हिराबाई पेडणेकर यांनी लिहिलेल्या संगीत दामिनी या नाटकाचे जे पुस्तक प्रकाशित झाले त्याचे पहिले पान.
---
हिराबाई पेडणेकर यांचे हस्ताक्षर
--------
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील रहिवासी कृष्णाजी नारायण नेने यांच्या समवेत हिराबाई पेडणेकर
------
हिराबाई पेडणेकर यांचे रेखाचित्र.
----
--------
दै. दिव्य मराठीच्या दि. २३ एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या पुरवणीत मी नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्यावर लिहिलेला हा लेख. त्या लेखाची वेबपेज लिंक व जेपीजी फाइलही सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sameer-paranjpe-article-about-hirabai-pednekar-5581178-PHO.html?seq=2
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/23042017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/23042017/0/2/
------------------
हिराबाई नावाची कस्तुरी!
-------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---------
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ९७व्या आकड्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. २०२० साली शतकमहोत्सवी नाट्य संमेलन होईल. आजवरच्या नाट्य संमेलनांच्या इतिहासामध्ये फक्त सात महिलांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. मराठीतील महिला नाटककार गिरिजाबाई केळकर यांना १९२८ मध्ये मुंबईत भरलेल्या २३ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर दुर्गा खोटे (नवी दिल्ली, १९६१), ज्योत्स्ना भोळे (पणजी, १९८४), भक्ती बर्वे ( कणकवली, १९९८), लालन सारंग (कणकवली, २००६), फय्याज (बेळगाव, २०१५) या अभिनेत्रींना व दिग्दर्शिका- अभिनेत्री विजया मेहता (इचलकरंजी, १९८६) यांना नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मुळात मराठी रंगभूमीवर पूर्वी व आजही महिला नाटककारांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. गिरिजाबाई केळकरांना मिळालेले नाट्य संमेलनाध्यक्षपद ही तत्कालीनदृष्ट्या अपूर्वाईची घटना होती. गिरिजाबाईंनी आयेषा, पुरुषांचे बंड, मंदोदरी, राजकुंवर, वरपरीक्षा, सावित्री, हीच मुलीची आई अशी काही नाटके लिहिली होती. त्याशिवाय त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. गिरिजाबाईंच्या द्रौपदीची थाळी या आत्मचरित्रात त्यांचा लेखन व जीवनप्रवास कसा झाला याचे अतिशय निरामय वर्णन आहे.
गिरिजाबाई केळकर यांच्याप्रमाणेच बाळुताई खरे (मालती बेडेकर), आनंदीबाई किर्लोस्कर, शकुंतला परांजपे, उमाबाई सहस्त्रबुध्दे, पद्मा गोळे, सरिता पदकी, सई परांजपे, ज्योत्स्ना देशपांडे, सुमती क्षेत्रमाडे, वसुंधरा पटवर्धन, सुमतीदेवी धनवटे, रेखा बैजल, मालतीबाई दांडेकर, कुमुदिनी रांगणेकर, मुक्ताबाई दिक्षित, लीला फणसळकर, शिरीष पै, मंगला गोडबोले, मनस्विनी लता रवींद्र, इरावती कर्णिक, रोहिणी निनावे, मधुगंधा कुलकर्णी, संपदा जोगळेकर- कुलकर्णी, मनिषा कोरडे आदी महिला नाटककारांनीही आपली मुद्रा मराठी रंगभूमीवर उमटवली आहे. मात्र या सर्वांमध्ये एक नाव अतिशयच महत्वाचे आहे ते म्हणजे हिराबाई पेडणेकर या मराठीतील पहिल्या महिला नाटककार असे