Sunday, December 4, 2016

आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी - ४ डिसेंबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या दि. ४ डिसैंबर २०१६च्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये शाहीर विठ्ठल उमप यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने मी लिहिलेला हा लेख. या लेखाची वेबपेज व टेक्स्ट लिंक तसेच जेपीजी फाइल व मजकूर पुढे दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-rasik-article-in-marathi-5473432-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/04122016/0/6/
---------------
आंबेडकरी चळवळीची कव्वालीयात्रा
----------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
प्रख्यात इतिहासकार न. र. फाटक यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. पण त्यांनी लिहायला घेतलेले ‘मुंबई नगरी’ हे पुस्तक त्यांच्या निधनामुळे अपूर्णच राहिले. पुढे त्यात काही भर घालून ते पुस्तक त्यांच्या मुलाने पूर्ण केले. प्रख्यात संगीतकार सुधीर फडके यांचे ‘जगाच्या पाठीवर’ हे आत्मचरित्रही त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकले नव्हते. लेखकाच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेले पुस्तक, असे एक स्वतंत्र दालनच मराठी साहित्यात निर्माण झालेले आहे. त्यात अनेक उत्कृष्ट पुस्तके आहेत. त्याच पंक्तीतले एक पुस्तक म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेले ‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’.
विठ्ठल उमप हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत ते १९६० सालापासून. ते वयाच्या आठव्या वर्षापासून गायनकलेत रुजू झाले. पहिल्यापासून ते शाहिरी कार्यक्रम करत होते. त्यांची हजारच्या वर ध्वनिमुद्रित गीते अाहेत. विठ्ठल उमप म्हणजे ‘जांभुळाख्यान’, असे समीकरण मराठी माणसाच्या मनात घट्ट रुजलेले आहे. आकाशवाणी, दूरदर्शनपासून चित्रपटांपर्यंत त्यांची गायक, अभिनेता म्हणून अत्यंत वैभवी कामगिरी आहे. उमप हे आंबेडकरांचे सच्चे अनुयायी. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी माझी वाणी भीमचरणी, माझी आई भीमाई हे गीतसंग्रह लिहिले. त्यांचा अजून एक विशेष म्हणजे, ते गझल, कव्वालीचे निस्सीम भक्त व भोक्ते होते. त्यातून त्यांनी ‘उमाळा’ हा गजलसंग्रहही लिहिला होता. उर्दूची नजाकत विठ्ठल उमपांच्या नसानसात भिनलेली होती. त्यामुळे त्या भाषेच्या संगतीने येणारे जे संगीताविष्कार आहेत, त्यांचा ध्यास त्यांना लागला होता. कव्वालीप्रेमही त्यातूनच आले.
२६ नोव्हेंबर २०१० रोजी विठ्ठल उमपांचे निधन झाले. या घटनेला नुकतीच २६ नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण झाली. हे आठवणींचे पुस्तक त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होण्याचा योग नव्हता. परंतु गेल्या आॅगस्ट महिन्यात त्यांचा पुत्र संदेश याने पुढाकार घेतला व सुगावा प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत विलास वाघ यांनी म्हटले आहे की, ‘शाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली यांनी हा गायनप्रकार दर्ग्यातून आंबेडकरी चळवळीत आणला. कव्वालीने आंबेडकरी चळवळीत प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले आहे. नंतर गायक मंडळींनी आंबेडकर जयंती उत्सवात कव्वालीचा उपयोग करायला सुरुवात केली. विठ्ठल उमप यांचे मोठमोठ्या कव्वालांंच्या सोबत कव्वालीचे सामने होत असत. ते शीघ्र कवी होते. उत्तर देण्यासाठी त्वरित काव्यरचना करीत असत.’ शाहीर उमपांमधील कव्वालाचे वर्णन यापेक्षा अधिक समर्पक शब्दांत होऊ शकत नाही.
‘जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास’ या पुस्तकाची सुरुवात होते ती विठ्ठल उमप यांच्या बालपणीच्या दिवसांपासून. दादर पूर्वेला नायगावच्या बीडीडी चाळ क्र. १३ मध्ये त्यांचे बालपण गेले. आजूबाजूचे वातावरण असे होते की, लोककलांच्या माहोलमध्येच ते मोठे झाले. १९२५पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिचळवळीला जोर चढला होता. त्या वेळी त्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाहीर भीमराव कर्डक पुढे आले. त्यांनी भीमजलसा काढला. तो पहिला आंबेडकरी जलसा. त्या मागोमाग आडांगळे, घेगडे, गायकवाड, कांबळे, भोसले अशा जलसाकारांचे फड उभे राहिले. ब्राह्मणांनी दलितांवर शतकानुशतके जे अत्याचार केले, त्यांना वाचा फोडण्याचे काम या जलशांतून होत असे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची माहितीही त्यात मिळे. मात्र परिस्थिती आपल्या गतीने बदलत असते. सिनेमाच्या उडत्या गीतांनी जनसमुदायाला वेड लागले. विठ्ठल उमप हे सारे परिवर्तन सजगतेने