Sunday, February 12, 2017

दोन पावले पुढे... चार पावले मागे - समीर परांजपे - ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर लेख - दै. दिव्य मराठी १२ फेब्रुवारी २०१७




दि. ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ रोजी डोंबिवली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या साहित्य संमेलनाचे वृत्तांकन करताना या संमेलनाचे अनेक अनुभव आले. त्यातून या साहित्य संमेलनाचे वाचक व साहित्य विश्वाला काय फलित लाभले याचा विचार करुन मी लिहिलेला हा लेख दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवर दि. १२ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला. त्याची वेबलिंक व मजकूर पुढे देत आहे. हाच लेख दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी दै. दिव्य मराठीच्या नाशिक आवृत्तीत अक्षरा पानावरही प्रसिद्ध झाला आहे. त्याचीही 'टेक्स्ट व वेबपेज लिंक सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-writes-about-marathi-sahitya-sammelan-5526443-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/17022017/0/7/
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-writes-about-marathi-sahitya-sammelan-5526443-PHO.html
-----
दोन पावले पुढे... चार पावले मागे
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-----
डोंबिवली येथे पार पडलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने मराठी साहित्याला आणखी चार पावले पुढे नेण्यासाठी काय भर घातली,यावर आता उदंड चर्चा सुरु आहे. प्रथमदर्शनी पाहाता या संमेलनाकडे डोंबिवली तसेच ठाणे, मुंबईतील साहित्यरसिक मोठ्या संख्येने फिरकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय सध्या राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या निवडणुकांनी वातावरण ढवळून निघाले असल्याने या साहित्य संमेलनात उपस्थित राहाणार म्हणून जी नावे जाहीर झाली होती, त्यापैकी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे ही नेतेमंडळी तिथे फिरकली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. या उद्घाटन व समारोप कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी संमेलन व्यासपीठाचा जणू ताबा घेतल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे काही प्रमुख नेते आले नसले तरी संमेलन लहान-मोठ्या राजकीय नेत्यांनी गजबजलेच.
राजकारण्यांनी संमेलनात रसिक म्हणून यायला कोणाचाही आक्षेप नाही. पण त्यांनी व्यासपीठे अडवू नयेत, ही सामान्य साहित्यरसिकांची अपेक्षा. मात्र असेे सांगण्याचे नैतिक धैर्य आज कोणाकडेही उरलेले नाही. ते नैतिक धैर्य पु. ल. देशपांडेंनी १९७४मध्ये इचलकरंजी येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळताना दाखवले होते. राजकारण्यांनी संमेलनात व्यासपीठावरील खुर्च्या अडवाव्यात, यास पुलंचा सक्त विरोध होता. त्यामुळे संमेलनाला येणार असाल तर श्रोते म्हणून या, असा निरोप त्यांनी त्या वेळचे केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाणांकडे पोहोचवला होता. चव्हाणांनी पुलंचा मतांचा आदर करत खरोखर प्रेक्षकांमधून संमेलन अनुभवले होते. आता यशवंतरावांसारखे सुसंस्कृत आणि मर्यादांचे भान असलेले राजकारणीही नाहीत, आणि पुलंसारखे नैतिक अधिष्ठान असलेले संमेलनाध्यक्षही नाहीत.
साहित्यिक हा कोणाचाही मिंधा नसावा, त्याने समाजातील खटकणाऱ्या गोष्टींबाबत ठाम भूमिका घ्यायला हवी ही, अपेक्षा चुकीची नक्कीच नाही. या अपेक्षेला जागून संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी आपल्या भाषणात पुण्यामध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा उद्ध्वस्त करणाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवायला हवा होता, असे जे आता उच्चरवाने सांगत आहेत त्यांनी संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात गडकरी पुतळा उद्ध्वस्तीकरणाचा एका ठरावाद्वारे तीव्र निषेध करण्यात आला, या वास्तवाकडे मात्र डोळेझाक केलेली दिसते. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार हे लेखक, कलावंत, पत्रकार अशांचे रक्षण करुन त्यांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहात नाही हे कबूल करण्याची वेळ महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांवर येणे ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणारी परिस्थिती आहे. यापुढे तरी अशी वेळ महाराष्ट्र सरकारवर येऊ नये,याची दक्षता गृहखात्याने घ्यावी, असा ठराव ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आला.
महाराष्ट्रात आज सर्व समाजांच्या आक्रंदनातून निघणाऱ्या मोर्चामुळे ढवळून निघत आहे. अशा सर्वच अन्यायग्रस्त जातीजमातीच्या प्रश्नांबद्दल या साहित्य संमेलनात चिंता व्यक्त करण्यात आली. अन्यायग्रस्तांची, त्यांच्या प्रश्नांची केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन ते सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी एका ठरावाद्वारे झाली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ताब्यात घेण्यापूर्वी संबंधित सरकारांनी जमीन मालक कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करावे, जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे हप्त्या-हप्त्याने मूल्य न देता एक रकमी मोबदला द्यावा आणि संबंधित घरातील सर्व मुला-मुलींना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे,असा आग्रही मागणी असलेला ठरावही या प्रसंगी मांडण्यात आला. जमिनी ताब्यात घेतल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर राजकारण्यांच्या हस्तकांकडून व भांडवलदारांच्या दलालांकडून दबाव येणार नाही, यासाठी राजपत्रित व सनदी अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी एका ठरावाद्वारे राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ७ सप्टेंबर २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार कल्याण डोंिबवली महानगरपालिकेतून जी २७ गावे वगळून वेगळी महानगरपालिका अथवा नगरपरिषद स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या ठरावाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या खुल्या अधिवेशनात विरोध केला. त्यावर साहित्य संमेलनातील खुल्या अधिवेशनात करण्यात येणाऱ्या ठरावांपैकी एखाद्या ठरावाला विरोध करण्याची घटना संमेलनाच्या इतिहासात अनेक वर्षांनी घडली आहे, याचे स्मरण तत्काळ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी करुन दिले. सीमा प्रश्नाच्या एका ठरावावरही महापौर देवळेकरांनी आक्षेप घेऊन बेळगाव, कारवार, निपाणीसह अखंड महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा प्रस्ताव मांडून तो संमत करुन घेतला. ठरावांमध्ये प्रतिबिंबित झालेले हे विषय साहित्यबाह्य असले तरी मराठी समाजाच्या दैनंदिन जीवनाशी खूप जवळीक साधणारे आहेत. त्याची दखल डोंबिवली साहित्य संमेलनात आवर्जून घेतली गेली, ही घटना खूप महत्वाची आहे.
राज्य सरकारच्या अनुदानाविना साहित्य संमेलन आयोजित करणे शक्य व्हावे म्हणून मालवण येथे १९५८ साली झालेल्या साहित्य संमेलनात कवी अनिल यांनी एक संकल्पना मांडली होती. या संकल्पनेच्या अाधारे १९९९ साली मुंबईत वसंत बापटांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साहित्य संमेलनामध्ये महाकोश प्रकल्पाची घोषणा साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्ष वसंुधरा पेंडसे नाईक यांनी केली होती. पण त्यानंतर या महाकोशात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकलेली नाही. इतक्या रकमेत साहित्य संमेलनांचे आयोजन करणे कठीणच आहे. याला दुसरी बाजू अशी आहे की, मराठी माणूस साहित्य संस्कृतीच्या मोठमोठ्या गप्पा मारतो. पण सांस्कृतिक उपक्रमांना खिशात हात घालून भरीव आर्थिक मदत करण्याची दानत मराठी माणसांकडे, मराठी उद्योजकांकडे अभावानेच आहे. मराठी साहित्य संमेलनाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी निदान विद्रोही सांस्कृतिक च‌ळ‌वळ आयोजित करत असलेल्या संमेलनाला भरीव आर्थिक मदत करावी. पण तसे काही होताना दिसत नाही. साहित्य संमेलन तीन दिवस आयोजित करण्यापेक्षा एक दिवसच आयोजित करण्याचा पर्याय चर्चिला जातो. पण अशा पर्यायांवर मराठी समाजात बौद्धिक चर्चा झाली आहे ,असे फारसे सध्या आढ‌‌ळत नाही. त्यामुळे कृतीची अपेक्षाही शून्यच आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य संमेलने ही बहुतेक शहरांतच भरविली जात आहेत. ही संमेलन अस्सल ग्रामीण भागात भरविली गेली तर तिथे साहित्यप्रेमींचा नक्कीच उदंड प्रतिसाद मिळेल. सध्या मराठी वाचनाची भूक शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यादृष्टीने साहित्य संमेलनाची स्थळे भविष्यात निश्चित करणे गरजेचे आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने तर यापुढेही व्हायलाच हवीत. परंतु ती भपकेबाज नव्हे साहित्यरसिकांच्या अभिरुचीला साजेशी व्हावी. ते ध्येय निश्चितच साध्य करता येईल. परंतु, महाराष्ट्रात २७०हून अधिक विविध प्रकारची साहित्यसंमेलने होतात. त्या सर्व संमेलनांना एकत्र गुंफणारा धागा म्हणून मराठी साहित्य संमेलनास भूमिका बजावावी लागेल. तसे चित्र डोंबिवलीतील साहित्य संमेलनात काही दिसले नाही. ही सुबुद्धी पुढच्या संमेलनात होवो, म्हणजे मिळवली.

Thursday, February 9, 2017

पाकिस्तान्यांची झाडाझडती - समीर परांजपे. दै. दिव्य मराठीच्या ९ फेब्रुवारी २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.




