Monday, April 14, 2014

मुंबईकरांचा पांढरा हत्ती! (दै. महाराष्ट्र टाइम्सची मुंबई टाइम्स पुरवणी - २० जुलै २००३)




यश लोके या टोपण नावाने महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्स या पुरवणीमध्ये मी २००३ या वर्षाच्या पूर्वार्धात विविध विषयांवर लेखन करीत असे. त्याच काळातला मी लिहिलेला हा लेख पुढे दिला आहे. या लेखाची जेपीजी फाईल वर दिली आहे. हा लेख दै. महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्स पुरवणीमध्ये २० जुलै २००३ रोजी प्रसिद्ध झाला होता.



मुंबईकरांचा पांढरा हत्ती!


-    समीर परांजपे


अपेक्षेपेक्षा कमी संख्येने येणारे प्रवासी व दर किलोमीटरमागे देखभालीसाठी दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च यामुळे `पांढरा हत्तीबनलेल्या डबलडेकर बसेस पूर्णपणे बंद करण्याच्या विचारापर्यंत आलेल्या बेस्ट प्रशासनाने लोकप्रतिनिधी व जनतेच्या दबावामुळे आपली भूमिका थोडीशी बदललेली आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील साडेचार हजार बसेसपैकी ४५१ डबलडेकर बसेस आहेत. त्यांची संख्या कालांतराने कमी करुन ती दोनशेपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे बेस्ट प्रशासनाने ठरविले आहे.
१९३७ सालापासून मुंबईच्या रस्त्यांवर डबलडेकर बसेस धावू लागल्या होत्या. गेल्या ६६ वर्षांत डबलडेकरपेक्षा सिंगलडेकर बसेस चालविणेच फायद्याचे आहे हे बेस्ट उपक्रमाच्या ध्यानी येऊ लागले. सध्या बेस्टच्या बसेसमधून रोज ४२ ते ४५ लाख प्रवासी ये-जा करतात. म्हणजेच एकूण क्षमतेच्या तुलनेत ५२ ते ५८.५६ टक्के इतकेच हे प्रवासी आहेत. खरंतर बेस्ट बसेसमध्ये सरासरी ७३ टक्के प्रवासी असतील तर हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या खर्या अर्थाने फायद्यात चालेल असे गणित सांगते.
सिंगलडेकर बसला प्रतिकिलोमीटरला देखभालीचा खर्च ३७ रुपये येतो. मात्र हाच खर्च डबलडेकर बससाठी ५५ रु. इतका होतो. मुंबईतील अनेक वाहतूक मार्ग तोट्याचे बनत चाललेले असताना डबलडेकरचा पांढरा हत्ती पोसणे बेस्ट उपक्रमाच्या आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे. त्यामुळे नवीन डबलडेकर्स विकत घेणे बेस्ट उपक्रमाने पाच वर्षांपूर्वीच बंद केले आहे. मुंबई महानगरासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पाचशे नव्या बसगाड्या विकत घेण्यासाठी बेस्टने जागतिक बँकेकडे कर्ज मागितले. बेस्टने नफ्याचाच व्यवसाय केला पाहिजे अशा मुख्य अटीवरच हे कर्ज जागतिक बँकेने मंजूरही केले आहे. त्यामुळे डबलडेकरसारख्या चैनीच्या वस्तू सांभाळणे आता बेस्ट उपक्रमाला परवडण्यासारखे नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळातील `बाँम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रँमवेज कंपनी लिमिटेडची मालकी ७ आँगस्ट १९४७ रोजी मुंबई महानगरपालिकेकडे आली. त्यानंतर ही कंपनी `बाँम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग(बेस्ट) या नावाने ओळखली जाऊ लागली. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता १८७४ साली बाँम्बे ट्रॅम अँक्ट मंजूर होऊन कंपनीकडे दोनशे घोडे व वीस ट्रॅमगाड्या आल्या. १९२० साली दुमजली ट्रॅम गाड्या मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागल्या होत्या.
ट्रॅम वाहतुकीच्या पाहणीत १९१३ साली रिमिंग्टन या अधिकार्याने मुंबईत ट्राँली बस आणायची सूचना केली होती. १९२६ पर्यंत याबाबत काहीही हालचाल झाली नाही. डारडिंपल नावाच्या साहेबाने मात्र जोर लावल्यामुळे मुंबईत ट्राँली बस आणावी की मोटारबस यावर पुन्हा एकदा चर्चा झडली. शेवटी १५ जुलै १९२७ या दिवसापासून प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये पहिली मोटारबस धावू लागली. दादर टीटीपासून पारशी काँलनीतून किंग्ज सर्कलपर्यंत, आँपेरा हाऊसपासून लँमिंग्टन रोडपर्यंत असे त्या मोटारबसचे काही मार्ग होते.
