महाराष्ट्र, गोवा
सहित ११ प्रमुख विद्यापीठांतील मराठी विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात
मराठी भाषेच्या विकास, संवर्धनाबाबत सुरु असलेल्या संशोधनाबाबत चिकित्सक
लेख लिहिले, ते दै. दिव्य मराठीच्या इंटरनेट आवृत्तीवर दि. २६ फेब्रुवारी
२०१७ रोजी प्रसिद्ध झाले. ते सर्व लेख इथे एकत्रित दिले आहेत. वाचकांना ते
लेख आवडतील ही आशा.
(समन्वय-संकलन : समीर परांजपे)
-----
स्लग : शाेध मराठीचा...
भाषा आणि भाषेतले शब्द पहिल्यांदा कानी पडतात, ते आईच्या मुखातून म्हणून ती मातृभाषा. या मातृभाषेचं खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध जतन-संवर्धन होतं, ते शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून. विद्यापीठे ही भाषेची राखणदार आणि पालकही. या पालकांनी भाषाशास्त्राच्या अंगाने तिचं रक्षण करण्याबरोबरच सातत्यपूर्ण शोध घेण्यावर आणि संशोधन करण्यावर तिचं भवितव्य अवलंबून. म्हणजेच, भाषेच्या भवितव्याची दोरी या विद्यापीठांच्या हाती. ती जितकी मजबूत तितकं तिचं भवितव्य उज्ज्वल. अशा प्रसंगी राज्यातल्या विद्यापीठांत सध्या कशा स्वरूपाचं मराठी भाषाविषयक शोध-संशोधन सुरू आहे, याचा खास मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेला हा विशेष आढावा...
------------------
हेडिंंग : उपेक्षितांमध्ये संशोधनाची उर्मी मोठी
-----------------------------
- डॉ. अविनाश सांगोलेकर
avinashsangolekar@unipune.ac.in
-----------------------------
ब्लर्ब : पीएच.डी. पदवीचे सर्वप्रथम मानकरी डॉ. द. न. गोखले (१९५२) हे ठरतात. त्यानंतर गेल्या ६५ वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण ५१८ व्यक्तींनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. विभागामध्ये १९८२ ते नोव्हेंबर २०१६ या गेल्या ३४ वर्षांच्या कालावधीमध्ये ४१२ व्यक्तींनी प्रबंधिका सादर करून एम. फिल. ही पदवी प्राप्त केली आहे...
-----------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा आणि साहित्य या दोहोंवर मराठी विभागातून झालेले आजवरचे संशोधन हे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नावाजले गेले आहे. १९९० नंतर मराठी समाजात, साहित्यात जे बरेवाईट बदल झाले; ते मुळात जाऊन धुंडाळण्याचा प्रयत्न एम. फिल. व पीएच.डी.च्या माध्यमातून सध्याचे विद्यार्थी करीत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर आजचे आघाडीचे कवी प्रा. संतोष पद्माकर पवार (मंचर/श्रीरामपूर) हे ‘नव्वदोत्तरी मराठी कविता ः स्वरूप, संकल्पना आणि वाटचाल’ या विषयावर पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करीत आहेत.
अर्थात, मराठी भाषेच्या किंवा तिच्या बोलीभाषेच्या अंगाने फारसे संशोधन होताना दिसत नाही. आमच्या विभागामध्ये केवळ दोनच अभ्यासक या विषयावर संशोधन करीत आहेत. भानुदास कुलाल हे ‘लोकराज्य नियतकालिकाचे वाङ्मयीन कार्य’ (संतविषयक, लेखकविषयक, नाट्यविषयक, भाषाविषयक विशेषांकांच्या संदर्भात) या विषयावर संशोधन करीत आहेत, तर पुरुषोतम तायडे हे ‘वऱ्हाडी आणि अहिराणी बोलींमधील म्हणींचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर संशोधन करीत आहेत. तौलनिक अभ्यासाकडे मात्र आजच्या अभ्यासकांचा कल काहीसा वाढलेला दिसतो आहे. हे अभ्यासक भाऊ पाध्ये आणि सआदत हसन मंटो, भालचंद्र नेमाडे आणि एंगुगी वा थियोन्गो, संत सेनामहाराज आणि संत रविदास यांचा तुलनात्मक अभ्यास करीत आहेत.
मध्यपूर्व आशियातील साहित्य, भारतीय लेखिकांच्या कादंबऱ्या, डॉ. यु. आर. अनंतमूर्तींचे साहित्य हे सर्व मराठीत अनुवादित झाले असून त्याचाही धांडोळा काही अभ्यासक आपल्या प्रबंधांमधून घेत आहेत. दोन अभ्यासक हे ‘दै. सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ यांचे कार्य आपल्या प्रबंधांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गौतम बुद्ध, अहिल्याबाई होळकर, सयाजीराव गायकवाड, म. फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. गोविंद गारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, नामदेव ढसाळ, सतीश आळेकर यांच्याशी संबंधित विषय घेऊन पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करीत आहेत. मुस्लिम समाज आणि आदिवासी समाजही आता पुढे येत चालला आहे. अभ्यासकांचेही लक्ष या समाजाच्या साहित्याकडे वेधले जात आहे. आमच्या विभागामध्ये या विषयांशी संबंधित विषयांवर संशोधनकार्य काही अभ्यासक करत आहेत.
सध्या एम. फिल. आणि पीएच. डी. करणाऱ्यांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असलेले अधिक दिसतात. शिवाय ते दलित, भटके-विमुक्त, आदिवासी, मुस्लिम अशा उपेक्षित समाजघटकांतूनही आलेले दिसतात. पुष्कळदा ते त्यांच्या घराण्यातील पहिलेच उच्चविद्याविभूषित ठरत आहेत.
डॉ. अविनाश सांगोलेकर
(मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे )
avinashsangolekar@unipune.ac.in
-----------
स्लग - शोध मराठीचा...
हेडिंग - गोमांतकात नांदते मराठी...
-----
बायलाइन - डॉ. बाळकृष्ण कानोळकर
-----
इंट्रो - गोवा िवद्यापीठातील हे सारेच्या सारे संशोधन "चिकित्सक अभ्यास' या पठडीतले असल्याचे जाणवते. येथे कुठेही समाजशास्त्रविषयक वा तौलनिक अभ्यासाचा प्रयत्न दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाषावैज्ञानिक व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आता हा अभ्यास स्पर्श करताना आढळून येत नाहीत, असे सखेद नोंदवावे लागते. हे भूषणावह नाही, हे मान्य करूनही मुख्य धारेपासून दूर असलेल्या माझ्या गोमंतकात मराठी साहित्याच्या संशोधन क्षेत्रात चाललेले हे काम नाकारण्यासारखेही खचितच नाही...
-----
कोणत्याही विद्यापीठाच्या ज्ञानशाखांचे कार्य हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक अध्यापन आणि दुसरे संशोधन. गोवा विद्यापीठाच्या कला विभागात भाषा आणि साहित्य उपविभागांतर्गत मराठी भाषा विभागही याला अपवाद नाही. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच म्हणजे १९८५ पासून संशोधनाचे कार्य या विभागामध्ये चालत आलेले आहे. गेल्या काही वर्षांत त्यात संख्यात्मक वाढ झालेली आहे. परंतु गुणात्मक वाढीचे काय? असा प्रश्न साहजिकच कुणाही अभ्यासकाच्या मनात निर्माण होणे अपरिहार्य आहे.
आजमितीला या विभागातून सुमारे १२ संशोधक विद्यार्थी पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेले आहेत. सध्या असा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या कार्यात १४ विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन विषय असे आहेत : मराठी एकांकिकेचा रूपबंध आणि आशय : एक चिकित्सात्मक अभ्यास, अरुण हेबळेकर यांचे कथानक साहित्य - एक चिकित्सात्मक अभ्यास, संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्याचा वाङ्मयीन व भाषिक अभ्यास, एकोणीसशे नव्वदोत्तरी मराठी कविता : स्वरूप आणि शैली, एकोणीसशे नव्वदोत्तरी मराठी ललित निबंधाचा चिकित्सात्मक अभ्यास, मराठीतील क्रौर्यनाट्य : एक चिकित्सक अभ्यास, दक्षिण कोंकण प्रदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कादंबरीतील कथनाचा सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय लेखकांचे मराठी प्रवासवर्णन : एक चिकित्सक अभ्यास, १९९० नंतरच्या मराठी कादंबरीचा चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय मराठी आत्मचरित्रात्मक लेखनाचा चिकित्सक अभ्यास (प्रारंभ ते २०१०), शांता शेळके, सुनीता देशपांडे, इंदिरा संत, प्रतिमा इंगोले, अरुणा ढेरे या साठोत्तरी लेखिकांच्या विशेष संदर्भात ललित निबंधाचा चिकित्सक अभ्यास. गोमंतकीय ख्रिस्ती मराठी साहित्याचे संशोधन व संशोधक : एक चिकित्सक अभ्यास, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांचे मराठीतील संशोधन कार्य : एक चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय लोकनाट्य : रणमाले याचा चिकित्सक अभ्यास.