दै. दिव्य मराठीच्या दि. ९ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा माझा लेख. त्याचा मजकूर व जेपीजी फाइल व वेबलिंक सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/09022017/0/6/
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-about-india-and-pakistan-by-samir-paranjape-5524115-NOR.html
--------
पाकिस्तान्यांची झाडाझडती
----------
समीर परांजपे | Feb 09,2017 3:05 AM IST
--------
भारत व पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये जे युद्ध झाले त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पूर्व पाकिस्तानचे स्वतंत्र बांगलादेशात रूपांतर झाले. या युद्धाच्या वेळी सौदी अरेबियाने पाकिस्तानची पाठराखण केली होती. ही भूमिका घेताना दोन्ही देशांमध्ये ते मुस्लिम राष्ट्र असणे हा धागा अधिक बळकट होता. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेचे सौदी अरेबिया व पाकिस्तान हे महत्त्वाचे सदस्य आहेत. बांगलादेश निर्मितीसाठी झालेल्या युद्धाला आता ४६ वर्षे उलटली आहेत. रोजगार तसेच निवासाबाबत असलेल्या व्हिसाच्या नियमांचे नीट पालन न केल्याने गेल्या चार महिन्यांत सौदी अरेबियाने ३९ हजार पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले आहे. यापैकी काही जण हे इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांत गुंतले असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची तत्परतेने छाननी, तपासणी केली गेली. ज्यांनी नियमभंग केला त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.
सौदी अरेबियामध्ये अमली पदार्थांची तस्करी, चोरी, फसवणुकीचे प्रकार, मारहाण या प्रकारच्या गुन्ह्यांत पाकिस्तानी नागरिक गुंतले असल्याचे आढळल्यानेही सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढलेली होती. सौदी अरेबियाने आता कितीही आव आणला तरी जगात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना या देशातून काही घटकांकडून मोठी आर्थिक मदत मिळायची, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. ओसामा बिन लादेन याचा जन्म सौदी अरेबियातील एका धनाढ्य कुटुंबात झाला होता. अफगाणिस्तानवर सोव्हिएत रशियाच्या फौजांनी आक्रमण केल्यानंतर त्यांच्याविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानातून सक्रिय झालेल्या मुजाहिदींबरोबर लादेनही रणांगणात उतरला होता. सोव्हिएत रशियाच्या फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरून मुजाहिदींना मोठी मदत केली होती. त्या वेळी लादेन अमेरिकेसाठी एकदम परमप्रिय होता. मात्र, लादेनने १९८८ मध्ये अल कायदा संघटनेची स्थापना करून तिच्यामार्फत अफगाणिस्तानमध्ये आपल्या कारवाया वाढवल्या. तालिबान्यांशीही त्याने हातमिळवणी केली. हा भस्मासूर आपल्यावर उलटणार हे लक्षात आल्यानंतर सौदी अरेबियाने आपल्या देशात येण्यास लादेनला बंदी घातली. त्यामुळे लादेन मग सुदानमध्ये राहू लागला. पण लादेनच्या कारवायांना सौदी अरेबियातील काही धनाढ्य लोक तसेच अमेरिका व पाकिस्तानचाही छुपा पाठिंबा होता. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट उलथवून टाकण्यासाठी केलेल्या लष्करी कारवाईत अमेरिकेसह पाकिस्तान, सौदी अरेबियाचे लष्करही सामील झाले होते. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी एकत्र आल्याचा आव या देशांनी आणला असला तरी तो काही खरा नव्हता. २ मे २०११ रोजी अमेरिकेच्या सैनिकांनी धडक कारवाई करून पाकिस्तानात दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनला ठार केले. त्यामुळे त्याची अल कायदा संघटना कमजोर झाली. पण ती पोकळी आता इसिस या संघटनेने भरून काढली आहे. १९९० मध्ये सद्दाम हुसेन याने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियातून आपल्या सैन्याची हलवाहलव करून आखाती युद्ध लढले होते. त्या वेळीही पाकिस्तान आणि सौदी अरेबिया अमेरिकेबरोबरच होते. सौदी अरेबिया व पाकिस्तान हे दोन्ही मुस्लिम देश आहेत. पॅन इस्लाम ही संकल्पना लक्षात घेतली तर या दोन्ही देशांत कमालीचे सौहार्द हवे होते. मात्र, तसे कधीही घडले नाही. घडण्याची शक्यताही नाही. जगात धर्माधिष्ठित देश अनेक आहेत; पण त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून अनेक मतभेद आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये ८२ पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सौदी अरेबियाच्या अल-हजरत व अल-नसीम या जिल्ह्यांतून एका महिलेसह काही पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी कारवायांत गुंतल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. जेद्दाहमधील अमेरिकी वकिलातीजवळ अब्दुल्ला गुलझार खान या पाकिस्तानी नागरिकाने आत्मघाती बाॅम्बस्फोट घडवला. गेल्या वर्षी जेद्दाहमधील सुमारे साठ हजार प्रेक्षकांनी भरलेल्या अल-जवाहर स्टेडियममध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट सौदी अरेबियाच्या सुरक्षा दलाने उधळून लावला होता. याप्रकरणी दोन पाकिस्तानी, एक सिरियन व एका सुदानी नागरिकाला अटक केली होती. आपल्या गळ्याला नख लागते आहे, असे दिसल्यानंतर सौदी अरेबियाला जाग आली आहे. लष्कर-ए-तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेची हस्तक असलेल्या फलाह-इ-इन्सानियत फाउंडेशनने काही देशांत बँक खाती उघडून संशयास्पद व्यवहार केले आहेत. त्याच्या चौकशीचे धागेदोरे सौदी अरेबियापर्यंतही जाऊ शकतात. त्यामुळेच सौदी अरेबियाला तातडीने पाकिस्तानींची झाडाझडती घेणे भाग पडले आहे.
(लेखक - उपवृत्तसंपादक, मुंबई)

Monday, January 30, 2017

‌Baburao Arnalkar - बाबूराव अर्नाळकरांचा रहस्यभेद - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी, रसिक पुरवणी दि. २९ जानेवारी २०१७


 प्रख्यात रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर






 चित्रकार सतीश भावसार - यांनीच निवडक बाबुराव अर्नाळकर या पुस्तकाचे संपादन केले आहे.



 स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा निवडक बाबुराव अर्नाळकर या ग्रंथाबाबतचा अभिप्राय

----
अर्नाळकर यांच्या काही रहस्यकथा पुस्तकांची मुखपृष्ठ





ख्यातनाम रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या साहित्यकामगिरीचा सर्वंकष आढावा घेणारे निवडक बाबुराव अर्नाळकर हे पुस्तक राजहंस प्रकाशनाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध झाले. या पुस्तकाची निर्मिती, संकल्पना याचा प्रवास नेमका कसा झाला याविषयी सदर पुस्तकाचे संपादन करणारे नामवंत चित्रकार सतीश भावसार यांच्याशी जो संवाद साधला, त्यावर आधारित मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवार पुरवणीत २९ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे.त्या लेखाची वेबपेज, टेक्स्ट लिंक व जेपीजी फोटो सोबत दिेले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjpe-article-about-writer-buburao-arnalkar-5515468-PHO.html?seq=1
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/29012017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/29012017/0/4/

