Sunday, July 31, 2016

निरुप्पुडा! निरुप्पुडा!! (रजनीकांत - कबालीवरील माझा लेख), दै. दिव्य मराठी ३० जुलै २०१६, रसिक पुरवणी



सुपरस्टार रजनीकांत याचा कबाली हा चित्रपट झळकला त्या पहिल्या दिवशी मुंबईतील अरोरा टॉकिज येथे सकाळचा सहाचा शो पाहून मी तेथील वातावरणावर एक लेख दै. दिव्य मराठीच्या ३१ जुलै २०१६च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत लिहिला. त्या लेखाची टेक्स्ट, वेबपेज व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/31072016/0/6/
----
स्लग : टॉक ऑफ द टाऊन
------------------
हेडिंंग : निरुप्पुडा! निरुप्पुडा!!
------------------
बायलाइन : समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
------------------
इंट्रो : चमत्काराचे सगळे पेटंट बहुधा एकट्या रजनीकांतच्या नावावर जमा आहेत. म्हणूनच १००-२०० कोटींच्या कमाईसाठी बॉलीवूड धडपडत असताना पहिल्या चार दिवसांतच बहुचर्चित ‘कबाली’ने तब्बल ४०० कोटींची कमाई केली...या चमत्कारापुढे दिपून जाऊनच कदाचित विधानसभा अधिवेशन काळात रजनीकांतला महाराष्ट्रभूषण हा मानाचा पुरस्कार देण्याची मागणी पुढे आली...पाठोपाठ भारतरत्नचा आग्रह लावून धरला गेला... खरं तर "कबाली' प्रदर्शित होऊन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय, तरी "रजनीमॅनिया' ओसरायचं काही नाव घेईना... पण प्रत्यक्षातलं रजनीवेड असतं तरी कसं, याचा पहाटेच्या शोला हजेरी लावून टिपलेला हा सांग्रसंगीत इितवृत्तांत...
------------------
ब्लर्ब : बाल्कनीतला प्रेक्षक हा स्टाॅलच्या प्रेक्षकापेक्षा अधिक महागडे कपडे घालणारा, उंची मोबाइल वापरणारा, आपापल्या गाड्यांतून आलेला आहे, हे स्पष्टपणे डोळ्यांना िदसत होते. पण थलैवाच्या अॅक्शनला आणि संवादांना दाद देताना हे स्टाॅल, बाल्कनीचे झंजटच मिटले होते...
------------------
मुंबईतील माटुंगा पूर्व येथे द्रुतगती महामार्गाच्या वाटेतच एका गोलात वसलेलं महेश्वरी उद्यान... या उद्यानाहून थोडे पुढे गेले की, शीवच्या दिशेने उजव्या अंगाला आहे, सिंगलस्क्रीन अरोरा सिनेमा. नाव ‘अरोरा’ पण इथे मक्तेदारी दाक्षिणात्य चित्रपटांची. पहाटे तीन वाजल्यापासून या ‘अरोरा’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाक्षिणात्य वाद्ये धुमधडाक्यात वाजवली जात होती... उत्साही तरुणांचा घोळका जिवाची कुर्वंडी करून नाचत होता... अंतराअंतराने दणक्यात फटाके फुटत होते...सोबत रोशणाई... फटाके... जणू दोन महिने आधीच दिवाळी आली होती... मध्येच कोणीतरी आरोळी ठोकायचा... थलैवा, थलैवा... मग तरुणांचा घोळकाही चित्कारायचा, थलैवा... थलैवा... ‘थलैवा’ या तामीळ शब्दाचा अर्थ आहे नेता, महानायक... गेल्या तीन दशकांपासून हा शब्द तामिळींसह सारे दाक्षिणात्य प्रजानन एकाच व्यक्तीसाठी वापरतात आणि तो म्हणजे, नन अदर दॅन रजनीकांत... द बाॅस...!