पूर्वी सांगितले जात असे. मात्र सोनाबाई चिमाजी केरकर यांचे ‘संगीत छत्रपती संभाजी नाटक’ आणि काशिबाई फडके यांचे ‘संगीत सीताशुद्धी’ ही नाटके कालानुक्रमे आधीची असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली. डॉ. मधुरा कोरान्ने यांनी आपल्या `स्त्री नाटककारांची नाटके' या पुस्तकात म्हटले आहे की, `सोनाबाई केरकर या मराठीतील आद्य स्त्री नाटककार आहेत. त्यांनी १८९४ साली `संगीत छत्रपती संभाजी नाटक' हे नाटक लिहिले. सोनाबाईंच्या मृत्यूनंतर (१७ जुलै १८९५) एक वर्षाने इ.स. १८९६ साली हे नाटक प्रसिद्ध करण्यात आले. परंतु यासंदर्भात डॉ. ताराबाई भवाळकर यांच्या मते `पहिली मराठी स्त्री नाटककार' असण्याचा मान काशीबाई फडके यांच्याकडे जातो. काशीबाईंचे संगीत सीताशुद्धी हे नाटक इ.स. १८९७मधे लेखिकेच्या मृत्यूनंतर (इ.स. १८९६) एका वर्षाने प्रसिद्ध झाले.'म्हणजे १८८७मध्ये लिहिलेले हे नाटक आहे. परंतु जसे हे नाटक पूर्वी जरी लिहिलेले असले तरी ते १८९७ साली प्रसिद्ध झाले आहे. एखाद्या साहित्य प्रकारातील आद्यत्व त्या त्या लेखकाच्या प्रसिद्ध छापील ग्रंथांच्या आधारेच ठरविले जाणे योग्य ठरते. सोनाबाई केरकर यांचे नाटक१८९६मध्ये प्रसिद्ध झाले असल्याने सोनाबाई केरकर याच पहिल्या मराठी स्त्री नाटककार ठरतात.'
पहिल्या मराठी स्त्री नाटककार होण्याचा हिराबाई पेडणेकरांना मिळाला नाही पण त्यामुळे हिराबाईंच्या लेखनाची महत्ता कमी होण्याचे काहीच कारण नाही. हिराबाईंच्या ठायी कर्तृत्व असूनही त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद कधीही मिळू शकले नाही. आज तर त्यांच्याबाबत `नाही चिरा नाही पणती' अशी अवस्था आहे.
हिराबाई पेडणेकर यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८६ साली सावंतवाडीमध्ये झाला. त्यांचा जन्म संगीत, नृत्याची जाण असणाऱ्या घराण्यामध्ये झाला असे मोघम त्यांच्याबद्दल लिहून ठेवले गेले असले तरी त्यांचा `नायकीण' असा अगदी स्पष्ट शब्दांत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेला आहे. याच ग्रंथात कोल्हटकरांनी पुढे हिराबाईंचा उल्लेख हिराबाई जोगळेकर (कारण बाईंचा किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीचे मालक-नट नानासाहेब जोगळेकरांशी स्नेह होता) असाही केला आहे. हा कोल्हटकरांचा कुत्सितपणा आहे. हिराबाई पेडणेकर या गोव्यातील गोमंतक मराठा समाजाच्या. गोवा, सिंधुदूर्ग, कारवार परिसरातील अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात कलावंत, देवळी, भावीण, पेरणी, बांदे, फर्जंद, चेडवा अशा देवळात सेवा देणाऱ्या पोटजातींच्या समूहाला ‘देवदासी’ असं नाव मिळालं. या समाजातही स्त्रियांना देवाला वाहण्याचा सेषविधी होता. पण तो प्रत्येक बाईला बांधील नव्हता. या समाजात नृत्य, संगीतात मुली वाकबगार असत. या देवदासी समाजातील सर्व पोटजातींमध्ये ऐक्य घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून या समाजाचे नाव नाईक मराठा समाज आणि शेवटी गोमंतक मराठा समाज ठरलं. हिराबाई पेडणेकर हा सगळा वारसा घेऊन जन्मला, त्यातूनच त्यांच्या ठायी असलेल्या लेखन व इतर ललित कलांना प्रेरणा मिळाली. हिराबाई वारांगना नव्हत्या. त्या फक्त बैठकीच्या गाणेच करायच्या.