उपरोक्त अभ्यास/संशोधन विषयक सूचीवर एक नजर टाकली असता, गोवा िवद्यापीठातील हे सारेच्या सारे संशोधन "चिकित्सक अभ्यास' या पठडीतले असल्याचे जाणवते. येथे कुठेही समाजशास्त्रविषयक वा तौलनिक अभ्यासाचा प्रयत्न दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाषावैज्ञानिक व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आता हा अभ्यास स्पर्श करताना आढळून येत नाहीत, असे सखेद नोंदवावे लागते. हे भूषणावह नाही, हे मान्य करूनही मुख्य धारेपासून दूर असलेल्या माझ्या गोमंतकात मराठी साहित्याच्या संशोधन क्षेत्रात चाललेले हे काम नाकारण्यासारखेही खचितच नाही. येणाऱ्या काळात इथले संशोधक छात्र संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्राचा अभ्यास करून नव्या व उपेक्षित वाटा व दिशांचा धांडोळा आपल्या संशोधनकार्याचा विषय बनवतील, अशी अपेक्षा आहे.
विद्यापीठातील सर्वच संशोधक विद्यार्थ्यांची मातृभाषा कोंकणी/ मराठी असून एकतर ते खुद्द गोव्यातील वा दक्षिण कोकणातील असून एक-दोन देशावरचे आहेत. अगदी मोजक्याच विद्यार्थ्यांच्या संशोधन अभ्यासविषयाच्या निवडीवर परिसर-प्रभाव असलेला जाणवतो.
आंतरविद्यापीठीय आदानप्रदान आवश्यक
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातील विद्यापीठीय संशोधनाचा विद्यमान दर्जा आणि त्याची मराठीचा प्रसार-प्रचार आणि वृद्धी-समृद्धीच्या अंगाने असलेली उपयुक्तता याबाबत खरे तर मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कारण या विद्यापीठातील अध्यापक वा संशोधक विद्यार्थ्यांशी माझा व्यक्तिश: कधी संबंध आलेला नाही. भाैगोलिक दूरता हे याचे एक प्रमुख कारण असू शकते. नाही म्हणायला, गेल्याच वर्षी एका प्रबंधाचे मूल्यमापन करण्याविषयी मला विचारले होते. परंतु विषय होता, संत गाडगेबाबा यांचे साहित्य. संत गाडगेबाबा यांच्या साहित्याचा माझा सखोल अभ्यास नसल्याने साहजिकच ही निवड मी सखेद नाकारली. या निमित्ताने जाता जाता एक सुचवावेसे वाटते ते म्हणजे, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयक संशोधनाची व्याप्ती आणि दर्जा वाढवायचा असेल तर विविध विद्यापीठांतर्गत आदानप्रदान वाढविण्याच्या दृष्टीने काही उपक्रम राबवावे लागतील. अधिक काय सांगणे?
(मराठी विभागप्रमुख, गोवा विद्यापीठ)
hodmar@unigoa.ac.in
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. भारती निरगुडकर
-------------------
हेडिंंग : बोलीभाषांच्या संशोधनावर भर
----
इंट्रो : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय; आदिबंधात्मक समीक्षादृष्टी इ.च्या परिप्रेक्ष्यात हे अभ्यास सिद्ध झाले आहेत.
------------------
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापन व संशोधन सातत्याने सुरू आहे. मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. पीएच. डी. व एम. फील. पदव्यांसाठी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक तज्ज्ञ व व्यासंगी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध तयार केले आहेत. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. साहित्याच्या अभ्यासामध्ये विशिष्ट आधुनिक ज्ञानदृष्टीचा अवलंब सातत्याने करण्यात आलेला आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय; आदिबंधात्मक समीक्षादृष्टी इ.च्या परिप्रेक्ष्यात हे अभ्यास सिद्ध झाले आहेत.
साहित्याबरोबरच भाषा व बोलींचे संशोधन विभागात गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. या संदर्भांत ‘मराठी भाषेचा भाषाशास्त्रीय विचार’ या विषयावर शं. गो. तुळपुळे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनातून महाराष्ट्री, प्राकृत व मराठी भाषा यासंबंधी प्राकृत अपभ्रंश भाषेचा दुवा मांडण्यात आला. त्यातून मराठीच्या ऐतिहासिक अभ्यासाला नवी दिशा मिळाली. पेशवे दप्तरातील १८व्या शतकातील मराठीचे स्वरूप (ग. ब. ग्रामोपाध्ये), मराठी गद्याचा विकास (श्री. दि. परचुरे) अशा काही मान्यवर संशोधकांनी पूर्ण केलेले महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प उल्लेखता येतील. ही प्रमाण मराठीच्या संदर्भातील संशोधन परंपरा आजही सुरू आहे. प्रशासनिक मराठीची घडण, प्रसारमाध्यमातील मराठीचे स्वरूप, राज्यव्यवहारातील मराठी भाषेचे उपयोजन, मराठी शुद्धलेखन परंपरा इ. विषयांवर मौलिक संशोधन अलीकडेच झालेले आहे. या विषयांबरोबरच मुंबईतील व मुंबईबाहेरील अनेक जाती, जमातींच्या बोलींचे अभ्यास झालेले आहेत. सुरू आहेत. मराठीच्या अनेक बोलींची वैशिष्ट्ये भाषावैज्ञानिक अभ्यासाद्वारे मांडण्यात आलेली आहेत. उदा. मालवणी, ठाकरी, आगरी, शिंदी भंडारी, वसई परिसरातील सामवेदी आणि वाडवळ इ. बोलीवरील संशोधन सिद्ध झाले आहे. मुंबईतील कोळी बोली, मुंबईजवळ असलेल्या ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील विविध बोली यांवर भाषावैज्ञानिक अंगाने संशोधन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
आज मराठी विभागात संशोधनासाठी प्रवेश घेणारा विद्यार्थी मुंबई शहरातील व त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनही येतो. साहजिकच ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यांबरोबरच मुंबईबाहेरील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातूनही विद्यार्थी सातत्याने येत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्या त्या प्रदेशातील लोकसाहित्य संकलित करण्यात येते, आणि त्या आधारे लोकसंस्कृतीबरोबरच बोलींचा अभ्यासही होत असतो. एम. फिल. व पीएच. डी. पदवीसाठी ठाकरी, कातकरी, वारली व भिल्ली आदिवासी बोली व बोलीसाहित्याचा अभ्यास घडत आहे. याशिवाय मांगेला, कादोडी, मल्हारकोळी, धनगरी, कुणबी, वाडवळी ख्रिश्चन, अहिराणी, उत्तर कोंकणी या बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न चालू आहेत. विविध बोलींचे व त्यातील लोकसाहित्याचे दस्तऐवजीकरण होत आहे. त्याच्या आधारे या बोलींचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बोलींचे व्याकरण लिहिणे, लोकसाहित्य प्रकाशित करणे यांसारखे भविष्यातील उपक्रम व्यवहारभाषा म्हणून मराठीला संपन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. मराठी ज्ञानभाषा म्हणून घडवताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीदेखील हे उपक्रम नक्कीच उपकारक ठरू शकतील, असा माझा विश्वास आहे.
सद्यःस्थितीत आतापर्यंत झालेल्या व सुरू असणाऱ्या संशोधनाचा दर्जा समाधानकारक असून मराठी विभागप्रमुख या नात्याने भविष्यात मराठी भाषा व साहित्य वेगवेगळ्या भाषांच्या अभ्यासाशी जोडले जावे, तसेच आज नव्याने उदयास आलेल्या ज्ञानशाखा मराठीतून उपलब्ध व्हाव्यात व व्यावसायिक दृष्टीनेही मराठीत संशोधन व अभ्यास घडावा, अशी भूमिका व धोरण विभागप्रमुख म्हणून आमच्या विभागात राबविण्याचा माझा प्रयत्न आहे.