रजनीकांतचा बहुप्रतीक्षित ‘कबाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्या पहाटेचे हे आख्यान. अरोरा टॉकीजच्या मुख्य प्रवेशद्वारावर डाव्या हाताला ‘कबाली’मधील सुटाबुटातल्या रजनीकांतचा तब्बल ५५ फुटी कटआऊट‌ लावलेला... त्या भव्य कटआऊटला सॉलीड लायटिंग केलेली... त्यावरून सकाळी पाच वाजता एका चाहत्याने पुष्पवृष्टी केली. तशी प्रवेशद्वारासमोर बेभान नाचणाऱ्या चाहत्यांच्या डोक्यात ही फुले पडली... त्यांनाही धन्य वाटले. एकाने या या कटआऊटला साष्टांग नमस्कार केला. ‘जय थलैवा’, ‘निरुप्पुडा’ (हे कबालीतलं गाजलेलं गाणं. निरुप्पुडा याचा अर्थ, आग) असे जवळजवळ ओरडतच त्याने त्या कटआऊटसमोर सोबत आणलेला नारळ फोडला. त्यातील पाणी कटआऊटच्या चारी अंगाला फेरून, मग नारळाचा नैवेद्य दाखविला. कटआऊटला निरांजनाने ओवाळले... आपल्या भक्ताची ही निर्मम भक्ती पाहून कटआऊटरूपी तो रजनीकांत देव प्रसन्न झालेला, तिथे उपस्थित असलेल्या साऱ्यांनाच जाणवला बहुतेक. त्यामुळेच की काय, दाक्षिणात्य वाद्यांचे आवाज अधिकच दणक्यात घुमू लागले... लोकही नाचता नाचता घुमू लागले, रजनीकांतच्या प्रेमात...
रजनीकांतवर त्याच्या चाहत्यांचे जे प्रेम आहे, ते काही वेळेस वेडाच्या सीमारेषेला स्पर्श करून येते. दाक्षिणात्य संस्कृतीत सारेच भडक... कपड्याचे रंगही, वागण्याची तऱ्हाही आणि चित्रपटही... पण त्यातही एक लोभस आक्रस्ताळेपणा भरलेला असतो, त्यांच्या जगण्यात. ‘कबाली’चा पहिला खेळ बघायला आलेले जे सात-आठशे चाहते होते, ते असेच भडक रंगात न्हालेले... रामुलू नावाचा प्रेक्षक त्यातलाच एक. त्या दिवशी सकाळच्या सहाच्या खेळाचे काढलेले तिकीट तो सर्वांना दाखवत होता. तो म्हणाला, ‘मी मूळचा तामीळनाडूचा. शिर्डीत कामाला असतो. थलैवाचा कबाली बघायचाच, म्हणून खास शिर्डीहून आलोय मुंबईत. आज सहाचा खेळ बघणार, मग नऊचा, मग बाराचा... तीन खेळ लागोपाठ बघितले की, माझे कान, डोळे तृप्त! हवा तेवढा रजनीकांत मनात साठवून घेणार... आणि पुन्हा शिर्डीत माझ्या कामावर हजर होणार... आज खास सुट्टीच काढलीये...’ तो हे बोलत असतानाचा त्याचा मित्र रामकृष्णन तिथे आला... त्या दोघांचेही तामीळमध्ये काही बोलणे झाले. तो मित्रही मग तिन्ही खेळांची तिकिटे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवू लागला...
पण हेच कशाला, ‘अरोरा’बाहेर त्या िदवशी पहाटे तीनपासूनच रजनीकांतप्रेमींची लगबग सुरू होती. त्यातील अतिउत्साही प्राण्यांनी एका फ्लेक्सवर मधोमध रजनीकांतला विराजमान करून त्याच्या भोवती आपल्या छायाचित्रांची रांगोळी काढली होती. त्यावर ‘वेलकम रजनीकांत अँड हिज फॅन्स’ असे लिहिलेले होते. काही फ्लेक्स जरा वेगळे होते. फॅन्सच्या जागी धारावी भागातील तामीळ संघटनांच्या स्थानिक नेत्यांची नावे व फोटो त्या फ्लेक्सवर होते. त्यांनीही रजनीकांत व चाहत्यांना वेलकम केलेले होते. रजनीकांतचा चित्रपट बघायला जाणे म्हणजे, सत्यनारायणाच्या पूजेसारखा किंवा एखाद्या देवाच्या उत्सव-महोत्सवासारखा माहोल करून टाकला होता या फॅन मंडळींनी... मराठी, हिंदी चित्रपट पाहायला येणाऱ्यांना हे सारे वातावरण अगदीच नवीन...त्यामुळे काही जण नाक मुरडत होते, तर काही जण नाक खुपसत होते.
