Tuesday, March 14, 2017

थुकरटवाडीची रंगीबेरंगी हवा... दै. दिव्य मराठीच्या १२ मार्च २०१७च्या रसिक पुरवणीत चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांची डॉ. नीलेश साबळे यांनी शब्दांनी रंगविलेली अर्कचित्रे..

 डॉ. नीलेश साबळे

 ---
 सागर कारंडे


 ---
 श्रेया बुगडे



 ---
भारत गणेशपुरे व कुशल बद्रिके
 ----
भाऊ कदम
-----
चला हवा देऊ द्या या मालिकेची यशस्वी टीम
--







दै. दिव्य मराठीच्या १२ मार्च २०१७च्या रसिक पुरवणीत चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांची डॉ. नीलेश साबळे यांनी शब्दांनी रंगविलेली अर्कचित्रे..

थुकरटवाडीची रंगीबेरंगी हवा...


शब्दांकन - समीर परांजपे

प्रथेप्रमाणे वर्षातून एकदाच होळी-रंगपंचमी साजरी होते, मात्र झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभर हास्याची धुळवड रंगत असते. डॉ. निलेश साबळेकृत या कार्यक्रमात प्रत्येक कलावंत निराळा, त्याची अिभनयाची खासियत निराळी. पण, त्यांना एका सूत्रात बांधण्याचे अवघड कार्य दर कार्यक्रमागणिक साबळे साधत असतात. डॉ. साबळेंच्या नजरेला प्रत्यक्षात हे कलावंत दिसतात तरी कसे, त्यांची कोणती स्वभाववैशिष्ट्ये त्यांना भावून जातात आणि त्यातून त्यांचे म्हणून कसे आगळे अर्कचित्र आकारास येत जाते, याचीच ही होलिकोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारी शाब्दिक गोळाबेरीज. खास ‘रसिक’च्या वाचकांसाठी...
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-rasik-team-writes-about-chala-hawa-yeu-dya-show-5548748-PHO.html?seq=1
‘चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या...डोक्याला शॉट नको, हवा येऊ द्या...हे टायटल साँग खरं तर याच नावाच्या विलक्षण लोकप्रिय मालिकेचं. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ असं काही रसिकांच्या मनात घर करून बसलंय, की त्यातील थुकरटवाडी हे गाव जणू काही आपलंच गाव आहे, असाच समस्त प्रेक्षकवर्गाचा पक्का विश्वास आहे. थुकरटवाडीतील सरपंच, त्यातील गावकरी असे सारे सारे लोक म्हणजे, मोहात पाडणारी अर्कचित्रेच आहेत.. ती शब्दांच्या माध्यमातून चितारली डॉ. निलेश साबळे याने. तोच तर या थुकरटवाडीचा खरा कर्ताधर्ता आहे. तोच या वाडीचा, त्यातील वाडीकरांचा खरा दिशादर्शक आहे. त्यामुळे एकदा का भट्टी जमली की, विनोदाचे चौकार, षटकार हाणले जातात ते याच थुकरटवाडीतून. मैदानातला रसिक मग जल्लोश करतो, त्यातल्या एकेक अदांवर. भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे असे एकेक कसलेले खे‌ळाडू आणि त्यांचा कर्णधार निलेश असे मिळून जो काही धुमधडाका लावतात, त्याचे नाव ते. हा सगळा सामना जिथे नेहमी रंगतो ती जागा म्हणजे, मुंबईच्या वेशीवरच्या मीरारोड उपनगरातला एक स्टुडिओ. तिथे अवतरलेल्या थुकरटवाडीत ‘दिव्य मराठी’ जाऊन पोहोचला तेव्हा लगबग सुरू होती, होळीनिमित्त सादर होणाऱ्या रंगीबेरंगी विशेष कार्यक्रमाची. सेटच्या आजूबाजूच्या खोल्या एकदम फुल होत्या. प्रत्येक कलाकारासाठी राखीव खोली. तिच्या दारावर या कलाकाराचे नाव डकवलेली कागदी पट्टी. एका खोलीतून एखादा असिस्टंट हातातून विविध प्रकारचे विग घेऊन दुसऱ्या खोलीत जातोय... तर कपडेपटवाला शूटिंगसाठी