Wednesday, April 19, 2017

`लिळा पुस्तकांच्या' जोडणार मराठीतील `बुक ऑन बुक्स'चा धागा...दै. दिव्य मराठी दि. १९ एप्रिल २०१७




दै. दिव्य मराठीच्या दि. १९ एप्रिल २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी केलेली बातमी.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/19042017/0/7/
---
`लिळा पुस्तकांच्या' जोडणार मराठीतील `बुक ऑन बुक्स'चा धागा...
प्रा. नितिन रिंढे लिखित पुस्तक होणार लोकवाङ‌्मय गृहातर्फे लवकरच प्रसिद्ध
---
- समीर परांजपे
---
मुंबई, िद. १८ एप्रिल - मराठी साहित्यात `बुक ऑन बुक्स' म्हणजे `पुस्तकांवरील पुस्तक' अशा प्रकारची पुस्तके फारशी लिहिली जात नाहीत. ही प्रथा मोडीत काढणारे एक आगळे पुस्तक लोकवाडमय गृहाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध होत आहे. `लिळा पुस्तकांच्या' असे या पुस्तकाचे नाव असून ते प्रख्यात समीक्षक व प्रा. नितीन रिंढे यांनी लिहिले आहे. मराठी साहित्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारचे पुस्तक बऱ्याच कालावधीनंतर प्रसिद्ध होत आहे.
या पुस्तकाच्या अंतरंगाबद्दल बोलताना प्रा. नितीन रिंढे यांनी सांगितले की, माझ्या या पुस्तकामध्ये काही अमेरिकन तसेच युरोपियन पुस्तकांबद्दल मी लिहिले आहे. बुक ऑन बुक शेल्फ हे इंग्रजी पुस्तक बुक शेल्फचा इतिहास सांगणारे आहे. त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ मिडनाईट लायब्ररी या पुस्तकात ग्रंथालयांशी संबंधित गमतीदार घटना आहेत तसेच खाजगी व सार्वजनिक ग्रंथालयांचे किस्से आहेत. हिटलर्स लायब्ररी नावाचे एक पुस्तक माझ्या वाचनात आले होते. हिटलरने जमविलेल्या पुस्तकांच्या आधारे हिटलरचे चरित्र या पुस्तकात रेखाटले आहे. पुस्तकांबाबत ड्युमाज क्लब सारख्या कादंबऱ्याही इंग्रजीत प्रसिद्ध होतात. त्यापैकी काही कादंबऱ्यांबद्दलही `लिळा पुस्तकांच्या'मध्ये मी लिहिले आहे. पुस्तकांच्या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकांची संख्या युरोप, अमेरिकेत मोठी आहे. फ्रेंच, जर्मन,इंग्लिश भाषेत `बुक आॅन बुक्स' प्रकारातील पुस्तकांच्या संख्या मोठी आहे. त्यातील निवडक ९० पुस्तकांची वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारे २३ लेख `लिळा पुस्तकांच्या'मध्ये आहेत.
प्रा. नितिन रिंढे यांनी सांगितले की, `बुक ऑन बुक्स' या प्रकारच्या पुस्तकांमध्ये पुस्तकांबद्दलच्या आठवणी असतात. दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह करणारे, पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा इतिहास, लेखकांबद्दलच्या आठवणी, लेखकाच्या घरातील पुस्तकांबद्दल केलेले लेखन, पुस्तकाची छपाई, त्यातील चित्रे, छायाचित्रे, रेखाटने, कागदाचा दर्जा याबद्दलच्या वाचकांच्या आठवणी, पुस्तकांच्या निर्मितीमागील इतिहास, पुस्तकांनी घडविलेला इतिहास, पुस्तकांचा परिचय करुन देणारी पुस्तके अशा पुस्तकांचा `बुक ऑन बुक्स' या प्रकारात समावेश होतो.
--
मराठीतील `बुक ऑन बुक्स'
मराठी साहित्यामध्ये डॉ. अरुण टिकेकरांचे अक्षरनिष्ठांची मांदियाळी हे गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेले `बुक आॅन बुक्स' प्रकारातील अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे. त्यानंतर महत्वाचे ठरावे असे नितिन रिंढेंचे `लिळा पुस्तकाच्या' हे पुस्तक असेल. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी पुस्तकांचा परिचय करुन देणारी लिहिलेली पुस्तके, अ. का. प्रियोळकर लिखित प्रिय-अप्रिय, श्री. बा. जोशी यांनी लिहिलेली संकलन, गंगाजळी, उत्तम-मध्यम ही तीन पुस्तके, स. ग. मालशे यांचे आवड-निवड, अविनाश सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेले दुर्मिळ अक्षरधन अशी `बुक ऑन बुक्स' प्रकारातील मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. या प्रकारातील पुस्तकांची संख्या वाढली तर वाचकांना पुस्तकांबद्दल रोचक माहिती मिळणे अधिक सुलभ होईल. इंटरनेटवर कोणत्याही पुस्तकाची माहिती एका क्लिकवर मिळत असली तरी त्या पुस्तकांबाबत पडद्यामागे वा लेखकाच्या स्तरावर घडलेल्या घटनांचा तपशील फारसा मिळत नाही. तो अशा पुस्तकांच्या माध्यमातूनच अधिक मिळू शकतो.

No comments:

Post a Comment