http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/28042017/0/10/
विनोद खन्ना यांचा जन्म पेशावरला झाला होता. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पेशावरशी विनोद खन्ना व अन्य अभिनेत्यांची नाळ कशी जुळली आहे ते सांगणारा माझा हा लेख दै. दिव्य मराठीच्या २८ एप्रिल २०१७च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
---
पेशावरशी जडलेले नाते
समीर परांजपे
विनोद खन्ना हे किशनचंद खन्ना व कमला या पंजाबी दांपत्याचे अपत्य. विनोद खन्ना यांच्या वडिलांचा टेक्सटाइल, डाइज व केमिकलचा व्यवसाय होता. विनोद यांचा जन्म पेशावर (फाळणीनंतर हा भाग पाकिस्तानात गेला) येथे ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. भारताच्या फाळणीनंतर खन्ना कुटुंब मुंबईत आले. पेशावर या शहराशी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायकांचे खास नाते आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांचे पिता व प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ रोजी पूर्वीच्या ल्यालपूर (आताच्या पाकिस्तानातील फैसलाबाद) जवळील समुंद्री येथे झाला. पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बसेश्वरनाथ कपूर हे पोलिस उपनिरीक्षक होते. बसेश्वर यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार (मूळ शब्द किस्सा कहानी, मग त्याचा अपभ्रंश झाला.) परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. पृथ्वीराज कपूर यांचे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण ल्यालपूर येथील खालसा कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पेशावरमधील एडवर्ड्स महाविद्यालयात झाले. एडवर्ड्स महाविद्यालयातील प्राध्यापक जय दयाळ हे कलाप्रेमी होते. पृथ्वीराज कपूर यांच्यातील अभिनेत्याला पहिली संधी मिळाली ती याच महाविद्यालयात. एडवर्ड्स महाविद्यालयातून पृथ्वीराज कपूर बी.ए. झाले. पृथ्वीराज कपूर यांचे खरे प्रेम नाटकांवरच होते. त्यामुळे पुढे साहजिकच त्यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडेच वळली. १९२८ मध्ये पृथ्वीराज कपूर मायानगरी मुंबईमध्ये आले आणि मग कायमचे इथलेच झाले. पृथ्वीराज कपूर यांचा विवाह पेशावरमध्ये रामसरनी मेहरा यांच्याशी झाला. त्या वेळी पृथ्वीराज यांचे वय होते १७ वर्षांचे, तर त्यांच्या पत्नीचे वय होते १४ वर्षांचे. पृथ्वीराज कपूर यांचा थोरला मुलगा राज कपूर याचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावरमध्येच झाला.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवल्या गेलेले तसेच ट्रॅजिडी किंग म्हणून रसिकमान्यता मिळालेले अभिजात अभिनेते दिलीपकुमार हेदेखील मूळचे पेशावरचेच. या शहरातील किस्सा ख्वानी बाजारातील मोहल्ला खुदादाद येथील निवासस्थानी ११ डिसेंबर १९२२ रोजी दिलीपकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहंमद युसूफ खान. पेशावरमधील त्यांच्या कुटुंबामध्ये हिंडको ही भाषा बोलली जात असे. दिलीपकुमार यांच्यासह ती सर्व १२ भावंडे होती. दिलीपकुमार यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवार. ते फळांचे व्यापारी होते. त्यांच्या पेशावर व महाराष्ट्रातील नाशिकजवळील देवळाली येथे मोठ्या फळबागा होत्या. १९२०च्या दशकाच्या अखेरीस दिलीपकुमार यांचे कुटुंबीय मुंबईला आले व येथेच स्थायिक झाले.
अभिनेता नासीरुद्दीन शाह यांचे पूर्वज सय्यद मुहम्मद शाह हे मुळचे अफगाणिस्तानचे. पहिले अँग्लो-अफगाण युद्ध व १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सय्यद ब्रिटिशांच्या बाजूने सहभागी झाले होते. ते जान फिशान खान या नावानेही ओळखले जात. ब्रिटिशांनी त्यांना सरढाणाचे वतन देऊ केले होते. ते सरढाणाचे नवाब बनले. काबूलमधून कायमचे स्थलांतरित व्हावे लागलेल्या सय्यद मुहम्मद शाह यांनी काही काळ पेशावरमध्येही घालविला. त्यानंतर ते सरढाणामध्ये आले. या दूरच्या धाग्याने नासिरुद्दीन शाह देखील पेशावरशी जोडले गेले आहेत. पाकिस्तानच्या दौऱ्यावर काही वर्षांपूर्वी गेले असताना नासीरुद्दीन यांनी अफगाणिस्तानातील काबूल तसेच पाकिस्तानातील पेशावर शहरांशी आपल्या पूर्वजांचे असलेले नाते उलगडून दाखविले होते.
शाहरुख खान म्हणजेच किंग खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी नवी दिल्लीमध्ये झाला. पण त्याच्या पूर्वजांची पाळेमुळे ही पेशावरमध्येच आहेत. शाहरुख खानचे आजोबा जान मुहम्मद हे मुळ अफगाणिस्तानातले. जान मुहम्मद कालांतराने पेशावरमध्ये स्थायिक झाले. तेथे हे कुटुंब हिंडको भाषा बोलत असे. शाहरुख खानचे वडिल मीर ताज मोहम्मद खान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पेशावर येथील आंदोलनांत सहभागी झाले होते. फाळणीनंतर मीर ताज मोहम्मद खान हे भारतात आले. आजही शाहरुख खानचे काही नातेवाईक पेशावर येथे राहातात.
---
विनोद खन्ना, फिरोज खानची दोस्ती
विनोद खन्ना, फिरोझ खान यांच्या निधनाची तारीख २७ एप्रिलच!
विनोद खन्ना व फिरोज खान या दोघांचे रुपेरी पडद्यावर छान मेतकुट जमलेले होते. त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील काही घटनांमध्येही साम्य होते. फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी विनोद खन्ना यांचेही कर्करोगामुळेच २७ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले. विनोद खन्ना व फिरोझ यांनी शंकर शंभू, कुर्बानी, दयावान अशा काही चित्रपटांत एकत्र काम केले होते. मणिरत्नन याने नायकन हा तामिळ चित्रपट बनविला होता.फिरोझ खानने त्याचा दयावान या नावाने हिंदीत रिमेक केला होता. या दोघांनी एकत्र केलेला पहिला चित्रपट म्हणजे शंकरशंभू. हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला. फिरोझ खानने कुर्बानी चित्रपटानंतर जाँबाज चित्रपट बनवायला घेतला. त्यावेळी विनोद खन्नाला प्रमुख भूमिका देण्याचे फिरोझच्या मनात होते. पण ती भूमिका सरतेशेवटी अनिल कपूरने केली.
--
छोट्या पडद्यावरील `काशिनाथ'
विनोद खन्ना यांनी मोठा पडदा तर गाजवलाच पण छोट्या पडद्यावरही कालांतराने भूमिका साकारली. स्मृृती इराणी यांनी निर्मिलेल्या मेरे अपने या मालिकेमध्ये काशिनाथ ही भूमिका साकारली होती.
---------
No comments:
Post a Comment