Sunday, February 12, 2017

सावट 'सखाराम'चे! - - मिलिंद शिंदे - शब्दांकन - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १२ फेब्रुवारी २०१७च्या रसिक पुरवणीतील लेख (दोन लेख)





 मुक्ता बर्वे व तिचे सहकारी सखाराम बाइन्डर नाटकाच्या सध्या करीत असलेल्या पाच निवडक प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. 12 फेब्रुवारी 2017च्या रसिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रख्यात अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या लेखाची ही जेपीजी पाइल. मिलिंद शिंदे यांच्या लेखाचे शब्दांकन मी केले आहे. त्या लेखाची टेक्स्टलिंक, वेबपेज लिंक व लेखाचा संपूर्ण मजकूर सोबत दिला आहे.
वेबपेज लिंक व लेखाचा संपूर्ण मजकूर सोबत दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-milind-shinde-writes-…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/12022017/0/1/
----
नाटककार विजयतेंडुलकरांनी त्यांच्यानाटकांमधून माणसामध्ये दडलेल्या हिंस्र वृत्तीचा जाणीवपूर्वक शोध घेतला. त्या शोधातला एक टप्पा होता - सखाराम बाइन्डर. पुरुषी वर्चस्वाच्या भावनेने फुसफुसणारा, स्त्रीदेहावर मालकी हक्क सांगणारा असा हा सखाराम. त्याचा दंश जहरी, त्याची वाणी विखारी. चार दशकांपूर्वी आलेल्या या नाटकाने समाजातल्या ‘सभ्य नि सुसंस्कृत’ पुरुषांना अक्षरश: नागडं केलं होतं. पण आजचा समाज तरी बदललाय का? त्यातली सखाराम प्रवृत्ती लोपलीय का? याचा अंतर्मुख होऊन एक समाज म्हणून पुनर्विचार करायला लावणारी घटना मराठी रंगभूमीवर घडते आहे. चतुरस्र अभिनेत्री-निर्माती मुक्ता बर्वे आणि दिग्दर्शक जयंत जठार ‘सखाराम बाइन्डर’चे मुंबई आणि पुण्यात निवडक पाच प्रयोग करत आहेत. या निमित्ताने नाटकाच्या आशयाचे समकालीनस्त्री-पुरुष वर्तनाशी असलेले संबंध अधोरेखित करण्याच्या हेतूने लिहिलेला हा विशेष लेख...
------
सावट 'सखाराम'चे!
-----------
- मिलिंद शिंदे
milindrshinde@gmail.com
-----
शब्दांकन - समीर परांजपे
-----
प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले "सखाराम बाइन्डर' हे काळाच्या पुढे असणारे नाटक. हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा, त्याविरोधात अनेकांनी खूप गहजब माजविला नाटकाची कथा, त्यातील भाषा यावरुन प्रखर टीका झाली. कोर्टबाजीही करण्यात आली. पण अखेर या साऱ्यांना हे नाटक पुरुन उरले.
तेंडुलकर हे भविष्याचा वेध घेणारे नाटककार होते. सखाराम बाइन्डर नाटकामध्ये रंजनाची मूल्ये आहेत, तसेच समाजस्थितीची चिरफाडही तेंडुलकरांनी अत्यंत भेदक शैलीत केलेली आहे. या नाटकाचा मुख्य नायक, सखाराम बाइन्डर. त्याचे वर्तन पाहून तो कोणालाही खलनायकच वाटेल. तो दारु पितो, तो बायकांचा वापर करतो. जे जे काही वाईट आहे तो ते करतो. पण तो भयंकर खरे बोलतो. सखारामचा हा खरे बोलण्याचा गुण आपल्याला साऱ्या नाटकभर दिसत राहतो.
सखाराम हा समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक आहे. चार दशकापूर्वी हे नाटक लिहिलेले असले तरी ते आजही तितकेच सुसंगत आहे. कारण त्यात सखाराम ज्या पद्धतीने वागतो, त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला- घरांत पुरुष वागताना दिसतच असतात. फरक एवढाच असतो की, बदचालीने वागणाऱ्यांपैकी अनेक पुरुष आपले दुर्गुण लपवतात. सखारामचा सगळा उघड मामला आहे. पण, ‘सखाराम बाइन्डर’ मधली खरी खलनायक परिस्थितीला शरण जाताना आपला स्वार्थ जपणारी लक्ष्मीच आहे, असाही निष्कर्ष निघू शकतो. देवाचे सतत नाव घेणारी, देवपूजा करणारी लक्ष्मी नाटकाच्या शेवटी ज्या प्रकारे वर्तन करते, ते पाहून प्रेक्षकांना धक्का बसतो.
तेंडुलकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या नाटकांतील व्यक्तिरेखा विलक्षण बोलक्या असतात. प्रेक्षकांशी निराळ्या पातळीवर जाऊन संवाद साधतात. एरवीसुद्धा नाटककाराला काही गोष्टी नाटकातून सांगायच्या असतात. त्या गोष्टी मग नाटककार नाटकातील पात्रांच्या तोंडी असलेल्या संवादातून सांगतो. "सखाराम बाइन्डर'च्या माध्यमातून समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेतील त्रुटी, विखारीपण तेंडुलकर प्रेक्षकांना सांगतात. तेंडुलकरांची गिधाडे, कन्यादान, सखाराम बाइन्डर अशी सारी नाटके वेगळे काही सांगू पाहाणारी होती. त्यामुळेच या नाटकांविषयी वादंग निर्माण केले गेले. पण तेंडुलकरांची नाटके आग्रहाने करणारी एक फळीही मराठी रंगभूमीवर त्यावेळी होतीच की. सत्यदेव दुबे यांनी अट्टाहासाने तेंडुलकरांची नाटके केली. अगदी आग्रहाने केली. कमलाकर सारंग, लालन सारंग यांनीही तेंडुलकरांची नाटके करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. सखाराम बाइन्डर नाटक करताना वादळे उठली, राळ उडाली. या नाटकाबाबत सेन्सॉर बोर्डाबरोबर झालेला वादही खूप गाजला.
कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केलेले ‘सखाराम बाइन्डर’चे प्रयोग बघण्याची मला संधी मिळाली नाही. त्यात निळुभाऊ फुले यांनी साकारलेला सखाराम प्रचंड गाजला होता. मी जे ऐकले, वाचले आहे, त्यावरुन सांगतो की, सखारामचे तेरा-चौदा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने त्यावेळेस या नाटकाचे प्रयोग बंद करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र, नाटकावरील या बंदीविरोधात न्यायालयात जाऊन लढा द्यायचा, हे कमलाकर सारंग यांनी मनाशी निश्चित केले. साधारण नऊ-दहा महिन्यांपर्यंत ही न्यायालयीन लढाई चालली. हा खटला कमलाकर सारंग जिंकले. एका मोठ्या दिव्यातून ते बाहेर पडले. एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई ते जिंकले होते.
हे घडू शकले कारण, त्या वेळेस मूल्यांची बूज राखणारी, ती मूल्ये जतन करणारी माणसे मराठी रंगभूमीवर सक्रीय होती. आजच्या काळात व्यावसायिक नाटक करायचे म्हटल्यानंतर पहिल्यांदा विनोदी नाटकाची मागणी केली जाते. गंभीर नाटक करताना नफा-तोट्याचा विचार पहिला मनात येतो. अशा प्रकारचे नाटक चालले तरच, त्या नाटकावर अवलंबून असलेल्यांच्या हाताला रोजगार मिळणार, त्यांची पोटे भरणार हा त्यामागचा विचार असतो. सध्या व्यावसायिक नाटके करताना अशी अनेक व्यवधाने बाळगावी लागतात. कारण काळाचे संदर्भ, नाट्यरसिकांचा पोत हे सारेच बदलले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या ललित कला केंद्राचे अभिनेत्री-निर्माती मुक्ता बर्वे ,संदीप पाठक, सुहास शिरसाट, हिमानी निलेश, पुंडलिक धुमाळ आदी माजी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना साथ देणारे निर्माते दिनू पेडणेकर यांचे धाडस विलक्षण कौतुकास्पद आहे. ‘सखाराम बाइन्डर’ हे प्रत्येक पिढीतील रंगकर्मींना करावेसे वाटते, यातच त्या नाटकाचे आगळेपण दडलेले आहे. नाटकातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आजच्या परिस्थितीतही तितकीच सुसंगत आहे.