अखेर पावणेसहा वाजता अरोराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील लोखंडी जाळी हलली आणि बाहेर इतका वेळ दबा धरून बसलेला थलैवाप्रेमी जमाव तीराच्या वेगाने आतमध्ये शिरला. ज्याच्याकडे त्या खेळाचे तिकीट होते, तो प्रत्येक जण दहा एक मिनिटांत आपापल्या जागेवर चित्रपटगृहात स्थिर झाला. माहोल इतका भारावलेला की, मीडियाच्या प्रतिनिधींनाही ‘अरोरा’च्या व्यवस्थापनाने सहाच्या खेळाला चित्रपटगृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला... सहा वाजायला काही सेकंदच उरले होते... आतापर्यंत फक्त पांढराफटक असलेला समोरचा पडदा विविध रंगांनी उजळू लागला. चित्रपटाची श्रेयनामावली सुरू झाली... तामीळ चित्रपट पाहात होतो... पडद्यावर काय अक्षरे व संवाद उमटतात, काहीच कळत नव्हते. पण श्रेयनामावलीत रजनीकांतचे नाव आल्यावर प्रेक्षकांनी त्याच्या नावाने जो गिल्ला केला, त्याला तोड नव्हती. श्रेयनामावली संपली... मलेशियाच्या तुरुंगातून सुटका झालेला माफिया म्हणजे, रजनीकांत पडद्यावर अवतरण्याचा तो क्षण जवळ आला... आधी तो पाठमोरा दिसला, मग त्याचे हात, मग त्याच्या चेहऱ्याचा थोडासाच भाग... आणि हा हा म्हणता अख्खा रजनीकांत पडद्यावर अवतरला... आणि चित्रपटगृहामधल्या वेड्यापिशा प्रेक्षकांमध्ये जो उन्माद संचारला, तो अवर्णनीय होता... टाळ्या, शिट्ट्यांनी चित्रपटगृह दणाणून गेले... रजनीकांतने पहिला संवाद म्हणताच पुन्हा जोरजोरात शिट्ट्या. ही अशी शिट्ट्याबिट्ट्यांची उधळण पिटातील प्रेक्षकांची मक्तेदारी, असे आम्हा पामरांना वाटत होते... पण रजनीकांतचे सगळेच निराळे... त्याचा पिटातील (पक्षी : स्टॉलमधील) व बाल्कनीतील प्रेक्षक फक्त तिथल्या खुर्चीत बसतो म्हणून तो त्या श्रेणीतला प्रेक्षक म्हणायचे, बाकी या प्रेक्षकाची प्रतवारी एकच ती म्हणजे, रजनीवेडे... बाल्कनीतला प्रेक्षक हा स्टाॅलच्या प्रेक्षकापेक्षा अधिक महागडे कपडे घालणारा, उंची मोबाइल वापरणारा, आपापल्या गाड्यांतून आलेला आहे, हे स्पष्टपणे डोळ्यांना िदसत होते. पण थलैवाच्या अॅक्शनला आणि संवादांना दाद देताना हे स्टॅाल, बाल्कनीचे झंजटच मिटले होते... या प्रेक्षकांत महिलावर्गही लक्षणीय संख्येने होता, तेही सकाळी सहाच्या शोला. मुंबईमधील चित्रपटखेळांच्या माहोलमध्ये हे चित्र आक्रित वाटावे असेच...
अरोरा हे मुंबईत दाक्षिणात्य चित्रपट झळकण्याचे माहेरघर... या चित्रपटगृहाची इमारत जुनीपुराणी... इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या दुकानांची अवस्था न्यायालयीन खटल्यांमुळे जीर्णशीर्ण झालेली... पण ‘कबाली’ लागणार म्हटल्यावर चित्रपटगृहाच्या आतील भिंतीवर रंगांचे दोन हात फिरले, मोडक्या आसनांची डागडुगी झाली... स्क्रीन नवीन बसविण्यात आला... इतके दिवस दुर्लक्षित असलेली म्हातारी, तिला लॉटरी लागताच घरातल्या सगळ्यांची लाडकी व्हावी, तसे झाले अगदी ‘अरोरा’चे. ‘कबाली’चा सकाळी सहाचा खेळ सुरू असताना पडद्याच्या पुढे जी थोडी मोकळी जागा असते, तिथेच डाव्या अंगाला कोपऱ्यात एक साठीचा गृहस्थ प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसला होता. कोणीतरी खास असावा. त्याला चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांपैकी कोणी मध्येच चहा आणून देत होते, तर कोणी समोसा... उत्सुकतेने पुढे जाऊन विचारले की, तुम्ही चित्रपटगृहाच्या मालकांपैकी आहात का? ते गृहस्थ ‘नाही’ म्हणाले. ते एवढेच म्हणाले, “मी डिस्ट्रिब्युटर आहे...’
