Thursday, August 17, 2017

'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' या चित्रपटाचे परीक्षण - दै. दिव्य मराठी वेबसाईट ११ ऑगस्ट २०१७.- समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही! या नव्या चित्रपटाचे ११ ऑगस्ट २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याचा मूळ मजकूर व वेबलिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-MB-movie-review-of-ma…
---
'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' बघून होतो भ्रमनिरास
---
- समीर परांजपे
---
चित्रपट - मला काहीच प्रॉब्लेम नाही!
--
रेटिंग - २ स्टार
--
कलावंत - गश्मीर महाजनी,स्पृहा जोशी, निर्मिती सावंत, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख, साहिल कोपर्डे, आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर, विनोद लव्हेकर
निर्माता - पी. एस. चटवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग, करण बेलोसे, सुरभी हेमंत, गणेश रेवडेकर
दिग्दर्शक - समीर विद्वांस 
कथा - रवि सिंग 
पटकथा, संवाद - कौस्तुभ सावरकर 
संगीत – ह्रषिकेश-सौरभ-जसराज
श्रेणी - फॅमिली ड्रामा
समीर विद्वांस हे नाव घेतले त्याने दिग्दर्शित केलेले काही दर्जेदार चित्रपट आठवू लागतात. त्याने `डबल सीट', `टाईम प्लीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय `वायझेड' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. क्लासमेट्स', `लग्न पाहावे करुन' यांसारख्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिली आहे. समीर विद्वांसच्या नवा गडी नवं राज्य या नाटकाचे शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. लोकमान्य - एक युगपुरूष या चित्रपटात समीर विद्वांस याच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली होती. हे जरा सविस्तर अशासाठी सांगितले की, नाटक-चित्रपट या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या माणसाकडून काही किमान चांगल्या अपेक्षा असतात. त्या घेऊन प्रेक्षक त्याचा नवीन सिनेमा पाहायला जातात. समीर विद्वांस याचे दिग्दर्शन असलेला मला काहीच प्रॉब्लेम नाही! हा चित्रपट मोठ्या अपेक्षेने बघायला जावे व भ्रमनिरास व्हावा अशी पाळी प्रेक्षकावर येते. 
कथा - अजय हा या चित्रपटाचा नायक तर केतकी या चित्रपटाची नाियका. दोघांचेही वय २५च्या आतले आहे. चित्रपट सुरु होतो तो मॅरेज कोर्टामधील रजिस्ट्रारच्या रुमपाशी. तिथे बाहेर एका बाकड्यावर नायक व नायिका बसलेले आहेत. ते थोड्या वेळातच रजिस्ट्रारसमोर सह्या करुन नोंदणी पद्धतीने विवाह करणार आहेत. नेमका याचवेळी सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो. अजय, केतकी व त्या दोघांंचाही जिगरी मित्र सागर एका इराण्याच्या हॉटेलमध्ये बसलेले आहेत. परस्परांशी लग्न करावे की न करावे याचा निर्णय अजय व केतकीला घ्यायचा असतो. त्या दोघांना भेटून अवघे तीन महिने झाले आहेत. त्यांच्या घरच्यांना या दोघांच्या प्रेमाविषयी माहिती आहे. अजय आहे विदर्भातला. नागपूरला त्याचे आई, वडिल, भाऊ, भावजय असा परिवार राहात असतो. तर केतकी आहे कोकणातली. तिला शिक्षणासाठी तिच्या आईवडिलांनी मुंबईत पाठविलेले असते. त्यामुळे मुंबईच्या आधुनिक वातावरणात मोठी झालेल्या केतकीचे विचारही पुरोगामी तसेच स्त्रीच्या स्वातंत्र्याला, स्वतंत्र विचाराला सर्वोच्च प्राधान्य देणारे असतात. केतकी व अजय या दोघांचे आई-बाबा जेव्हा लग्नाची बोलणी करायला भेटतात तेव्हा त्यांच्यात मानपान व अनेक मुद्द्यांवरुन खूप मतभेद होतात. त्यामुळे अजय व केतकी यांचा विवाह होणे काहीसे मुश्किल होऊन बसते. हा पूर्वी घडलेला प्रसंग फ्लॅशबॅकमध्ये आठवून अजय व केतकी पुन्हा वर्तमानात येतात. आता पुढचा प्रसंग आहे अजय व केतकी यांच्या रजिस्टर मॅरेजचा. हे लग्न करताना अजय व केतकी हे दोघेही आपल्या आईबाबांना