विभागप्रमुख, मराठी विभाग.
मुंबई विद्यापीठ, मुंबई
bharatinirgudkar@yahoo.in
-------------
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. राजन गवस
-------------------
हेडिंंग : निखळ संशोधन व्यवहाराचा आग्रह
------------------
इंट्रो : चंदगडी बोलीचा अभ्यास, श्रद्धा व अंधश्रद्धेची भाषिक संरचना, मराठी कवितेवरील बुद्ध विचाराचा प्रभाव, कोल्हापूर जिल्ह्यातील बलुतेदारांच्या बोलीचा अभ्यास हे बृहद प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय विज्ञान व सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहेत... शिवाजी विद्यापीठाचे वैशिष्ट्य ठरले आहे...
------------------
शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाची स्थापना १९७९मध्ये झाली. या विभागात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील गोरगरीब मुले शिक्षणासाठी येत असतात. यांची जडणघडण खेड्यापाड्यांत झाल्यामुळे आपापल्या मौखिक परंपरा, बोली यांसह ही मुले विभागात वावरत असतात. या मुलांच्या पाचवीलाच दारिद्र्य पुजलेले असते. तरीही परिस्थितीशी चिवट झुंज देत त्यांचे अध्ययन सुरू असते. मुलांना संशोधनाची गोडी लागावी, म्हणून एम. ए. भाग १ व २ मध्येच क्षेत्रीय अभ्यासाची सवय लावण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये लोकगीते, लोककथा, दैवतकथा, बोलीतील म्हणी, बोलीतील संपत चाललेले शब्द संकलित करून त्याबाबत स्वतःचे अनुभव मांडण्याची संधी दिली जाते. एम. फिल. व पीएच. डी. साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन, बोलींचा अभ्यास, लोककलांचा अभ्यास याकडे विशेष आस्थापूर्वक वळविण्याचे काम सुरू असते. विभागात आजमितीस ६३ विद्यार्थी एम. फिल. करत असून पीएच. डी. पदवीसाठी १०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परंपरागत विषय टाळून अभ्यासाच्या नव्या क्षेत्राकडे त्यांनी वळावे, यासाठी विभागात विशेष प्रयत्न केले जात आहेत.
वाहन व्यवहारातील मराठीचा वापर, वाड्या-वस्तीतील दलित समाजाची वाचन अभिरुची, महाविद्यालयीन स्तरावरील मराठीचे अध्यापन, मराठी अध्यापनाच्या नव्या पद्धती, संशोधन व्यवहारातील समस्या, मराठीतील कोश वाङ्मय इत्यादी विषयांवर सध्या विद्यार्थ्यांचे विशेष संशोधन सुरू आहे. विभागात मोडी व देवनागरी लिपीबाबतही संशोधन सुरू असून छत्रपती घराण्यातील मोडी दस्तऐवज भाषेच्या दृष्टीने अभ्यासण्याचे कामही विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकवाद्यांच्या संकलनाचे कामही विद्यार्थ्यांनी हाती घेतले असून प्रत्येक वाद्याच्या वाजविण्याच्या विविध पद्धती ध्वनिमुद्रित करून वाद्यखोली तयार करण्याचा प्रकल्प विद्यार्थ्यांनी पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच या तिन्ही जिल्ह्यातील दैवतकथांवर वेगवेगळे प्रबंध सिद्ध झालेले आहेत.
विभागामार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील लेखक सूची बनविण्याचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पात प्रत्येक खेड्यात लिहिणाऱ्या लेखकाची नोंद संकलित केली आहे. आयुर्वेद, खगोलशास्त्र, शेती, हवामानशास्त्र, आहारशास्त्र, पोवाडे, पाळणे, दैवतकथा, कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, तमाशांचे वग इत्यादी लिहिणाऱ्यांची नोंद या सूचीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे काळाआड गेलेल्या अनेक लेखकांचे साहित्य या निमित्ताने प्रथमच वाचकांसमोर येत आहे. या प्रकल्पाचा उपभाग म्हणून विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील सर्व विषयांच्या लेखकांचे प्रकाशित ग्रंथ विभागात संकलित केले जात आहेत. आजवर १,२१३ ग्रंथ उपलब्ध झाले असून संकलनाचे काम अजूनही सुरू आहे. यामुळे विभागात संपन्न ग्रंथालयही निर्माण होत आहे.
विभागात चंदगडी बोलीचा अभ्यास, श्रद्धा व अंधश्रद्धेची भाषिक संरचना, मराठी कवितेवरील बुद्ध विचाराचा प्रभाव, कोल्हापूर जिल्ह्यातील बलुतेदारांच्या बोलीचा अभ्यास हे बृहद प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय विज्ञान व सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळामार्फत गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे साहित्य प्रकाशित केले जाणार आहे. या प्रकल्पाचे कामही या विभागात सुरू आहे. याबरोबरच ‘तृतीयपंथीयांच्या बोलीचा अभ्यास’ हा बृहद प्रकल्प विभागामार्फत घेतलेला आहे. उपरोक्त प्रकल्पांव्यतिरिक्त मराठी अध्यापनांबाबत संशोधन गरजेचे असल्यामुळे याबाबतचे प्रकल्पही हाती घेण्यात आलेले आहेत.
अलीकडच्या काळात खेड्यापाड्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी धुमाकूळ घातल्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. या परिस्थितीशी मुकाबला करता यावा, म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना विभागाने स्वतःशी जोडून घेतले आहे. या शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग त्यांच्या त्यांच्या गटविभागात घेतले जात आहेत. यासाठी या शिक्षकांना सततच्या संपर्कात ठेवले गेले आहे. माध्यमिक शाळांतील सर्व विषयांच्या शिक्षकांना मराठीबाबत साक्षर करण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आलेला आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर मराठीबाबत प्रत्येक मराठी विभागाने भरीव काम केले तर इंग्रजी शाळांचे वाढते वर्चस्व कमी करण्यात यश मिळणार आहे, अशा निष्कर्षाला हा विभाग आलेला आहे.
विभागातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, चर्चासत्रे सातत्याने घेतली जात आहेत. या वर्षीपासून विद्यापीठ परिसरात सर्जनशील लेखन करणाऱ्या लेखकांची कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी या विद्यापीठ क्षेत्रातील ६० नवोदित लेखकांची कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यात आली. याबरोबरच विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयातील लिहिणाऱ्या मुलांना मार्गदर्शन व्हावे म्हणून विद्यार्थी-लेखक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. वाचनविकास कार्यशाळाही घेण्यात आली. वाचनाभिरुची वाढविणे, वाचनाचे दृष्टिकोन समजावून देणे व वाचन ही गंभीर प्रक्रिया आत्मसात करण्यासाठी घ्यावयाचे परिश्रम याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अशा स्वरूपाच्या कार्यशाळांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढावा, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
विभागामार्फत ग्रंथ प्रकाशनाचे प्रयत्नही गंभीरपणे केले जात आहेत. ज्येष्ठ लेखक दत्ता देसाई यांनी विभागात ‘आधुनिकता व उत्तरआधुनिकता’ या विषयावर दिलेली तीन व्याख्याने विभागामार्फत प्रकाशित केली जात आहेत. याबरोबरच ‘समकालीन भारतीय साहित्य’ या विषयावर विभागात झालेली व्याख्याने ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. विभागात महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे आधुनिक मराठी साहित्य हे ज्ञानमंडळ कार्यान्वित झाले असून ‘नोंद लेखनाचा प्रशिक्षण वर्ग’ लवकरच घेण्यात येणार आहे.
संशोधन व्यवहार निखळ राहावा, यासाठी शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग सततच आग्रही राहिला आहे. विभागाची कामगिरी वेगवेगळ्या प्रकारे उल्लेखनीय असली तरी, अलीकडे मराठी विषयाची निवड बुद्धिमान विद्यार्थी कमी करत असल्यामुळे, विविध अडचणी निर्माण होत आहेत. बुद्धिमान मुलांना मराठी विषयाकडे वळविण्यासाठीच्या प्रयत्नांचा शोध सुरू आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरच यासाठी भरीव श्रम घेण्याची गरज असल्यामुळे विभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे.
