Thursday, August 17, 2017

कच्चा लिंबू या चित्रपटाचे परीक्षण - दै. दिव्य मराठी वेबसाईट ११ ऑगस्ट २०१७.- समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटमधील मराठी कट्टा या सेगमेंटसाठी कच्चा लिंबू या नव्या चित्रपटाचे ११ ऑगस्ट २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याचा मूळ मजकूर व वेबलिंक पुढे दिली आहे.
--
आईवडिलांच्या नि:स्वार्थ प्रेमाची अऩुभूती देणारा 'कच्चा लिंबू'
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - कच्चा लिंबू
--
रेटिंग - ४ स्टार
--
कलावंत - रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम, सचिन खेडेकर, अनंत महादेवन
निर्माता - मंदार देवस्थळी
दिग्दर्शक - प्रसाद ओक
कथा - जयवंत दळवी
पटकथा, संवाद – चिन्मय मांडलेकर
संगीत – राहुल रानडे
श्रेणी - फॅमिली ड्रामा
---
प्रख्यात नाटककार व लेखक जयवंत दळवी यांच्या दुर्गी या नाटकावर आधारित उत्तरायण हा चित्रपट २००५ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी आता जयवंत दळवींच्या ऋणानुबंध या कादंबरीवर आधारित `कच्चा लिंबू' हा नवा मराठी आला आहे. `कच्चा लिंबू'चे दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओक याने केले असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे व विशेष म्हणजे तो चित्रपट कृष्णधवल रंगात आहे. जयवंत दळवी यांचे बहुतांश लेखन अस्सल आहे म्हणजेच ते कोणत्याही अन्य भाषेतील साहित्यकृतींवर आधारलेले नाही. त्यांनी ऋणानुबंध या स्वत: लिहिलेल्या कादंबरीवर आधारित नातीगोती हे नाटक लिहिले होते. नातीगोती हे गतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे नाटक नाही तर गतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई-वडिलांचे भावविश्व उकलणारे, हे एक मन व्याकूळ करणारे नाटक आहे. हे नाटक रंगभूमीवर येताच या नाटकावर अनेक पारितोषिकांचा वर्षाव झाला होता. पण नातीगोती नाटकामध्ये न अडकता हे नाटक ज्यावरुन बेतले त्या जयवंत दळवींच्या ऋणानुबंध कादंबरीला प्रमाण मानून हा चित्रपट बनविण्यात आला आहे. हे कथानक घडते तो काळ १९६०-७०च्या दशकातील आहे.
कथा - ही कथा घडते तो काळ १९६०-७०च्या दशकातील आहे. ही कथा मुंबईतील गिरगाव (चर्नीरोड) या त्यावेळच्या अस्सल मराठमोठ्या भागात चाळीत राहाणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. या चा‌ळीतील एका खोलीत मोहन काटदरे व त्यांची पत्नी शैला काटदरे हे राहात असतात. त्यांना मुलगा हा मतिमंद आहे. शैला हिचे लग्न जुळत नसते. सरतेशेवटी तिला मोहन काटदरे यांचे स्थळ सांगून येते. मोहन हा शैलापेक्षा बुटका आहे. एवढी एक गोष्ट सोडली तर मोहन हे टपाल खात्याच्या तार विभागात कायमस्वरुपी नोकरीत आहेत. त्यामु‌ळे त्यांच्या बुटकेपणाकडे दुर्लक्ष करुन शैला मोहन काटदरे यांना लग्नासाठी होकार देते. त्यांचा विवाह होतो. गिरगावच्या चाळीत त्यांचा संसार सुरु होते. लग्नानंतर एक-दोन वर्षातच शैलाला दिवस जातात. तिला मुलगा होतो. त्याला ते लाडाने बच्चू असे म्हणत असतात. हा मुलगा दोन वर्षांचा होईपर्यंत तो गतिमंद आहे हे या दांपत्याच्या ध्यानात येत नाही. पण ते जेव्हा कळते त्यानंतर ते आपला मुलगा बरा व्हावा म्हणून आटापिटा करीत