लागणाऱ्या कपड्यांना इमानेइतबारे ‘इस्तारी’ करतोय. तर बाकीचे असिस्टंट सारखे काही ना काही कामात गुंतलेले. अशी सगळी धावपळ-पळापळ सुरू असताना अचानक एका खोलीतून भाऊ कदम बाहेर आला. इथे-तिथे डोकावून पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने भारत गणेशपुरे आपल्या वऱ्हाडी बोलीत कोणाला तरी काही सूचना देऊन घाईघाईने सेटच्या दिशेने मार्गस्थ झाला. पण श्रेया बुगडे मात्र अभ्यासू मुलीसारखी आपल्या खोलीत संवाद पाठ करत बसलेली. थुकरटवाडीची चावडी अजून फुलायची होती. पण त्यातील सगळ्याच गावकऱ्यांचे लक्ष होते, स्टुडिओतील एका खोलीकडे... ती खोली होती, निलेश साबळेची. नुकताच एका आजारातून बरा झालेला निलेश पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागल्याचे सेटवर दिसतच होते. पण दुसरीही गोष्ट जाणवत होती. जगात सगळीकडे डॉक्टर इतरांची काळजी घेतात, इथे इतर लोक एका डॉक्टरची मनापासून काळजी घेत होते...
१८ ऑगस्ट २०१४ रोजी ‘चला हवा येऊ द्या’चे प्रसारण सुरू झाले. ‘फू बाई फू’च्या यशानंतर निलेश साकारत असलेला हा दुसरा कार्यक्रम. कार्यक्रमाचा आत्मा फक्त आणि फक्त निखळ विनोदाचा. यात सादरीकरण करण्याआधी काही तालमी होतातच, पण जास्त भर उत्स्फूर्ततेवरच. लेखी स्क्रीप्टपेक्षा अलिखित हावभावांचे महत्त्व अधिक. त्यामुळे पहिल्या काही भागांनंतर या कार्यक्रमाने कधीच मागे वळून बघितले नाही. आतापर्यंत ‘हवा’चे २७८ भाग प्रक्षेपित झालेत. हा म्हटला तर सुखद चमत्कारच.
असे सगळे मनात साठवत निलेश साबळेला आम्ही गाठले. हेतू हा की, ‘रसिक’च्या होळी विशेषांकासाठी थुकरटवाडीत धमाल उडवणाऱ्यांची शाब्दिक अर्कचित्रे त्यांनी रंगवावी. मग काय, ‘चला हवा येऊ द्या’चा एकेक मोहरा... त्यांच्या गमतीजमती, आठवणी, अभिनयाच्या लकबी याबद्दल निलेश भरभरून बोलला आणि त्यातूनच आकारास येत गेली, ‘चला हवा येऊ द्या’ची कुणाच्याही नजरेस न पडणारी अर्कचित्रात्मक दुनिया...
--------------
झोपाळू भाऊ अभिनयाला जागतो!
भाऊची रात्रीची झोप नीट झालेली असली तर सकाळी भाऊ एकदम फ्रेश असतो. मग दिवसभर तो अभिनयाचे असे लाजवाब फटके मारतो की, एखाद्या ग्रेट बॅट‌्समनशीच त्याची तुलना होईल. पण जेव्हा कधी अशी बिकट स्थिती असेल,  त्या दिवशी तो स्टुडिअोत सेटला लागून एखाद्या खोलीत जाऊन तास-दोन तास तरी झोप काढतोच काढतो...
रंगाने सावळा, चेहऱ्यावर निष्पाप भाव असलेला भालचंद्र उर्फ भाऊ कदम भूमिका साकारायला उभा राहिला, की टाळ्यांचा कडकडाट हा ठरलेलाच. पण हा भाऊ प्रचंड विसराळू आहे. भाऊची रात्रीची झोप नीट झालेली असली तर सकाळी भाऊ एकदम फ्रेश असतो. मग दिवसभर तो अभिनयाचे असे लाजवाब फटके मारतो की, एखाद्या ग्रेट बॅट्समनशीच त्याची तुलना होईल. पण जर त्याची झोप झाली नसेल, तर मग भाऊचा हाच उत्साह कुठे गायब होतो माहीत नाही. जेव्हा कधी अशी बिकट स्थिती असेल, त्या दिवशी तो स्टुडिअोत सेटला लागून एखाद्या खोलीत जाऊन तास-दोन तास तरी झोप काढतोच काढतो. त्यामुळे बराच वेळ तो दिसला नाही की समजायचे, भाऊ झोपी गेलेला आहे. अशीच एक दिवस गंमत करायची म्हणून आम्ही त्याला अजिबात झोपू दिले नाही. काही ना काही कारण काढून जागे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पठ्ठा निर्धाराचा