-----------------------------
साहित्यातले समाजअंग उजळले...
१९८२मध्ये पॉप्युलर प्रकाशन व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चर्चासत्रात डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘मराठी कादंबरी ः प्रेरणा व स्वरूप’ हा निबंध सादर केला. आणि मराठी समीक्षेतील केंद्र, परीघ ही संकल्पनाच बदलून गेली. या चर्चासत्रातील निबंधांचे एकत्रीकरण करून ‘मराठी वाङ्मय प्रेरणा व स्वरूप’ हा ग्रंथ सिद्ध झाला. हे नोंदविण्याचे कारण असे की, यानंतरच मराठी साहित्यात सामाजिक दृष्टीने अभ्यासाची परंपरा निर्माण झाली. विभागाने आजवर दिलेले योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे.
(विभाग प्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
इमेल आयडी : rajan.gavas@gmail.com
शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. अरुणा दुभाषी,
-------------------
हेडिंंग : समाजाभिमूख संशोधनाचा वसा
------------------
इंट्रो : १९७१ मध्ये विद्यापीठात प्रा. गं. बा. सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी स्तोत्रवाङ््मय’ या विषयावरील पहिला प्रबंध सादर झाला. त्यानंतर विभागात अनेक साहित्यिक, साहित्यप्रकार, रचनाप्रकार यांच्यावर संशोधन झाले आहे. डॉ. स. गं. मालशे, डॉ. भीमराव कुलकर्णी, डॉ. मीना जोशी, डॉ. चंद्रकांत वर्तक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. अनंत देशमुख, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे अशा अनेक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले आहे...
------------------
५ जुलै १९१५ रोजी सुरू झालेल्या श्रीमती ना. दा. ठाकरसी उर्फ एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठामध्ये मराठी हा विषय प्रारंभापासूनच शिकवला जात होता. मराठीतील थोर तत्वज्ञ साहित्यिक वामन मल्हार जोशी हे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी होते. पुढे १९५६ मध्ये पदव्युत्तर मराठी विभाग सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधन विभागात सुरू आहे.
१९७१ मध्ये विद्यापीठात प्रा. गं. बा. सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी स्तोत्रवाङ््मय’ या विषयावरील पहिला प्रबंध सादर झाला. त्यानंतर विभागात अनेक साहित्यिक, साहित्यप्रकार, रचनाप्रकार यांच्यावर संशोधन झाले आहे. डॉ. स. गं. मालशे, डॉ. भीमराव कुलकर्णी, डॉ. मीना जोशी, डॉ. चंद्रकांत वर्तक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. अनंत देशमुख, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे अशा अनेक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले आहे.
सध्या विभागामध्ये १५ विद्यार्थिनींचे पीएच.डी.करिता संशोधन सुरू आहे. विद्यार्थिनींना संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांची पूर्वतयारी चांगली व्हावी या हेतूने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने एम.ए.च्या अभ्यासक्रमात संशोधन विषयाच्या तीन अभ्यासपत्रिकांचा समावेश केला आहे. संशोधन प्रक्रियेविषयीचा तत्वविचार विद्यार्थिनी दुसऱ्या सत्रात शिकतात. तिसऱ्या सत्रात त्या प्रक्रियेचे उपयोजन करायचे असते आणि चवथ्या सत्रात त्यांना प्रबंधिका सादर करायची असते. एम.फिल. व पीएच.डी. पदवीकरिता जी संशोधन प्रक्रिया राबवली जाते ती या विद्यार्थिनी एम.ए. करतानाच आत्मसात करतात. त्यामुळे त्यापुढे जेव्हा एम. फिल वा पीएच.डी करण्यासाठी येतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन तयार असल्यामुळे विषयाच्या निवडीपासून सूची, ग्रंथालयाचा वापर, टिपणी इ. बाबतीत त्यांची तयारी दिसून येते.
सध्या विभागात गझल, गीतकाव्य, रूपककथा या साहित्यप्रकारांवर आणि भालचंद्र नेमाडे, द. मा. मिरासदार, प्रतिमा इंगोले यांसारखे लेखक आणि ना. घ. देशपांडे, ना. धों. महानोर यासारखे कवी यांच्या साहित्यकृतींवर संशोधन सुरू आहे. या शिवाय वि.दा. सावरकर आणि नरेंद्र दाभोळकर यांसारख्या विचारवंत साहित्यिकांवरही संशोधनपर कार्य सुरू आहे.
(मराठी विभागप्रमुख, एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई )
Aruna.dubhashi@gmail.com
----
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : प्रा. हनुमंत मते
hbmate70@gmail.com
-------------------
हेडिंंग : परंपरेची बूज राखणारे संशोधन
------------------
इंट्रो : सोलापूर विद्यापीठात शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती यासंदर्भात स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवरती सोलापूर विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिसंवादांचे आयोजन केले जाते. बोलीभाषांची विविध रुपे उलगडून दाखविणारे कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाने नेहमीच हाती घेतले आहेत. त्याला जोडूनच होणाऱ्या चर्चासत्र व परिसंवादात नामांकित भाषातज्ज्ञ सहभागी होऊन या कार्यक्रमांची बौद्धिक उंची वाढवतात.
------------------
एक जिल्हा एक विद्यापीठ या योजनेनुसार सोलापूर येथे ऑगस्ट २००४मध्ये विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकारची ११६ महाविद्यालये आहेत. त्यातील तीसहून अधिक महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. सोलापूर जिल्ह्यातून मराठवाड्यातील काही भागांतून तसेच कर्नाटकातूनही अनेक विद्यार्थी सोलापूरच्या महाविद्यालयांत शिकायला येतात. मराठी मायबोलीचा उगम, विकास, समृद्धी आणि भवितव्य यांचा विचार करुन सोलापूर विद्यापीठातर्फे विविध उपक्रम नेहमी राबविले जातात. मराठी भाषेचा विविध पैलूंनी विचार करून, या भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकडून लेख लिहून घेऊन, ते विकिपिडियावर प्रसिद्ध केले जातात. मातृभाषेची महती आणि माहिती तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने काही कार्यक्रमांचे सहआयोजन केले जाते. समाजप्रचार माध्यमातील मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी या विषयांवरील व्याख्यानेही आयोजिली जातात. सोलापूर विद्यापीठात शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती यासंदर्भात स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवरती सोलापूर विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिसंवादांचे आयोजन केले जाते. बोलीभाषांची विविध रुपे उलगडून दाखविणारे कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाने नेहमीच हाती घेतले आहेत. त्याला जोडूनच होणाऱ्या चर्चासत्र व परिसंवादात नामांकित भाषातज्ज्ञ सहभागी होऊन या कार्यक्रमांची बौद्धिक उंची वाढवतात.
मराठी भाषा साहित्य कोश वाडमय या संदर्भातील नावीन्यपूर्ण गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले जाते. प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे व संगणकाच्या चोवीस तास वापरामुळे हाताने लिहिणे ही गोष्ट खूपच कमी होऊ लागली आहे. त्याची जागा संगणकाच्या की बोर्डने घेतली आहे. मात्र मराठी हाताने लिहिता येणे, हा वेगळा आनंद असतो. त्यासाठी मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर अशा स्पर्धाही सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजिल्या जातात. मराठी कथा, कविता, नाटक यांची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना लेखनाच्या दृष्टीकोनातून सक्षम बनविण्याचे प्रयत्न केले जातात. सोलापूर विद्यापीठात प्रामुख्याने कन्नड, तेलुगू आणि मराठी या भाषांमध्ये संशोधन सुरु असते. एम. फील. आणि पीएचडी या स्तरावर हे संशोधन होते. एका प्राध्यापक मार्गदर्शकाच्या हाताखाली दरवर्षी एमफीलचे सहा व पीचएचडीचे सहा विद्यार्थी या संशोधनकार्यात गुंतलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात जन्मलेल्या संतांमध्ये सावता माळी, संत चोखामेळा, कान्होपात्रा, संत दामाजीपंत, स्वामी समर्थ अशा नावांचा समावेश आहे. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे म्हणणारे संत सावता माळी हे प्रत्येकालाच प्रात:स्मरणीय आहेत. दुष्काळात बादशहाची धान्याची कोठारे जनतेला खुली करणारे संत दामाजीपंत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचेच. शाहीर राम जोशीही सोलापूर जिल्ह्यातीलच. साहित्यसम्राट न.चि. केळकर यांचा जन्म जिल्ह्यातील मोडनिंब या गावी झाला, तर नवकवितेचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर जिल्ह्यातील मर्ढे या गावचे होते. युद्धकाळात रुग्ण सैनिकांची सेवा करून भारताचे नाव जगभर उज्ज्वल करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जन्मगाव सोलापूर असून, येथे त्यांचे स्मारकही आहे. तसेच पंचागकर्ते दातेही सोलपूरचेच. कवी कुंजविहारी, शाहीर अमर शेखांपासून ते निर्मलकुमार फडकुले, ‘अक्करमाशी’ या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक प्रा. निशिकांत ठकार, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, समीक्षक गो. मा. पवार, राणा पवार, त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यापासून ते प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातलेच. अशा सगळ्या नामवंतांनी, प्रतिभवंतांनी मराठी भाषेची जी सेवा केली आहे, तिच्या विकासासाठी जो मोलाचा हातभार लावला आहे त्याचे पांग फेडणे अशक्य आहे. या थोर परंपरेची बूज राखत सोलापूर विद्यापीठ मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तेही संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातूनही.
