Monday, December 12, 2016

डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....समीर परांजपे


 (सोबत दिलेल्या छायाचित्रात उजवीकडील डॉ. रमेश प्रभू.)
-------------
डॉ. रमेश प्रभू यांच्यावरील खटल्यात साक्षीदार म्हणून उभा राहिलो तेव्हा....
----------------------------------------
- समीर परांजपे
---
शिवसेनेचे माजी आमदार व मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांचे निधन झाले. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रमेश प्रभू यांचे ११ डिसेंबर २०१६ रोजी रविवारी सकाळी ६.२० वाजता निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी १९८७-८८ मध्ये मुंबईचे महापौरपद भूषवले होते. डॉ. प्रभू हे प्रथम १९७३ साली पार्ल्यातून नगरसेवक झाले. तसेच १९८५ ते १९९२ या काळात ते पार्ले येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९८७ साली आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाल्यावर पार्ले विधानसभा मतदार संघात विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार करुन मते मागितली होती. ती देशातील अशी पहिलीच निवडणुक की ज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रचार करुन निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार जिंकला होता. रमेश प्रभू यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कुंटे उभे होते. ते हरले. प्रभू यांच्या विजयाला प्रभाकर कुंटे यांनी न्यायालयात आव्हान दिले. नेमका त्या खटल्याशी माझा संबंध आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलेपार्ले येथे जे हिंदुत्वाचा प्रचार करणारी भाषणे केली. त्यातील एका भाषणाचे वृत्तांकन मी दै. नवाकाळसाठी केले होते. १९८७ साली दहावी परीक्षा नुकतीच दिली होती. दादरहून गिरगावला नवाकाळ कार्यालयात जायचो. निळुभाऊ खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली थोडेफार लिहायचो. ते देतील ती पुस्तके वाचायचो. त्यावेळी प्रॅक्टिकल सोशॅलिझम हा त्यांनी मांडलेला विचार फार जोरात होता. एक दिवस निळुभाऊ म्हणाले की, नाना मुसळे (हे नवाकाळमध्ये ज्येष्ठ वार्ताहर होते. ते महापालिकेचे वृत्तांकन करीत असत.) यांच्याबरोबर विलेपार्लेला जा. तिथे आज सायंकाळी बाळासाहेबांचे भाषण आहे. मी नानांबरोबर गेलो. साधारण रात्री आठ वाजता शिवसेनाप्रमुखांचे भाषण सुरु झाले. माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो, मातांनो अशी सुरुवात करुन त्यांचा वाक्प्रपात सुरु झाला. त्या भाषणाने प्रभावित झालो त्या वयात...दुसऱ्या दिवशी सकाळी नवाकाळ कार्यालयात येऊन मला जशी जमली तशी बातमी लिहून काढली. आणि निळुभाऊ खाडिलकरांकडे तपासायला दिली. दुपारी नाना मुसळे आले व त्यांनीही त्या सभेची त्यांची बातमी दिली. नाना मुसळे यांचीच बातमी छापून येणार हे नक्कीच होते. कारण ते स्टाफवर होते व अनुभवी होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७लाच मला आजीने उठवले. समीर, तुझ्या नावाने बातमी छापून आली आहे. बघ. मी डोळे चोळतच नवाकाळचा अंक पाहिला. हिंदुत्व हाच आमचा श्वास - बाळासाहेब ठाकरे असे त्या बातमीचे हेडिंग होते. आणि हेडिंगखाली समीर परांजपे यांजकडून असे छापून आले होते. मी ते सारे दहा दहा वेळा पाहिले. त्या दिवशी दुपारी नवाकाळ ऑफिसमध्ये गेलो निळुभाऊ खाडिलकरांचे आभार मानायला पण ते बाहेर गेलेले होते. ही माझ्या आयुष्यात मी केलेली व नावासह छापून आलेली पहिली बातमी.