 --------------
बाबूराव अर्नाळकरांचा रहस्यभेद
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----------
इंट्रो- साहित्याचा जागर जेथे एकेमेळी होतो, तो प्रसंग म्हणजे मराठी साहित्य संमेलन. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पुस्तकांचेही आगमन होत आहे. त्यातील राजहंस प्रकाशनाच्या सतीश भावसार संपादित ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया उलगडून सांगणारे हे रसाळ निवेदन...
------------
१४८० रहस्यकथा लिहिल्याने गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये अत्यंत सन्मानाने नोंद झालेले पहिले मराठी साहित्यिक...रहस्यकथा व ललित साहित्यप्रकारातील पुस्तके असा ग्रंथसंभार लक्षात घेतला तर त्यांच्या पुस्तकांची संख्या भरते तब्बल १८००... इतका बहुप्रसवा व विश्वविक्रम करणारा लेखक असूनही त्यांना मराठी साहित्याच्या प्रथम श्रेणीच्या साहित्यिकांमध्ये कधीच मानाची जागा मिळाली नाही. ही उपेक्षा हयात असताना व मृत्यूनंतरही कायम राहिली...
सटवाईने ज्यांच्या ललाटी हे असे भाग्य लिहून ठेवले, ते होते रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर. (ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे ते मूळ रहिवासी. जन्मदाखल्यावरचे त्यांचे खरे नाव चंद्रकांत सखाराम चव्हाण. पण ते कोणाच्याच ध्यानात येण्याचे काही कारणच नाही!)
नाही चिरा नाही पणती इतकी नक्कीच बाबूराव अर्नाळकरांच्या साहित्याची वाईट अवस्था मात्र झाली नाही. १९४०च्या दशकापासून सुरू झालेल्या त्यांच्या साहित्यलेखनाचा प्रवास डोळ्यांच्या विकारामुळे १९७०च्या दशकात विराम पावला. या ३०-३५ वर्षांच्या काळात बाबूरावांना रहस्यकथाकार म्हणून वाट्याला आली कोणालाही हेवा वाटावी अशी विलक्षण लोकप्रियता. त्यांच्या एकेका पुस्तकाच्या दोन दोन हजार प्रती दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत हा हा म्हणता खपून जात. हे इतके भाग्य साहित्यचंद्र वगैरे असलेल्या ना. सी. फडकेंपासून साहित्यसूर्य असलेल्या आचार्य अत्रे या समकालीनांनाही लाभले नव्हते.
आता ही सगळी माणसे काळाच्या पडद्याआड गेली आहेत. पण तुम्हा-आम्हाला आजही फडके, अत्रे यांची पुस्तके सहजी बघायला मिळतात. आजही त्यांच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या निघतात.चांगलेच आहे. जे काही संचित आहे ते जपलेच पाहिजे. पण मग बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या काढाव्या, हे एक-दोन प्रकाशकांनाच वाटत राहते. बाबूरावांची १८०० पुस्तके छान संग्रहित करून ठेवली आहेत, असे एकही जाणते ग्रंथालय या उभ्या-आडव्या महाराष्ट्रात नाही! पण हे राज्य एकांड्या शिलेदारी करणाऱ्या वेड्यांचे जरूर आहे.त्यातूनच भव्यदिव्य कामे उभी राहिली आहेत. वि. का. राजवाडेंपासून किती किती नावे घ्यावीत!
असेच एकांडे शिलेदार होते बाबूराव अर्नाळकरांचे जीवश्चकंठश्च मित्र विभाकर कर्वे. बाबूराव गिरगावमध्ये राहात होते तेव्हापासून या मैत्रीची सुरुवात झाली.विभाकर कर्वेंनी आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणाकरिता रेल्वेमध्ये निवृत्तीपर्यंत ज्या निष्ठेने नोकरी केली, त्याच निष्ठेने दुसरे कामही केले ते म्हणजे बाबूरावांच्या पहिल्या पुस्तकापासून ते शेवटच्या पुस्तकापर्यंत सर्व पुस्तके त्यांनी मनापासून वाचली. एकदा नाही दोनदा, तीनदा... तसेच अर्नाळकरांच्या १८०० पुस्तकांचा एकहाती संग्रह केला विभाकर कर्वे यांनी अगदी प्रेमाने...बाबूरावांबद्दल जाणून घ्यायची ज्यांना असीम ओढ लागली होती, त्या प्रख्यात चित्रकार सतीश भावसार यांच्यासाठी विभाकर कर्वे मार्गदर्शक बनले बाबूराव नावाच्या दीपस्तंभाकडे नेणारे... ही सारी वाटचाल सुरू होती गेली पाच वर्षे. त्यातूनच सतीश भावसार यांनी संपादित केलेला निवडक बाबूराव अर्नाळकर हा डबल क्राऊन आकाराचा ७०० पानांचा ग्रंथराज राजहंस प्रकाशनाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकाला प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रस्तावना आहे.बाबूराव अर्नाळकर यांचे व्यक्तिमत्त्व व लेखनपैलूंविषयी कुमार केतकर, रत्नाकर मतकरी, अभिराम भडकमकर, अंबरिश मिश्र अशा दहा नामवंतांनी आपापले अनुभव लेखबद्ध केले आहेत. तसेच लता मंगेशकर यांनीही अर्नाळकरांविषयी लिहिले आहे.बाबूरावांच्या १८०० पुस्तकांपैकी पहिल्या ५०० पुस्तकांमधून दहा पुस्तके निवडून ती या ग्रंथात छापण्यात आली आहेत. त्यात जसे ‘चौकटची राणी’ हे बाबूरावांचे पहिले पुस्तक आहे, तसेच सुवर्णकाराचे रहस्य आणि अजून आठ पुस्तके... ही दहाही पुस्तके या एकाच मोठ्या पुस्तकात पाहता-वाचता येतील...त्याशिवाय बाबूराव अर्नाळकरांची चरित्रात्मक ओळख करून देणारा एक लेख, बाबूरावांना त्यांच्या वाचकांनी पाठविलेली काही पत्रे, असे बरेच काही रंजक नि रोमांचक ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’मध्ये असेल...
‘निवडक बाबूराव अर्नाळकर’पर्यंतचा जो प्रवास झाला, त्याविषयी बोलते करावे,म्हणून चित्रकार सतीश भावसार यांच्याकडे मोर्चा वळविला. सुमारे पाच हजार पुस्तकांची मुखपृष्ठे तयार केलेला हा दिग्गज कलावंत.अनेक लेखक, प्रकाशक अजमावलेला माणूस. पुस्तक सजवता सजवता संपादनाच्या जंजाळात कसा सापडला?सतीश भावसार सांगू लागले, ‘डिटेक्टिव्ह रामराव, धनंजय, सुदर्शन, फु मांचू यांसारखे सुमारे १०० मानसपुत्र बाबूराव अर्नाळकरांनी आपल्या रहस्यकथांमधून जन्माला घातले अाहेत. त्यातील जास्त नावाजले गेलेले म्हणजे झुंजार, काळा पहाड असे चार-पाचच. बाबूरावांच्या कादंबऱ्यांनी माझ्या मनाचा कब्जाच घेतला होता. १९८६मध्ये पुण्याहून चित्रकलेचे पदवी शिक्षण घेऊन पुढील वाटचालीसाठी मुंबईत आलो.पुस्तकांची व चित्रकलेशी संबंधित कामे कालांतराने मिळत गेली. आयुष्य स्थिरावत गेले. पण या कामाच्या धबडग्यातही बाबूराव अर्नाळकरांच्या लेखनाने मला घातलेली मोहिनी काही केल्या उतरायला तयारच नव्हती.’
"बाबूराव अर्नाळकरांची पुस्तके मी लहानपणापासूनच वाचत होतो. मुंबईत आल्यानंतर त्यांची पुस्तके मिळवून ती वाचण्याचा सपाटा आणखीन वाढला. त्यांना प्रत्यक्षात कधी भेटण्याचा योग मला आला नाही. मात्र बाबूराव अर्नाळकरांच्या पिढीतील कोणी व्यक्ती भेटली की मी हमखास त्यांच्याकडे बाबूरावांच्या पुस्तकांचा विषय काढायचो. मग ते गृहस्थ त्या पुस्तकांच्या आठवणीत रंगून जायचे. कोणाकडे बाबूरावांच्या रहस्यकथांची २०० पुस्तके संग्रही असायची, तर कोणाकडे ४०. पण ती निगुतीने त्यांनी जपून ठेवलेली असायची.त्यातला एखादा अर्नाळकरांना आपण कसे भेटलो, त्यांच्याशी काय बोललो, याच्या आठवणी सांगण्यात रंगून जायचा.बाबूरावांविषयी जी जी माहिती मिळेल ती मी गोळा करत होतो. तो ध्यासच लागला होता.'भावसारांचे विचारभाव शब्दांतून व्यक्त होत होते.
‘२०१२मधील गोष्ट असेल. काही कामानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथे लोकवाङ‌्मय गृह या प्रकाशनसंस्थेच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे अरुण शेवते,प्रकाश विश्वासराव व मी गप्पा मारत बसलो होतो. त्या वेळी लोकवाङ‌्मय गृहच्या एका कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बोलणे चालू होते. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा कोणाला बोलवायचे, असा विषय निघाला.मी चटकन बोलून गेलो की, बाबूराव अर्नाळकर आज असते तर मी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले असते. माझे हे उद्गार ऐकून विश्वासराव व शेवते यांना आश्चर्य वाटले. मग मी त्या दोघांना बाबूराव अर्नाळकरांबद्दल माझ्याकडे जी जी माहिती होती ती सांगत राहिलो. बाबूराव अर्नाळकर या विषयाने मला पछाडले आहे, हे लक्षात येताच ‘लोकवाङ‌्मय गृह’च्या प्रकाश विश्वासरावांनी मला या विषयावर पुस्तक लिहिण्यास सांगितले व त्यासाठी एक वर्षाची मुदतही दिली. मला हे सारे अकल्पितच होते.माझे सारे
व्याप सांभाळून अर्नाळकर यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी माहिती गोळा करायच्या धडपडीला लागलो. दादरमध्ये पुस्तकांचे दुकान असणारे वसंत तेंडुलकर यांनी मला अर्नाळकरांचे मित्र विभाकर कर्वे यांचा कल्याणचा पत्ता दिला. कर्वे यांच्याकडे बाबूरावांच्या आठवणी व त्यांच्या पुस्तकांचा जो खजिना गवसला त्यामुळेच ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ हे पुस्तक होऊ शकले.या कामगिरीची खास नोंद घेण्यासाठी विभाकर कर्वे यांची माहिती देणारे एक स्वतंत्र पानच या पुस्तकात िदलेले आहे. ‘लोकवाङ‌्मय गृह’ने हा प्रकल्प सुचविल्यानंतरची पुढील तीन वर्षे माझ्याकडे अर्नाळकरांविषयी पुरेशी माहिती जमा होऊ शकली नव्हती. मात्र विभाकर कर्वेंची भेट झाल्यानंतर मिळालेल्या माहितीमुळे अर्नाळकरांवर भलाथोरला ग्रंथ होईल, असा विश्वास बळावू लागला.’ भावसार गतआठवणींमध्ये रंगून गेले.
बाबूराव अर्नाळकरांच्या कोणत्याही कामात अडथळ्यांची शर्यत ही ठरलेलीच.त्यांच्यावरील पुस्तकदेखील त्याला अपवाद का ठरावे? हा प्रकल्प ज्या ‘लोकवाङ‌्मय गृह’ने सुचवला होता, त्यांनीच कालांतराने अर्नाळकरांवरील मोठ्या पृष्ठसंख्येचे पुस्तक छापणे शक्य नाही, असे कळवले. सतीश भावसारांनी मग एकच केले. त्यांनी अर्नाळकरांविषयी जे जे जमविले होते, ते सारे बासनात गुंडाळले व कपाटात ठेवून दिले. त्या मजकुराला कदाचित पुन्हा उजेड दिसणारच नाही, या भावनेने. वर्षभरापूर्वी भावसार काही कामानिमित्त राजहंस प्रकाशनाच्या कार्यालयात गेले होते. गप्पा मारताना दिलीप माजगावकरांनी त्यांना विचारणा केली, ‘नवीन काय करताय?’भावसार म्हणाले, ‘अर्नाळकरांविषयी खूप काही जमवले होते...’ यावर माजगावकर म्हणाले, ‘जे जमवले आहे ते सारे आम्हाला द्या.’ मग राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ.सदानंद बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ या पुस्तकाला आकार येऊ लागला...त्यामुळे या पुस्तकाला अजून काही चांगले पैलू जोडले गेले... ते प्रत्यक्ष पुस्तकात पाहायला मिळतीलच...’
भावसारांना अजून खूप काही सांगायचे होते बाबूराव अर्नाळकरांविषयी, त्यांच्या लेखनाविषयी; पण कुठेतरी सीमा असावीच लागते. काळा पहाड, झुंजार या मानसपुत्रांचे रचयिता बाबूराव अर्नाळकरांवर प्रसिद्ध होणारे पुस्तकच जणू आता या विषयाची मैफल जनमानसात रंगवणार असल्याने आम्ही दोघांनी अर्नाळकरांवरील गप्पा आटोपत्या घेतल्या...

