तारक मेहता या प्रख्यात गुजराती लेखक महोदयाचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे साहित्यचित्र रेखाटणारा मी लिहिलेला हा लेख दै. दिव्य मराठीच्या दि. ५ मार्च २०१७च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. या लेखाची वेबपेज, टेक्स्टलिंक तसेच जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
---
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sameer-panjape-article-about-writer-tarak-mehata-5543154-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/05032017/0/4/
----
उलट्या चश्म्याचा सरळ लेखक
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी दैनंदिन मालिका प्रक्षेिपत होऊ लागली सब टीव्ही या वाहिनीवर. ती तारीख होती २८ जुलै २००८. या घटनेला येत्या जुलै महिन्यात होतील तब्बल नऊ वर्षे. विशेष म्हणजे आजवर या मालिकेतील विनोद ना कधी शिळा झाला, ना ही मालिका बघणारा रसिकवर्ग आटला. मालिका आहे हिंदीमध्ये. त्यात गुजराती कुटुंब मध्यवर्ती भूमिकेत असले तरी त्याच्या सोबतीला मराठी, शीख, दाक्षिणात्य अशी अठरापगड कुटुंबे आहेत. त्यांच्या संमिश्र जगण्यातून मालिकेचे मुख्य पात्र जेठालाल व त्याच्या आयुष्याचा गोफ विणला जातो. या लोकांचे सारे भावविश्व एकवटलेले आहे ते मुंबईमध्ये. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे आजवर अकराशेहून अधिक भाग प्रक्षेपित झाले, हेही एक भारीच प्रकरण आहे. तरीही मनात राहून राहून एक प्रश्न येतोच, की कोण आहेत तारक मेहता?
या प्रश्नाचे उत्तर अधिक ठळकपणे पुढे आले ते, १ मार्च रोजी. या दिवशी गुजरातीतील प्रख्यात साहित्यिक असलेल्या तारक मेहता यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांनी देहदान केलेले असल्याने मरणानंतरही ते समाजरूपातच मिसळून गेले. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका ज्यावर आधारलेली आहे ती गोष्ट म्हणजे, तारक मेहता यांचा एक स्तंभ. १९७२मध्ये ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकात तारक मेहता यांचा ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा विनोदी स्तंभ सुरू झाला. रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूला जी माणसे दिसतात, त्यांचे बारकाईने निरीक्षण करून ती माणसे आपल्या या स्तंभातून तारक यांनी पुन्हा एकदा चितारली. त्यांच्या वागण्यातले ताणेबाणे अचूक टिपताना त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाचा सुखद शिडकावाही या स्तंभातून वाचकांवर होत असे. त्यामुळे आपल्याच गोष्टी जरा उपरोधिक नजरेने मेहता जेव्हा सांगतात, तेव्हा त्या भलत्याच रोचक होतात, असा विश्वास वाचकांच्या मनातही जागा झाला. ‘दुनियाने उंधा चश्मा’मध्ये जेठालाल नावाचे एक पात्र येते. हे पात्र ज्यावरून बेतलेय, ती जेठालाल नावाची व्यक्ती वास्तवात आजही आहे.
‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकाचे ज्येष्ठ प्रतिनिधी केतन मिस्त्री हे तारक मेहता यांच्या आठवणी सांगू लागले. ‘गुजरातीत अनेक नामवंत साहित्यिक होऊन गेले. गुलाबदास ब्रोकर यांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा बाज वेगळा होता. लघुकथा व इतर काही साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. तारक मेहता हे नुसतेच विनोदी लेखक नव्हते, तर बुद्धिचातुर्याची झालर त्यांच्या लिखाणाला होती. त्यांचा विनोद ‘इंटेलिजण्ट ह्युमर’ या वर्गात मोडणारा होता. त्याची जातकुळी चार्ली चॅप्लीनच्या कारुण्याची झालर असलेल्या विनोदासमान होती. किंबहुना एकाकी बालपणात चॅप्लिन हाच त्यांचा सखासोबती आणि आदर्श होता. म्हणूनही समाजाच्या भाव-भावनांचा आदर राखण्याचा संस्कार त्यांच्या लेखणीवर होता. त्याचमुळे गरिबीपासून नोटाबंदीपर्यंत कितीतरी ज्वलंत विषय हाताळले, पण एकदाही त्यांच्या लेखनाने कुणा व्यक्ती वा समूहाच्या भावना दुखावल्या नाहीत. चित्रलेखातील स्तंभावर बेतलेली हिंदी मालिका निर्मिली गेली, तिचे एक खास वैशिष्ट्य आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टेलिव्हिजनच्या इतिहासातील एकमेव अशी मालिका, जिच्या शीर्षकात लेखकाचे नाव आहे. तब्बल ४५ वर्षे मेहतांनी ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा स्तंभ लिहिला. आता त्यावरची मालिका कदाचित त्याहून अधिक वर्षे लोकप्रियता टिकवून ठेवेल!’
तारक मेहता मुंबईत फिल्म्स डिव्हिजनमध्ये खूप मोठ्या पदावर कार्यरत होते. अतिशय कलासक्त माणूस. त्यांनी अनेक गुजराती नाटके लिहिली. पारशी रंगभूमीवरही त्यांनी मोलाचे योगदान दिले. किंबहुना पारशी रंगभूमीनेच त्यांचा दृष्टिकोन घडवला. त्यांचा मूळ पिंड नाटककाराचा होता. मॉलमॉलिएर-कॉफमन-बर्नाड स्लेड आदी युरोपीय नाटककारांच्या विनोदी शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता, आणि सरळसरळ प्रभाव टाळून नवनिर्मितीची विलक्षण क्षमताही होती. त्याचमुळे त्यांच्या हातून लफरा सदन, मौसम छालके, सखा सैयारा आदी जबरदस्त विनोदी नाटके लिहून झाली. यातल्या "लफरा सदन'ने (लफडा सदन) मराठी रंगभूमीवर तुफान धुमाकूळ घातला होता. म्हणूनच नदीचा जसा प्रवाह तसा मेहता यांच्या लेखणीचा प्रवाहदेखील कायम ओघवता राहिला. त्यामुळे त्यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९९५मध्ये ते निवृत्त झाले आणि मुंबईहून अहमदाबादला कायमचे राहायला गेले. मुंबईहून दूर गेले खरे, पण तिचे बहुपेडी बहुसांस्कृतिक रूप त्यांच्या मनात इतके ठसलेले व रुजलेले होते की, ते अहमदाबादमध्ये राहून मुंबईतील दुनिया रंगवू लागले.
तारक मेहता यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली. याचे कारण तारक मेहता हे मोदी यांचे अत्यंत आवडते लेखक होते. मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले, त्या वेळी त्यांची तारक मेहता यांनी चित्रलेखा साप्ताहिकासाठी अत्यंत सविस्तर मुलाखत घेतली होती. एक विनोदी लेखक मोदीसारख्या राजकारण्याची मुलाखत घेतो, इथपासूनच तिच्या आगळ्या वैशिष्ट्याला सुरुवात झाली होती. या मुलाखतीत मोदींना आवडणारी पुस्तके, संगीत, अन्य ललित कला, त्यांचे छंद अशा अनेक गोष्टींबाबत मेहतांनी त्यांना प्रश्न विचारले होते. मोदींमधील कलाप्रेमी माणूस शोधण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला गेला होता.