असतात. आपल्या खिशाला परवडतील ते सारे वैद्यकीय उपचार काटदरे दांपत्य बच्चूसाठी करतात. या उपचारांनंतरही तो बरा होत नाही हे दिसल्यानंतर ते विविध गुरुंकडे जातात, नवस बोलतात पण कशानेही गुण येत नसतो. मोहन काटदरे तारविभागात कायम रात्रपाळी करायचे व सकाळी घरी यायचे व सकाळी शैला काटदरे आपल्या नोकरीवर जायची. त्यामुळे सकाळी बच्चूला मोहन व रात्री बच्चूला त्याची आई शैला सांभाळायची. त्यांच्या नोकरीच्या वेळांमुळे बच्चूला सांभाळायच्या वेळेची विभागणीच या दोघांनी करुन घेतली होती. बच्चू गतिमंद असल्याने काटदरे दांपत्याच्या आयुष्यात अन्य सर्वसामान्य संसारी माणसांप्रमाणे सुखाचे दिवस येणे कठीण होते. बच्चूच्या नंतर दुसरे अपत्य होण्यासाठी काटदरे दांपत्य प्रयत्न करीत नाही. कारण बच्चूचे आपल्यानंतर कोण करणार? त्यामुळे त्याच्यासाठी आर्थिक तजवीज करुन ठेवली पाहिजे या विचाराने मोहन काटदरे हे कार्यालयीन काम संपल्यानंतर टायपिंगची इतर कामे करुन अधिक पैसे मिळवत असतात. ते हे पैसे नीट साठवून त्यातून आपल्या गतिमंद मुलाच्या भविष्यासाठी तरतूद करण्याची धडपड करतात. बच्चू झाल्यानंतरच्या पंधरा वर्षांत स्वत:वर पैसे खर्च करण्याचे मोहन काटदरे विसरुन गेले आहेत. ते पत्नीला नीटसे शरीरसुखही देऊ शकत नाहीत कारण शरीर त्यासाठी तयार असले तरी मन हे बच्चूच्या विवंचनेत गुंतले आहे. बच्चूसाठी मोहन काटदरे यांनी स्वत:ला गाडून घेतले आहे. शैलाचेही आपल्या मुलावर, नवऱ्यावर अतिशय प्रेम आहे. पण माणसाच्या मानसिक गरजांबरोबर शारिरिक गरजा देखील असतात. शैलाच्या शारिरिक गरजा नवऱ्याकडून पूर्ण होत नाहीत, आई म्हणूनही तिच्या वाट्याला नीट सुख नाही. त्यामुळे मनाचा प्रचंड कोंडमारा झालेली शैला आपले कार्यालयातले साहेब श्रीकांत पंडित यांच्याकडे आपले मन मोकळे करते. श्रीकांत पंडित शैला काटदरेला मदत करायचे ठरवितात. तिला कार्यालयामध्ये बढती मिळावी म्हणून शिफारस करतात. बच्चू या पंधरा वर्षाच्या गतिमंद मुलाचा सांभाळ करता करता काटदरे पती-पत्नी यांची मने उद्ध्वस्त झालेली आहेत. त्या मनावर फुंकर घालून, त्यांना थोडे सुखाचे दिवस दिसावेत म्हणून श्रीधर पंडित आपल्या परीने धडपडतात. या सग‌ळ्या माहोलमध्ये मोहन काटदरेच्या कार्यालयातील वेंकट नावाचा सहकारी बच्चूवर आपल्या मुलासारखे प्रेम करत असतो. मात्र वेंकटने आपला आजारी मुलगा कृष्णाला झोपेच्या ५५ गोळ्या दुधात मिसळून ते प्यायला लावलेले असते. त्यानंतर कृष्णा मरण पावतो. वेंकटला आता या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होत असल्याने हे सारे तो एकदा मोहनला सांगून टाकतो. मोहन या अनुभवाने हादरतो. पण बच्चूमुळे होणाऱ्या त्रासापासून कायमची सुटका करुन घेण्यासाठी मोहनला वेंकटने सांगितलेल्या सत्यातून एक मार्गही दिसू लागतो. दरम्यान शैलाला एक आस लागलेली आहे की, तिला तिच्या वाट्याचे थोडेतरी सुख उपभोगायचे आहे जे आजवर दुरावले आहे. त्यामुळे श्रीराम पंडितांनी सुचविल्याप्रमाणे कंपनीच्या इन्स्पेक्शनचे कारण देऊन शैला दोन दिवस लोणावळ्याला पंडितांबरोबर फिरण्याची योजना आखते. त्या दोन दिवसांत तिला मानसिक, शारिरिक अशी दोन्ही सुखे पंडितांकडून मिळवावी असा मोह होतो. ती मोहन काटदरे यांना खोटे सांगून लोणावळ्याला जायला निघते. दुसऱ्या बाजूला वेंकटने आपला मुलगा कृष्णाला कसे संपविले तो तपशील डोक्यात घेऊन त्याच मार्गाने बच्चूला कायमचे संपविण्यासाठी मोहन काटदरे उंदीर मारायचे औषध विकत घेतात. शैला लोणावळ्याला गेली आहे त्या दोन दिवसांतच हे औषध दुधातून बच्चूला पाजून साऱ्या दु:खातून सुटका करुन घ्यायचा बेत मोहन मनात आखतो...