Wednesday, July 13, 2016

रेल्वेच्या इतिहासाचे साक्षीदार - दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१६च्या अंकात लेख प्रसिद्ध.


दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१६च्या अंकात संपादकीय पानवर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची टेक्स्ट व वेबपेज लिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurang…/…/13072016/0/6
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
---
रेल्वेच्या इतिहासाचे साक्षीदार
-----------------
- समीर परांजपे
--------------
हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी... भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली उद््धृत केली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरिबंदर ते ठाणे यादरम्यान भारतातील पहिली रेल्वेगाडी धावली. ती जीआयपीआरचीच होती. ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची (जीआयपीआर) स्थापना १ ऑगस्ट १८४९ रोजी करण्यात आली होती. या घटनेला येत्या १ ऑगस्टला १६७ वर्षे पूर्ण होतील. जीआयपीआर रेल्वेच्या रूपाने भारताला दळणवळणाची जी नवसंजीवनी मिळाले त्या रेल्वेचे महत्त्व आजतागायतही तितकेच कायम आहे. पुढे जीआयपीआरचे १९५१ मध्ये मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. पण जीआयपीआरचा इतिहास हे भारताच्या विकासातील लखलखीत पान आहे. या इतिहासाशी निगडित दुर्मिळ कागदपत्रे, दस्तऐवज व्यवस्थित जतन करून ठेवणे आवश्यक होते. याची नेमकी जाण असल्याने जीआयपीआरशी निगडित सुमारे १०० ऐतिहासिक व दुर्मिळ कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. देशातील पहिली गाडी जिथून प्रथम धावली त्या बोरीबंदर स्थानकाचे पुढे व्हिक्टोरिया टर्मिनस (व्ही.टी.) असे नामकरण झाले. काही वर्षांपूर्वी व्ही.टी.चे छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी.) असे पुनर्नामकरण झाले. त्या स्थानकात साजरा करण्यात आलेल्या हेरिटेज आठवड्यादरम्यान अलीकडेच ही १०० कागदपत्रे मध्य रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या मुंबईतील पुराभिलेखागाराकडे जतनासाठी सुपूर्द केली. मुंबईतील फोर्ट विभागातल्या एल्फिन्स्टन काॅलेज इमारतीमध्ये हे पुराभिलेखागार आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जीआयपीआरने देशाच्या विकासात कोणती महत्त्वाची भूमिका बजावली याचे दर्शन या कागदपत्रांतून होते. त्याचप्रमाणे जीआयपीआरने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, या रेल्वेने महसूल मिळवण्यासाठी त्या वेळी प्रकाशित केलेल्या नियतकालिकांचे अंक, अशा गोष्टींचा या कागदपत्रांमध्ये समावेश आहे. जीआयपीआरच्या अधिकाऱ्यांनी लंडनच्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांतून अनेक ऐतिहासिक संदर्भाचाही उलगडा होत जातो. या कागदपत्रांतील जी अगदी जुनी आहेत त्यांचे लॅमिनेशन केले जाईल. जी कागदपत्रे, नियतकालिके अगदीच जीर्ण झाली आहेत, त्यांना स्पर्श न करता त्यांचे विशेष स्कॅनरद्वारे स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करण्यात येईल. म्हणजे या कागदपत्रांचे अजून तुकडे पडणार नाहीत. दस्तऐवज किंवा जुनी हस्तलिखिते, पुस्तके यांच्या जतनीकरणासंदर्भात आपल्या देशामध्ये तसा आनंदीआनंद आहे. त्यामुळे जीआयपीआरच्या दस्तऐवजांचे योग्य जतन होणार, ही घडामोड म्हणजे थंड वाऱ्याच्या झुळुकेसमानच अाहे. याआधीही मध्य रेल्वेने १२ मार्च १९९७ रोजी जीआयपीआरच्या संदर्भातील सुमारे पंधरा हजारांवर पृष्ठसंख्या असलेली कागदपत्रे मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाकडे जतनासाठी सुपूर्द केली होती.
जीआयपीआरच्या आगगाडीने अलम मराठी साहित्यिकांना ही प्रेरणा दिली असून तो सांस्कृतिक दस्तऐवजही महत्त्वाचा आहेच. आगगाडी या विषयावर मराठीतील सर्वात पहिले पुस्तक ‘लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन’ हे होय. डाॅ. लाॅर्डनर यांच्या ‘रेल्वे इकाॅनाॅमी’ या इंग्रजी पुस्तकातील निवडक भागाचे कृष्णशास्त्री भाटवडेकर यांनी मराठी भाषांतर करून त्यातून ‘लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन’ हे पुस्तक १८५४ मध्ये म्हणजे आगगाडी धावू लागल्यानंतर लगेचच एक वर्षाने प्रसिद्ध करण्यात आले. मुंबईचे आद्य इतिहासकार गोविंद नारायण माडगावकर यांनी युनायटेड स्टुडंट्स असोसिएशन या संस्थेपुढे ‘आगगाडी’ या विषयावर १५ मार्च १८५८ रोजी दिलेले भाषण लोखंडी सडकांचे चमत्कार या नावाने पुस्तकरूपाने त्याच वर्षी प्रकाशित झाले. त्यानंतरही अनेकांनी रेल्वेवर मराठी पुस्तके व कविता लिहिल्या. आगगाडीला ‘चाक्या म्हसोबा’ म्हणून संबोधण्यात येत असे. १८५३ मध्ये आगगाडी सुरू झाल्यानंतर तिचे महत्त्व जनमानसात रुजायला लागले. अनेक जातींचे लोक, स्त्री-पुरुष हे सर्व एकत्रितपणे प्रवास करू लागले. आगगाडीने भारतीय समाजजीवनात अबोलपणे जणू क्रांतीच घडवली. रेल्वे जाळ्यात भारताचे समग्र दर्शन होते असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. आधुनिक भारताला साजेशी बुलेट ट्रेन आता येऊ घातली आहे, पण जीआयपीआरचे ऐतिहासिक महत्त्व हे कायमच राहणार आहे.
(लेखक दिव्य मराठी मुंबई कार्यालयात उपवृत्तसंपादक म्हणून कार्यरत आहेत.)
paranjapesamir@gmail.com

No comments:

Post a Comment