मोटारबस सुरु झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये ती लवकरच लोकप्रिय झाली. ३१ डिसेंबर १९२६पर्यंत बाँम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रॅम कंपनीकडे २४ बसगाड्या झाल्या होत्या. १९२७ सालपर्यंत मुंबईत ४९ लाख प्रवाशांनी या बससेवेचा फायदा घेतलेला होता.
१९३७ साली बेस्टने डबलडेकर बसेसची वाहतूक सुरु केली. त्याकाळी सिंगलडेकर बसमध्ये ३६ प्रवाशांची सोय होत असे. मात्र डबलडेकर बसमध्ये ५८ प्रवासी बसू लागले. दुसर्या महायुद्धाच्या काळात अपरिहार्यता म्हणून बेस्टने सिंगलडेकर गाड्यांच्या टपावर बसण्याची सोय केली. या बसमधून ६० प्रवासी जाऊ शकत. मात्र उन्हाळा व पावसाच्या काळात टपावरील प्रवाशांना बसायला त्रास होऊ लागल्याने हळूहळू ही सुविधा बंद करण्यात आली. मुंबईतील प्रवाशांची वाढती संख्या व कमी बसेस यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत होती. त्यातून मार्यामार्याही होत असत. म्हणून बेस्ट प्रशासनाला शेवटी बसमध्ये प्रवेश करणार्या प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आणणारा कायदा करावा लागला.
१९४०मध्ये बेस्टने कुलाबा ते माहिम या दरम्यान पहिली लिमिटेड बस सुरु केली. ही सेवाही अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ७ आँगस्ट १९४७ रोजी बेस्ट गाड्यांची संख्या २४२ इतकी झाली. बसगाड्यांची संख्या १९५२-५३ मध्ये ३४३, १९५७-५८मध्ये ६२४, १९६२-६३मध्ये ९२२, १९६७-६८मध्ये १०८८, १९७२मध्ये १२१५ व आता २००३मध्ये ४५०० पर्यंत वाढतच गेली.
छोट्या अंतराच्या प्रवाशांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून १९६७ साली बेस्टने आँल स्टॅंडिंग बसचा प्रयोग केला. या बसमध्ये मोकळ्या जागांच्या व्यतिरिक्त सर्व प्रवासी उभे राहात. पण ही बस लोकांना आवडली नाही. लोक तिला बकरा गाडी म्हणू लागले. ही बस १९७०मध्ये बंद झाली. १९६८ साली बेस्ट उपक्रमाने मिनी बसेस सुरु केल्या. प्रारंभी बेस्टकडे वीस मिनी बसेस होत्या.
मुंबई, मुंबईची उपनगरे व नंतर नवी मुंबईपर्यंत विस्तारलेल्या बेस्ट बस सेवेला वाढण्यासही काही मर्यादा आहेत. १९५८ साली वाँटरबस सुरु करण्याचा प्रस्ताव बेस्टच्या विचाराधीन होता. पुढे १९६८ साली जी. एम. लालवाणी यांच्या अध्यक्षतेखाली वाँटर बसबाबत विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. पण हा प्रस्ताव पुढे बारगळला. गोराई, मनोरी, मार्वे, वर्सोवा या भागात बेस्टने लाँच सेवा मात्र सुरु केली आहे. मुंबईची वाहतूक समस्या हलकी व्हावी यासाठी आता स्काय बससारख्या पर्यायांचाही विचार सुरु आहे. त्याचबरोबर आलिशान लिमोझिन वातानुकुलित बससेवाही बेस्टने सुरु केली.
बेस्ट उपक्रमाची ही सिंगल व डबलडेकर बसची वाटचाल बघता हा उद्योग काहीसा तोट्याच चालणार हे गृहितच धरायला लागते. बससेवेत होणारा तोटा वीजनिर्मितीमधम्ये अधिक नफा कमावून भरुन काढावा असे धोरण आता बेस्ट उपक्रमाला अंगिकारावे लागत आहे. त्यासाठी डबलडेकरचा पांढरा हत्ती बंद करण्याचा निर्णय बेस्टने पुढे मागे घेतलाच तर त्याला लोकांनी आंधळा विरोध करता कामा नये. लंडनमध्ये सिंगलडेकरपेक्षा डबलडेकर बसेसची संख्या वाढती असली, तरी त्या शहराची लोकसंख्या व परिस्थीती मुंबईपेक्षा अगदी वेगळी आहे. बेस्टला तंदरुस्त ठेवण्याचा मार्ग सिंगलडेकर बसेसवर भर देणे हाच आहे. काळाच्या ओघात निरुपयोगी ठरलेल्या ट्रॅमगाड्या मुंबईतून अस्तंगत झाल्या. तशा काही वर्षांनंतर डबलडेकर बसही मुंबईच्या रस्त्यांवरून कायमच्या दिसेनाशा होतील. मुंबईकरांनी काळाचा हा महिमा समजून घेतला पाहिजे.



No comments:

Post a Comment