काटदरे कुटुंबाच्या आयुष्यालाच एक वेगळे वळण लागणार असते. श्रीकांत पंडित यांच्या बरोबर शैला लोणावळ्याला जाऊन दोन दिवस राहाते का? आयुष्यात पारखी झालेली सुखे ती या मुक्कामात पंडितांकडून मिळवते का? मोहन काटदरे उंदरांना मारायचे औषध दुधात मिसळून ते बच्चूला प्यायला देऊन मारतात का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
अभिनय - मुंबईतील गिरगाव या साठ-सत्तरच्या दशकातील मराठमोळ्या मध्यमवर्गीय चाळकरी कुटुंबातील नोकरदार माणसे जसे जगत असत तसेच साऱ्या चित्रपटभर शैला काटदरेच्या भूमिकेतील सोनाली कुलकर्णी व मोहन काटदरे यांच्या भूमिकेतील रवि जाधव वावरले आहेत. सोनाली कुलकर्णी ही कसलेली अभिनेत्री आहे. याआधी मुक्तापासून अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या सशक्त अभिनयाने बहार आणली होती. त्यामुळे शैला काटदरे या भूमिकेतील मध्यमवर्गीय व मध्यमवयीन मराठी नोकरदार स्त्री तिने उत्तमच साकारली आहे. पण जास्त कौतुक हे रवि जाधव यांचे आहे. रवी जाधव हे स्वत: ख्यातनाम दिग्दर्शक आहेत. ते रुढार्थाने अभिनेते नव्हेत. मात्र कच्चा लिंबूमध्ये त्यांनी मोहन काटदरेची प्रमुख भूमिका केली आहे. मोहन काटदरे हे पात्र आपल्या गतिमंद मुलाच्या भोवतीच फिरत राहाते. आयुष्यातल्या साऱ्या इच्छा बाजूला सारलेले मोहन काटदरे रवि जाधव यांनी तरलतेने साकारले आहेत. रवि जाधव यांच्या अभिनय कामगिरीमुळे सोनाली कुलकर्णी हिच्या भूमिकेला अधिक उठाव आला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये. म्हणून रवि जाधव यांच्या अभिनयाला सलाम...ते सोनाली कुलकर्णीच्या अभिनयापेक्षा मनाला जास्त भिडतात. गतिमंद बच्चूची भूमिका मनमीत पेमने सर्वसामर्थ्यानिशी केली आहे. गतिमंद मुलाचे शारिरिक हावभाव, त्याचे बोलणे, त्याचे वागणे हे बारकाईने व अचूकतेने दाखविण्यात मनमीत यशस्वी ठरला आहे. मनमीत आपल्या भूमिकेत कमी पडला असता तर या चित्रपटाचा डोलारा डळमळीत झाला असता. पण तसे झालेले नाही. शैला काटदरेच्या साहेबाची म्हणजे श्रीकांत पंडित याची भूमिका सचिन खेडेकर यांनी प्रगल्भतेने केली आहे. शैलाला आधार देणारा श्रीकांत पंिडत हा माणूस हे सर्व निरपेक्षतेने करत असतो हे प्रेक्षकांना आधी लक्षात येत नाही. पण ते नंतर एका प्रसंगात कळते. तो जो कलाटणीपर्यंतचा प्रवास आहे तिथपर्यंत प्रेक्षकांना सचिन खेडेकर यांनी अगदी आपल्या अभिनयाने सहजरित्या नेले आहे. मोहन काटदरे यांचा सहकारी वेंकट हा आपला मुलगा कृष्णाची आठवण सारखी का काढतो याबद्दलचे कारण कळेपर्यंत वेंकटच्या भूमिकेतील अनंत महादेवन यांनी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच ताणली जाईल असा अभिनयाविष्कार दाखविला आहे. या कथेतील कोणतेच पात्र सर्वस्वी सुखीही नाही व दु:खीही नाही. हे सारे कंगोरे घेऊनच कलावंत या चित्रपटात वावरले आहेत.