प्रा. हनुमंत मते
संचालक,
विद्यार्थी कल्याण विभाग,
सोलापूर विद्यापीठ
-----------
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : प्रा. केशव देशमुख
-------------------
हेडिंग : सार्थ संशोधन पुष्कळसे अल्प
------------------
ब्लर्ब : संशोधन म्हटले की त्याला चिंतनमूल्य, समाजमूल्य, संदर्भमूल्य, वाङ्मयमूल्य ही चार मूल्ये किंवा यापैकी एखादे तरी ठळक मूल्य असणे अभिप्रेतच असते. तर मग या श्रेणीचा मूल्य शोध कमीच गवसतो. या न्यायाने मराठी संशोधनाचा विद्यमान दर्जा हिरमोड करतो.
------------------
एखादे बीज स्वत:ला आधी गाडून घेते आणि उद्या रोपटे होऊन वर येते, असा हुन्नर संशोधकांत हल्ली अपवादाने आढळतो. त्यामुळे ‘मराठी’त एम. फिल. काय अथवा पीएच.डी. काय, या उभय वर्गातील संशोधन ‘अप्रतिम’ या शब्दांत समाविष्ट करावे, असे नक्कीच नाही. बहुतांश विद्यापीठांत मराठी विषयनिष्ठ संशोधनाचा झपाटा आणि सपाटा वेगवान असा असतो, याला आमचेही विद्यापीठ अपवाद नाही. पण सार्थ (मिनिंगफूल) संशोधन पुष्कळसे अल्प आहे. संशोधन म्हटले की त्याला चिंतनमूल्य, समाजमूल्य, संदर्भमूल्य, वाङ्मयमूल्य ही चार मूल्ये किंवा यापैकी एखादे तरी ठळक मूल्य असणे अभिप्रेतच असते. तर मग या श्रेणीचा मूल्य शोध कमीच गवसतो. या न्यायाने मराठी संशोधनाचा विद्यमान दर्जा हिरमोड करतो.
मुळात संशोधन ही फावल्या वेळेची (लिझर) गोष्ट नव्हे. डोक्यात लोभ ठेवून पार पाडावयाचे हे कार्यपण नव्हे! तर उलट ज्ञानात्मक (कॉग्निटिव) असे बिरूद स्वीकारलेले पीएच.डी. कार्य आहे. मी इथे एक दाखला मुद्दाम नमूद करेन की, ‘बदलते ग्रामीण वास्तव आणि मराठी कादंबरी’ या विषयावर आसाराम लोमटे आमच्याकडे पीएच.डी. पदवी प्राप्त झाले! संशोधन कसे पाहिजे, याचा अप्रतिम नमुना म्हणून या प्रबंधाकडे बघता येईल. लोमटेंचा प्रबंध आमच्या विद्यापीठाच्या मराठी विभागाचे मी गौरवचिन्ह मानतो!
‘भाषा’ हा शब्द केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टीने म. जोतिराव फुले, संत तुकाराम, डॉ. आंबेडकर, वारकरी कीर्तन परंपरा किंवा दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटांची लोकभाषा, कृषी-संस्कृतीतील स्त्रिया-पुरुष यांची भाषा किंवा शाहीर आणि लोककलावंताची एक खास असलेली ‘ढंगदार-जोरदार भाषा’ आदींचा अभ्यास म्हणूनच कळीचा ठरायला हवा. यासाठी विद्यार्थीशोध आणि विद्यार्थी ‘घडविण्यासाठी’ आमचा सर्वतोपरी प्रयत्न असतो. संशोधनात रोगटपणा (मॉरबॅडिटी) मूळ धरू नये, याचाही यत्न आम्ही करतो. शक्यतोवर नावीन्यपूर्ण, जरा आव्हानात्मक पण दमछाक करणारे आणि शेवटी समाधान देणारे मराठी भाषेचे, साहित्याचे नूतन विषय आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. भालचंद्र नेमाडे किंवा भुजंग मेश्राम, विश्वास पाटील, अथवा आदिवासी विश्वातील मौलिक काव्यलेखन आणि याशिवायही नरेंद्र दाभोलकरांचे विचार वाङ्मय, भाषांतर, लोकसाहित्य, संत साहित्य असे विषय निवडत एम. फिल, पीएच. डी. प्रबंधलेखन करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तरीही व्याकरण विद्या, विज्ञानवाङ्मय, मराठी आणि सिनेमा, बोलीविज्ञान, भाषा, समाज, मराठी आणि साहित्य या धाटणींचे विषय निवडून त्यावर काही एक मौलिक संशोधन मराठीची ध्वजा उंच करायला साहाय्य करील, असा आमचा समकाल दृष्टिकोन आहे. समकालीन (कंटेम्पररी) स्वरूपाचे विषय निवडतानाच अन्वर्थक (रेलेव्हन्ट) स्वरूपाच्या विषयांचे वेध मराठी संशोधनाला लगडले पाहिजे. या दृष्टीने विद्यार्थीशोध विभाग घेत असतो. अशा संशोधनातच मला वाटते की, मराठीची समृद्धी सामावलेली आहे.
‘मराठी’ म्हणून आणि ‘भाषा’ म्हणून संशोधनाची पत व प्रत या दोन्ही गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी विद्यार्थी-शिक्षक या दोघांचीही असतेच! पण या पलीकडेही १) बिनमुद्द्यांचे (पॉइंटलेस) संशोधन होऊ नये.
२) संशोधनाच्या मुळाशी मूलाधार (ओरिजनल सोर्स) हा असायलाच हवा.
३) संशोधनात अभिरुचीची अनेकता (प्ल्यूरॅलिटी) जपणे व तिचे संवर्धन व्हायला हवे.
४) आपले हे संशोधन विचारसाहचर्य (असोसिएशन ऑफ आयडियाज) जपणारे असावे.
५) मराठीच्या या सांप्रत संशोधनातून मताभिनिवेशाचा (डॉग्मॅटिक) दर्प न येता मूल्यविधानाची (व्हॅल्यू जजमेन्ट) अनुभूती यायला हवी.
६) भाषिक विश्लेषण (व्हर्बल अॅनालिसिस) म्हणून तसेच अधिकृतता (ऑथेन्टिसिटी) म्हणून मराठीच्या या संशोधनाची प्रत आणि किंमत सदोदित जपताच आली पाहिजे.
वर निर्देश केलेल्या सहा सूत्रांचा विचार करूनच आम्ही पावले टाकतो. परिश्रम, प्रतिभा आणि नावीन्य हे तीन परवलीचे शब्द मराठीच्या संशोधनात आम्ही शक्यतोवर नजरेआड होऊ देत नाही. इतरांनीही होऊ देऊ नये.
विद्यापीठातल्या पीएच. डी. प्रबंधांवर जेव्हा बारीक-सूक्ष्म नजर टाकतो, तेव्हा घागरभर पाण्यातून मला समाधान देऊ पाहणारे काही थेंबच हाताशी लागतात, पण ही बाब खंतावणारी नाही. कारण, हे माझे म्हणणे नकारघंटेचे नसून वास्तवभेद सांगू पाहणारे आहे.
