कालवश झालेले रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांच्यावर दै. दिव्य मराठीच्या दि. 1१७ मे २०१७च्या अंकात मी लिहिलेला विशेष लेख पुढे देत आहे. लेखासोबत त्या पानाची वेबलिंकही देत आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sachin-parajanpe-writes-about-emperor-krishna-borkar-5599924-NOR.html
http://
---
रंगभूषेचे सम्राट कृष्णा बोरकर
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
मराठी नाट्य तसेच चित्रपटसृष्टीमध्ये सुमारे ७० वर्षांहून जास्त काळ कार्यरत असलेले प्रसिद्ध रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांच्या निधनामुळे या कलेतील एक माहिर मोहरा आपण गमावला आहे. असं म्हणतात गोवा व कोकणाच्या भूमीत माणसे नाटकाचे वेड घेऊनच जन्माला येतात. कृष्णा बोरकर यांचे घराणे मुळचे गोव्यातील बोरी गावचे. पोर्तुगीजांच्या राजवटीतील छळाला कंटाळून अनेक गोवेकरांनी कोकणात स्थलांतरित होणे पसंत केले. कृष्णा बोरकरांचे पूर्वजही त्यातलेच. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचखरी गावी आपला मुक्काम हलविला. कोकणातील प्रत्येक माणसाला मुंबईचे आकर्षण असतेच. त्याच बरोबर अनेकांनी पोट भरण्यासाठीही मुंबईची वाट धरलेली असते. कृष्णा बोरकरांचे वडिल वारल्यानंतर त्यांची आई आपल्या मुलांना घेऊन मुंबईला आली. बोरकर कुटुंब अशा रितीने कायमचे मुंबईकर झाले.
कृष्णा बोरकरांना लहानपणापासूनच नाटकाविषयी असीम जिव्हाळा. गावाला दशावतारीचे खेळ व्हायचे तेव्हा लहानगा कृष्णा ते पाहाण्यात रंगून गेलेला असायचा. एखाद्या नटाला केली जाणारी रंगभूषा व एखादा पुरुष नट स्त्रीभूमिका करीत असताना त्याला केली जाणारी रंगभूषा यातील जो महत्वाचा फरक आहे तो कृष्णाला लहानपणापासून नीट उमगू लागला होता. दशावतारीच्या वेळेस नटाची रंगभूषा सुरु असताना तिचे निरीक्षण कृष्णा न कंटाळता करत असे. याच रंगांशी आपल्याला आयुष्यभर खेळायचे आहे हे तेव्हा त्यांच्या गावीही नसेल.
भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्रात रंगभूषा, वेशभूषा, देखावे या सगळ्यांना नेपथ्य ही एकच संज्ञा वापरली आहे. मराठी नाट्यपरंपरेचा पाया विष्णुदास भावे यांनी घातला. त्यानंतर मराठी रंगभूमी चोहोअंगानी बहरली. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, दिग्दर्शन अशा प्रत्येक गोष्टीचेच विशेषीकरण झाले. मराठी रंगभूमीवर रंगभूषा या विषयात पंढरीनाथदादा जूकर तसेच कृष्णा बोरकर या दोन नावांना गेली पन्नास वर्षे तरी समर्थ पर्याय नव्हता. मराठी रंगभूषेच्या इतिहासात डोकावले तर अगदी १९०४ पर्यंत पिवळी माती, सफेती, काव आदी गोष्टींचा वापर करुनच नटांची रंगभूषा करण्यात यायची. मराठी रंगभूमीवर आप्पासाहेब टिपणीस, कारखानीस यासारखे सुशिक्षित अभिनेते आल्यानंतर त्यांनी इंग्रजी पुस्तके वाचून रंगभूषाशास्त्राचा विकास घडविला. महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक अभिनेते वामनराव उर्फ मामा भट यांनी आपला नटाचा पेशा त्यागून रंगभूषेसाठी लागणाऱ्या रंगांचा कारखाना काढला. निव्वळ रंगभूषाकार म्हणून वावरलेले नाना जोगळेकर यांचीही रंगभूषेसाठी लागणारी उत्पादने पूर्वी प्रसिद्ध होती. ही सारी पार्श्वभूमी पंढरीनाथ जूकर व कृष्णा बोरकर यांना पुण्याईसारखी लाभली होती.
कोकणातून मुंबईत आल्यानंतर कृष्णा बोरकर राहात होते त्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील कलकत्तावाला चाळीमध्ये शेजारी एक कलासक्त व्यक्ती राहात असे. तिचे नाव पांडुरंग हुले. हे गृहस्थ नाटक कंपन्यांचे पडदे रंगविण्याचे काम करायचे. हुलेंमुळेच कृष्णा बोरकरांचे पाऊल खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीच्या अंगणात पडले. सुडाची प्रतिज्ञा या कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकातून कृष्णा बोरकरांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रथमच स्वतंत्रपणे रंगभूषा करण्याची संधी मिळाली. भुलेश्वर येथे विविध प्रकारचे ड्रेस भाड्याने देण्याची काही दुकाने पूर्वी होती. आता तशी दुकाने दादरला दिसतात. भुलेश्वरच्या यापैकी एका दुकानात कृष्णा बोरकरांनी काम करुन अजून अनुभव घेतला. महाराष्ट्र नाटक कंपनीचे वेषभूषाकार कमलाकर टिपणीस यांच्या ओळखीने कृष्णा बोरकरांना एका चित्रपटाची रंगभूषा करण्याचीही संधी मिळाली.