मुंबईतील मिशन स्कूलमध्ये त्या शिकल्या. हिराबाईंचे शिक्षण अवघे सातवीपर्यंतच झालेले. मुंबई विद्यापीठाला ‘राजाबाई टॉवर’ बांधून देणाऱ्या धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या घरात त्या वाढल्या, त्या मावशी भीमाबाईमुळे. मावशीनं या भाचीला मुंबईत आणून शिक्षण दिलं. प्रख्यात डॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी अशी आठवण लिहून ठेवली आहे की, `समीक्षक प्रा. वि. ह. कुळकर्णी म्हणजे अण्णांबरोबर कधीकधी आम्ही भ्रमंतीला जात असू. राणीचा बाग, वरळी चौपाटी किंवा गिरगावात भटकून येत असू. त्यावेळी शांतारामाची चाळ, जगन्नाथाची चाळ, टिळकांच्या सभेची जागा, ग. त्र्यं. माडखोलकरांचे घर, हिराबाई पेडणेकरांचे घर, सर्व काही अण्णा दाखवायचे.' हिराबाई या गिरगाव इथल्या गांजावाला चाळीत राहात होत्या. याच गांजावाला चाळीचा जिना न. चिं. केळकर, चिंतामणराव वैद्य, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, वि. सी. गुर्जर, रेंदाळकर, बालकवी ठोंबरे, मामा वरेरकर हे चढले ते हिराबाईंचे गाणे ऐकायला तेही श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या आग्रहामुळेच. हिराबाईंना मराठी व संस्कृत उत्तमरित्या येत होते. त्याशिवाय हिंदी, बंगाली, इंग्लिश या भाषांचा काही अभ्यास त्यांनी केला होता. त्या उत्तम कविताही करीत असत. मनोरंजन आणि उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्यांनी “माझे आत्मचरित्र” नावाची जी लघुकथा लिहिली होती त्यामुळे त्यांचा अधिक बोलबाला झाला. हिराबाईंनी गाण्याचे अधिक शिक्षण पं. भास्करबुवा बखले यांच्याकडून घेतले. १९०१ साल असेल. भास्करबुवा बखले यांना त्यांच्या काही गानपटु शिष्यांचे गाणे ऐकविण्याची विनंती श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली होती. त्यानूसार ते किर्लोस्कर मंडळीचे प्रसिद्ध नट चिंतोबा गुरव यांच्यासोबत काही जणींकडे गाणे ऐकायला गेले. त्यातील एका १८-२० वर्षांच्या मुलीचे गाणे कोल्हटकरांना विशेष भावले. त्या होत्या हिराबाई पेडणेकर. त्यानंतर एक वर्षाने कोल्हटकर हे किर्लोस्कर कंपनीच्या बिऱ्हाडी गेले असताना गोविंदराव देवल यांनी त्यांच्या हातात एक पुस्तक ठेवले व ते म्हणाले ` हे नाटक एका सुशिक्षित नायकिणीने लिहिले आहे.' या नाटकातील पदांची रचना देवलांच्या धर्तीवर केलेली होती. कोल्हटकर यांनी हिराबाईंच्या घरी जाऊन त्यांच्याकडून ही पदे प्रत्यक्षात ऐकली व प्रभावित झाले. पण तरीही नाटकातील ही पदे हिराबाईंनीच लिहिली आहेत का? ही शंका कोल्हटकरांना आलीच. ही मनातली खुणगाठ ओळखून हिराबाई त्यांना म्हणाल्या की, `मला लिहिण्यावाचण्याचा नाद असल्याचे आपणांस आश्चर्य वाटेल. पण माझ्यासारख्या कितीतरी नायकिणी तो नाद असलेल्या आपणांस सापडतील.' १९०० ते १९११ दरम्यान हिराबाई किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीचे मालक-नट नानासाहेब जोगळेकरांसोबत त्या राहात होत्या. पुढे हिराबाईंचा कोल्हटकरांशी चांगला स्नेह जमला. त्या काही वर्षे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांबरोबर खामगाव येथे जाऊन राहिल्याही होत्या.
बालकवी ठोंबरे यांच्याशी झालेल्या परिचयामुळे हिराबाईंच्या काव्यस्फुर्तीला अधिक ऊर्जा मिळाली. तसेच हिराबाईंतील कलागुणांनी बालकवींच्याही प्रतिभेला बहर आला. `तू सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी, किती कांति तुझी कोवळी। तू नंदनवनीची चुकून अप्सरा आलिस या भूतळी ॥' असा प्रारंभ असलेली ही `चाफेकळी' कविता बालकवी यांनी हिराबाई पेडणेकरांवरच केली होती असे म्हटले जाते. राम गणेश गडकरी यांनीही हिराबाईंवर एक कविता केल्याचे उल्लेख आहेत. मात्र ती कविता नेमकी कोणती असावी याविषयी थांग लागत नाही. या दोन गोष्टींचे कोडे संशोधनाद्वारे सोडविणे गरजेचे आहे. या साऱ्या प्रतिभावंतांचा सहवास लाभलेल्या हिराबाई पेडणेकरांमधील नाटककारही स्वस्थ बसलेला नव्हता. हिराबाई पेडणेकरांनी लिहिलेल्या नाटकांपैकी जयद्रथ विडंबन (१९०४) व संगीत दामिनी (१९१२) या नाटकांचा विशेष बोलबाला झाला. एका पौराणिक कथानकाच्या आधारे त्यांनी जयद्रथ विडंबन हे नाटक लिहिले होते व त्यावर देवल शैलीच्या नाट्यलेखनाचा प्रभाव होता. ते नाटक व नाटकातील पदांचे नाट्यक्षेत्रातील त्यावेळच्या मान्यवरांकडून कौतुक झाल्याने एक मोठे स्वतंत्र नाटक लिहावे असे हिराबाईंच्या मनाने घेतले ते म्हणजे संगीत दामिनी. हिराबाईंनी लिहिलेले संगीत दामिनी हे नाटक कोणतीही नाटक कंपनी करण्यास तयार होईना. कारण कनिष्ठ कुलीन लेखिकेचे नाटक रंगमंचावर कसे आणावे असा प्रश्न त्यावेळच्या प्रस्थापित नाटकमंडळींना पडलेला! शेवटी ही गोष्ट मामा वरेरकरांच्या कानी गेली. त्यांनी `ललितकलादर्श' या नाटकमंडळीचे चालक व प्रखर अभिनेते केशवराव भोसले यांना हे नाटक करण्याविषयी गळ घातली. ती भोसले यांनी मान्य केली. हिराबाई कोणत्या कुळातल्या आहेत हे न पाहाता त्यांचे नाटक करण्याचा निर्णय घेऊन केशवराव भोसले यांनी आपले पुरोगामित्व कोणताही गाजावाजा न करता सिद्ध केले. अशाप्रकारे हिराबाई यांचे नाव महिला नाटककार म्हणून मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरले गेले. या नाटकाचे पुस्तक १ ऑक्टोबर १९१२ रोजी प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हिराबाई पेडणेकरांनी म्हटले आहे, `चांगल्या विद्वान नाटककारांच्या सुंदर नाट्यकृती रंगभूमीवर यावयाला किती अडचणी येतात, याविषयी काही माहिती व थोडा अनुभव असल्यामुळे मजसारख्या अशिक्षित स्त्रीची ही सामान्य कृती कशी रंगभूमीवर येते, याबद्दल मला फार काळजी वाटत होती. परंतू केशवराव भोसले यांनी हे नाटक रंगभूमीवर आणून ठिकठिकाणी त्याचे कळकळीने प्रयोग केले. या त्यांच्या धैर्याबद्दल व स्त्रीशिक्षणाविषयीच्या आस्थेबद्दल त्यांचे मी कितीही आभार मानिले तरी ते थोडेच होणार आहे.' हिराबाईंना समाजाकडून कोणती अहवेलना सहन करावी लागली असेल हे त्यांच्या या शब्दांतून समोर येतेच.