दिग्दर्शन - अभिनेता प्रसाद ओक याच्या कारकिर्दीला अनेक वर्षे झाली. त्या काळात त्याने विविधांगी भूमिकाही केल्या होत्या. पण त्याला दिग्दर्शन करायचे होते. पण काही ना काही कारणाने ही संधी मिळत नव्हती. काही वर्षांपूर्वी ऋणानुबंध या कादंबरीवर चित्रपट करायचे त्याने मनावर घेतले. चिन्मय मांडलेकर याच्याकडून पटकथा व संवाद लिहून घेतले. मधल्या काळात अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करुन अखेर ऋणानुबंध कादंबरीवर त्याने कच्चा लिंबू हा चित्रपट दिग्दर्शित केला. पहिल्या पदार्पणातच प्रसाद ओक याने अतिशय परिपक्व दिग्दर्शन केलेले आहे. बच्चू या गतिमंद मुलामुळे मने पार उद्‌्ध्वस्त झालेल्या काटदरे कुटुंबाचे चित्रण करायचे होते. काटदरे दांपत्याच्या जीवनात काही वाईट म्हणजे कृष्णवर्णीय व काही बऱ्या म्हणजे धवल गोष्टीही आहेत. पण काटदरेंची मने उद्ध्वस्त झाली अाहेत हे दाखविण्यासाठी व ते प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यासाठी प्रसाद ओक यांनी कच्चा लिंबू चित्रपटातील सात-आठ रंगीत दृश्ये वगळता बाकीचा सारा चित्रपट कृष्णधवल ठेवला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेला हा प्रयोग वेगळा व त्यांची कलात्मकता दाखविणारा आहे. जयवंत दळवींच्या आणखी काही साहित्यकृतींवर प्रसाद ओक यांना भविष्यात चित्रपट बनवायचे आहेत. त्या प्रकल्पांची सुरुवात म्हणून कच्चा लिंबू चित्रपटाकडे पाहाता येईल. थोडक्यात पहिल्याच प्रयत्नात प्रसाद ओक यांनी सिक्सर मारली आहे. साठ-सत्तरच्या दशकातील मुंबईतील वातावरण उभे करताना तेव्हाचे सारे तपशील कच्चा लिंबूमध्ये दिग्दर्शकाने अतिशय बारकाईने व अचूक दाखविले आहेत. त्यामुळे चित्रपटात वास्तववादी रंग भरले जातात.
संगीत - कच्चा लिंबू या चित्रपटाला राहूल रानडे यांनी संगीत दिले असून गाणी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाच्या अखेरीस एक गाणे येते ते म्हणजे `माझे आई बाबा माझे आई बाबा स्पेशल आईबाबा देवाजीचे दोन हात सारे आई बाबा.' हे गाणे अवधूत गुप्ते याने अतिशय तरलपणे गायले असून त्या गाण्यातून या चित्रपटाचे जणू काही सारे सारच उलगडते. संगीत व पार्श्वसंगीताचा अचूक वापर ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.                 http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-marathi-film-kaccha-limboo-movie-review-5666775-PHO.html

1 comment: