ञासा कुतुहलपूर्तीचा सहाय्यक आणि एकूण ज्ञानवृद्धी व्यावसायिक अशी भूमिका बजावणार्या ग्रंथपालांना सामाजिक प्रतिष्ठा हमखास मिळेल.
प्रश्न – सध्याचे ग्रंथविश्व आपल्या मते खालावल्या दर्जाचे झाले आहे का?
प्रा. अरविंद टिकेकर  - ग्रंथनिर्मिती व ग्रंथप्रसार ह्यांची आवश्यकता प्रतिपादणार्या लेखक, प्रकाशकांनी ग्रंथालये केवळ ग्रंथ खपविण्यासाठी आहेत असे न मानता त्यांच्या उदात्त उद्दिष्टांची पूर्ती करणार्या संस्था आहेत हे जाणून घेतले पाहिजे. ग्रंथालये जुन्या-नव्या विचारधनाची भांडारे आहेत. नवनिर्मितीलाही त्यांचे सहाय्य लागते हे विसरता कामा नये. विविध क्षेत्रात पुढे आलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण त्यांच्या लहानपणी सार्वजनिक किंवा शालेय ग्रंथालयातील ग्रंथ वाचूनच झाली आहे. ग्रंथ वाचन हा जन्मभराचा उद्योग असल्याने ग्रंथाची सोबत दीर्घकालाची असते. एकदा वाचक, कायमचा वाचक हे चांगल्या ग्रंथालयाचे ब्रीदच असते. अवांतर वाचन करणार्यात परिवर्तन करणे हे ग्रंथालयाचे काम आहे. वाचनाची पहिली संधी देणार्या ग्रंथालयाचे म्हणूनच महत्व खूप. खेडोपाडी सार्वजनिक ग्रंथालये त्यासाठी असायला हवीत. महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्यांनी ग्रंथालये स्थापिली त्यामुळेच आज महाराष्ट्रात शताब्दी झालेली सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र ती प्रगत म्हणून बोलबाला असणार्या महाराष्ट्राला शोभणारी नाहीत. तेथे आधुनिकतेचे वारे नाहीत. वृद्धापकाळात कसेबसे तगून रहावे अशी त्यांची स्थिती आहे. सर्व प्रकारच्या ग्रंथालयांची आजच्या काळाला साजेशी प्रगती करावयाची असल्यास महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर ग्रंथालय विकास मंडळ स्थापन करावे असे वाटते.
प्रश्न – निवृत्तीनंतरचे तुमचे संकल्प काय आहेत?

प्रा. अरविंद टिकेकर  - माझी निवृत्ती अत्यंत सन्मानपूर्वक होते आहे. तुम्ही हवेहवेसे वाटत असताना निवृत्त होण्याची गोडी वेगळीच! निवृत्तीनंतर लेखन, वाचनासारखे अपुरे राहिलेले उपक्रम पुरे करावयाचे आहेत. माझ्या ग्रंथपालनाची सुरुवात ग्रंथालयातील पहिल्या पुस्तकाच्या खरेदीने झाली व भारतीय मापदंडाने मोठ्यातल्या मोठ्या ग्रंथालयचा ग्रंथपाल म्हणून निवृत्त होण्याचा योग येत आहे. कित्येक व्यवसाय शेवटी भ्रमनिरास व निराशा करणारे ठरतात. ग्रंथपालन व्यवसायाचे तसे नाही. नवनवे वाचन साहित्य, नवनवे वाचक ग्रंथपालाला सदैव प्रफुल्ल्तित ठेवतात. वाचकांच्या चेहेर्यावरील समाधान व डोळ्यातून प्रकटणारी कृतज्ञता व्यावसायिक समाधान भरभरुन देतात. अशा ग्रंथपालन व्यवसायात चार दशके काढता आली हे माझे परमभाग्यच नव्हे काय?



No comments:

Post a Comment