स्त्री शिक्षणाविषयी हिराबाईंना विलक्षण कळकळ होती. संगीत दामिनीमध्ये त्यांच्या या विचारांचे प्रतिबिंब दिसते. या नाटकात एकुण बहात्तर पदे आहेत हेही एक वैशिष्ट्य. हिराबाई पेडणेकरांनी लिहिलेली कवी जयदेवाची पत्नी, मीराबाई ही नाटके मात्र तेवढीशी गाजली नाहीत. हिराबाईंचा तत्कालीन नाट्यधर्मींवर एवढा प्रभाव होता की, कोल्हटकर, गडकरी, नाट्याचार्य खाडिलकर, केशवराव भोसले, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे यांना सुरेल चाली दिल्या. तर गडकरी, वि. सी. गुर्जर, बालकवी, लेले, रेंदाळकर, वरेरकर यांना हिराबाईंनी काव्यानंद दिला. नटवर्य गणपतराव बोडस यांनीही आपल्या पुस्तकात हिराबाईंविषयी याच साऱ्या आठवणी लिहिल्या आहेत.
हिराबाई पेडणेकर हा मराठी नाट्यसृष्टीतील असा अविष्कार होता की जो काही काळच तेजाने तळपला व नंतर प्रसिद्धीच्या झोतापासून इतका दूर गेला की, त्यांची आठवणही खूप कमी लोकांनी राखली. नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर तसेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याबरोबरच्या सहवासानंतर हिराबाईंनी कौटुंबिक, स्थैर्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील पालशेत गावच्या कृष्णाजी नारायण नेने या गृहस्थांशी घरोबा केला. कृष्णाजी नेने यांची हिराबाईंशी पहिल्यांदा ओळख १९१५ साली झाली. हिराबाई यांनी आधी `नायकिण' या अर्थाने जे आयुष्य व्यतित केले होते अशी नेने यांची जी समजूत होती त्या आयुष्याची सावली नेने यांना नको होती. त्यामुळे मागचे सर्व आयुष्य त्यागून एक साध्या राहणीची स्त्री म्हणून हिराबाईंनी आपल्याबरोबर आयुष्य व्यतित करावे अशी नेने यांनी बोलून दाखविलेली इच्छा हिराबाईंनीही मानली. नेने यांच्याबरोबर त्या सुमारे ३६ वर्षे पालशेत येथे राहात होत्या. त्यांचे गाणे, नाटक हा सर्व विसरलेला भूतकाळ झाला होता त्यांच्यासाठी. त्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत पालशेत येथेच राहात होत्या. कर्करोगाने त्यांचे पालशेत येथेच १८ ऑक्टोबर १९५१ रोजी निधन झाले. हिराबाईंच्या नंतर अकरा वर्षांनी ११ ऑक्टोबर १९६२ रोजी कृष्णाजी नेने यांचेही पालशेत येथेच निधन झाले. हिराबाई पेडणेकरांच्या आयुष्यातील घटनांनी प्रेरित होऊन वसंत कानेटकरांनी कस्तुरीमृग हे नाटक लिहिले. त्यात अंजनी ही नायिका हिराबाईंचे प्रत्यक्ष रुप आहे. ग. त्र्यं. माडखोलकरांनी व्यक्तिरेखा या आपल्या पुस्तकामध्ये हिराबाईंचे समग्र आयुष्य प्रत्ययकारी शब्दांत रेखाटले आहे. डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या आठवणी लिहिताना म्हटले आहे की, `समीक्षक वि. ह. कुलकर्णी म्हणजे, अण्णा यांच्याकडे एकदा अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे नातेवाईक आले होते. त्यांनी अण्णांना हिराबाई पेडणेकर व नेने यांचे एक छायाचित्र दिले. मी अण्णांना भेटायला आठवड्यातून एकदोनदा जात असे. एका भेटीत अण्णांनी मला ते छायाचित्र दिले. हिराबाई पेडणेकर या महत्वाच्या स्त्री नाटककार. ज्या ज्या प्रतिष्ठित लेखकांकडे त्या आपल्या नाटकाच्या प्रयोजनासाठी गेल्या त्यांनी हिराबाईना मदत करणे सोडा, पण त्यांच्या स्त्रीत्वाचा फायदा मात्र घेतला. अखेरच्या पर्वात त्या कृष्णाजी नेने नावाच्या गृहस्थांकडे राहिल्या. हिराबाईंचा वि. ह. कुलकर्णी यांना मिळालेला व त्यांनी मला दिलेले ते छायाचित्र म्हणजे महाराष्ट्रातील नाट्यसृष्टीचा एक दस्तावेज होता. मी बराच काळ ते छायाचित्र सांभाळून ठेवले. तो योग्य ठिकाणी पोचवावा असे माझ्या मनात आले. पण तो कुठे पाठवायचा हे मला माहित नव्हते. एका कार्यक्रमासाठी आकाशवाणीवर गेलो असता रवींद्र पिंगे यांच्याकडे ते छायाचित्र दिले. `पिंगे, या छायाचित्राला ऐतिहासिक महत्व आहे. तो तुम्ही योग्य ठिकाणी पाठवा,' असे सांगून त्यांच्या हवाली केला. पुढे त्या छायाचित्राचे काय झाले, ते कुठे गेले हे काही कळले नाही.'
