Monday, May 29, 2017

वाचकांनी शेरेबाजीने खराब केलेल्या पुस्तकांचे मुंबईत आगळे प्रदर्शन ३० मे पासून - दै. दिव्य मराठी २९ मे २०१७ - समीर परांजपे



---------

दै. दिव्य मराठीच्या दि. 29 मे 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली ही मी केलेली विशेष बातमी
-------
वाचकांनी शेरेबाजीने खराब केलेल्या पुस्तकांचे मुंबईत आगळे प्रदर्शन ३० मे पासून
विलेपार्लेच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाचा वाचकजागृतीसाठी अनोखा उपक्रम
- समीर परांजपे
मुंबई, दि. 29 मे - `हे उरलंसुरलं फारस चविष्ट, रुचकर नाही किंबहुना बेचवच आहे.' अशी बेधडक शेरेबाजी एका अनामिक वाचकाने केली आहे पु. ल. देशपांडे यांच्या उरलंसुरलं या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर...वाचकांनी अशा प्रकारच्या ताळतंत्र सोडून केलेल्या तसेच प्रसंगी तालेवारही शेरेबाजी केलेल्या पुस्तकांचे एक आगळे प्रदर्शन मुंबईतील विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात उद्या म्हणजे ३० मेपासून पुढे आठवडाभर आयोजिण्यात येत आहे. वाचकांनी शेरेबाजी केलेल्या मराठी पुस्तकांचे हे अशा प्रकारचे राज्यातील पहिलेच प्रदर्शन आहे. शेरेबाजी करुन पुस्तके खराब करु नका असा संदेश या प्रदर्शनातून वाचकांना देण्यात येणार आहे.
यासंदर्भात श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांनी सांगितले की, पुस्तकावर वाचकांनी शेरेबाजी करणे हे मुळात चुकच आहे. त्यामुळे पुस्तकाचे जे मुळ सौंदर्य असते ते नष्ट होते. आमच्या ग्रंथालयात वाचकांनी शेरेबाजी करुन खराब केलेल्या पुस्तकांतून ५० हून अधिक पुस्तकांचे प्रदर्शन आम्ही मुद्दामहून आयोजित करीत आहोत.शेरेबाजीमुळे पुस्तकांची गेलेली रया बघून वाचकांना काही बोध होईल व असे प्रकार भविष्यात थांबतील हा आशावाद मनात धरुनच आम्ही या आगळ्यावेगळ्या पुस्तकांचे प्रदर्शन श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात आयोजित केले आहे.
या पुस्तकांमध्ये अनामिक वाचकांनी नमुनेदार शेरेबाजी केली आहे. ती काही वेळेस सकारात्मक आहे तर बहुतांशी नकारात्मकच आहे. सफर बहुरंगी रसिकतेची या गंगाधर गाडगीळ यांच्या पुस्तकावर एका वाचकाने असा शेरा लिहिला आहे `गं. गा. यांची लेखनशैली खूपच निरस, कंटाळवाणी आहे. वाचताना रमून जाणे होत नाही.' फाऊंटन हेड या कादंबरीचा शिखर या नावाने अनुवाद करणाऱ्या मोहनतारा पाटील यांच्या लेखनशैलीबद्दल लिहिताना एका वाचकाने तिरकसपणे पुस्तकावर लिहून ठेवले आहे `भाषांतर करणे या फंदात पाटीलबाईंनी न पडलेले बरे.' राजा राजवाडे यांच्या `हास रे घुम्या' या पुस्तकाच्या एका पानावर वाचकाचा शेरा असा आहे `हे पुस्तक वाचून जो हसेल त्याचा जाहीर सत्कार करावा.' वि. स. खांडेकर रजत-स्मृति पुष्पांतर्गत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादन करुन प्रसिद्ध केलेल्या `अजून येतो वास फुलांना' या वि. स. खांडेकरांच्या पुस्तकावर वाचकशेरा असा आहे की, `अजून येतो सुरेख वास फुलांना. हा वास घ्यायलाच हवा.' पुणं एक साठवणं या श्याम भुर्के लिखित पुस्तकाच्या पानावरील एक वाचकशेरा आहे तो म्हणजे 'ही साठवण फारशी आनंददायक नाही. बरेचसे लेखन अतिरंजित अवास्तव आहे. श्री. भुर्के उगाचच भुरके मारीत आहेत!' प्रा. माधव का. देशपांडे लिखित `सन्त आणि सायन्स' या पुस्तकावर एका वाचकाने लिहून ठेवले आहे ` सणसणीत व सडेतोड भाषेत लिहिलेले हे सुंदर पुस्तक. ज्याला झेपेल त्यानेच वाचावे. हृदयविकार असणारांनी वाचू नये.'
वाचकांनी पानोपानी केलेल्या शेरेबाजीतून दृष्टिकोन (लेखक - भारतकुमार राऊत), सर्व प्रश्न अनिवार्य - रमेश इंगळे उत्रादकर, कपटी कंदार आणि कताचा मनोरा - नारायण धारप, अमेरिकेतील धावपळ -डॉ. अनंत लाभसेटवार, फाळणीचे दिवस - गो.मा. कुलकर्णी, गाठ पडली ठका ठका - शांताबाई शेळके अशी अनेक पुस्तकेही सुटलेली नाहीत. ती सारी या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
मारुती चितमपल्लींना पाहावी लागली आपल्या पुस्तकावरील शेरेबाजी
प्रख्यात पक्षीतज्ज्ञ व लेखक मारुती चितमपल्ली गेल्या पाच मार्च रोजी विलेपार्ले येथे एका पुस्तक प्रकाशन समारंभासाठी हवे होते. त्यांना त्यांच्या आता दुर्मिळ असलेल्या रानवाटा या पुस्तकाची श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयातील प्रत काही संदर्भासाठी हवी होती. या प्रतीवर वाचकांनी खूप उलटसुलट शेरेबाजी केली होती. शेवटी जिथे शेरेबाजी केली आहे त्या ठिकाणी पांढरे कागद चिटकवून हे पुस्तक मारुती चितमपल्ली यांना देण्यात आले. तरीही काही ठिकाणची शेरेबाजी लपविणे शक्य नव्हते. ते पुस्तक बघून चितमपल्ली यांना काय बरे वाटले असेल असा विचार त्यावेळी संबंधितांच्या मनात येऊन गेला होता.
---
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/29052017/0/3/

No comments:

Post a Comment