मी वर्षभरातील मागच्या प्रबंधविषयांवर या निमित्त दृष्टी टाकली, तेव्हा ‘मराठी गूढकथा’, ‘स्त्री नाट्यलेखक’, मराठी कादंबरीतील धरणग्रस्त-भूकंपग्रस्त यांचे चित्रण, ‘जाहिरातलेखन’, अथवा ‘मराठी सामाजिक नाटकातील वैद्यकीय वास्तव’, ‘मराठी साहित्यातील तमाशा कलावंतांचे चित्रण’, ‘दि. बा. मोकाशी’ किंवा ‘सुबोध जावडेकर’ यांच्या निराळ्या विषयावर संशोधन झालेले पाहायला मिळाले. ‘कविता-रती’, ‘विचारशलाका’ यांसारख्या वाङ्मय आणि विचार परंपरा सशक्त चालविणाऱ्या अनियतकालिकांवरही संशोधन झाले आहे. इतकेच नव्हे तर दलित - आदिवासी - ग्रामीण - महानगरी आणि विविध नवप्रवाहांच्या मौलिक साहित्यावर, चळवळींवर संशोधन झालेले आहे. काही नवे संशोधन सुरू आहे. भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरी, कविता, समीक्षा, मुलाखती (‘हिंदू’ या नेमाडेकृत बृहत कादंबरीवर विनायक येवले नावाच्या विद्यार्थ्याचे संशोधन दखलपात्र ठरावे!) यांचा धांडोळा घेणारे संशोधन विद्यार्थी करत आहेत. याचबरोबर विज्ञान साहित्यावर मौलिक संशोधन झाले आहे. भविष्यात अलक्षित अशा बाल-कुमार साहित्य, बोलीवाङ्मय, अनुवादित साहित्य, आजची उत्तम मराठी दूरदर्शन मालिका आणि मराठी किंवा मराठी आणि दादा कोंडके ते नागराज मंजुळे किंवा जगदिश खेबुडकर ते गुरू ठाकुर या संबंधाने नवे संशोधन मराठीत करता येईल का, याविषयी मंथन व त्यासंबंधीची चाचपणी आम्ही करत आहोत.
भाषाविज्ञान, वाङ्मयेतिहास, साहित्यसिद्धांत, व्याकरण-रचना, मराठी छंद, वारकरी आणि महानुभाव साहित्य अथवा चळवळींचे साहित्य उदा. आदिवासी साहित्यातील आत्मकथने, मराठवाड्यातील सण-उत्सवांतील गाणी, वामनदादांची गाणी, महात्मा बसवेश्वरांचे वाङ्मय, आंबेडकरी विचारप्रवाह किंवा मराठी कादंबरीतील शेतमजुरांचे चित्रण, संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तौलनिक साहित्य : मराठी आणि इतर भाषा, वारकरी वाङ्मयातील लौकिक जीवन, मराठी कादंबऱ्या आणि समस्याप्रधानता, मराठी वैचारिक साहित्य आणि भटक्या-विमुक्तांचे चित्रण आदी. हे तर मराठीच्या संशोधनात ‘मध्यवर्ती’ आहेच. पण त्यातील पुनरावृत्ती टाळून, एकच गोष्ट पुन:पुन्हा न मांडण्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मराठी भाषा व इतिहास म्हणून आदिम (प्रिमिटिव्ह) विषययुक्त म्हणून उत्खनन व उत्कर्ष हा तर सतत मांडला जावाच, पण याशिवाय ‘नवे’, ‘आव्हानात्मक’ आणि मराठीजागर बुलंद करणारे पण संशोधन व्हावे, हा ध्यास आम्ही जपू पाहात आहोत.
(रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
इ-मेल - keshavdeshmukh74@gmail.com
----
स्लग : शोध मराठीचा
-------------------
बायलाइन : प्रा. डॉ. महेंद्र पगारे
-------------------
हेडिंंग : भाषा विकास हेच ध्येय
------------------
ब्लर्ब : मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास हा निव्वळ चाकोरीबद्ध राहू नये, तर तो विश्वात्मक पातळीवर प्रसरण पावणारा असला पाहिजे. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा ‘मुख्य दरवाजा’ हा मराठी भाषेचा असला पाहिजे, परंतु त्याबरोबरच विविध भाषांच्या खिडक्यादेखील आमच्या साहित्य संशोधनाला असल्या पाहिजेत...
------------------
जळगाव, धुळे व नंदुरबार या एकूण तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यकक्षेत अहिराणी ही प्रमुख बोली बोलली जाते. त्यामुळेच अहिराणी बोली व अहिराणी साहित्याच्या अनुषंगाने महाविद्यालय व विद्यापीठीय स्तरावर लक्षवेधी काम झालेले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयपत्रिकेच्या शीर्षकासाठी ‘संशोधन प्रकल्प’ दिला जातो. या संशोधन प्रकल्पाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपल्या ग्रांथिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांशी सर्वेक्षणदृष्ट्या व संदर्भ नोंदवण्याच्या दृष्टीने जोडून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. सर्वेक्षण कसे करावे? संदर्भ कसे नोंदवावेत? यासह संशोधनाच्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी संशोधन कसे करावे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते. संशोधन काटेकोरपणे व्हावे, म्हणून स्वतंत्रपणे संशोधनपद्धती हा एक पेपरच अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आला आहे.
मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास हा निव्वळ चाकोरीबद्ध राहू नये, तर तो विश्वात्मक पातळीवर प्रसरण पावणारा असला पाहिजे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, पारशी, अरबी, जर्मनी अशा अनेक भाषांसोबत व साहित्यासोबत तुलना होत चांगल्या गोष्टींचे आदान-प्रदान करीत मराठी भाषेची समृद्धी अधिकाधिक भक्कम झाली पाहिजे. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा ‘मुख्य दरवाजा’ हा मराठी भाषेचा असला पाहिजे, परंतु त्याबरोबरच विविध भाषांच्या खिडक्यादेखील आमच्या साहित्य संशोधनाला असल्या पाहिजेत. कारण त्यामुळे हवा खेळती राहते. ज्ञान, विवेक, संस्कार आणि संस्कृती यांचे सक्षम आदान-प्रदान होते. या आदान-प्रदानातून मराठी भाषेचा आणि साहित्याचा खूप चांगला विकास होऊ शकतो. अशा व्यापक पटलावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी विभाग संशोधनाची विकसनशील भूमिका रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे.
उ. महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘भिलोरी लोकगीतांचा अभ्यास’, ‘आदिवासी लोकसाहित्याचा अभ्यास’, ‘मावची’, ‘गावीत', ‘पावरा’ इ. भाषांचा अभ्यास, ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘लोकसाहित्यातील लोकतत्त्वे’, ‘समाजभाषेचे स्वरूप’, ‘ग्रामीण साहित्याचे स्वरूप’, ‘ग्रामीण-दलित साहित्याची तुलना’, ‘दलित साहित्याची प्रेरणा’, ‘ग्रामीण साहित्याची प्रेरणा’, ‘दलित-आदिवासी साहित्याची प्रेरणा’, ‘दलित साहित्यविषयक चळवळी’, ‘दलित कार्यकर्त्यांच्या चळवळी’, ‘आदिवासी अभ्यासकांच्या मुलाखती’, ‘ग्रामीण लेखकांची माहिती’, ‘नाट्यविषयक चळवळ’, ‘प्रायोगिक नाटक रंगभूमी’, ‘व्यावसायिक रंगभूमीचे स्वरूप’, ‘प्रबोधनाची चळवळ’, ‘महात्मा फुलेंच्या साहित्याचा अभ्यास’, ‘सार्वजनिक सत्य धर्माचे स्वरूप’, ‘आंबेडकरी जलसे’, ‘इहवादाचे स्वरूप’, ‘तमाशा’, ‘वगनाट्य’, ‘लळीत’ इत्यादीचे स्वरूप, ‘संतांच्या साहित्यातील सामाजिकता’, ‘शाहिरांच्या काव्यातील सौंदर्यानुभव’, ‘तुकाराम व कबीर यांच्या कवितेतील साधर्म्य-वैधर्म्य’ अशा अनेक विषयांवर संशोधन करण्यास प्राधान्य दिले आहे.