पक्का. त्याने कोणीही हुडकून काढू नये, म्हणून आमच्या नकळत जागा बदलली. सेटच्या पाठी अंधाऱ्या जागेत ठेवलेल्या एका टेबलावर भाऊ ढाराढूर झोपी गेला. इतर वेळी हा झोपप्रिय भाऊ एखाद्या माणसाला समोर बसवून त्याला सलग अर्धा तास हसवत ठेवू शकतो. सोप्पे नाही हे. त्याची विनोदाची कपॅसिटी प्रचंड आहे. मी तुम्हाला सांगतो, थुकरटवाडीतले आमचे सगळे कलाकार वाटतात प्रथमदर्शनी लोककलाकार, पण इंग्रजी कॉमेडीच्या पुढेही जायची त्यांची ताकद आहे.
भाऊने १९९१मध्ये अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली. नाटकांतून तो पुढे आला. ‘फू बाई फू’मधून भाऊला मिळाली खरी ओळख... भाऊ तसा साधा सरळ अभिनय करणारा इसम. त्याला विनोदी भूमिका कशा जमतील, असा प्रश्न तेव्हा अनेकांच्या मनात असायचा. पण भाऊच्या अभिनयक्षमतेवर गाढा विश्वास होता माझा. म्हणूनच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा त्यात भाऊ पाहिजेच, ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती. भाऊचे वैशिष्ट्य हे की, त्याला दोन ओळींच्या मध्ये अभिप्रेत असलेला विनोद बरोबर कळतो. हे जे ‘बिटविन द लाइन’ आहे, ते भाऊने जास्तीत जास्त पडद्यावर साकारावे, म्हणून माझे प्रयत्न असतात. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावातून तो विनोद विलक्षण बोलका करतो. त्यामुळे दोन ओळींतील विनोद पकडू शकेल, असेच संवाद मी भाऊसाठी लिहितो. ती फार मोठी मोठी वाक्य नसतात. एखादे वाक्य संपले की, पुढे कंसात आता भाऊ अमुक अमुक पात्राकडे नुसते बघतो, असे मी लिहून ठेवतो. ते वाचून भाऊला बरोबर कळते, की त्या जागी आपल्याला नेमके काय करायचे आहे ते. अगदी खरं सांगायचं, तर ‘चला हवा येऊ द्या’मधील सर्व कलाकारांत मला भाऊ कदमचा अभिनय अधिक भावतो. कोणत्याही भागाचे एडिटिंग करताना भाऊच्या भूमिकेचा भाग मी पुन:पुन्हा रिवाइंड करून बघतो, त्याच्या विनोदाची मजा लुटतो. विनोदी कलाकार म्हणून भाऊला ‘चला हवा येऊ द्या’ने उदंड प्रसिद्ध केले, हे जगाला ठाऊक आहे; पण सेटवर वावरतानाही भाऊच्या वागण्यातून विनोद होतात, हे आमचे आम्हीच जाणतो...
----------------
हास्याचे 'कुशल'-'भारत' अभियान...
‘चला हवा येऊ द्या’मधील कोणत्या कलाकारात खऱ्या अर्थाने लहान मूल दडलेले आहे, असा सर्व्हे झालाच तर उत्तर एकच येईल, कुशल बद्रिके! आणि समोरच्या कलावंताकडून लाफ्टर नाही आला की, जाम टेन्शनमध्ये येऊन पाय फैलावून उभा राहतो तो म्हणजे भारत गणेशपुरे. दोघांचे दोन ढंग,
दोन तऱ्हा...
‘चला हवा येऊ द्या’मधील कोणत्या कलाकारात खऱ्या अर्थाने लहान मूल दडलेले आहे, असा सर्व्हे झालाच तर उत्तर एकच येईल, कुशल बद्रिके! कुशल बद्रिके!! कुशल बद्रिके!!! कुशलला शारीर हावभावांतून विनोदनिर्मिती करणे उत्तम जमते. तेही अभिनयाचा आब व रुबाब राखून. पण तो आहे प्रचंड धसमुसळ्या. पाठीच्या दुखण्यातून बरा झालाय नुकताच; पण तरीही सतत धडपडत राहील, छोटे छोटे फ्रॅक्चर करून घेत राहील, याची फुल गॅरंटी. कुशलला विनोद कुठून नि कसा बाहेर काढावा, हे नीट कळते. आता हा एक प्रसंग बघा. एका कार्यक्रमात गायक आदर्श शिंदेला बोलावले होते. अँकरिंग करताना माझ्या लक्षात आले की, आदर्शसारखाच साधारण दिसणारा एक जण प्रेक्षकांत बसलेला