----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
(या लेखासोबत अनंत गुरव याचे छायाचित्र व त्याचे पीएच. डी. प्रमाणपत्र यांची छायाचित्रे दिली आहेत.)
----
प्रबोधनकार ठाकरे हे संपादक असलेल्या `प्रबोधन' या नियतकालिकावर देशात पहिल्यांदा ज्याने पीएचडी केली तो माणूस...
या गोष्टीमुळे विद्वत्तेच्या क्षेत्रात आता तो खूपच महत्वाचा झालाय असा माणूस...
तरीही तो मित्र आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाचा....
आश्चर्य वाटते कधी कधी...
त्याचे नाव अनंत गुरव.
तो आहे एका गिरणी कामगाराचा मुलगा...
त्याचे लहानपण व थोडे जाणतेपण गेले डिलाइल रोडवरील सोराबजी चाळीत.
त्याच्या त्या घरी मी गेलोय.
सुमारे अडीचशे फुटांची खोली. खोलीत वर एक माळा...
त्या खोलीत स्वयंपाकघराचा ओटा डावीकडे. त्याच्या पुढे मोरी.
उजव्या अंगाला एक खाट, कपाट.
भिंतींना पोपटी रंग दिलेला. तोही काही ठिकाणी उडालेला.
मी अनंत गुरवच्या या घरी तीन-चारदा राहिलो असेन. दोनदा रात्री मुक्कामाला. एकदा सकाळी गेलेलो व एकदा दुपारी.
म्हणजे सारे प्रहर बघितले या खोलीचे.
अनंतचे वडील महादेवराव गिरणीकामगार. अनंतची आई सौजन्यमूर्ती होती.
नऊवारी पातळ ल्यालेली. कपाळावर मोठे कुंकु, गव्हाळ वर्णाची, कुडी बारीक.
तिच्या
हातच्या पदार्थांना न्यारी चव होती. भाकरी, ठेचा वगैरे हे पदार्थ मला तसे
दुर्मिळच. ते सगळे पदार्थ मी अनंतच्या आईच्या हातचे खाल्लेत त्याच्या घरी.
अनंत मला भेटला रुईया महाविद्यालयात.
तेव्हा तो एम. ए. करीत होता. मुळात तो प्रिटिंग टेक्नॉलॉजी या विषयात डिप्लोमा केलेला.
इंडियन एक्स्प्रेसच्या छापखान्यात काम करताना त्याच्या मनाने घेतले की, आपणही पांढऱ्यावर काळे करायचे म्हणजे वर्तमानपत्रात लिहायचे.
त्याला ग्रॅज्युएट व्हायचे होते. आला पठ्ठा रुइयामध्ये. तो इथे आला तेव्हा त्याचे वय उलटून गेले होते पदवीधर झालेल्या मुलाइतके.
तरीही अनंतने मनाचा हिय्या केला. कॉलेज करायला लागला व नंतर नोकरीही.
बी.ए. झाला. एम. ए. झाला....
रुइयामध्ये शिकत असताना उत्तम वक्ता म्हणून त्याचे नाव गाजू लागले.
भूषण
गगरानी जेव्हा आय. ए. एस. झाले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील पहिली जाहीर
मुलाखत झाली रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर.
मुलाखतकार होता अनंत गुरव.
अनंतचे त्याच्या विशी-तिशीतले फोटो बघितले तर तो थेट अमोल पालेकरसारखा दिसतो.
त्याला तसे अनेक जण बोलतातही. मी ही बोलून घेतो.
अनंतचा एक किस्सा भन्नाट आहे.
तो
रुइयाच्या एका हाइकला येण्यासाठी आला. हाइकसाठी जमा झालेले बाकीचे सारे
लोक चक्रावले. कारण अनंत आला होता सफारी सुटात-बुटात आणि हातात प्रवासाला
निघतात तशी बॅग घेऊन...
गंमतीचा भाग सोडा. पण हाइक असो वा कॉलेज जीवन हे सारे पहिल्यांदाच त्याला महद्कष्टाने अनुभवायला मिळत होते.
त्यामुळे त्याच्यात प्रत्येक अनुभवानंतर बदल होत होता.
हे सारे मुंबईतलेच वातावरण आहे. तो ही मुंबईतलाच.
पण हे अनुभवविश्व वेगळे होते पूर्णपणे त्याच्यासाठी.
त्याला माझ्यासारखेच अखेर भिकेचे डोहाळे लागले...हाहाहा
अनंत गुरव पत्रकार झाला. दै. सामना, लोकमत अशा अनेक वृत्तपत्रांत विविध ठिकाणी त्याने नोकरी केली.
आता तो दै. सामनाच्या मुंबई कार्यालयात संपादकीय विभागात कार्यरत आहे.
तो मला आवडतो कारण तो मुळातून अभ्यासू आहे.
१९९५-९६ची
गोष्ट असेल. तो मुंबई व महाराष्ट्रातील विविध ग्रंथालयांवर विश्व
ग्रंथालयांचे नावाचा स्तंभ दै. सामनाच्या उत्सव पुरवणीत लिहित होता. त्याचे
पुढे त्याच नावाने पुस्तक डिंपल प्रकाशनने प्रसिद्ध केले.
अनंत गुरवचे हे पहिले पुस्तक. आणि त्याच्या अख्ख्या खानदानात पुस्तक लिहिणारा तो पहिलाच.
तसेच त्याच्या अख्ख्या खानदानात पीएचडी करणाराही तो आता पहिलाच आहे.
`केशव
सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन या नियतकालिकाचा अभ्यास' या विषयावर अनंत
गुरवने डॉ. विद्यागौरी टिळक या अनुभवी शिक्षक व गाईडच्या मार्गदर्शनाखाली
पुणे विद्यापीठातून नुकतीच पीएच.डी. मिळवली.
त्याचा अभिमान त्याच्यापेक्षाही मला अधिक वाटला.
गिरणीकामगाराचा मुलगा हे काही कमी पात्रतेचे लक्षण नाही.
तसेच पीएचडी कोणीही करतो पण अत्यंत गहन विषयावर समाजाला उपयोगी पडेल अशा अंगाने पीएच.डी. करणारे खूप कमी लोक असतात.
अामचा डॉ. अनंत गुरव त्यापैकी एक आहे.
अनंतबद्दल अजून एक गोष्ट मला नुकतीच कळलीये ती डॉ. हरि नरके यांचे तरुणपणीचे छायाचित्र बघून.
नरके यांनी फेसबुकवर आपले हे छायाचित्र अपलोड केले तेव्हा मी त्याखाली लिहिले की अमोल पालेकरांसारखे दिसता.
अनंत गुरवही अमोल पालेकरसारखाच दिसायचा त्या वयात. आता तो पन्नाशीला येऊन ठेपलाय.
हे दोन्ही अमोल पालेकर अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेले आहेत. दोन्ही डॉक्टर झाले आहेत. पीएच.डी. वाले!
पुण्यात
ते दोघे एकमेकांना जेव्हा भेटतीलही तेव्हा हे दोन अमोल पालेकर एकमेकांशी
भाई-भाई (बडा भाई- छोटा भाई) म्हणून भेटावेत अशी इच्छा.
ठेविले अनंते तैसेचि राहावे.
ही अभंगातील एक ओळ. ती आपल्यासाठीच असावी असे आळशी माणसांना वाटते असे म्हणतात.
आमचा डॉ. अनंत गुरव तर आहे कोणतीही परिस्थिती स्वप्रयत्न व स्वकष्टाने बदलणारा.
त्याच्यासाठी दुसऱ्या एका ओळीत बदल करावासा वाटतो.
अनंताचिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे...
त्यामध्ये बदल करुन
अनंताचि पीएच.डी. सदा पाहे असा समीर बोरिवलीत आहे....
असे म्हणावेसे वाटते...
अनंताचे झाड असेच बहरो...
सिनिअर अमोल पालेकर डॉ. हरि नरके तुम्ही हे सारे वाचले आहेत ना?
(या लेखासोबत अनंत गुरव याचे छायाचित्र व त्याचे पीएच. डी. प्रमाणपत्र यांची छायाचित्रे दिली आहेत.)
No comments:
Post a Comment