(संचालक व मराठी विभाग प्रमुख, भाषा अभ्यास प्रशाला व संशोधन केंद्र, जळगाव)
इ-मेल : dr.mspagare@gmail.com
---------------
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. मनोज तायडे
-------------------
वऱ्हाडी खाक्या
------------------
ब्लर्ब : राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाने वऱ्हाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे आव्हान स्वीकारले. या प्रकल्पाची फलश्रुती म्हणजे, त्यातून ‘वऱ्हाडी शब्दकोश’, ‘वऱ्हाडी म्हणींचा कोश’ आणि ‘वऱ्हाडी वाक्प्रचार कोश’ असे तीन स्वतंत्र कोश तयार झाले. ..
------------------
बदलत्या काळानुरूप आदिवासी संस्कृतीवर शहरीकरणाचे आक्रमण होत आहे. त्यातली कोरकू संस्कृतीसुद्धा आक्रमणाच्या विळख्यात आहे. तिचे मूळ रूप हरवत चालले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने डॉ. मनोज तायडे यांचा ‘मेळघाटातील कोरकू आदिवासींची भाषा, त्यांचे साहित्य व संस्कृती’ जतन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर केला. प्रकल्पांतर्गत कोरकू जनजीवनाचा (अचलपूर येथील स्व. मूलजीभाई कढी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. काशिनाथ बहाटे यांनी डॉ. मधुकर वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरकू भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास केला. हे संशोधन एवढे मूलगामी आहे की, डॉ. गणेश देवी यांच्यासारख्या भाषावैज्ञानिकाने त्याची दखल घेतली आहे.) जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास चित्रित करून रीती-रिवाज, घटना-प्रसंग यांचे विश्लेषण करून अभिलेख जतन करून ठेवला आहे.
विभागातर्फे दुसरा पूर्ण झालेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे, ‘वऱ्हाडी बोलीचा शब्दकोश’. या प्रकल्पात सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी-लेखक डॉ. विठ्ठल वाघ यांनी मुख्य संशोधकाचे कार्य स्वीकारले. या कामी संशोधकांनी अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा पिंजून काढला. ‘शब्दयात्रा’ हा उपक्रम राबवून खेड्यापाड्यातील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून, बायाबापड्यांकडून, शेतकरी-शेतमजुरांकडून शब्द गोळा केले. डॉ. वाघांनी त्याचे वर्गीकरण केले. अर्थ लिहिले. या प्रकल्पाची फलश्रुती म्हणजे, त्यातून ‘वऱ्हाडी शब्दकोश’, ‘वऱ्हाडी म्हणींचा कोश’ आणि ‘वऱ्हाडी वाक्प्रचार कोश’ असे तीन स्वतंत्र कोश तयार झाले. हे तिन्ही कोश महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे प्रकाशनार्थ देण्यात आले.
संशोधनाच्या नव्या दिशा धुंडाळणे ही विद्यापीठातल्या संशोधकांची सहज प्रवृत्ती ठरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेळघाटातील कोरकू लोकसंस्कृतीचा शोध घेणारा ‘कोरकू लोकगीतांचे संकलन आणि लिप्यंकन’ (डॉ. सुखदेव ढाकणे), ‘मराठी विज्ञान कथात्म साहित्य आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम’ आणि ‘अनुवादित मराठी विज्ञान कथात्म साहित्य आणि त्याचा मराठी कथात्म साहित्यावर होणारा प्रभाव’ (डॉ. मोना चिमोटे) असे दोन प्रकल्प पूर्ण करताना मूळ मराठीतून निर्माण झालेले विज्ञानसाहित्य आणि मराठीत अनुवाद झालेले विज्ञानसाहित्य या दोन्ही प्रकाराचा अभ्यास मांडला गेला. याशिवाय ‘अर्वाचीन मराठीतील काव्यविचार’ (डॉ. हेमंत खडके) हा विद्यापीठ अनुदान आयोगाने साहाय्य केलेला प्रकल्प पूर्ण करून साहित्य-सौंदर्यशास्त्र विचारात मोलाची भर घातली गेली. कृषीतील अनेक संकल्पना आज कालबाह्य ठरत आहेत. यांत्रिकीकरणामुळे कित्येक अवजारे आज तयारही होत नाहीत. अशा प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने ‘कृषी साधनांचा कोश’ आणि ‘महाराष्ट्रातील शेती व्यवसाय संकल्पना कोश’ (डॉ. माधव पुटवाड) असे दोन कोश तयार केले.
अलीकडील काळात डॉ. पंकज वानखडे यांनी ‘संत गाडगेबाबा यांचे जीवन व कार्य' या संदर्भात प्रकाशित झालेल्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ डॉ. राजेंद्र मुंढे यांनी ‘उत्तम कांबळे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’, डॉ. शीला लोखंडे यांनी ‘तुकारामांच्या काव्याची स्वातंत्र्योत्तर समीक्षा’ या विषयावर संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. सध्या विभागात लोककला व लोककलावंत यांच्या माहितीचे संकलन व संशोधन करणारा प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाकरिता हे कार्य डॉ. प्रणव कोलते आणि डॉ. काशीनाथ बहाटे, डॉ. टी. एस. राठोड, डॉ. सीमा साठे, डॉ. चंदू पाखरे, प्रा. अतुल सारडे, डॉ. श्रीकृष्ण काकडे, डॉ. रावसाहेब काळे हे त्यांचे सहकारी करत आहेत.
-----------------------
(मराठी विभागप्रमुख, पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती)
इमेल- manojtayade1563@gmail.com
-----------
शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : प्रा. डॉ. सतीश बडवे
-------------------
हेडिंधुनिक विचारधारेशी सुसंगत संशोधन
------------------
ब्लर्ब : ग्रंथपरीक्षण, लेखनतंत्र, कथालेखन तंत्र या स्वरूपाच्या कार्यशाळा विद्यापीठात आयोजित केल्या जातात. अलीकडे राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा घेतली गेली. मॉरिशसहून महात्मा गांधी इन्स्टिट्यूटचे डॉ. बिद्दन अब्बा यांचे व्याख्यानही दूरवरचा मराठी संबंध कसा असतो, याचे दर्शन घडविणारा ठरला.
------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाची पूर्वपरंपरा नि:संशय अध्यापन आणि संशोधनाशी निगडित आहे. त्यामुळे समीक्षा, संतसाहित्य, आधुनिक वाङ्मयीन प्रवाह, लोकसाहित्य, भाषाविज्ञान वाङ्मयेतिहास अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याचे प्रयत्न प्रारंभापासूनच आढळतात. अलीकडच्या काळात कालसुसंगत अशा भाषिक कौशल्य व सर्जनशील लेखनाचा विभागाच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला. याचबरोबर मराठवाड्यातील साहित्य, ग्रामीण-दलित स्त्रीवादी-आदिवासी यांच्या वाङ्मयीन चळवळी, साहित्याचे माध्यमांतर अशा आधुनिक विचारधारेला अभ्यासक्रमात स्थान दिले गेले आहे. तौलनिक साहित्याभ्यास, अनुवाद, मराठी लेखन, व्यावहारिक व उपयोजित मराठी, भारतीय संविधान, संशोधनाची तोंडओळख असे पूरक विषयही मराठीच्या अभ्यासक्रमात आले. स्पर्धा परीक्षा (एम.पी.एस.सी./ यू.पी.एस.सी.) नेट, सेट, पेट यांसारख्या पात्रता परीक्षांना उपयुक्त ठरतील, अशा आशयविषयाचा समावेशही त्यात अंतर्भूत करण्यात आला आहे. जीवनजाणिवा आणि वाङ्मयीन जाणिवा विकसित होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी केली गेली आहे. अभ्यासक्रमाच्या या पायाभरणीतून तयार झालेला विद्यार्थी जेव्हा संशोधनाच्या क्षेत्रात उतरतो, तेव्हा भाषेचे व साहित्याचे सूक्ष्म विश्लेषण करू शकतो, असा दृष्टिकोन या पाठीमागे आहे.