------
उकल अर्नाळकरी शैलीची...
बाबूराव अर्नाळकर हे मूळचे वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे. पुढे रहस्यकथा लिहिताना हेच गाव त्यांच्या टोपणनावात अगदी फिट्ट बसले.लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड. नाटके लिहावीत, त्यात काम करावे, असाही खाक्या. त्यामुळे चंद्रकांत सखाराम चव्हाण असे मूळ नाव असलेल्या या मुलाला नाटकमंडळींत बाबू या नावाने हाक मारली जायची. पुढे हाच बाबू "बाबूराव' झाला लेखक म्हणून.बाबूरावांनी नाटके लिहिली आहेत, ललित साहित्यही लिहिले आहे. इतकेच काय, "वैतरणाच्या तीरावरून' नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहायला घेतले होते.ते अपुरे राहिले. त्याची पंधरा-वीस पानेच आज उपलब्ध आहेत. "मनोरंजन'मासिकात "सतीची समाधी' नावाची बाबूरावांनी आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेचे कौतुक साक्षात नाथ माधवांनी केले होते.ही कथा वाचून गिरगावात व्ही. आर. प्रभू(अभिनेता बबन प्रभू यांचे वडील) यांचा छापखाना होता. त्यांनी बाबूरावांना एक पुस्तक लिहायची विनंती केली. त्यातून बाबूरावांनी "चौकटची राणी' हे पहिले पुस्तक लिहिले. व्ही. आर. प्रभू यांनी काही मुलांना हाताशी धरून या पुस्तकाची रस्त्यावर उभे राहून विक्री करण्याचे अनोखे तंत्र अवलंबले, ते कामाला आले.अवघ्या दोन महिन्यांत चौकटची राणीच्या ५०० प्रती संपल्या. मग सिलसिला सुरू झाला तो अखंड रहस्यकथा लेखनाचा.प्रभू यांनीच अर्नाळकरांची पहिली काहीशे पुस्तके छापली आहेत. त्यानंतर मग अर्नाळकर अन्य प्रकाशकांकडे वळले.बाबूराव अर्नाळकर महिन्यातून चार ते पाच रहस्यकथांची पुस्तके लिहीत असत.त्या प्रत्येक पुस्तकाचे त्यांना मिळणारे मानधन मात्र अगदीच अल्प होते. त्यामुळे गिरगावमध्ये चश्म्याचे दुकान उघडून त्यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविला होता. एडगर वॉलेस हा रहस्यकथाकार त्यांचा आवडता.बाबूरावांच्या पहिल्या काही पुस्तकांवर वॉलेसच्या शैलीची छाप स्पष्ट दिसते. पण त्यातून अर्नाळकर लवकरच बाहेर आले.त्यांना त्यांची शैली गवसली. झुंजार,काळा पहाड आदी त्यांचे मानसपुत्र गिरगाव, ग्रँटरोडपासून ते अख्ख्या मुंबईत जिथे जिथे आपले कारनामे करीत भ्रमण करीत तो परिसर ते आपल्या कादंबऱ्यातून जिवंत करू लागले.झुंजार महाल शोधण्यासाठी त्यांचे वाचक हातात रहस्यकथेचे पुस्तक घेऊन गिरगावपासूनचा परिसर पालथा घालू लागले. अर्नाळकरांच्या कथानायकांना चित्ररूप देऊन जिवंत केले ते प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी. हा रहस्यकथांचा डौल काही वेगळाच होता...पण बाबूराव अर्नाळकरांच्या या कामगिरीची मराठीतील मठाधिपती साहित्यिक व समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही. त्यांना रहस्यकथाकार म्हणून कायमच दुय्यम स्थान दिले. ही खंत नक्कीच बाबूरावांच्या मनात होती. त्यांचा जन्म ९ जून १९०६चा. बाबूराव अर्नाळकरांना डोळ्यांचा विकार जडल्याने त्यांचे लेखन १९८८-८९च्या कालावधीत कायमचे बंद झाले होते. त्यांचा मृत्यू झाला ४ जुलै १९९६ रोजी. त्यांना पाच मुले, तीन मुली. त्यापैकी आता दोन मुली, एक मुलगा हयात आहेत. बाबूराव अर्नाळकरांच्या आठवणी जशा त्यांच्या परिवाराकडे आहेत तशाच त्यांच्या असंख्य आठवणी त्यांच्या हजारो वाचकांच्या मनातही आहेत. त्या सगळ्यांचेच स्मरणरंजन आहे "निवडक बाबूराव अर्नाळकर' पुस्तकात.
-----------------
अर्नाळकरांची कीर्ती सांगती लतादीदी...
बाबूराव अर्नाळकर आणि मंगेशकर कुटुंबीयांमध्ये स्नेहबंध होते. मुंबईत ग्रँटरोड पश्चिमेला १९व्या शतकामध्ये नाना शंकरशेठ यांनी बांधलेलेे शंकराचे देऊळ आहे. या देवळाच्या परिसरात पूर्वी धर्मशाळा होती. गंधर्व नाटक मंडळीचा मुंबई दौरा असेल तेव्हा त्या नाटक कंपनीचा मुक्काम याच देवळाच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेत असे. या देवळाशेजारीच जी एक चाळ होती त्यामध्ये मंगेशकर कुटुंब त्यांच्या संघर्षकाळात वास्तव्य करून होते.मंगेशकर कुटुंबीय राहात होते त्या खोलीच्या शेजारीच बाबूराव अर्नाळकर राहात होते. बाबूरावांची मुलगी उषा व लता मंगेशकर त्या वेळी लहानग्या होत्या.त्या दोघी एकत्रित गाणे शिकायला जायच्या. चित्रकार सतीश भावसार यांना ही माहिती कळताच त्यांनी "निवडक बाबूराव अर्नाळकर' या पुस्तकासाठी लतादिदींच्या आठवणी मिळविण्यासाठी मंगेशकरांचे निकटवर्तीय असलेल्या विविध व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. पण ते फलद्रूप ठरले नाहीत. लता मंगेशकर यांच्याकडून आठवणी किंवा अभिप्राय मिळण्याची वाट बघत मधल्या काळात चार महिने पुस्तकाचे कामही थांबविण्यात आले होते. इतके या मजकुराचे महत्त्व या ग्रंथाचे संपादक व प्रकाशकांना वाटत होते! खूप प्रयत्न करूनही काहीही होत नाही, असे लक्षात आल्यानंतर एक दिवस सतीश भावसार त्यांच्या दादरच्या कार्यालयात आले असताना त्यांच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. भावसार यांनी लता मंगेशकर यांना एक पत्र लिहायला घेतले.त्यात "निवडक बाबूराव अर्नाळकर' या पुस्तकामध्ये नेमके काय काय असणार आहे, याविषयी सविस्तर माहिती नमूद केली. त्याचबरोबर तुमच्या अर्नाळकरांविषयीच्या आठवणी किंवा अभिप्राय द्यावा, अशी विनंती या पत्रात भावसारांनी केली. पत्र लिहून झाल्यावर ते तातडीने लता मंगेशकर यांच्या पत्त्यावर कुरिअरने पाठवून दिले.
पत्र पाठवून दोन दिवस उलटले असतील. तिसऱ्या दिवशी भावसार यांच्या घरचा फोन खणखणला. भावसार तेव्हा घरी नव्हते. त्यांची मुलगी सानिकाने हा फोन घेतला. "मी लता मंगेशकर बोलतेय'... पलीकडून आवाज आला. "भावसारांचे पत्र मिळाले. त्यानुसार मी अभिप्राय लिहून ठेवलेला आहे. तुम्ही माझ्या घराच्या जवळपास येणार असाल तर ते पत्र कृपया स्वत: येऊन घेऊन जा किंवा तुम्हाला शक्य नसेल तर मी ते तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठविण्याची व्यवस्था करते.' असे साक्षात लतादीदी पलीकडून सांगत होत्या. हा फोन ठेवल्यानंतर सानिकाने आपल्या वडलांना सतीश भावसारांना फोन करून लगेच ही सारी माहिती दिली.
हे दिवस गेल्या वर्षीच्या नवरात्रौत्सवातील होते. सतीश भावसार व त्यांची मुलगी सानिका लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. दीदींनी त्यांचे आगतस्वागत केले. "निवडक बाबूराव अर्नाळकर' या ग्रंथासाठी आपला अभिप्राय लिहिलेले पत्र भावसार यांच्या हाती सुपूर्द केले. भावसार यांना कृतकृत्य वाटले त्या वेळी. या अभिप्रायात लतादीदींनी लिहिले आहे की, "रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकरांबरोबर आम्हा मंगेशकरांचा, खास करून आमची आई"माई' हिचा परिचय होता. तिच्यामुळे आम्हा भावंडांना बाबूरावांच्या रहस्यकथा वाचण्याची आवड निर्माण झाली. धनंजय,छोटू, झुंझार, काळा पहाड या रहस्यकथा आम्ही वाचलेल्या आहेत. आपण निर्माण करीत अाहात त्या ग्रंथाला आम्हा मंगेशकर भावंडांच्या मनापासून शुभेच्छा!'
लता मंगेशकर यांनी बाबूराव अर्नाळकर यांच्याविषयी जो अभिप्राय दिला तो सारा प्रसंगच सतीश भावसार यांच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे ही आठवण सांगताना चित्रकार सतीश भावसार हरखून गेले होते.
अर्नाळकरांचा धनंजय व सी. रामचंद्र
लती मंगेशकर व सी. रामचंद्र यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठी एकत्रित कामगिरी केली आहे. दोघांनाही बाबुराव अर्नाळकर हे लेखक आवडायचे. बाबुराव अर्नाळकर यांच्या कादंबरीवर आधारित धनंजय नावाचाच एक मराठी चित्रपट आला होता. त्या चित्रपटाला संगीत दिले होते सी. रामचंद्र यांनी व धनंजयचीच भूमिकाही त्यांनीच केली होती. तेच या चित्रपटाचे निर्मातेही होते. सी. रामचंद्र दिसायला देखणे, सहा फुटाहून अधिक उंचीचे. मात्र त्यांच्या रुपाची जादू मात्र हा चित्रपट यशस्वी करु शकली नाही. `जीवाच्या सखीला कितीदा पुकारु, किती साद घालू, किती हाक मारु' हे सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले व महेंद्र कपूर, उषा मंगेशकर यांनी गायलेले सुश्राव्य गाणे हीच काय ती धनंजय या चित्रपटाची लोकांच्या मनात राहिलेली आठवण. हे गाणे आता यू ट्यूबला रसिकांना ऐकायला मिळते पण ऑडियो स्वरुपात. त्या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अजून तरी अपलोड झालेला नाही.
-------

Tuesday, January 10, 2017

माणदेशातल्या महिलांच्या जिद्दीची गोष्ट - समीर परांजपे - मधुरिमा, दै. दिव्य मराठी १० जानेवारी २०१७