२००५ सालातील गोष्ट आहे. त्यावेळी मुंबईत माझे घर नव्हते. मी नगरला राहात असे. काही काम असेल, तरच मुंबईत मुक्कामाला असे. असाच एक िदवस नगरला असताना मला अमृता सुभाषचा फोन आला. ती म्हणाली की, तुझ्याशी एका व्यक्तीला बोलायचे आहे. तिने मला नाव न सांगता, त्या व्यक्तीच्या हाती फोन दिला. ती व्यक्ती पलीकडून बोलू लागली. ‘मी तेंडुलकर बोलतोय. तुमचे ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या सिनेमातील काम मी पाहिले. तुम्ही खूप चांगले काम करता. तुम्ही मुंबईत आलात की भेटूया'. साक्षात तेंडुलकर माझ्याशी बोलत होते, या कल्पनेनेच मला विलक्षण आनंद झाला होता. मी मुंबईत गेल्यावर विलेपार्ले येथे त्यांच्या घरी गेलो. गप्पा झाल्या. त्यावेळी टीव्हीवर झहिरा शेख प्रकरणाच्या बातम्या दाखविल्या जात होत्या. त्या बघता बघता तेंडुलकर मला म्हणाले की ‘या झहिरा शेखवर मला नाटक लिहायचे आहे.' त्यानंतर काही दिवसांनी मला फोन आला की, ‘सखाराम बाइन्डर’ची व्हीडिओ सीडी करण्याचा प्रकल्प सुरु होतोय. त्यात मला फौजदार शिंदे ही भूमिका करायची होती. सखारामच्या भूमिकेत सयाजी शिंदे होते. हे नाटक संदेश कुलकर्णी दिग्दर्शित करणार होता. हे नाटक करताना मला खूप काही शिकायला मिळाले. सखाराम बाइन्डरची भूमिका निळूभाऊ फुलेंनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवली होती की, ती भूमिका त्यांच्यानंतर जो करायचा त्याच्या कामगिरीची तुलना निळुभाऊंच्या कामगिरीशी केली जाणे, अगदी साहजिकच होते. सखारामची भूमिका करणाऱ्या सयाजी शिंदेला या अनुभवातून जावे लागले आहे. खरे तर माझ्या अनेक भूमिकांचा बाज खलनायकी असतो. पण अगदी मनातले सांगायचे म्हणजे, मला आजही सखाराम बाइन्डर करायला नक्की आवडेल.
मी दिल्लीत एनएसडीमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत असताना, तिथे मराठीतून हिंदीमध्ये अनुवादित झालेली नाटके पाहायला मिळाली. मराठीतील विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आ‌ळेकर यांची हिंदीत अनुवादित झालेली नाटके विलक्षण लोकप्रिय आहेत. हे तीनही लेखक हिंदीत सुपरिचित आहेत. धर्मवीर भारती, राकेश मोहनसारख्यांनी हिंदीत नाटके लिहिली. पण हिंदीतून लिहिली गेलेली मूळ नाटके एकुणातच कमी आहेत. ‘सखाराम बाइन्डर’चा हिंदी प्रयोग मला कधीही पाहाता आला नाही. पण एक जाणवले की, तेंडुलकर, विजयाबाई मेहता हे लोक आपल्या कलाकृतीतून जे सांगायचे, ते थेटपणे सांगत असतात. तेंडुलकरांचा सखारामही असाच थेट बोलतो. आपल्या वर्तनाबद्दल, आपल्या सवयींबद्दल. आपल्या संपर्कात येणाऱ्या बायकांनी कसे वागावे, याचे त्याचे काही नियम आहेत. त्या नाटकात एक संवाद आहे ‘नवरे पावणे आठ असतात. मूल होत नाही, म्हणून बायकांना मारतात' हे किती विदारक सत्य आहे. अशी बाईला मारहाण करणारे पुरुष आपल्याला आजही आजूबाजूला दिसतात. सखाराम बाइन्डर हा असा कळीकाळाला पुरुन उरला आहे. कारण आजचा, समाज कितीही मॉडर्न झालेला असला, तरीही या समाजाची पुरुषप्रधान घडी अजूनही तशीच आहे. आणि असा समाज जोवर अाहे. तोवर सखाराम बाइन्डर दृश्य-अदृश्य रुपात आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत राहाणार आहे. सखाराम बाईंडर हे नाटक कालातीत आहे ते या अर्थानेच.