सद्य:स्थितीत मराठी भाषा व वाङ्मय विभागात अनेकविध विषयांवर संशोधन चालू आहे. हे संशोधन केवळ ललित वाङ्मय प्रकारांशी निगडित न ठेवता, भाषेशी संबंधित असणारे विषयही या संशोधनकार्यात अंतर्भूत आहेत. त्यातही ललित साहित्य, वाङ्मय प्रकार, लोकसाहित्य या संदर्भातील विषय अभ्यासकांनी निवडले तरी त्यातही भाषिक अंगाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो. अलीकडच्या काळात संशोधनासाठी जे विषय आहेत, ते असे ः साठोत्तरी नाटकातील भिन्न प्रवाह, मराठी कथेतील स्थित्यंतर व प्रयोगशीलता, महानुभाव व वारकरी यांचे रचनाप्रकार, कादंबरीचे निवेदन तंत्र, संतसाहित्यातील कृषी व पर्यावरणविषयक जाणिवा, नियतकालिकांची वाङ्मयीन कामगिरी, काव्यसमीक्षा, साहित्यकृतींचे माध्यमांतर, लोकगीतांचा समाजभाषा विज्ञानाच्या अंगाने अभ्यास, कादंबरीचा रूपबंध, म्हणी-उखाणे-वाक्प्रचार यांतून घडणारे लोकजीवनदर्शन, मराठी-हिंदीमधील दलित स्त्री आत्मकथने, मराठीतील (निवडक) वैचारिक लेखन, वाचनाभिरुची, आदिवासींच्या बोली, भटक्या विमुक्तांच्या बोली, विज्ञानसाहित्य, बालसाहित्य या विषयांवर संशोधन केले जात आहे. यातील काही विषयांवर संशोधन प्रबंध सिद्ध झाले आहेत.
संशोधनासाठी जे विषय निवडले गेले आहेत, ते वाङ्मयीन प्रवाहांशी, वैचारिक लेखनाशी, वाङ्मयप्रकार व प्रवाहांच्या समीक्षेशी, संतसाहित्यातील अलक्षित राहिलेल्या विषयांशी, लोकसाहित्यातील शाब्दआविष्काराशी, बोली अभ्यासाशी, तौलनिक दिशेशी, स्थित्यंतरे व प्रयोगशीलतेशी निगडित आहेत. मराठी साहित्य व भाषेशी संबंधित असणारे येथील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या पिचलेले असतात. अभावग्रस्त वातावरणातून ते येतात. परंतु आनंदाची बाब म्हणजे, अलीकडच्या काळात सातपुड्याच्या परिसरात राहणारे आदिवासी विद्यार्थीही विभागात संशोधन करत आहेत. त्यांची बोली भिन्न आहे. तेही त्यांच्या बोलीची परंपरा, इतिहास, त्यांचे बोलीवाङ्मय यावर संशोधन करत आहेत.
प्रा. डॉ. सतीश बडवे
(मराठी भाषा व वाङ्मय विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
इमेल - dr.satishbadwe@gmail.com
-----
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. शैलेंद्र लेंडे
-------------------
हेडिग : नवसाहित्यप्रवाहकेंद्री संशोधन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयातील प्रामुख्याने महानगरांच्या केंद्रापलीकडील साहित्यव्यवहारासंबंधांतील संशोधनामुळे मराठी भाषा व साहित्याच्या संबंधात एक प्रकारची जागरुकता व जाज्वल्यता आकारास आलेली आहे...
------------------
भाषाव्यवहार हा जीवनाच्या विविध पातळ्यांवरून चालणारा व जीवनाला सर्व अंगांनी व्यापून टाकणारा व्यवहार असतो. कोणताही भाषिक समाज त्यांच्या भाषेतून केवळ लोकव्यवहार व समाजव्यवहार करीत नाही, तर तो त्या भाषेतून ज्ञानव्यवहार व बौद्धिक व्यवहारही करीत असतो. त्यामुळे कोणत्याही भाषेचा विचार करताना भाषेच्या संबंधात सुरू असलेल्या तत्संबंधित विविधांगी क्रिया-प्रक्रियांचा, तसेच त्यातील ज्ञानात्मकतेचा विचार करणे आवश्यक ठरते. मराठी भाषेचाही विचार याच प्रकारच्या ज्ञानव्यवहारात्मक दृष्टीतून करणे गरजेचे ठरते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयातील प्रामुख्याने महानगरांच्या केंद्रापलीकडील साहित्यव्यवहारासंबंधांतील संशोधनामुळे मराठी भाषा व साहित्याच्या संबंधात एक प्रकारची जागरुकता व जाज्वल्यता आकारास आलेली आहे. विशेषतः ग्रामीण, दलित, आंबेडकरवादी, आदिवासी व स्त्रीनिर्मित साहित्यप्रवाहांतील साहित्य व साहित्यिकांसंबंधी आस्थेवाईक आकलन पुढे येत आहे. साहित्य आणि समाजवास्तव, साहित्य आणि सामाजिक भान आणि साहित्यातून होणारे सामाजिक अभिसरणदेखील या संशोधनातून पुढे येत आहे.
सद्यःस्थितीत सुरू असलेल्या मराठीतील संशोधनाला विषयवैविध्याचे व लेखनाविष्काराचे विवक्षित स्वरूपाचे मूल्य आहे. मात्र अलीकडे विशेषतः संशोधनाच्या गुणात्मकतेच्या संबंधात विविध प्रकारच्या समस्यादेखील निर्माण झालेल्या आहेत. या समस्या विद्यार्थ्यांशी संबंधी, विभागातील अपुऱ्या मनुष्यबळासंबंधी, विद्यार्थ्यांच्या संशोधनदृष्टीसंबंधी, संशोधनाच्या साधनसामग्रीविषयी, संशोधनाच्या अभ्यासपद्धतीसंबंधी, संशोधकांच्या पुनरावलोकनासंबंधी, एकूण संशोधनप्रक्रियेसंबंधी, संशोधनातील एकंदर ज्ञानव्यवहारासंबंधी, संशोधकांच्या रोजगारासंबंधी, संशोधकांच्या भवितव्यासंबंधी तसेच संशोधनाच्या मौलिकतेसंबंधी, अशा विविधांगी स्वरूपाच्या आहेत. या विविध पातळ्यांवरील संशोधनविषयक समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करता आली व सामूहिकपणे मात करता आली, तर भाषा व साहित्यविषयक संशोधनाला तसेच समग्र मानव्यविद्या शाखेतील संशोधनाला मौलिकता मिळू शकेल. अंतिमतः समग्र ज्ञानव्यवहार खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध व अधिक सकस आणि अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल.
संशोधनाचा भर कविता आणि कादंबऱ्यांवर...
सद्यःस्थितीत कविता आणि कादंबरी हे दोन ठळकसंशोधनविषय आहेत. जागतिकीकरणाचा मराठी कवितेवर पडलेला प्रभाव, तसेच देशीवादाचा मराठी कादंबरीवर पडलेला प्रभाव, या विषयावर विभागात संशोधनकार्य सुरू आहे. त्याचबरोबर नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, शरणकुमार लिंबाळे, भुजंग मेश्राम, महादेव मोरे, सदानंद देशमुख, योगेंद्र मेश्राम, उर्मिला पवार या साहित्यिकांच्या साहित्यावर लेखकनिष्ठ संशोधनकार्य विभागामध्ये सुरू आहे. संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्यातील प्रबोधनपरतेचाही तुलनात्मक अभ्यास विभागात सुरू आहे. युजीसीच्या कनिष्ठ संशोधन छात्रवृत्ती व मनोहर सप्रे यांच्या साहित्यावर संशोधनकार्य सुरू आहे. विद्यापीठाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संशोधन छात्रवृत्ती या दोन्ही छात्रवृत्तींच्या अंतर्गत आदिवासी कविता, अर्वाचीन संत कविता व समकालीन कथा-कादंबरी यांच्या संबंधात विशेषत्वाने संशोधन सुरू आहे. या संशोधनामध्ये विनायक तुमराम, ह. मो. मराठे, मनोहर सप्रे या लेखकांवरील संशोधनाचा समावेश आहे. सद्यःस्थितीमध्ये मराठी विभागाच्या संशोधनकेंद्रामध्ये जवळपास १०० संशोधनकर्ते विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. संशोधनकर्त्यांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. इ.स. २००० ते २०१० या कालखंडात नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयात पीएच. डी. करण्यासाठी एकूण ५२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे दिसून येते. इ.स. २०११ ते २०१५ या काळातील नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठीच आहे.
( प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर )
इमेल - shailendra.rtmnu@gmail.com

मुंबई
विद्यापीठाच्या मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची
प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक,
उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे.
कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय;…
divyamarathi.bhaskar.com
No comments:
Post a Comment