आहे. त्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून प्रेक्षकांत बसलेल्या कुशलला स्टेजवरूनच खुणेने ते सांगितले. तसेच दाढीवर हात फिरवल्यासारखे हावभावही केले. त्यावरून लगेच मला काय म्हणायचे आहे, ते कुशलला कळले. त्या प्रेक्षकाला तो लगोलग मेकअपरुपमध्ये घेऊन गेला. आदर्शसारखे कपडे त्याला कपडेपटातून मिळवून घालायला लावले. दाढी पेन्सिलीने रंगवली. आणि मग शूटिंग सुरू असतानाच एका क्षणी येऊन हात दाखवून ‘ऑल इज रेडी’ असा इशारा मला केला. मी तत्काळ आदर्श शिंदेला सांगितले की, आम्हाला असे कळलेय की, इथे अजून एक आदर्श शिंदे आहेत. त्या वेळी त्या प्रेक्षकाला आम्ही स्टेजवर आणले. त्याला पाहून आदर्श शिंदे अवाकच झाला. त्याला विश्वासच बसेना, की ही सगळी आयत्या वेळची तयारी आहे म्हणून... कुशल हा असा आहे. मला काय हवे, ते त्याला बरोबर कळते. नजरेचा इशारा तो उत्तम जाणतो.  कुशल बद्रिकेची ही तऱ्हा, तर आमच्यातला सिनिअर अभिनेता भारत गणेशपुरेचा अभिनय ही दुसरी तऱ्हा. म्हणजे काय तर, एखाद्या प्रसंगाला सुरुवात झाली आणि त्यात भारतच्या पहिल्या काही संवादांना समोरच्या कलाकाराने योग्य दाद दिली नाही, लाफ्टर आला नाही, की भारतला जाम टेन्शन येेते. आपण जे करतोय ते समोरच्यापर्यंत बरोबर पोहोचते का? हा विचार त्याला सतावू लागतो. मग भारत पाय फैलावून उभा राहतो. तसे दिसले की ओळखू येते की, तो आता सॉल्लिड टेन्शनमध्ये आहे. अगदी ‘फू बाई फू’पासून भारत माझ्याबरोबर काम करतोय. त्याच्या भूमिकेचे संवाद लिहून देताना कधी पल्लेदार वाक्य असली तरी भारत पाठांतराला एकदम बाप आहे. तो ती वाक्ये वाचून काही मिनिटांतच मनात घोळवतो आणि भूमिकेत आरपार शिरतो. मी त्याला लेखकाचा फेवरिट नट म्हणतो.
आपल्या वऱ्हाडी बोलीने तो थुकरटवाडीचा अख्खा माहोलच बदलून टाकतो. उत्स्फूर्त विनोदाची जाण असली तरीही त्याचा तो अतिरेक नाही करत. हीच त्याची दर वेळी खासियत ठरते...
----
रेयाला नाही उपमा आणि सागरला नाही मर्यादा...
श्रेयाला विनोदाचा अफलातून सेन्स आहे. मी तिला एकही संवाद लिहून दिलेला नसतो. फक्त त्या भूमिकेत मला काय अपेक्षित आहे, हे मी थोडक्यात लिहिलेले असते. श्रेया जितकी भन्नाट आहे, तितकाच सागर कारंडेही अफलातून अवलिया आहे. कोणतीही भूमिका हिडीस दिसता कामा नये, असे एक दिग्दर्शक म्हणून माझे मत आहे. या मताचा तो पुरेपूर आदर करतो...
‘अब मै आपसे एक प्रश्न पुछती हूँ’ असे इंग्रजा‌‌ळलेल्या हिंदीत समोरच्या माणसाला मोठ्ठाल्या आवाजात धारेवर धरणारी महिला पत्रकार दिसली की, ‘चला हवा येऊ द्या’चे प्रेक्षक म्हणतात की, आली आली, बरखा दत्त आली. ती ओरिजिनल बरखा दत्त असणे शक्य नसतेच, पण ती असते श्रेया बुगडे. मी म्हणतो, विनोदाची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्री तशा कमीच आढळतात, पण श्रेयाला विनोदाचा अफलातून सेन्स आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये ती ज्या ज्या भूमिका करते, त्यांचे वैशिष्ट्य काय माहितीये? मी तिला एकही संवाद लिहून दिलेला नसतो. फक्त त्या भूमिकेत मला काय अपेक्षित आहे, हे मी थोडक्यात लिहिलेले असते. ती ते वाचते. स्वत:चे संवाद स्वत:च तयार करते. ते उत्स्फूर्त असतात. पण ते कथानकात चपखलपणे सामावूनही जातात. तिचा हा आग्रह कधीच