मेहता यांच्या ‘दुनियाने उंधा चश्मा’ या स्तंभामध्ये विविध पठडीची पात्रे होतीच. या स्तंभावर आधारित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सुरू झाली तेव्हा तिच्यात आणखी पात्रांची भर पडली. त्यात मूळ रत्नागिरीचा पण मुंबईत स्थायिक झालेला आत्माराम तुकाराम भिडे व त्याची बायको, त्याशिवाय बिहारचा डॉ. हंसराज हाथी, जालंदरचा सरदार रोशनसिंग हरजितसिंग सोधी, चेन्नईचा कृष्णन सुब्रमणियम अय्यर व त्यांची बंगाली पत्नी, भोपाळचा अविवाहित पत्रकार पोपटलाल अशी विविध पात्रे जन्माला आली. सुंदरलाल, अब्दुल, रिपोर्टर रिटा श्रीवास्तव, नटवरलाल प्रभाशंकर उधईवाला, बागेश्वर दधुख उधईवाला, बावरी धोंडुलाल कानपुरिया, बबिता अशी अजून काही पात्रे. या साऱ्या पात्रांच्या परस्पर वर्तन व व्यवहारातून जी धमाल उडते, आयुष्याची मौज होते, कधी करुणामय प्रसंग येतात, ते सारे या मालिकेत चितारण्यात आले आहेत.
केतन मिस्त्री चित्रलेखामध्ये रुजू झाले, १९९८ रोजी. तेव्हापासून ते तारक मेहता यांच्या संपर्कात होते. मिस्त्री यांनी आजवर ‘चित्रलेखा’साठी सुमारे दीडशे व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातील निवडक ३० उत्कृष्ट मुलाखतींचा समावेश असलेले ‘व्यक्तिविशेषनु शेषविशेष’ हे मिस्त्री यांचे पुस्तक अहमदाबादमध्ये २०१५मध्ये प्रकाशित झाले. आपल्या पुस्तकाची एक प्रत भेट देण्यासाठी मिस्त्री तारक मेहता यांच्या अहमदाबादमधील घरी गेले होते. त्या वेळी तारक मेहता यांनी अत्यंत उदारपणे मिस्त्री यांना सांगितले की, ‘माझा ग्रंथसंग्रह ठेवलेल्या खोलीत जा, तुम्हाला हवी ती पुस्तके घ्या.’ मिस्त्री यांनी मेहतांच्या ग्रंथसंग्रहातील आठ ते दहा पुस्तके निवडली व ही अमूल्य भेट मोठ्या आनंदाने घेऊन ते तेथून निघाले.
अगदी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातही ‘चित्रलेखा’मध्ये तारक मेहता यांनी आपला स्तंभ लिहिला होता. लेखकाचे वय कितीही झाले तरी मन तरुण लागते, तरच ते सतेज विचार करू शकते. तारक मेहता यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय ८८ वर्षांचे होते, पण त्यांची विनोदी तैलबुद्धी मात्र अखेरपर्यंत तेजतर्रार होती. जगण्याची शैली अत्यंत सकारात्मक होती. तारक मेहता यांनी जसे सातत्यपूर्ण ‘चित्रलेखा’साठी लिखाण केले, तसेच भास्कर समूहाच्या दैनिक ‘दिव्य भास्कर’साठीही तितक्याच आपुलकीने काही काळ स्तंभलेखन केले.
२०१५मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. २०११मध्ये गुजराती साहित्य अकादमीचा साहित्य गौरव पुरस्कार, तसेच अलीकडेच रमणलाल नीलकंठ हास्य पारितोषिक प्रदान करून मेहतांना गौरवण्यात आले. प्रतिभावंताला पुरस्कार मिळणे हे त्याचा लौकिक वाढवतेच, पण त्याला मिळणारे लोकांचे प्रेम हे या सर्वाहूनही अधिक मोलाचे. आपल्या आजूबाजूच्या दुनियेकडे उपरोधिक चश्म्यातून बघून त्याचा नर्मविनोदी शैलीत वाचकांना उलगडा करून देणाऱ्या तारक मेहता यांचे अख्खे आयुष्य वाचकांनी भरभरून केलेल्या प्रेमाने भारून व भारावून गेले. तारक मेहतांनी जन्माला घातलेल्या या लोकविलक्षण दुनियेचे प्रतिरूप विश्वामित्रालाही निर्माण करता येऊ नये, इतके ते दुर्मीळ होते.
No comments:
Post a Comment