अजिबात कळवत नाहीत. लग्न करुन मोकळे होतात. लग्न झाल्यानंतर भराभर काळाची पाने उलटत जातात. केतकीला मुलगा होतो. त्याचे नाव तनय ठेवण्यात येते. आता केतकी व अजय यांच्या लग्नाला सात वर्षे झालेली आहे. अजय एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. केतकीसुद्धा एका कंपनीत सिनिअर पोजिशनला आहे. ते दोघेही रात्रंदिवस मेहनत करत असतात. आपल्या स्वकमाईतून अजय व केतकीने मुंबईत एक मोठा फ्लॅटही विकत घेतला आहे. आपापल्या नोकरीत सुस्थिर, एक मुलगा असा राजा-राणी-छकुला असा छान त्रिकोणी संसार सुरु आहे. हा संसार सुखी आहे असे चित्र बाहेरुन पाहाणाऱ्याला दिसते. पण या संसारात अजय व केतकी यांच्या परस्परांविषयी काही तक्रारी आहेत. त्यातही केतकीच्या अजयविषयी काही जास्त तक्रारी आहेत. अजय हा सतत कामामध्ये बिझी असतो. तो आपल्याशी नीट संवाद साधेनासा झाला आहे, तनय या मुलाला अजय अजिबात वेळ देत नाही अशी केतकीची तक्रार आहे व ती योग्य आहे. दुसऱ्या बाजूला केतकी ही अत्यंत स्पष्टवक्ती आहे. मात्र तिला जेव्हा एखादी वाईट गोष्ट पटत नाही तेव्हा ती खूपच त्रागा करते. अगदी फटाफट बोलते. नेमका याच गोष्टीचा अजयला त्रास होत असतो. केतकीच्या समोर गेल्यानंतर अजयला नेहमी आपण अपराधी असल्यासारखी भावना मनात येत राहाते. तर दुसऱ्या बाजूला अजयला आपण सतत डॉमिनेट करतो आहोत अशी भावना केतकीच्या मनात साठून राहाते. पण त्यांच्या त्यांच्या मनातील भावना ते बोलून व्यक्त करत नाहीत. सारी वाफ मनातच साचून ठेवतात. त्यामुळे गेली वर्षभर त्यांच्यातील संवाद खूपच तुटक झाला आहे. एकाच घरात राहात असूनही ते परस्परांना अनोळखी वाटावेत अशा अवस्थेला आलेले आहेत. आपण एकमेकांशी बोलून आपल्यातले वाद मिटविले पाहिजेत असे एका बाजूला केतकी सांगत असताना अजय त्यावर फारशी प्रतिक्रियाच देत नसतो. त्यामुळे एक दिवस भांडणाच्या ओघात केतकी अजयकडे घटस्फोट मागते. या दोघांमधील नाते आता संपण्याच्या बेतात असताना अचानक अजयचे आईबाबा, भाऊ, वहिनी हे सारे नागपूरहून अजयच्या घरी येऊन ठेपतात. गेली सात वर्षे त्यांनी अजयशी धरलेला अबोला ते तोडतात. अजयचे आई-बाबा आपला मुलगा व सुन, नातवाला घेऊन कोकणात केतकीच्या आईवडिलांकडे जातात. गेली सात वर्षे केतकीही आपल्या आई-बाबांच्या संपर्कात नसते. त्यामुळे अजय व केतकी या दोघांकडील कुटुंबे आता अबोला संपवून परस्परांशी जोडली गेली आहेत. कोकणातील चार-पाच दिवसांच्या मुक्कामात अजय व केतकीचे आईबाबा पूर्वी राहिलेले मानपानाचे सोपस्कार आपल्या मर्जीने पूर्ण करतात. काही पूजा, शांती वगैरे करतात. पण हे सारे केतकीच्या स्वभावाला काही पटत नसते. ती तसे आपल्या माहेर व सासरकडच्यांना बोलून दाखविते. अजय व केतकीचा सुखी संसार सुरु आहे असेच सर्वांना वाटत असते. मात्र मुंबईतून कोकणात दोन-चार दिवसांसाठी येण्याआधी आपला मित्र सागरचा सल्ला अजय व केतकीला आठवत राहातो तो म्हणजे `तुम्ही दोघेच कुठेही बाहेर फिरायला जाऊन या. आपल्यात नाते शिल्लक राहिले आहे किंवा नाही याचा प्रामाणिक शोध घ्या. नाते टिकवावेसे वाटले तर टिकवा अन्यथा वेगळे व्हा.' हा सल्ला आठवून अस्वस्थ होणारी केतकी एक दिवस माहेर व सासरच्यांना सांगून टाकते की, आम्हा दोघांत अनेक मतभेद निर्माण झाले असून संसार मोडायच्या बेतात आलेला आहे. त्यावर सर्वजण विचार करुन अजय व केतकी या दोघांनाच काही दिवसांसाठीच दोघांचीच स्पेस द्यायचे ठरवितात. तनयला या चार-पाच दिवसांत त्याचे कोकणातील आजोबा-आजी सांभाळणार असतात. मग केतकी व अजय हे दोघेच कोकणातून मुंबईला आपल्या घरी परततात. त्यानंतर हे दोघे परस्परांशी मोकळेपणाने संवाद साधतात का? ते घटस्फोट घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहातात का? असे काही प्रश्न कथानकाच्या ओघात निर्माण होतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी हा चित्रपट पाहाणे श्रेयस्कर ठरेल. 