हिराबाई पेडणेकरांच्या मृत्यूनंतर काही जणांनी पुस्तक लिहून किंवा लेख लिहून त्यांची आठवण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला; पण ते प्रयत्न क्षीण स्वरुपाचेच होते. हिराबाई पेडणेकर हयात असताना त्यांना पदोपदी उपेक्षाच सहन करावी लागली. मरणानंतरही ही उपेक्षा कायम राहिली. परंपरेने जखडलेल्या मराठी नाट्यसृष्टीरुपी मृगालाही आपल्यातल्या हिराबाई पेडणेकर नामक कस्तूरीचा कधी थांग लागला नाही...
------
हा लेख लिहिण्यासाठी वापरलेले संदर्भ -
(१) कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे आत्मवृत्त - प्रकाशक ह. वि. मोटे, प्रकाशनवर्ष - १ जून १९३५
(२) कोल्हटकर आणि हिराबाई - लेखक - प्रा. म. ल. वऱ्हाडपांडे, प्रकाशक - साहित्य सहकार प्रकाशन, प्रकाशनवर्ष - १९६९
(३) व्यक्तिरेखा - लेखक - ग. त्र्यं. माडखोलकर, नागपूर प्रकाशन, प्रकाशनवर्ष - १९४३
(४) अप्रकाशित गडकरी - प्रकाशक - ह. वि. मोटे या पुस्तकातील रोजनिशीतील पाने या भागात पान ९४ वरील २२ मे १९१६ या दिवसातील घडामोडींची राम गणेश गडकरींनी हिराबाईंबद्दल केलेली नोंद.
(५) माझी भूमिका - लेखक - गणपतराव बोडस
(६) गोमांत सौदामिनी - लेखिका - माधवी देसाई.
(७) बहुरुपी - लेखक - चिंतामणराव कोल्हटकर
(८) स्त्री नाटककारांची नाटके - लेखिका - डॉ. मधुरा कोरान्ने
(९) कहाणी कलावतीची, विराणी वारांगनेची - लेखक - कमलाकर नाडकर्णी - अनुराधा दिवाळी- २०००.
(१०) पुरुषार्थ - लेखक - पत्रकार वामन राधाकृष्ण
(११) `इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रेवोल्यूशन` - लेखक - प्रा. पराग परब
(१२) मैत्री २०१२ या ब्लॉगवरील `प्रा. वि. ह. कुळकर्णी : मिष्किल व रसिक आनंदयात्री' हा लेख - लेखक - डॉ. विठ्ठल प्रभू.
विशेष आभार- प्रा. श्रीपाद जोशी, प्रा. विजय तापस, डॉ. विठ्ठल प्रभू, नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी.
(13) या लेखासाठी संदर्भग्रंथ उपलब्ध करुन देणारी ग्रंथालये - (अ) दादर सार्वजनिक वाचनालय, दादर पश्चिम, मुंबई - हे वाचनालय व त्या वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक यांचे मनापासून आभार.
(ब) लोकमान्य सेवा संघाचे श्री. वा. फाटक वाचनालय, विलेपार्ले पूर्व, मुंबई - हे वाचनालय व त्या वाचनालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांचे मनापासून आभार.
Hello,
ReplyDeleteI'm Lina Joshi, am I talking with Mr. Sameer Paranjape??
If yes, then I would love to take more information about HIRABAI PEDNEKAR as I'm curious about her life, and want to know more for it..
linamjoshi11@gmail.com this is my e-mail ID will you please contact me..