पाहात होते. जलसा मागे पडून आंबेडकरी विचारांच्या प्रचारासाठी नव्या उमेदीचे तरुण गायक, कवी पुढे आले. त्यांनी जलशाचा ढंग बदलला, त्याला कव्वालीचा पेहराव दिला. कव्वाली हा प्रकार फार पूर्वी रुजविला अजमेरचे हजरत ख्वाजा गरीब नवाज यांनी. त्यानंतर अमीर खुसरोने कव्वालीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. या कव्वाली यात्रेत ख्वाजा, खुसरो यांचे गानवारसदार बनले विठ्ठल उमप. या वाटचालीत त्यांचे सहप्रवासी होते ते म्हणजे गोविंद म्हशीलकर, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, कृष्णा शिंदे, किसन खरात, भिकाजी भंडारे, काशिनाथ शितोळे, राजेश जाधव, नवनीत खरे, दत्ता जाधव, प्रतापसिंग बोदडे आणि असे बरेच... त्यातील काही प्रसिद्ध झाले, काहींचे नाव तितके पुढे आले नाही. परंतु या सर्वांची कव्वालीवर नितांत श्रद्धा होती. कव्वालीच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची विलक्षण तळमळ होती.
विठ्ठल उमप लिखित या पुस्तकात अशा कव्वालांबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या आठवणी जागविण्यात आल्या आहेतच; शिवाय नामांतरासारख्या आंदोलनामध्ये कव्वालीने कशी साथ दिली, याचे वर्णन या पुस्तकात त्याच धगधगत्या शब्दांमध्ये येते. मुंबईच्या राणीच्या बागेतील शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह येथे श्रावण यशवंते यांच्या साहाय्यार्थ त्यांच्या मित्रांनी तिरंगी कव्वालीचा सामना आयोिजत केला होता. त्यात विठ्ठल उमप, रंजना शिंदे, शीलादेवी असे तीन गायक सहभागी झाले होते. गीत, गजल, खमसा, विनोदी गाणी या गानप्रकारापलीकडे तोवर मराठी कव्वाली गाण्यात मुक्तछंद हा काव्यप्रकार आलेला नव्हता. तो विठ्ठल उमपांनी या कव्वाल सामनाच्या माध्यमातून प्रथमच पेश केला. त्याचा मासला असा-
कल्याणच्या बाजारात कांदे विकतो
काळ्या चौकटीत डांबू नका
खर सांगतो रोकडेंना विचारा
विद्यानंदाची शपथ
हृदय धडधडतं
‘जज’ साहेब
आपण पंडित आहात, न्याय करा....
विविध माणसांच्या आठवणींतून हे किस्से पुढे खुलत जातात. उमपांची लेखनशैली धारदार आहे. त्याबरोबरच ती कधीकधी मिश्कील रूप धारण करते. कव्वाली गायकांतील उमपांचे एक सहचर म्हणजे आप्पा कांबळे. दिलखुलास वृत्तीचे, दिलदार बाण्याचे, शीघ्र गीते लिहिणारे, लोकगीतांची परंपरा जपणारे कव्वाल म्हणजे आप्पा कांबळे, असे वर्णन विठ्ठल उमपांनी त्यांच्यावरील लेखात केले आहे. त्यांच्यात नेहमी काव्यजुगलबंदी होत असे. आप्पा कांबळे यांचे लोकप्रिय गीत होते, ‘दार उघड आता दार उघड’. एका बाईचा नवरा दारू पिऊन आलाय. तो दारावर थाप मारून दार उघड, दार उघड, असं ओरडतोय. बाई दार उघडत नाही. शेजारचा एक मित्र त्याला सांगतोय, काय आलास ना कोणाचा मार खाऊन? ती दार उघडत नाही. अशा गीतांतून सामाजिक स्थितीबद्दलही प्रखर भाष्य केले जात असे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दोन-एक वर्षांनी बाबांचे निष्ठावंत कार्यकर्ते बी. सी. कांबळे व आर. डी. भंडारे यांच्यात मतभेद निर्माण झाले. दख्खनस्थ मंडळी भंडारे यांच्याबरोबर, तर कोकणातील दलित मंडळी बी. सी. कांबळे यांच्यासोबत होती. मुंबईतही दुहीचा वणवा पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या लेकरांनी आपापसात भांडू नये म्हणून विठ्ठल उमप यांच्यातील कवी, शाहीर, कव्वाल जागा झाला होता. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तो आपल्या दलित बांधवांच्या कल्याणासाठीच. त्या वेळी महाराष्ट्रातील विविध भागांतील एकमेकांचा दुस्वास करणाऱ्या दलित बंधूंना या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण करून देण्यासाठी विठ्ठल उमपांची लेखणी सांगू लागली...
‘मजेदार गोष्ट ऐका या पुराणाची
महाभारत आणि या रामायणाची
कथा ऐका हो या रक्तमिश्रणाची
भानगड ऐका तुम्ही या पुराणाची
मी हिंदू धर्मात मरणार नाही...’
माटुंगा लेबर कॅम्पमधील दिवसांपासून ते त्यांना भेटलेल्या रसिकांपर्यंत अनेकांच्या आठवणी या पुस्तकात विठ्ठल उमपांनी लिहिल्या आहेत. कोणतीही चळवळ म्हटली की ती केवळ भाषणबाजीतून फोफावत नाही. गाणी, कविता, लोककला यांच्या अाविष्कारातून या चळवळीला अनेक धुमारे फुटतात. आंबेडकरी चळवळीलाही असेच जे धुमारे फुटले त्यापैकी आंबेडकरी कव्वालांचे एक प्रकारचे आत्मचरित्र म्हणजे विठ्ठल उमपांचे हे आठवणीवजा पुस्तक आहे. आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, जिज्ञासू वाचक यांच्यासाठी उमप यांच्या सुरेल आठवणींचा खजिना उत्तम संदर्भस्रोत ठरू शकतो. मिळवून वाचावे, असेच हे पुस्तक आहे.
जुगलबंदी : माझा कव्वालीचा प्रवास
लेखक : लोकशाहीर विठ्ठल उमप
प्रकाशक : सुगावा प्रकाशन
पृष्ठसंख्या : २०४, मूल्य : २००/-
--------

No comments:

Post a Comment