Tuesday, July 12, 2016

हवामान बदलाचा फटका - दै. दिव्य मराठीच्या १२ जुलै २०१६च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख



दै. दिव्य मराठीच्या १२ जुलै २०१६च्या अंकात संपादकीय पानवर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची टेक्स्ट व वेबपेज लिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/12072016/0/6/
---
हवामान बदलाचा फटका
---
- समीर परांजपे
----- 
नैसर्गिक व मानवी कारणांमुळे हवामानात झालेले बदल व ग्लोबल वॉर्मिंग या दोन्ही गोष्टींचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील जीवसृष्टीवर होणे अटळच आहे. हवामानात झालेल्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवतात, त्याबरोबरच अनेक रोगांचा फैलावही होत असतो. जगभरात मलेरिया, डायरिया तसेच भयंकर उष्म्यामुळे निर्माण होणारे विकार यांनी ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय झाली आहे. हवामानातील बदलामुळे २०३० सालापर्यंत जगभरात बळी पडणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी अडीच लाखांनी वाढ होत जाईल, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. भारतालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे. हवामान बदलामुळे भारतात नेमकी काय परिस्थिती उद््भवेल याचा स्वतंत्रपणे अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने केला होता. त्यानुसार २०५० या वर्षी भारतात हवामान बदलामुळे सुमारे १ लाख ३० हजार लोक मरण पावतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबद्दलचा लेख “लॅन्सेट’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैद्यकीय नियतकालिकामध्ये या वर्षीच्या प्रारंभी प्रसिद्ध झाला आहे. जगभरात विविध उद्योगांतून जे विषारी वायू वातावरणात उत्सर्जित केले जातात, त्यामुळे हवामानात बदल होत असतात. १९९० मध्ये विषारी वायूंच्या उत्सर्जनाचे जे प्रमाण होते त्यात निम्म्याहून जास्त कपात २०५० पर्यंत करण्यात आली तरच हवामानामध्ये घातक बदल होण्याच्या प्रक्रियेवर योग्य नियंत्रण राखता येईल. या आव्हानाचा तातडीने मुकाबला करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांनी तशी पावलेही उचलली. परंतु या प्रयत्नांना सर्वच देशांनी संपूर्ण सहकार्य केले आहे असे झालेले नाही. प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले असून जगातील प्रदूषणामध्ये हे देश मोठी भर घालत असतात. विकसनशील देशांमध्ये प्रदूषणाविरोधात पुरेशी जागृती अजूनही झाली नसल्याने तेथील उद्योगांतूनही विषारी वायू वातावरणात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रदूषणाबाबत प्रगत देशांनी सातत्याने विकसनशील देशांकडे आरोपी म्हणून बोट न दाखवता प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही प्रकारच्या देशांकडून कशी होईल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेने हवामान बदलाच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातील निष्कर्ष अधिक गांभीर्याने घेतले पाहिजेत.
हवामान बदलामुळे समुद्रपातळी वाढणे, सातत्याने येणारे पूर व चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तींचा धोकाही वाढतो. त्याचा परिणाम साहजिकच शेतीवर होत असतो. अन्नधान्याचा दर्जा घसरला तर त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होणे अटळ आहे. हवामान बदलामुळे रोगराईचा प्रसार होतो. ही रोगराई रोखण्यासाठी प्रत्येक देशाची आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षम असतेच असे नाही. भारतासारख्या देशांत शहरी भाग वगळता ग्रामीण भागांमध्ये अजूनही पुरेशा अारोग्यविषयक सुविधा नाहीत. रोगराईचे संकट हे केवळ विकसनशील देशांप्रमाणेच अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही छळते आहे. मात्र तेथील आरोग्य यंत्रणा प्रगत असल्याने या रोगांमुळे बळी पडणाऱ्यांचे प्रमाण इतर देशांपेक्षा तुलनेने कमी आहे. काही प्रदूषणे अशी असतात की त्यांचा थेट विपरीत परिणाम लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध मंडळी तसेच अल्प उत्पन्नामुळे दोन वेळचे पोटभर अन्न मिळू न शकणाऱ्या लोकांवर होत असतो. ही संख्या भारतातही मोठी आहे. रोगराईचा सामना करण्यासाठी माणसांची प्रतिकारशक्ती वाढणे हेही गरजेचे आहे. त्यासाठी चांगला दर्जा असलेले अन्नधान्य पिकवणे व लोकांना ते उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. हवामानात होत असलेले बदल लक्षात घेऊन जगभरातच शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाले पाहिजेत, असे शास्त्रज्ञांचे आग्रही मत आहे. या दृष्टीने भारतानेही आपल्या राष्ट्रीय कृषी धोरणात वेळोवेळी योग्य बदल करीत राहायला हवेत. हवामान बदलामुळे जगभरात पटकीसारख्या रोगांनी दरवर्षी काही लाख लोक मरण पावतात. डेंग्यू रोगाचा प्रसार कितीही उपाययोजना केल्या तरीही रोखता येणे शक्य झालेले नाही. हवामान बदलामुळे मानवी जीवनात जी उलथापालथ होते, ती एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचीही हानी असते. संभाव्य महाशक्ती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतासारख्या देशांनी हवामान बदलामुळे होणारे दुष्परिणाम हे राष्ट्रीय संकट मानून त्याच्या निवारणासाठी व्यवहार्य पावले उचलावीत. तसे करण्यासाठी नागरिकांमध्येही जागृती निर्माण करावी.
paranjapesamir@gmail.com
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत.)

 

No comments:

Post a Comment