Saturday, March 11, 2017

पेनड्राइव्हतून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा बहरला नवा प्रवाह - दै. दिव्य मराठी दि. ११ मार्च २०१७- समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. ११ मार्च २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली विशेष बातमी
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAH-MUM-news-about-encycl…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/11032017/0/4/
----
पेनड्राइव्हतून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा बहरला नवा प्रवाह
विश्वकोशाच्या २० खंडांच्या प्रयोगानंतर मिळाली चालना
- समीर परांजपे
मुंबई, दि. ११ मार्च
महाराष्ट्र राज्य मराठी िवश्वकोश निर्मिती मंडळाने बुकगंगा डॉट कॉमच्या सहकार्याने मराठी भाषा दिनी विश्वकोशाचे वीस खंड पेन ड्राइव्हमध्ये उपलब्ध करुन दिले. त्यामुळे हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध नसलेल्या राज्यातील अनेक ठिकाणच्या वाचकांना एक नवी सोय उपलब्ध झाली आहे. पेन ड्राइव्हमध्ये पुस्तके साठवून ती वाचकापर्यंत नेण्याचा एक नवा प्रवाह यानिमित्ताने सुरु झाला असून आगामी काळात त्याचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण होईल.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडे २० खंडांचा मजकूर तयार आहे. पण वीस खंडांपैकी काही खंड अद्याप पुस्तकरुपात प्रसिद्ध झालेले नाहीत. तसेच विश्वकोशाचे खंड जाडजूड असल्याने ते हाताळायलाही काहीसे अवघड होते. त्यामुळे या वीस खंडांच्या सहा सीडींचा संच मंडळाने तयार करुन घेतला होता. त्याचे वजन अवघे ४५० ग्रॅम इतके होते. तसेच या खंडांचा सर्व मजकूर https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/ या मंडळाच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. गावोगावीच्या लोकांकडे आता संगणकांची संख्या वाढत असली तरी हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध असेलच याची अजूनही खात्री नाही. त्यामुळे सीडी उपलब्ध असल्या तरी विश्वकोशाच्या वेबसाइटवर जाऊन ते खंड पाहाणे ग्रामीण भागांतील विद्यार्थी व इतर वाचकांना शक्य होत नव्हते.
यासंदर्भात बुकगंगा डॉट काॅमचे संचालक मंदार जोगळेकर यांनी सांगितले की, िवश्वकोशाच्या वीस खंडांचा मजकूर युनिकोड स्वरुपात चार जीबी क्षमतेच्या एका पेन ड्राइव्हमध्ये साठविण्यात आला असून तो वाचकाला ८०० रुपयांना देण्यात येतो. या पेन ड्राइव्हची एक वर्षाची गॅरेंटी असून तो एका वेळेस एका संगणकावर वापरता येतो. विश्वकोश मंडळाकडून ग्रंथालीमार्फत बुकगंगाला या पेनड्राइव्हचे तंत्रज्ञान विकसित करण्याचेम व वितरणाची जबाबदारी मिळाली आहे. या पेनड्राइव्हतील मजकूराची कोणी कॉपी करु नये किंवा पायरसी होऊ नये म्हणून बुकगंगाने त्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्या संगणकांमध्ये पेन ड्राइव्ह जोडण्याची तांत्रिक सोयही असते. तसेच सीडी, डीव्हीडीपेक्षा आता पेन ड्राइव्हमध्ये साठविलेल्या गोष्टी पाहाण्याकडे संगणक वापरकर्त्यांचा कल असल्याने विश्वकोशाचा प्रसार या नव्या माध्यमातून वाचकांपर्यंत अजून वेगाने होईल. भविष्यात संस्कृती कोश व अन्य प्रकाशनांची पुस्तके पेन-ड्राइव्हच्या माध्यमातून नेण्याचा बुकगंगाचा मानस आहे.
विश्वकोश साठविलेल्या पेनड्राइव्हला महाराष्ट्रातील अलिबाग, विदर्भ, कोकण, खानदेश, सांगली, सातारा व अमेरिकेतूनही मागणी आली अाहे. अलिबागमधील एका व्यक्तीने शाळेच्या मुलांकरिता विश्वकोशाचे शंभर पेनड्राइव्ह विकत घेतले आहेत. मराठवाड्यातूनही या पेनड्राइव्हबाबत विचारणा होत आहे. मराठी भाषा दिनी अनावरण झाल्यानंतर आजवर विश्वकोशाच्या सुमारे ४०० पेनड्राइव्हची विक्री झाली आहे. आपली पुस्तके अशाच प्रकारे पेनड्राइव्हतून गावोगावीच्या वाचकांपर्यंत नेता येतील का याची चाचपणी काही प्रकाशकांनीही बुकगंगा डॉट कॉमकडे केली आहे.

No comments:

Post a Comment