मुंबईत ५ ते ८ जानेवारी २०१७ या कालावधीत भरलेल्या माणदेशी महोत्सवाबद्दल दिव्य मराठी या वृत्तपत्रात मधुरिमा या महिलाविषयक पुरवणीमध्ये दि. १० जानेवारी २०१७ रोजी मी लिहिलला हा लेख. त्या लेखाचा पूर्ण मजकूर, जेपीजी फाइल, वेब आणि टेक्स्ट लिंकही पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjape-writ…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/10012017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/10012017/0/7/
---------------------------------
माणदेशातल्या महिलांच्या जिद्दीची गोष्ट
-------------------------------------------
-समीर परांजपे
-------------
‘झाड येलाचं,झाड बेलाचं,झाड सुरूचं,झाड पेरूचं
करकरा लवं बाई मोगरा जाई’
जात्यावरील या ओवीचे सुस्वर निघत होते केराबाई सरगर यांच्या मुखातून.त्या गात असलेल्या ओव्या रेकॉर्ड करून घेण्यासाठी सात-अाठ जण आपले स्मार्टफोन त्यांच्यासमोर घेऊन उभे तेही अदबीने.लहानपणापासून ऐकलेल्या या ओव्या केराबाईंच्या मनीमानसी होत्याच,पण आता त्यांचा हा स्वर गुंजतो आहे माणदेशी फाउंडेशनने सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावी सुरू केलेल्या माणदेशी तरंग वाहिनी म्हणजे कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून.त्या या रेडिओ केंद्राच्या आरजे म्हणून प्रसिद्ध आहेत!आता वय वर्षे ५५ असलेल्या केराबाई सरगर लहानपणापासून पुणे,मुंबई रेडिओ केंद्र ऐकायच्या.त्यांनाही असे वाटायचे की,आपला आवाज रेडिओत आला पाहिजे.तो आवाज सरतेशेवटी माणदेशी तरंग वाहिनीतून ऐकायला मिळाला.हा चमत्कार होता,माणदेशी फाउंडेशनने त्या भागात महिला सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न केले त्यातून घडलेला.माणदेशी फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्यमंिदर संकुलामध्ये नुकताच माणदेशी महोत्सव आयोजिण्यात आला होता.त्यात केराबाई सरगर यांचा टेराकोटा भांड्यांचा स्टाॅल होता.त्या स्टॉलवरच‘जात्यावरच्या ओव्यांची ध्वनिमुद्रण परिषद’भरली होती!
केराबाईंशी संवाद साधताना त्या जुन्या आठवणींत रमल्या.‘सातारा जिल्ह्यातील माण तालुका म्हणजे सदानकदा दुष्काळी भाग.जे पेरले त्यातूनच जितके उगवले त्यातच भागवले,अशी अवस्था.या भागात ग.दि.माडगूळकर,व्यंकटेश माडगूळकर असे मोठमोठे लेखक होऊन गेले.व्यंकटेश माडगूळकरांनी‘माणदेशी माणसं’हे पुस्तक लिहून हा प्रदेश अमरच केला आहे.मात्र माण अजूनही दुष्काळी आहे.मी माण तालुक्यातील म्हसवडची.लहानपणापासून स्वत:चे काही करावे,अशी जिद्द होतीच.सामाजिक कार्यकर्ते चेतना व विजय सिन्हा यांनी स्थापन केलेल्या माणदेशी महिला बँकेने मला सहकार्याचा,कर्जाचा हात देऊ केला.त्यातून टेराकोटा भांड्यांचा व्यवसाय आम्ही अधिक वाढविला.हा आमचा परंपरागत व्यवसाय.आधी गाव,फार तर सातारा जिल्हा बाजारापर्यंत जाऊन विक्री करण्याची मजल होती.आता आम्ही महाराष्ट्रात व राज्याबाहेरही विक्रीसाठी जातो,’केराबाईंच्या डोळ्यांत हे सारे सांगताना कृतज्ञता दाटून आली होती.केराबाईंच्या टेराकोटा भांड्यांच्या स्टॉलवर त्यांचा मुलगा व सूनही होते.ही भांडी बनविण्यात केराबाई माहीर आहेत,हे सांगताना त्यांना विलक्षण अभिमान वाटत होता.ही एकाच स्टॉलवरची कथा नव्हती.या माणदेशी महोत्सवात सुमारे २० स्टॉल मांडलेले होते.प्रत्येक स्टॉलवर अशी कर्तृत्वगाथा व कर्तृत्वशालिनी ठळकपणे दिसत होती.माणदेशी फाउंडेशन व माणदेशी महिला बँकेचे काम आता फक्त सातारा जिल्ह्यापुरते नाही तर महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांत व गुजरातमध्येही विस्तारले आहे.विविध महिला तसेच बचत गटांना आर्थिक साहाय्य करून त्यांना स्वत:चा उद्योग उभारण्यास प्रोत्साहन देणे,त्यांना तंत्रज्ञानकुशल बनविणे अशी मुख्य उद्दिष्टे या संस्थांनी आपल्या कामातून साध्य केली आहेत.
इथल्या एका स्टॉलवर मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या विविध वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या.त्यामध्ये जेन,घोंगडी,बसकर,हसन,उशी,टोपी,मोपरेला अशा वस्तूंचा समावेश होता.या वस्तू मुंबईत एरवी दिसणं अशक्य,त्यामुळे अधिक बारकाईने बघितल्या गेल्या.तो स्टॉल होता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा गावच्या बिबि फातिमा कृषि महिला स्वयंसेवी सहबचत गटाचा.या गटाच्या अध्यक्षा बिस्मिल्ला हारून नदाफ यांचा तो स्टॉल.त्या मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती सांगत असताना मुंबैकर महिलांचा भोवती गराडा पडलेला.माहिती सांगून झाल्यावर पटापट विक्रीही झाली.बिस्मिल्ला म्हणाल्या,माणदेशी महिला बँकेने आमच्या बचत गटाला मदत केली व स्वत:च्या पायावर उभे केले.मुंबईत येण्याआधी केरळमध्ये एका प्रदर्शनात स्टॉल लावून या वस्तूंची विक्री केली व मुंबईत आलो,असे आत्मविश्वासाने बिस्मिल्ला यांनी सांगताच त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या पतीनेही आनंदाने त्यात आपला स्वर मिसळला.
बुरुड जमातीच्या बेबी हिरा जाधव.त्यांच्या स्टॉलवर बांबूपासून विणलेल्या टोपल्या,फुलदाणी,देव्हारा साफ करायचा साळुला अशा विविध वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या.१५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या वस्तू इथे मांडलेल्या होत्या.नुसत्याच मांडलेल्या नव्हत्या तर त्या प्रत्यक्ष तिथे बनविणे सुरू होते.त्यामुळे वस्तू विकत घेणाऱ्यांना त्या बनविताना बघण्याचाही दुहेरी आनंद.
त्याच्या पुढचा स्टॉल होता तानाजी हनुमंत यादव यांचा.ते बोरीच्या झाडाच्या लाकडापासून बनवत होते रवी,लाटणी,तसेच किचन ओट्यावर आले वगैरे चेचण्यासाठी लागणारे लाकडी उपकरण.बटाटे मॅश करायला,पावभाजी बनवायला लागणारे लाकडी उपकरणही त्यांनी विकायला ठेवले होते.
राधाबाई चौघुले ही पाथरवट व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील महिला.तिच्या स्टॉलवर छोट्या छोट्या आकाराची जाती,पाटा-वरंवटा,खलबत्ते अशा अनेक वस्तू होत्या.मुंबैकर बायका जाती,पाटा-वरवंटा विकत घेत होत्या.जात्याची किंमत १५०० रु.पाटा-वरंवटा ५०० रुपयाला.राधाबाईंचा मुलगा अर्जुनने मस्त माहिती दिली.‘योगगुरु रामदेवबाबा सांगतात की,गरोदर महिलांनी जात्यावर दळले पाहिजे,त्यासारखा चांगला व्यायाम नाही.त्यामुळे गर्भवती महिला ही छोट्या आकाराची जाती विकत घेतात.पाटा-वरवंट्यावर वाटण करणे हेदेखील व्यायामाचा भाग म्हणून पाहिले जाते.या गोष्टींवर बनविलेल्या पदार्थांची चव वेगळीच;पण आता जाते,पाटा-वरवंटा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.’माणदेशी महिला बँकेने अर्थसाहाय्य देऊन ज्यांना स्वत:च्या पायावर उभे केले त्यात राधाबाईदेखील होती.या सगळ्या दगडी वस्तू आपल्याला लहानपणापासून तयार करता येतात,हे त्यांनी बोलक्या डोळ्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगावच्या श्रीराम स्वयंसाहाय्यता महिला बचत गटाच्या स्टॉलवर विक्रीला होती मातीची भांडी.मातीच्या तव्यापासून माठापर्यंत अनेक प्रकार.त्यांच्या किमतीही जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत.मुंबईत मातीचा माठ वापरणारे आता कमी उरलेत.त्यामुळे या प्रदर्शनात अशा काही वस्तू दिसल्या की,अजि म्या ब्रह्म पाहिले,अशी अवस्था होते.हे स्टॉल बघत असताना माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांची भेट झाली.त्या म्हणाल्या,‘माणदेशातील महिला उद्योजकांना या प्रदर्शनाद्वारे जगापुढे आणण्याचा हेतू होता.त्याशिवाय त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होता.’
या चार दिवसांच्या महोत्सवात अनेक महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. त्यांनी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.माण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या माणदेशी महिला बँक व सामाजिक कणा असलेल्या माणदेशी फाऊन्डेशनने या भागातील महिलांचे जे सक्षमीकरण केले तेही गाजावाजा न करता.असे प्रयत्न महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात रुजले,वाढले तर महिला विकास अधिक चांगला आकार घेईल.पण त्यासाठी जिद्द हवी.ती शोधायची असेल तर त्यासाठी दुष्काळी
ओळख असलेल्या माणदेशातल्या माणसांना भेटायला हवं.
sameer.p@dbcorp.in

Monday, December 26, 2016

मेरा नाम (सपनों का) सौदागर- राज कपूरच्या मेरा नाम जोकर चित्रपटाबद्दल लेख - दै. दिव्य मराठी २५ डिसेंबर २०१६ - समीर परांजपे