------------------------------



मुक्ता बर्वे व तिचे सहकारी सखाराम बाइन्डर नाटकाच्या सध्या करीत असलेल्या पाच निवडक प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. १२ फेब्रुवारी २०१७च्या रसिक पुरवणीमध्ये प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांच्या लेखाची जेपीजी फाइल, टेक्स्टलिंक, वेबपेज लिंक व लेखाचा संपूर्ण मजकूर सोबत दिला आहे.

http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-satish-alekar-writes-…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/12022017/0/1/
----
"सखाराम बाइन्डर'मधील लक्ष्मी स्वत: शोषित आहेच, तरी वेळ येताच चंपाचे शोषण करायला ती मागेपुढे पाहात नाही आणि शेवटी पुन्हा स्वत:चे शोषण करणाऱ्यालाच शरण जाताना दिसते. ही मानसिकता फक्त तेंडुलकरच रंगवू शकतात...
----
क्रूर,निष्ठूर नि निर्दयी...पण माणसेच!
---
- सतीश आळेकर
-----
१९७०चे दशक स्त्रीमुक्ती चळवळीच्या संदर्भात जागतिक महत्त्वाचे होते. पारंपरिक विचारसरणीला शरण जाऊन शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक... अशा सर्व पातळ्यांवर स्त्रियांचे होणारे शोषण, हे वास्तव या जागतिक चळवळीच्या पृष्ठभूमीवर होते. राजकीय पातळीवरही घुसळण सुरू होती. या सर्व घटकांच्या एकत्रित पार्श्वभूमीवर तेंडुलकरांच्या "सखाराम बाइन्डर'सह अन्य काही महत्त्वाच्या नाटकांचा उल्लेख आणि संदर्भ मला महत्त्वाचा वाटतो. "घाशीराम कोतवाल', "गिधाडे' आणि "अशी पाखरे येती', ही ती अन्य नाटके. या प्रत्येक नाटकात कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपात शोषक-शोषित संघर्षाची वेगवेगळी रूपे दिसतात. नुसती दिसत नाहीत, तर सुन्न करतात. उदाहरणार्थ, "सखाराम बाइन्डर'मधील चंपाचे सखारामकडून होणारे शोषण सुस्पष्ट दिसते, पण लक्ष्मीकडून चंपाचे शोषण सूक्ष्म पातळ्यांवर नाटकभर वावरते. वाचक-प्रेक्षकाला सुन्न करते. तेंडुलकर एकाच वेळी विभिन्न पातळ्यांवरच्या शोषणाच्या, क्रूरतेच्या, दुष्टतेच्या छटा किंवा अंश त्यांच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दर्शवतात आणि त्यामुळेच तेंडुलकरांच्या व्यक्तिरेखा संमिश्र, करड्या (फक्त चांगल्या-वाईट, सुष्ट-दुष्ट या ढोबळ) फरकाच्या पल्याड जातात.
तेंडुलकरांच्या आधीचे फडके-खांडेकर युग या संदर्भात कधी आले आणि मावळले, याचा पत्ताही लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, तेंडुलकरांची वेगवेगळी नाटके, त्यांचे आशय, व्यक्तिरेखा. यातील वैविध्य पाहिले तर ही सारी तेंडुलकर नावाच्या एकाच नाटककाराची नाटके आहेत का, असा प्रश्न पडतो. एकाच वेळी इतक्या विभिन्न टोकाची ही नाटके आहेत. हाच मुद्दा दुसऱ्या शब्दांत मांडायचा तर मी असे म्हणेन, की कानेटकर-कोल्हटकरांची सर्व नाटके एका फटक्यात ‘ही कानेटकरी-कोल्हटकरी नाटके’ अशी खात्रीशीरपणे ओळखू येतात. तेंडुलकरांची केस अशी नाही आणि हेच त्यांचे असाधारण वैशिष्ट्य आहे.
"सखाराम बाइन्डर'मधील लक्ष्मी स्वत: शोषित आहेच, तरी वेळ येताच चंपाचे शोषण करायला ती मागेपुढे पाहात नाही आणि शेवटी पुन्हा स्वत:चे शोषण करणाऱ्यालाच शरण जाताना दिसते. ही मानसिकता फक्त तेंडुलकरच रंगवू शकतात. दुसरी बाब म्हणजे, तेंडुलकर सर्व ठिकाणी आपली मते बेदिक्कतपणे मांडत जातात. नाटककार म्हणून कोणत्याही प्रकारची प्रेक्षकशरणता त्यांनी स्वीकारलेली दिसत नाही. "सखाराम बाइन्डर'बद्दल वाद उद्भवणार, टीका होणार, संघर्ष करावा लागणार, याची पूर्वकल्पना असूनही तेंडुलकर कुठल्याही तडजोडी स्वीकारत नाहीत. "गिधाडे'नाटकाच्या बाबतही ते ठाम राहिलेले दिसतात आणि "घाशीराम कोतवाल"बाबतही त्यांची ही भूमिका स्पष्ट होती.
"सखाराम बाइन्डर'सह इतरही नाटकांच्या बाबतीत तेंडुलकरांचे आणखी एक वेगळेपण अधोरेखित करायला हवे. ते म्हणजे, नाटककार म्हणून ते नाटकातल्या कुणाचीच बाजू उचलून धरताना दिसत नाहीत. नाटकाची जी कथावस्तू आणि आशयद्रव्ये आहेत, त्याला सुसंगत अशीच त्यांची पात्रे वागत जातात. ती क्रूर वागतात, निष्ठुर होतात, निर्दय बनतात. पण ‘माणसे’च राहतात. त्यांचे कुठलेही उदात्तीकरण तेंडुलकर करत नाहीत. तडजोडी न करण्यावर जे ठाम राहू शकतात, तेच असे वागू शकतात. तेंडुलकरांनी हे त्यांच्या प्रत्येक नाटकांतून दाखवून दिले आहे.
(शब्दांकन : जयश्री बोकील)
 

No comments:

Post a Comment