व्यावसायिक मराठी नाटकांचे हक्काचे रंगभूषाकार ही त्यांच्या कारकिर्दीची पुढची पायरी होती. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी िदग्दर्शित केलेल्या पृथ्वी गोल आहे हे कृष्णा बोरकर यांचे स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून पहिले व्यावसायिक नाटक होते. बोरकर यांचे घट्ट नाते जुळले ते प्रख्यात अभिनेते-नाटयनिर्माते प्रभाकर पणशीकर व मोहन वाघ यांच्याशी. वाघ व पणशीकर यांनी सुरु केलेल्या नाट्यसंपदा या संस्थेच्या नाटकांसाठी बोरकरांनी रंगभूषाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे प्रभाकर पणशीकर व मोहन वाघांचे काही जमेना. त्यामुळे मोहन वाघांनी नाट्यसंपदातून बाहेर पडून चंद्रलेखा या नाट्यसंस्थेची स्थापना केली. चंद्रलेखामध्ये पुढे कित्येक वर्षे कृष्णा बोरकरांनी रंगभूषाकार म्हणून काम केले. गारंबीचा बापू, गुड बाय डॉक्टर, गरुडझेप, स्वामी, हे बंध रेशमाचे, गरुडझेप, दीपस्तंभ, गगनभेदी, रणांगण अशा अनेक नाटकांसाठी कृष्णा बोरकरांनी रंगभूषा केली. यातील काही नाटके ऐतिहासिक, काही सामाजिक. प्रत्येक नाटकाचा, त्यात काम करणाऱ्या अभिनेत्याचा बाज लक्षात घेऊन कृष्णा बोरकरांनी रंगभूषा केली. ती करताना त्यात विविधताही आणली. ‘रणांगण’ नाटकातील १७ कलाकार आणि ६५ प्रकारच्या रंगभूषा करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. केशवराव दाते, बाबुराव पेंढारकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, वसंत शिंदे , मधुकर तोरडमल, डॉ. काशिनाथ घाणेकर, यशवंत दत्त आणि अन्य दिग्गज कलाकारांची रंगभूषा बोरकर यांनी केली होती. त्याशिवाय रंगशारदा, श्री रंगशारदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांसाठी बोरकरांनी केलेली रंगभूषा हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.
राजकमल स्टुडिओच्या ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ ‘मौसी’ आदी चित्रपटांसाठी बोरकरांनी साहाय्यक रंगभूषाकार म्हणूनही काम केले. त्यावेळी या स्टुडिअोचे मुख्य रंगभूषाकार होते बाबा वर्दम. जेव्हा कृष्णा बोरकरांनी स्वतंत्रपणे रंगभूषाकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना पूर्ण पाठबळ दिले ते याच वर्दमांनी. ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकात मधुकर तोरडमल तर ‘सुख पाहता’ या नाटकात अभिनेते यशवंत दत्त यांना सहा वेगवेगळ्या भूमिकेसाठी कृष्णा बोरकरांनी केलेली रंगभूषा ही वाखाणण्याजोगीच होती.
१९९२च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत त्यांना उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक मिळाले होते. गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार तसेच भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. इतर अनेक संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांचा उल्लेख करायचा म्हटला तरी ती मोठी यादी होईल. कृष्णा बोरकर जीवनाच्या शाळेत जास्त शिकले. जीवनाच्या रंगभूमीवर लोक मुखवटे चढवून कसे जगतात, त्यांच्या चेहेऱ्यावर एक व मनात दुसरेच रंग कसे असतात हे सारे त्यांना मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत वावरताना नीट लक्षात आले. पण बोरकर जास्त रमले ते मराठी नाटकांतच. ८५ वर्षे वय असूनही त्यांचा उत्साह पंचविशीच्या तरुणासारखा असायचा. मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस या विभागात ते विद्यार्थ्यांना रंगभूषा हा विषय प्रात्यक्षिकांसह शिकवत असत. वयोपरत्वे त्यांनी मराठी नाटकांतील रंगभूषेच्या कामातून निवृत्ती घेतली होती पण नवे रंगभूषाकार घडविण्याचा उत्साह दांडगा होता. अभिनेता असो वा अभिनेत्री त्यांच्या चेहेऱ्याला खऱ्या अर्थाने रंगरुप देणारा कृष्णा बोरकर यांच्यासारखा रंगभूषाकार काळानेच घडविला होता. काळच त्यांना आपल्यातून दूर घेऊन गेला. मराठी नाटकांच्या रंगभूषेच्या इतिहासातील एक सुवर्णपान मिटले.
No comments:
Post a Comment