दै. दिव्य मराठीच्या रसिक या पुरवणीमध्ये दि. २५ डिसेंबर २०१६ रोजी मी लिहिलेला हा लेख व त्याची जेेपीजी फाइल.
-------------
स्लग : नॉस्टेल्जिया
-------------------
बायलाइन : समीर परांजपे
-------------------
हेडिंग : मेरा नाम (सपनों का) सौदागर
------------------
इंट्रो : ‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूरचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. आयुष्यभर ‘मिसअंडरस्टुड मास्टरपीस'चा मळवट भरून आपले सौभाग्य अजमावत राहिला. अगदी गेल्या १४ डिसेंबरला राज कपूरच्या ९२व्या वाढदिवशी या चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईत झाला, तेव्हाही हाच माहोल होता. मात्र, ‘मेरा नाम जोकर’मध्ये मरिनाची भूमिका साकारलेली रशियन कलावंत सेनिया रिबिनिका या वेळी हजर होती, आणि तिच्या त्या निळ्याशार डोळ्यांत केवळ कृतज्ञता आणि कौतुक झळकत होते...
------------------
ब्लर्ब : ज्या ‘मेरा नाम जोकर’ने कपूर घराण्याला कर्जाच्या खाईत लोटले, तोच चित्रपट १९९० सालानंतर आर. के. फिल्म्सला खूप पैसे मिळवून देतो आहे.
------------------
‘जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही हम थे जहाँ, अपने यहीं दोनो जहाँ, इस के सिवा जाना कहाँ...' हे सगळे सांगतोय एक विदूषक... राजू त्याचे नाव... तोच स्वत: दु:खात ग‌ळ्यापर्यंत बुडालेला. तरीही त्याला हसवायचे आहे, आम जनतेला. त्यातूनच तो स्वत:मागच्या कटकटी विसरण्याचा मार्ग शोधतोय... मग त्याने तोंडाला रंग लावलाय. रंगीत आवरणाने नाक मस्त फुगीर केलेय. डोक्यावर शंकूच्या आकाराची चित्रविचित्र रंगांनी मढलेली टोपी घातलीय. वेषही असाच बावळा ठेवलाय... राजू बन गया सर्कशीतला जोकर...! वास्तवातला राज कपूर या राजू जोकरच्या रूपात प्रेक्षकांना खूप काही सांगू पाहात होता... १९७० सालातली ही गोष्ट... पण ‘सपनों के सौदागर’ राज कपूरचा हा अलग प्रयत्न प्रेक्षकांनी मनावर घेतलाच नाही. ‘मेरा नाम जोकर' हा चित्रपट दणकून सणकून आपटला. या चित्रपटाच्या निर्मितीत राज कपूरने अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. अपयशामुळे अख्ख्या कपूर खानदानाला कर्जबाजारी व्हायची पाळी आली... पण राज कपूरच तो... रडला, पण खचला नाही. तो पुन्हा उभा राहिला. अडनिड्या, अवखळ वयातली प्रेमकहाणी असलेला ‘बॉबी' चित्रपट त्याने बनविला. तो आवडला प्रेक्षकांना. पुन्हा पैशाच्या राशी आर. के. बॅनरच्या तिजोरीत धो धो जमा झाल्या. राज कपूरची मान पुन्हा ताठ झाली. पण... हृदयात त्याच्या शेवटपर्यंत कळ येत असे. ती असे ‘मेरा नाम जोकर’ची...का आवडला नाही लोकांना तो? हा प्रश्न राज कपूरच्या मनाला भुंग्यासारखा पोखरत असे.
चित्रपटसृष्टी असेच अजब, अतर्क्य रसायन आहे. कधी अमृत बनते, कधी अॅसिड... १९७०मध्ये ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाचा सीन सुरू होता. २०११मध्ये ट्रान्सफर सीनही पुढे आला.
भारतीय अांतरराष्ट्रीय फिल्म अकादमी (आयआयएफए) आणि टोरोंटो अांतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव (टीआयएफएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने टोरोंटो येथे ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले. त्या प्रसंगी राजसाहेबांचे सुपुत्र अभिनेते दिग्दर्शक रणधीर कपूर प्रमुख पाहुणे. समारंभात रणधीर बोलून गेले, ‘ज्या ‘मेरा नाम जोकर’ने कपूर घराण्याला कर्जाच्या खाईत लोटले, तोच चित्रपट १९९० सालानंतर आर. के. फिल्म्सला खूप पैसे मिळवून देतो आहे. विशेष कार्यक्रमप्रसंगी किंवा टेलिव्हिजनवर जेव्हा जेव्हा हा चित्रपट दाखविला जातो, तेव्हा आम्ही खूप कमाई करतो... पैशाच्या दृष्टीनेही आता ‘मेरा नाम जोकर’ एक यशस्वी चित्रपट बनला आहे. आज राज कपूर असते तर त्यांना आपल्या या चित्रपटािवषयी असलेला अभिमान आणखी दुणावला असता...'
या साऱ्या गतप्रसंगांची आठवण राज कपूरप्रेमींना होणे साहजिक होते, कारण तो दिवसही तसाच होता... १४ डिसेंबर. राज कपूर आज हयात असते तर यंदा या दिवशी त्यांचा ९२वा वाढदिवस असता. ‘मेरा नाम जोकर’मधला राजू जोकर म्हणतो, ‘ये मेरा गीत जीवन संगीत, कल भी कोई दोहरायेगा, जग को हँसाने बहरूपिया, रूप बदल फिर आयेगा.' सच्चे रसिक कधीच काही विसरत नाहीत. ‘मेरा नाम जोकर’मध्ये आहे, सारा सर्कस माहोल. सर्कशीतील ट्रॅपिझ खेळाडूंच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी खास रशियाहून त्या वेळी कलावंत बोलावले होते. त्यातीलच एक होती सेनिया रिबिनिका... यंदा तिलाच खास मुंबईत पाचारण करण्यात आले. राज कपूरच्या वाढदिवशी ‘मेरा नाम जोकर’चा खास खेळ आयोजिण्यात आला. त्याला उपस्थित असलेल्या रणधीर, ऋषी, राजीव कपूर यांच्या साक्षीने सेनिया रिबिनिका खूप खूप बोलली या चित्रपटाबद्दल.
सेनिया बोलली, त्यापेक्षा तिचे निळेशार डोळे जास्त बोलत होते. ‘मेरा नाम जोकर’च्या सोनेरी लडी उलगडताना ती सांगू लागली, ‘राजू जोकरची आई मरते, त्या वेळी मला रडण्याचे दृश्य द्यायचे होते. खूपच कष्ट घ्यावे लागले मला ते दृश्य करण्यासाठी. अशा वेळी राज कपूर यांच्यातील दिग्दर्शकाने कंबर कसली. माझ्या आतपर्यंत त्यांनी त्या रुदनाची अभिव्यक्ती पोहोचवली आणि मी घळाघळा रडले कॅमेऱ्यासमोर... निव्वळ नैसर्गिक अभिनय होता तो... असे एक नाही, अनेक अनुभव आहेत माझ्यापाशी या चित्रपटाचे.' सेनिया सांगता सांगता मध्येच थांबली. दीर्घ श्वास घेतला तिने. पुन्हा आठवणींच्या धुक्यात हरवली.
‘मेरा नाम जोकर’चा खास खेळ झाला गेल्या १४ डिसेंबरला. ती जागा होती, मुंबईतील पेडर रोडवरील ‘रशियन सेंटर ऑफ सायन्स अॅण्ड कल्चर’ची. इमारतीला सर्वत्र साऊंड प्रुफ खिडक्या. त्यामुळे आतला आवाज बाहेर नाही. बाहेरचा आतमध्ये नाही. पण तिथे त्या दिवशी जमलेल्या रसिकांच्या मनात राज कपूरच्या अभिनयाचा जो नाद घुमत होता, तो तेथे हजर असलेल्या सर्वांनाच ऐकायला येतच होता... सेनिया रिबिनिकाचे आता वय आहे ७४. ती व्हीलचेअरवरुनच वावरते कधीकधी. बायका आपले वय जरा कमीच सांगतात, असे म्हणतात. पण आपण ते थोडे वाढवू. सेिनया पाऊणशे वयोमानाची आहे, असे ढोबळ विधान करू. वृद्धत्वामुळे शारिरिक हालचाली मंदावल्या आहेत पण तिच्या मनाच्या उत्साहाचे वय मात्र पंचविशीचे असावे, असे कोणीही म्हणेल. आता ती पुन्हा सर्कशीतील ट्रॅपिझवर जाईल व खेळ सुरू करेल, असा एकंदरीत तिच्या वागण्यातील नूर होता. तिच्यासाठी राज कपूर म्हणजे राजू. ती संपूर्ण कार्यक्रमभर ‘राजू राजू’ म्हणतच त्या महान माणसाबद्दल बोलत राहिली. रशियन माणसांपैकी काही जणांचे इंग्रजी असते बरे, पण आपल्याला कळायला जरा कठीण. सेनियाचे इंग्रजी बोलही असेच कान टवकारून समजून घेण्याच्या लायकीचे. त्या बोलांतून झिरपणारे राजू कौतुक विलक्षणच.
तिला घरचे सगळे लाडाने म्हणतात साना. साना शब्दाचा अर्थ श्रद्धा. ती त्याच भावाने राज कपूरविषयी बोलत होती. "मेरा नाम जोकर' झळकला, तो पडला, पण त्याने माझ्या ओंजळीत दान घातले, ते चाहत्यांच्या हजारो पत्रांचे. त्या चित्रपटातील माझ्या भूमिकेचे धो धो कौतुक केले साऱ्यांनी. चित्रपटाची लांबी जरा मोठीच होती. कदाचित इतका वेळ तग धरणे प्रेक्षकांना शक्य झाले नसेल. चित्रपट पडला.
सेनिया रिबिनिकाला शोधले कसे राज कपूरने? गमतीशीरच कहाणी आहे ती. मरिना या ट्रॅपिज आर्टिस्टच्या भूमिकेसाठी राज कपूर सुयोग्य कलाकाराच्या शोधात होता. त्याला हवी होती परदेशी युवती. रशियामध्ये गेल्यानंतर विविध सर्कशींच्या तंबूत राज कपूर फेऱ्या मारायचा. सर्कशीचे खेळ मन लावून बघायचा. त्यातच एकदा राज कपूर बोल्शेई बॅले बघायला गेला. त्यात काम करणारी सेनिया त्याच्या डोळ्यांत भरली. हीच ती ‘मरिना’. राजच्या मनाने कौल दिला. मुळात सेनियाला चमकाबिमकायची फारशी आवड नव्हतीच. तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असलेली बहीण एलिना ही खरेतर त्या काळातील सेलिब्रिटी कलाकार. पण बॅले पाहिल्यानंतर राज कपूरला मलाच भेटावेसे वाटले. त्याने मला भूमिका देऊ केली. तो माझा होता दुसरा चित्रपट. त्याआधी एका चित्रपटात काम केले होते मी. ‘मेरा नाम जोकर’सहित आजवर किमान १५ ते १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत मी. त्यातील काही रशियन चित्रपट आहेत. पण सर्वात आवडती माझी भूमिका कोणती तर ती ‘मेरा नाम जोकर’मधील मरिनाचीच.
मरिना आणि राजू जोकरचा एक किसिंग सीन आहे चित्रपटात. १९७०चा माहोल लक्षात घेता, हे म्हणजे क्रांतिकारकच. पण किसिंग सीनचे काही अप्रूप सेनियाला नव्हते. बॅले करताना ते जोडपे एकमेकांना शरीरस्पर्श करतेच करते. ती स्पर्शाची जाणीव अभिव्यक्तीच्या क्षितिजावरील उगवता तारा बनते. वासनेचा वडवानल नाही पेटत त्यातून. सेनियालाही तेव्हा असेच वाटले अगदी.
ती खरे तर बॅलेत काम करणारी. तिला राज कपूरने सर्कशीत ट्रॅपिझचे खेळ करणारी कलाकार बनवून टाकले चित्रपटात. हा बदल तिला पचवणे सुरुवातीला जरा कठीणच गेले. सगळे काम सोडून रशियाला जायची इच्छा व्हायची. पण जिद्द आड यायची. अशातूनच मरिना साकारली गेली मेरा नाम जोकरमध्ये. या चित्रपटातील तिची भूमिका पाहून काही अन्य निर्मात्यांनी तिला आपल्या चित्रपटांत भूमिका देण्यासाठी बोलणी सुरु केली होती. पण नंतर माशी कुठेतरी शिंकली. तिला भारतात काही फारसे काम मिळाले नाही. ती परतली पुन्हा रशियामध्ये. काही फुटकळ भूमिका करुन वयाच्या ४०व्या वर्षी तिने निवृत्ती पत्करली! चाळीशीत माणूस पुन्हा जवान होतो मनाने आणि या बाईचे सारे उलटेच. तिचा नवरा लवकर वारला. तिचा मुलगा एगिन हा अभिनेता आहे.
मरिनाच्या भूमिकेनंतर राज कपूर इतका खूश झाला की, त्याने सेनियाला एक सोन्याची अंगठी भेट दिली. भारतीय शिष्टमंडळ मॉस्को फिल्म फेस्टिव्हलला गेले होते त्या वेळची ही गोष्ट. अंगठी देतोय, ही पर्सनल गिफ्ट आहे, हे सेनियाला सांगायला राज कपूर लाजत, संकोचत होता. त्याने कधीही सेनियाला पत्रे वगैरे लिहिली नाहीत, पण तिचा अभिनय त्याने कायमच लक्षात ठेवला. तिनेही त्याला लक्षात ठेवले अगदी त्या सोन्याच्या अंगठीसकट.
ख्वाजा अहमद अब्बास यांच्या लेखणीतून उतरलेली ‘मेरा नाम जोकर’ची कहाणी पडद्यावर येण्यासाठी तब्बल सहा वर्षे निर्मितीच्या चक्रात गुरफटलेली होती. व्यावहारिकदृष्ट्या आर. के. फिल्म्सला खड्ड्यात घालणारा हा चित्रपट लौकिकाच्या दृष्टीने मात्र आकाश व्यापून टाकणारा ठरला. एक क्लासिक फिल्म आयुष्यभर ‘मिसअंडरस्टुड मास्टरपीस'चा मळवट भरून आपले सौभाग्य अजमावत राहिली. राहणार आहे. त्यातील अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. काही मागे उरलेत. या सर्वांच्या मनात एकच भावना होती, ‘कल खेल में हम हों न हों, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा...'
"मेरा नाम जोकर'चा विशेष खेळ पाहून परतताना अशीच भावविभोर अवस्था प्रेक्षकांचीही झाली होती. १४ डिसेंबर १९२४ रोजी राज कपूरचा जन्म झाला. १४ डिसेंबर २०२४ रोजी राज कपूरची जन्मशताब्दी साजरी होईल... त्या दिवशीही ‘मेरा नाम जोकर’चाच झेंडा पुन्हा खांद्यावर घेऊन येण्याचे काही जणांनी या विशेष खे‌ळाच्या वेळीच ठरवून टाकले. ‘सपनों का सौदागर’ असे राज कपूरला म्हणतात ते अशाच गोष्टींमुळे...

