#नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियासाठी आयआयटी खरगपूरने केले खास अॅप
#५ हजार मराठी पुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध; वर्षभरात मराठी पुस्तकांची संख्या २ लाखांपर्यंत नेणार, #केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याचा उपक्रम
मुंबई, दि. 18 मे
- समीर परांजपे
प्रायमरी ते पीजी या शैक्षणिक स्तरातील विद्यार्थी, वाचक यांच्यासाठी आता अगदी मोफत उपलब्ध आहेत भारतीय भाषांसह विविध भाषांतील सुमारे ६७ लाख पुस्तके, नियतकालिके, थिसिस व लेख व तेही फक्त एका क्लिकवर. ही किमया साधली आहे पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूरने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रकल्प असलेल्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (एनडीएलआय) या महाप्रकल्पासाठी नुकत्याच विकसित केलेल्या खास अॅपमुळे. हा अॅप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करुन घेतल्यानंतर वाचकांना अन्य भाषांतील पुस्तकांबरोबरच ५ हजारांहून अधिक मराठी पुस्तके डिजिटल रुपात वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत.
एनडीएलआयच्या वेबसाइटवर मराठी बुक्स असे सर्च ऑप्शन दिल्यानंतर सध्या ५ हजारांहून अधिक मराठी पुस्तके वाचकांना पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होतात. या मराठी पुस्तकांची संख्या येत्या वर्षभरात दोन लाखांपर्यंत जाईल. त्यात विषयांच्या विविधतेनूसार आपल्याला डिजिटल स्वरुपात ती पुस्तके वाचता येतात. इतिहास व भूगोल असा विषयाच्या पुस्तकांवर क्लिक केले असता शंकर वामन दांडेकरांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी, वि. ल. भावे यांनी लिहिलेल्या मराठी दप्तर या पुस्तकाचे काही खंड इथपासून विज्ञानावरील अनेक विषयांची मराठी पुस्तके इथे उपलब्ध आहेत.
नॅशनल डिजिटल लायब्ररी आॅफ इंडिया या प्रकल्पामध्ये देशातील सुमारे १०० विविध संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये देशातील विविध राज्यांतील अग्रगण्य शासकीय ग्रंथालये तसेच शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशभरातील कोणत्याही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेली पुस्तके डिजिटल स्वरुपात मोफत उपलब्ध करुन देण्यासाठीही (एनडीएलआय) प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. अँड्राॅइडची सुविधा असलेल्या मोबाइलधारकांनाच हा अॅप डाऊनलोड करुन घेता येईल. पुढे इतर प्रकारच्या स्मार्टफोनसाठी ही सुविधा विकसित करण्यात येईल. एनडीएलआयचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी वाचकानेhttps://ndl.iitkgp.ac.in वा या साइटवर जाऊन स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यानंतर वाचकाला त्याच्या आवडीचे पुस्तक विषय, लेखकाचे नाव, भाषा या क्रमानूसार शोधता येईल. ते केवळ मोफत वाचता येईलच असे नव्हे तर ते पुस्तक डाऊनलोडही करुन घेता येईल. इतकेच नव्हे तर हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर एनडीएलआयच्या वेबसाइटवर विविध विषयांवरची ऑडिओ व व्हिडिओ स्वरुपातील लेक्चर्सही ऐकता येण्याची सोय उपलब्ध आहे.
मराठी भाषेतही अॅप कार्यान्वित करणार
नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या साइटवर ऑडिओ बुक्स करण्याकडेही या वेबसाइटची वाटचाल सुरु आहे. आयआयटी खरगपूरने विकसित केलेले हे अॅप सध्या इंग्लिश, हिंदी व बंगाली भाषेत असून ते काही महिन्यांतच मराठी व अन्य भाषांतही कार्यान्वित होणार आहे.
No comments:
Post a Comment