अभिनय - गश्मीर महाजनी हा अभिनेता म्हणून समंजस आहे. त्याने या चित्रपटात केलेली अजयची भूमिका ही कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन या चारही गोष्टी जशा सांगतील तशी वठवली आहे. मुळात िचत्रपटाची कथा विस्कळीत आहे. त्यामुळे त्यातील पात्रांची रचना, त्यांचे वागणे यांचा गडबडगुंडा झाला आहे. अजयची व्यक्तिरेखा ही कथेतील दोषांमुळे भरकटलेली आहे. त्यामुळे गश्मीरने अभिनयात चांगली चुणूक दाखवूनही त्याने साकारलेला अजय हा प्रेक्षकांच्या मनावर हवा तसा ठसत नाही. आपल्या संसारात काही गोष्टींची उणीव आहे ही अजयच्या मनात असलेली तगमग त्याच्या चेहेऱ्यावर, देहबोलीत फारशी जाणवत नाही. तोच प्रॉब्लेम केतकीची भूमिका करणाऱ्या स्पृहा जोशी हिचा झाला आहे. केतकी ही करिअर ओरिएंटेड असण्याबरोबरच संसाराला जपणारी मुलगी दाखविली आहे. पण संसार करताना नवऱ्याबरोबर आपला उत्तम संवाद असावा, त्याने आपल्याकडे व मुलगा तनयकडे नीट लक्ष द्यावे ही केतकीची अपेक्षा निश्चितच चुकीची नाही. पण संसारसुखाच्या काही कल्पना घेऊन जगणाऱ्या केतकीला अख्ख्या चित्रपटात तिचा सूरच सापडत नाही. कारण तिचे पात्रच अर्धेकच्चे लिहिले गेले आहे. त्यामुळे स्पृहा जोशी ही उच्च अभिनयक्षमतेची नायिका लाभूनही केतकीचा काहीच प्रभाव चित्रपटात पडत नाही. अजय व केतकी ही दोन्ही मुख्य पात्रे संपूर्ण सपाट आहेत. हा दोष दिग्दर्शकापेक्षा चित्रपटाची कथा लिहिणाऱ्याचा जास्त आहे. त्याचबरोबर केतकीचे आईवडिल, अजयचे आईवडिल, अजयचा भाऊ, केतकीची आत्या, आत्याची मुलगी अशी पात्रे या चित्रपटात येतात त्यातील काही पात्रे अक्षरश: वायफळ वाटतात. ती त्या ठिकाणी का आहेत हेच कळत नाही. त्यामुळे अभिनयाबाबतही यातील बहुतांश कलाकारांकडून फारशी उजवी कामगिरी झालेली नाही. 
दिग्दर्शन - मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना समीर विद्वांसला आपण एका अत्यंत ठिसूळ कथेवर चित्रपट बनवतो आहे याचे भान नक्कीच असणार. डबल सीटसारखा उत्तम चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या समीर विद्वांसने मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटाच्या केलेल्या दिग्दर्शनात काहीही नाविन्य दिसत नाही. राम जाणवत नाही. ठिसूळ कथा व ढिसाळ मांडणी या शब्दांत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे वर्णन करता येईल. या िचत्रपटाचा पूर्वार्ध बरा झाला आहे. त्यात या चित्रपटाला काहीतरी कथा आहे असे वाटायला लागलेले असते. पण मध्यंतरानंतर उत्तरार्ध सुरु होतो तेव्हा चित्रपटाचे कथानक जे गडगडते ते तो चित्रपट अजिबात सावरत नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध अनाकलनीय आहे. रटाळ आहे. समीर विद्वांस असाही चित्रपट दिग्दर्शित करु शकतो हा त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का आहे. चित्रपटाचा शेवट ज्यारितीने केलाय तो प्रकारही पुन्हा अचंबित करणारा आहे. 
संगीत - मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटाला ह्रषिकेश-सौरभ-जसराज यांनी संगीत दिले आहे. गुरू ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांना बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, अभय जोधपूरकर, श्रृती आठवलेबरोबरच संगीत दिग्दर्शक जसराज जोशी यांचे स्वर लाभले आहेत. इतका सगळा जामानिमा असूनही या चित्रपटातील एकही गाणे मनात गुंजी घालत नाही. उत्तम साधने असून सुद्धा वाईट चित्रपट कसा काढता येतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/BOL-MB-movie-review-of-ma…

No comments:

Post a Comment