नसतो की, मला छान छान दिसायचे आहे वगैरे. जी भूमिका येईल ती उत्तमपणे करणे, हे तिचे वैशिष्ट्य. आता ती अधूनमधून महिला पत्रकाराची भूमिका साकारते ती ज्या कुणा व्यक्तीचे निरीक्षण करून तिने बेतली आहे, ते सारे अफलातूनच आहे. म्हणजे, ती जी कोण मूळ महिला पत्रकार आहे, तिच्या बोलण्याचे, हावभावांचे बेअरिंग अचूक पकडून तिचा भास आपल्या भूमिकेतून उभा करणे सोपे नसते. त्यामुळे श्रेयाला तिच्या उत्तम अभिनयाचे श्रेय द्यायलाच हवे.
----
अफलातून अवलिया :
सागर कारंडे
हे झालं श्रेयाचं. ती जितकी भन्नाट आहे, तितकाच सागर कारंडेही अफलातून अवलिया आहे. माझ्या मते, सागर कारंडे हा उत्तम नकलाकार आहे. बऱ्याचदा कलाकार कोणत्याही कार्यक्रमात नकला करायला तयार होत नाहीत. कारण मग त्याच्या स्वत:च्या अभिनयापेक्षा लोक त्याला इतरांची नक्कल करण्याची फर्माईश करतात. त्यात आपली ओळख हरविण्याचा धोका कोणत्याही कलाकाराला वाटणे साहजिक आहे. पण सागर कारंडेला असे अडथळे थांबवू शकत नाहीत. नकला करणे, हे त्याला बिनमहत्त्वाचे वाटत नाही. उत्स्फूर्त कविता करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यातील एका नेत्याची सागर कारंडे करत असलेली नक्कल विलक्षण लोकप्रिय आहे. नकला करणे ही पण खायची गोष्ट नाही. त्यासाठी जबरदस्त निरीक्षणशक्ती लागते. ती सागरकडे आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या एकेकाळी लोकप्रिय झालेल्या मराठी सिनेमामध्ये साडी नेसलेली दोन पुरुष पात्र आहेत. अनेक नाटकांत पुरुष स्त्री भूमिका करताना आढळतात. पण सागर कारंडेला जेव्हा प्रथम साडी नेसवून भूमिका करण्यास सांगितले तेव्हा ती कशी साकार होईल, याबद्दल तो स्वत:च साशंक होता. पण जसजसा त्याच्या स्त्री भूमिकेला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद द्यायला सुुरुवात केली, तसतसा त्याचाही आत्मविश्वास बळावला. तो स्त्री भूमिका करताना खूप काळजी घेतो. त्याची भूमिका पातळी सोडून कधीच वाहवत गेली नाही. साडीमध्ये तो स्वत:ला चांगले कॅरी करतो, तसेच दिसतोही चांगला. कोणतीही भूमिका हिडीस दिसता कामा नये, असे एक दिग्दर्शक म्हणून माझे मत आहे. या मताचा तो पुरेपूर आदर करतो.  जोडीला सागर जेव्हा पोस्टमन बनून येतो आणि ख्यातनाम व्यक्तीला उद्देशून अरविंद जगतापने लिहिलेले पत्र वाचतो, त्या क्षणी तो जमलेल्या समस्त प्रेक्षकांना अक्षरश: हेलावून टाकतो. आता खरे तर दोन वर्षांहून अधिक काळ झाला. या कार्यक्रमांतील पात्रांचा लोकांचा कंटाळा यायला हवा होता; पण तसे होताना दिसत नाही. याचा अर्थ, आम्ही त्यातील ताजेपणा टिकविण्यात यशस्वी झालो आहोत, असाच तर असतो...
---
 झपाटलेला निलेश
निलेश एकदम हाडाचा दिग्दर्शक. त्याला बरोबर माहीत असते, कोणत्या कलाकाराला काय द्यायचे, पडद्यावर काय साकारायला सांगायचे ते... प्रचंड कामसू असलेल्या निलेशला सतत काही वेगळे सुचत असते. एकदा मनात संकल्पना आली की, ती कधी पडद्यावर साकारतोय, असे त्याला होऊन जाते. तो जेव्हा कधी शूटिंगला बोलावतो, आम्ही हजर असतो तिथे. तो कामाने झपाटलेला गृहस्थ आहे. त्याला दिग्दर्शन, एडिटिंग असे सगळेच करायचे असते. अशा वेळी प्रकृतीकडेही लक्ष देत नाही तो फारसे...
- भारत गणेशपुरे

No comments:

Post a Comment