Monday, December 12, 2016

डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....समीर परांजपे


 (सोबत दिलेल्या छायाचित्रात उजवीकडील डॉ. रमेश प्रभू.)
-------------
डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....
----------------------------------------
- समीर परांजपे
---
शिवसेनेचे माजी आमदार व मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांचे निधन झाले. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रमेश प्रभू यांचे ११ डिसेंबर २०१६ रोजी रविवारी सकाळी ६.२० वाजता निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी १९८७-८८ मध्ये मुंबईचे महापौरपद भूषवले होते. डॉ. प्रभू हे प्रथम १९७३ साली पार्ल्यातून नगरसेवक झाले. तसेच १९८५ ते १९९२ या काळात ते पार्ले येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९८७ साली आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाल्यावर पार्ले विधानसभा मतदार संघात विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार करुन मते मागितली होती. ती देशातील अशी पहिलीच निवडणुक की ज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रचार करुन निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार जिंकला होता. रमेश प्रभू यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कुंटे उभे होते. ते हरले. प्रभू यांच्या विजयाला प्रभाकर कुंटे यांनी न्यायालयात आव्हान दिले. नेमका त्या खटल्याशी माझा संबंध आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलेपार्ले येथे जे हिंदुत्वाचा प्रचार करणारी भाषणे केली. त्यातील एका भाषणाचे वृत्तांकन मी दै. नवाकाळसाठी केले होते. १९८७ साली दहावी परीक्षा नुकतीच दिली होती. दादरहून गिरगावला नवाकाळ कार्यालयात जायचो. निळुभाऊ खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली थोडेफार लिहायचो. ते देतील ती पुस्तके वाचायचो. त्यावेळी प्रॅक्टिकल सोशॅलिझम हा त्यांनी मांडलेला विचार फार जोरात होता. एक दिवस निळुभाऊ म्हणाले की, नाना मुसळे (हे नवाकाळमध्ये ज्येष्ठ वार्ताहर होते. ते महापालिकेचे वृत्तांकन करीत असत.) यांच्याबरोबर विलेपार्लेला जा. तिथे आज सायंकाळी बाळासाहेबांचे भाषण आहे. मी नानांबरोबर गेलो. साधारण रात्री आठ वाजता शिवसेनाप्रमुखांचे भाषण सुरु झाले. माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो, मातांनो अशी सुरुवात करुन त्यांचा वाक्प्रपात सुरु झाला. त्या भाषणाने प्रभावित झालो त्या वयात...दुसऱ्या दिवशी सकाळी नवाकाळ कार्यालयात येऊन मला जशी जमली तशी बातमी लिहून काढली. आणि निळुभाऊ खाडिलकरांकडे तपासायला दिली. दुपारी नाना मुसळे आले व त्यांनीही त्या सभेची त्यांची बातमी दिली. नाना मुसळे यांचीच बातमी छापून येणार हे नक्कीच होते. कारण ते स्टाफवर होते व अनुभवी होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७लाच मला आजीने उठवले. समीर, तुझ्या नावाने बातमी छापून आली आहे. बघ. मी डोळे चोळतच नवाकाळचा अंक पाहिला. हिंदुत्व हाच आमचा श्वास - बाळासाहेब ठाकरे असे त्या बातमीचे हेडिंग होते. आणि हेडिंगखाली समीर परांजपे यांजकडून असे छापून आले होते. मी ते सारे दहा दहा वेळा पाहिले. त्या दिवशी दुपारी नवाकाळ ऑफिसमध्ये गेलो निळुभाऊ खाडिलकरांचे आभार मानायला पण ते बाहेर गेलेले होते. ही माझ्या आयुष्यात मी केलेली व नावासह छापून आलेली पहिली बातमी.
त्यानंतर काही महिन्यांतच प्रभाकर कुंटे यांनी डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. विलेपार्लेच्या त्या पोटनिवडणुकीत ज्या ज्या बातमीदारांनी बातम्या दिल्या होत्या. त्या सर्वांच्या नावे मुंबई उच्च न्यायालयाने समन्स जारी केले. मला दादरच्या पत्त्यावर समन्स येताच मी पहिल्यांदा सावरकर स्मारकात धाव घेऊन प्रख्यात पत्रकार दि. वि. गोखले यांची भेट घेतली. गोखले म्हणाले चिंता नको. त्यांनी मला न्यायालयात साक्ष देणे वगैरे म्हणजे काय ते समजावून सांगितले. प्रत्यक्ष साक्ष देण्याच्या दिवशी न्या. भरुचा यांच्या न्यायालयात समोर साक्षात शिवसेनाप्रमुखांसह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते बसलेले होते. माझे नाव पुकारले जाताच मी साक्षीदाराच्या कठड्यात उभा राहून विलेपार्ले येथे शिवसेनाप्रमुखांची सभा कशी झाली त्याचे वृत्तांकन मी कसे केले याचे इतिवृत्त सांगितले. संपूर्ण साक्ष झाल्यानंतर न्या. भरुचा यांनी विचारले की, तू खरच ही बातमी कव्हर केली होतीस? मी हो म्हणून ठामपणे सांगितले. त्या खटल्यातील सर्वात लहान वयाचा साक्षीदार मीच होतो. ही साक्ष झाली तेव्हा मी अकरावी इयत्तेत प्रवेश घेतलेला होता.
हिंदुत्वाचा विचार मला पहिल्यापासूनच कधीही पटला नाही. त्यामुळे या साक्षीतही मी हिंदुत्वाच्या विरोधात माझ्या त्यावेळच्या आकलनाप्रमाणे टीकाच केली. माझ्याप्रमाणेच अनेक पत्रकारांचीही साक्ष त्यावेळेला झाली. त्यानंतर काही वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने रमेश प्रभू यांचा विजय रद्दबादल केला. प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही प्रभू हरले. मी ज्या न्यायालयीन दालनात साक्ष दिली त्या दालनाचे महत्व पुढे कळाले. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला होता. त्यावेळी त्यांची केसही मुंबई उच्च न्यायालयाच्या याच दालनात चालली होती. तशी स्मृतिपट्टिका आता या दालनाबाहेर लावण्यात आली आहे. एका निवडणुकीमुळे इतक्या अनेक गोष्टींशी संबंध आला. त्यानंतर मात्र एक ठरविले कोणत्याही गोष्टींना ठामपणे समोर जायचे. कोणत्याही धमकी, दटावणीला घाबरायचे नाही. आदराने दोन पावलाने मागे जायचे पण ते दोनशे पावले पुढे जाण्यासाठी. यामुळेही प्रभू खटला लक्षात राहिला.
११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हिंदुत्वावर निवडणूक लढवून आमदार झाल्याबद्धल त्यांना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षांची मतदान आणि निवडणूक लढवण्यास बंदी घातली. पुढे डॉ. रमेश प्रभूही शिवसेनेत अप्रिय झाले. ते शिवसेना सोडून मनसे मध्ये गेले. मात्र त्यानंतरही डॉ. प्रभू जेव्हाजेव्हा भेटत त्यावेळी पांढऱ्या सफारी सुटमधील त्यांचे हसरे व्यक्तिमत्व लुभावणे वाटत असे. अत्यंत मृदूभाषी असा हा नेता. आपल्या राजकीय कारकिर्दीवर हिंदुत्वाची मोहर उमटवूनच ते वावरत होते. त्याचा त्यांना अभिमानही होता...आता ते या लौकिक जगातून पारलौकिकतेत विलिन झाले आहेत...
प्रभू आता प्रभूपाशीच गेले...