त्यांना विचारले की, ‘कबाली कसा वाटतोय?’
ते म्हणाले, ‘पैसा वसूल’...
वितरक असो वा प्रेक्षक, रजनीकांतच्या बहुतेक चित्रपटांना तो हेच म्हणतो... पैसा वसूल...!!!
तीन तासांचा तो चित्तचक्षुचमत्कारिक रजनीखेळ पाहून बाहेर आल्यानंतर ‘अरोरा’च्या बाहेर पहाटे पाचला पाहिली होती तशीच गर्दी नऊच्या खेळाला जमलेली दिसली. सहाचा खेळ पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांपैकी एकेकाला धरून प्रतिक्रियेच्या विटेवर उभे करण्याची घाई न्यूज चॅनेल, न्यूज वेबसाइट व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना लागलेली दिसली. त्या गर्दीतून वाट काढत चित्रपटगृहाबाहेर येत असतानाच अरोराचे मालक नंबीराजू भेटले. इतर वेळेला तुळतुळीत दाढी केलेले हे गृहस्थ त्या दिवशी ‘कबाली’मध्ये सुटाबुटातला पांढरी दाढीधारी रजनीकांत जसा दिसतो, अगदी तशा वेषात चित्रपटगृहात हजर होते... शहाणा वेडा म्हणतात तो हाच... येत्या दोन आठवड्यांचे सारे शो फुल आहेत, असे ते खूप अभिमानाने सांगत होते...
नंबी राजन सांगत होते, ‘रजनीकांत ज्या स्टाइलने डायलॉग म्हणतो, ज्या वेगाने-आवेगाने अभिनय करून शत्रूला चारीमुंड्या चीत करतो, ते प्रेक्षकांना भावतेच; पण रजनीकांतचा सोशल कनेक्ट जबरदस्त आहे. प्रेक्षकांशी त्याची नाळ इतकी घट्ट जुळली आहे की, ते त्याला देवच मानतात. म्हणून तर त्याच्या कटआऊटवर दुधाचा अभिषेक होतो, त्याची आरती केली जाते... त्याची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा प्रेक्षकांनीच निर्माण केली व त्यांनीच ती जपून ठेवली. अख्ख्या ‘कबाली’ चित्रपटात तू एक तरी असे दृश्य बघितलेस का की, रजनीकांतला दुसऱ्या खलनायकाने थोबाडीत मारली आहे किंवा जीवघेणी मारहाण केली आहे... असे एक जरी दृश्य चित्रपटात दिसले ना तर रजनीकांतला मारणाऱ्या कलावंताला प्रेक्षक वास्तवात इतका बुकलतील की, तो खलनायक पुन्हा चित्रपटात काम करूच शकणार नाही.’
‘रजनीकांतचा एखादा चित्रपट तोट्यात गेला तर तो आपल्या मानधनात कपात करून ती उरलेली रक्कम त्या चित्रपटाच्या वितरकाला देतो व जगवतो. अनेकांच्या लग्न, घरच्या इतर कार्यांमध्ये रजनीकांतकडून गाजावाजा न करता मदत पोहोचती झालेली असते. आपल्या ६५ वर्षांच्या आयुष्यात रजनीकांतने अशी हजारो, लाखो घरे जोडली, म्हणूनच तो अशा सुपरसुपरस्टारपदी विराजमान झालाय की ते स्थान अढळच आहे.’ नंबी राजन यांना किती सांगू, किती नको, असे होत होते...
सकाळी सहाच्या खेळाला उपस्थित राहून निघालो. नंतर दिवसभर बातम्या येतच राहिल्या की, प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकरही ‘अरोरा’मध्ये कबाली बघून गेला वगैरे वगैरे...वस्तुत: ‘कबाली’ची पटकथा ही कोणत्याही सर्वसामान्य मारधाडपटासारखीच. रजनीकांतचा अभिनयही चालू कॅटॅगरीतला... पण तरीही ‘अरोरा’मध्ये रजनीकांत जो काही दशांगुळे वर उरलेला बघायला मिळाला त्याला अक्षरश: तोड नव्हती...
--------------

No comments:

Post a Comment