त्यानंतर काही महिन्यांतच प्रभाकर कुंटे यांनी डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. विलेपार्लेच्या त्या पोटनिवडणुकीत ज्या ज्या बातमीदारांनी बातम्या दिल्या होत्या. त्या सर्वांच्या नावे मुंबई उच्च न्यायालयाने समन्स जारी केले. मला दादरच्या पत्त्यावर समन्स येताच मी पहिल्यांदा सावरकर स्मारकात धाव घेऊन प्रख्यात पत्रकार दि. वि. गोखले यांची भेट घेतली. गोखले म्हणाले चिंता नको. त्यांनी मला न्यायालयात साक्ष देणे वगैरे म्हणजे काय ते समजावून सांगितले. प्रत्यक्ष साक्ष देण्याच्या दिवशी न्या. भरुचा यांच्या न्यायालयात समोर साक्षात शिवसेनाप्रमुखांसह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते बसलेले होते. माझे नाव पुकारले जाताच मी साक्षीदाराच्या कठड्यात उभा राहून विलेपार्ले येथे शिवसेनाप्रमुखांची सभा कशी झाली त्याचे वृत्तांकन मी कसे केले याचे इतिवृत्त सांगितले. संपूर्ण साक्ष झाल्यानंतर न्या. भरुचा यांनी विचारले की, तू खरच ही बातमी कव्हर केली होतीस? मी हो म्हणून ठामपणे सांगितले. त्या खटल्यातील सर्वात लहान वयाचा साक्षीदार मीच होतो. ही साक्ष झाली तेव्हा मी अकरावी इयत्तेत प्रवेश घेतलेला होता.
हिंदुत्वाचा विचार मला पहिल्यापासूनच कधीही पटला नाही. त्यामुळे या साक्षीतही मी हिंदुत्वाच्या विरोधात माझ्या त्यावेळच्या आकलनाप्रमाणे टीकाच केली. माझ्याप्रमाणेच अनेक पत्रकारांचीही साक्ष त्यावेळेला झाली. त्यानंतर काही वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने रमेश प्रभू यांचा विजय रद्दबादल केला. प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही प्रभू हरले. मी ज्या न्यायालयीन दालनात साक्ष दिली त्या दालनाचे महत्व पुढे कळाले. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला होता. त्यावेळी त्यांची केसही मुंबई उच्च न्यायालयाच्या याच दालनात चालली होती. तशी स्मृतिपट्टिका आता या दालनाबाहेर लावण्यात आली आहे. एका निवडणुकीमुळे इतक्या अनेक गोष्टींशी संबंध आला. त्यानंतर मात्र एक ठरविले कोणत्याही गोष्टींना ठामपणे समोर जायचे. कोणत्याही धमकी, दटावणीला घाबरायचे नाही. आदराने दोन पावलाने मागे जायचे पण ते दोनशे पावले पुढे जाण्यासाठी. यामुळेही प्रभू खटला लक्षात राहिला.
११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हिंदुत्वावर निवडणूक लढवून आमदार झाल्याबद्धल त्यांना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षांची मतदान आणि निवडणूक लढवण्यास बंदी घातली. पुढे डॉ. रमेश प्रभूही शिवसेनेत अप्रिय झाले. ते शिवसेना सोडून मनसे मध्ये गेले. मात्र त्यानंतरही डॉ. प्रभू जेव्हाजेव्हा भेटत त्यावेळी पांढऱ्या सफारी सुटमधील त्यांचे हसरे व्यक्तिमत्व लुभावणे वाटत असे. अत्यंत मृदूभाषी असा हा नेता. आपल्या राजकीय कारकिर्दीवर हिंदुत्वाची मोहर उमटवूनच ते वावरत होते. त्याचा त्यांना अभिमानही होता...आता ते या लौकिक जगातून पारलौकिकतेत विलिन झाले आहेत...
प्रभू आता प्रभूपाशीच गेले...

No comments:

Post a Comment