Sunday, December 4, 2016

आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी - ४ डिसेंबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या दि. ४ डिसैंबर २०१६च्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये शाहीर विठ्ठल उमप यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने मी लिहिलेला हा लेख. या लेखाची वेबपेज व टेक्स्ट लिंक तसेच जेपीजी फाइल व मजकूर पुढे दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-rasik-article-in-marathi-5473432-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/04122016/0/6/
---------------
आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा
----------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
प्रख्यात इतिहासकार न. र. फाटक यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. पण त्यांनी लिहायला घेतलेले ‘मुंबई नगरी’ हे पुस्तक त्यांच्या निधनामुळे अपूर्णच राहिले. पुढे त्यात काही भर घालून ते पुस्तक त्यांच्या मुलाने पूर्ण केले. प्रख्यात संगीतकार सुधीर फडके यांचे ‘जगाच्या पाठीवर’ हे आत्मचरित्रही त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकले नव्हते. लेखकाच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेले पुस्तक, असे एक स्वतंत्र दालनच मराठी साहित्यात निर्माण झालेले आहे. त्यात अनेक उत्कृष्ट पुस्तके आहेत. त्याच पंक्तीतले एक पुस्तक म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेले ‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’.
विठ्ठल उमप हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत ते १९६० सालापासून. ते वयाच्या आठव्या वर्षापासून गायनकलेत रुजू झाले. पहिल्यापासून ते शाहिरी कार्यक्रम करत होते. त्यांची हजारच्या वर ध्वनिमुद्रित गीते अाहेत. विठ्ठल उमप म्हणजे ‘जांभुळाख्यान’, असे समीकरण मराठी माणसाच्या मनात घट्ट रुजलेले आहे. आकाशवाणी, दूरदर्शनपासून चित्रपटांपर्यंत त्यांची गायक, अभिनेता म्हणून अत्यंत वैभवी कामगिरी आहे. उमप हे आंबेडकरांचे सच्चे अनुयायी. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी माझी वाणी भीमचरणी, माझी आई भीमाई हे गीतसंग्रह लिहिले. त्यांचा अजून एक विशेष म्हणजे, ते गझल, कव्वालीचे निस्सीम भक्त व भोक्ते होते. त्यातून त्यांनी ‘उमाळा’ हा गजलसंग्रहही लिहिला होता. उर्दूची नजाकत विठ्ठल उमपांच्या नसानसात भिनलेली होती. त्यामुळे त्या भाषेच्या संगतीने येणारे जे संगीताविष्कार आहेत, त्यांचा ध्यास त्यांना लागला होता. कव्वालीप्रेमही त्यातूनच आले.
२६ नोव्हेंबर २०१० रोजी विठ्ठल उमपांचे निधन झाले. या घटनेला नुकतीच २६ नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण झाली. हे आठवणींचे पुस्तक त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होण्याचा योग नव्हता. परंतु गेल्या आॅगस्ट महिन्यात त्यांचा पुत्र संदेश याने पुढाकार घेतला व सुगावा प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत विलास वाघ यांनी म्हटले आहे की, ‘शाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली यांनी हा गायनप्रकार दर्ग्यातून आंबेडकरी चळवळीत आणला. कव्वालीने आंबेडकरी चळवळीत प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले आहे. नंतर गायक मंडळींनी आंबेडकर जयंती उत्सवात कव्वालीचा उपयोग करायला सुरुवात केली. विठ्ठल उमप यांचे मोठमोठ्या कव्वालांंच्या सोबत कव्वालीचे सामने होत असत. ते शीघ्र कवी होते. उत्तर देण्यासाठी त्वरित काव्यरचना करीत असत.’ शाहीर उमपांमधील कव्वालाचे वर्णन यापेक्षा अधिक समर्पक शब्दांत होऊ शकत नाही.
‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’ या पुस्तकाची सुरुवात होते ती विठ्ठल उमप यांच्या बालपणीच्या दिवसांपासून. दादर पूर्वेला नायगावच्या बीडीडी चाळ क्र. १३ मध्ये त्यांचे बालपण गेले. आजूबाजूचे वातावरण असे होते की, लोककलांच्या माहोलमध्येच ते मोठे झाले. १९२५पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिचळवळीला जोर चढला होता. त्या वेळी त्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाहीर भीमराव कर्डक पुढे आले. त्यांनी भीमजलसा काढला. तो पहिला आंबेडकरी जलसा. त्या मागोमाग आडांगळे, घेगडे, गायकवाड, कांबळे, भोसले अशा जलसाकारांचे फड उभे राहिले. ब्राह्मणांनी दलितांवर शतकानुशतके जे अत्याचार केले, त्यांना वाचा फोडण्याचे काम या जलशांतून होत असे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची माहितीही त्यात मिळे. मात्र परिस्थिती आपल्या गतीने बदलत असते. सिनेमाच्या उडत्या गीतांनी जनसमुदायाला वेड लागले. विठ्ठल उमप हे सारे परिवर्तन सजगतेने पाहात होते. जलसा मागे पडून आंबेडकरी विचारांच्या प्रचारासाठी नव्या उमेदीचे तरुण गायक, कवी पुढे आले. त्यांनी जलशाचा ढंग बदलला, त्याला कव्वालीचा पेहराव दिला. कव्वाली हा प्रकार फार पूर्वी रुजविला अजमेरचे हजरत ख्वाजा गरीब नवाज यांनी. त्यानंतर अमीर खुसरोने कव्वालीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. या कव्वाली यात्रेत ख्वाजा, खुसरो यांचे गानवारसदार बनले विठ्ठल उमप. या वाटचालीत त्यांचे सहप्रवासी होते ते म्हणजे गोविंद म्हशीलकर, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, कृष्णा शिंदे, किसन खरात, भिकाजी भंडारे, काशिनाथ शितोळे, राजेश जाधव, नवनीत खरे, दत्ता जाधव, प्रतापसिंग बोदडे आणि असे बरेच... त्यातील काही प्रसिद्ध झाले, काहींचे नाव तितके पुढे आले नाही. परंतु या सर्वांची कव्वालीवर नितांत श्रद्धा होती. कव्वालीच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची विलक्षण तळमळ होती.
विठ्ठल उमप लिखित या पुस्तकात अशा कव्वालांबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या आठवणी जागविण्यात आल्या आहेतच; शिवाय नामांतरासारख्या आंदोलनामध्ये कव्वालीने कशी साथ दिली, याचे वर्णन या पुस्तकात त्याच धगधगत्या शब्दांमध्ये येते. मुंबईच्या राणीच्या बागेतील शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह येथे श्रावण यशवंते यांच्या साहाय्यार्थ त्यांच्या मित्रांनी तिरंगी कव्वालीचा सामना आयोिजत केला होता. त्यात विठ्ठल उमप, रंजना शिंदे, शीलादेवी असे तीन गायक सहभागी झाले होते. गीत, गजल, खमसा, विनोदी गाणी या गानप्रकारापलीकडे तोवर मराठी कव्वाली गाण्यात मुक्तछंद हा काव्यप्रकार आलेला नव्हता. तो विठ्ठल उमपांनी या कव्वाल सामनाच्या माध्यमातून प्रथमच पेश केला. त्याचा मासला असा-
कल्याणच्या बाजारात कांदे विकतो
काळ्या चौकटीत डांबू नका
खर सांगतो रोकडेंना विचारा
विद्यानंदाची शपथ
हृदय धडधडतं
‘जज’ साहेब
आपण पंडित आहात, न्याय करा....
विविध माणसांच्या आठवणींतून हे किस्से पुढे खुलत जातात. उमपांची लेखनशैली धारदार आहे. त्याबरोबरच ती कधीकधी मिश्कील रूप धारण करते. कव्वाली गायकांतील उमपांचे एक सहचर म्हणजे आप्पा कांबळे. दिलखुलास वृत्तीचे, दिलदार बाण्याचे, शीघ्र गीते लिहिणारे, लोकगीतांची परंपरा जपणारे कव्वाल म्हणजे आप्पा कांबळे, असे वर्णन विठ्ठल उमपांनी त्यांच्यावरील लेखात केले आहे. त्यांच्यात नेहमी काव्यजुगलबंदी होत असे. आप्पा कांबळे यांचे लोकप्रिय गीत होते, ‘दार उघड आता दार उघड’. एका बाईचा नवरा दारू पिऊन आलाय. तो दारावर थाप मारून दार उघड, दार उघड, असं ओरडतोय. बाई दार उघडत नाही. शेजारचा एक मित्र त्याला सांगतोय, काय आलास ना कोणाचा मार खाऊन? ती दार उघडत नाही. अशा गीतांतून सामाजिक स्थितीबद्दलही प्रखर भाष्य केले जात असे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दोन-एक वर्षांनी बाबांचे निष्ठावंत कार्यकर्ते बी. सी. कांबळे व आर. डी. भंडारे यांच्यात मतभेद निर्माण झाले. दख्खनस्थ मंडळी भंडारे यांच्याबरोबर, तर कोकणातील दलित मंडळी बी. सी. कांबळे यांच्यासोबत होती. मुंबईतही दुहीचा वणवा पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या लेकरांनी आपापसात भांडू नये म्हणून विठ्ठल उमप यांच्यातील कवी, शाहीर, कव्वाल जागा झाला होता. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तो आपल्या दलित बांधवांच्या कल्याणासाठीच. त्या वेळी महाराष्ट्रातील विविध भागांतील एकमेकांचा दुस्वास करणाऱ्या दलित बंधूंना या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण करून देण्यासाठी विठ्ठल उमपांची लेखणी सांगू लागली...
‘मजेदार गोष्ट ऐका या पुराणाची
महाभारत आणि या रामायणाची
कथा ऐका हो या रक्तमिश्रणाची
भानगड ऐका तुम्ही या पुराणाची
मी हिंदू धर्मात मरणार नाही...’
माटुंगा लेबर कॅम्पमधील दिवसांपासून ते त्यांना भेटलेल्या रसिकांपर्यंत अनेकांच्या आठवणी या पुस्तकात विठ्ठल उमपांनी लिहिल्या आहेत. कोणतीही चळवळ म्हटली की ती केवळ भाषणबाजीतून फोफावत नाही. गाणी, कविता, लोककला यांच्या अाविष्कारातून या चळवळीला अनेक धुमारे फुटतात. आंबेडकरी चळवळीलाही असेच जे धुमारे फुटले त्यापैकी आंबेडकरी कव्वालांचे एक प्रकारचे आत्मचरित्र म्हणजे विठ्ठल उमपांचे हे आठवणीवजा पुस्तक आहे. आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, जिज्ञासू वाचक यांच्यासाठी उमप यांच्या सुरेल आठवणींचा खजिना उत्तम संदर्भस्रोत ठरू शकतो. मिळवून वाचावे, असेच हे पुस्तक आहे.
जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास
लेखक : लोकशाहीर विठ्ठल उमप
प्रकाशक : सुगावा प्रकाशन
पृष्ठसंख्या : २०४, मूल्य : २००/-
--------