Monday, June 6, 2016

अखेरचे दोन वार - रामन राघववरील लेख ( दै. दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जून २०१६ रोजीच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध)



दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जून २०१६ रोजीच्या रसिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख. त्याची लिंक सोबत दिली आहे. शिवाय रामन राघव या विषयावर माझ्या सहकार्यांचे आज प्रसिद्ध झालेले लेखही दिले आहेत.
रसिक स्पेशल - एक होता रामन राघव...
-----------------------------------------------------
अखेरचे दोन वार
- समीर परांजपे
Jun 05, 2016, 00:51 AM I
------------------------------
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
२५ ऑगस्ट १९६८ची ती रात्र. मुंबईतल्या मालाड उपनगरातील चिंचोली नाक्याजवळ असलेला डॉ. पुरुषोत्तम वासुदेव उर्फ पी. व्ही. मंडलिक यांचा ‘हिरा-माणिक’ बंगला. त्या लगत असलेल्या त्यांच्याच मालकीच्या म्हशींच्या गोठ्यामध्ये झोपलेल्या दोन उत्तर भारतीय कामकऱ्यांचा एका अज्ञात व्यक्तीने खून केला होता. मंडलिक यांच्या मालकीच्या वास्तूत भाडेकरू म्हणून राहात असलेल्या इनामदार कुटुंबातील किरण हे १९६८मध्ये अवघे तेरा वर्षांचे होते. त्यांना आजही तो दिवस लख्ख आठवतो आहे... किरण म्हणाले, ‘डॉ. मंडलिक हे प्रजा समाजवादी पक्षाचे नेते. त्यांच्याच म्हशींच्या गोठ्यात दोन खून झाल्याने साऱ्या मालाडभर हा चर्चेचा विषय झालेला. लालचंद जगन्नाथ यादव व दुलार जग्गी यादव अशी दोघा मृतांची नावे. वय साधारण २० ते ३५ वर्षे दरम्यानचे. ते गोठ्यातील सारी कामे करायचे. गोठ्यातच एका मोठ्या बाजेवर झोपायचे. तेथेच त्यांचा खून करण्यात आला. २६ ऑगस्ट १९६८ रोजी या दोन्ही यादवांचे मृतदेह पंचनाम्यासाठी सकाळी नऊ-दहापर्यंत तसेच तिथे होते. एक मोठे पोलिस अधिकारी तपासासाठी आले होते. मी त्यांच्याबरोबर गोठ्याच्या परिसरात गेलो होतो. गोठ्यातून दोन माणसांच्या अस्फुट किंचाळण्याचा आवाज बाबू बापू शिंदे व त्यांचा मुलगा रमेश या दोन पहारेकऱ्यांना रात्री आला होता. त्यांनी त्या जागी धाव घेतली, तेव्हा एक माणूस तिथून घाईघाईने नाला ओलांडून पळाल्याचे त्यांनी पाहिले. आणि गोठ्यात जाऊन पहारेकऱ्यांनी बघितल्यावर सारा भीषण प्रकार समोर आला होता. पुढे जी चर्चा कानावर पडली, त्यावरून हे लक्षात आले होते की, मुंबईत एक मनोविकृत माणूस फिरतोय, जो धारदार शस्त्राने व विशिष्ट पद्धतीने माणसांचे खून पाडतो. त्याच प्रकारे मंडलिकांच्या तबेल्यातही दोघांचे खून करण्यात आलेत.’
किरण इनामदार जणू तो काळच डोळ्यांपुढे आणून पुढे झरझर सांगू लागले. ‘२७ ऑगस्ट १९६८ रोजी रामन राघव नावाच्या विकृत माणसाला पकडल्याची बातमी त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत झळकली होती... मंडलिकांच्या मालकीच्या गोठ्यात केलेले दोन खून हे रामनने केलेले शेवटचे खून. त्यानंतर तो लगेचच पकडला गेला. म्हणजे त्याचे खूनसत्र याच तबेल्यात संपले होते.’ किरण इनामदार बोलत असताना समोरच नीला पटवर्धन बसलेल्या होत्या. डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या त्या प्रमुख आहेत. त्यांची दुसरी ओळख म्हणजे, मुक्ता दाभोलकर या प्रख्यात सामाजिक कार्यकर्तीच्या त्या सासूबाई. त्या म्हणाल्या, ‘रामन राघवने मंडलिकांच्या गोठ्यात जे दोन खून केले त्या वेळी मी मुंबईतच होते. पुढे मी जळगावला गेले. मात्र १९६८मध्ये खूनसत्र झाले तेव्हा मालाडमधील या जागेत मात्र आम्ही राहात नव्हतो, इतके पक्के आठवते.’ कृष्णाकाठी कुंडल ते उरले नाही असे म्हणतात, त्या प्रमाणेच मंडलिकांच्या त्या जागेत कोणे एकेकाळी असलेला म्हशींचा गोठा, तिथे रामन राघवने घातलेले रक्तथैमान या साऱ्या साऱ्या गोष्टी काळाने जणू पुसून टाकलेल्या आहेत. मंडलिकांच्या गोठ्याच्या जागी आता सोनमर्ग नावाची भलीमोठी इमारत उभी आहे. मात्र मंडलिकांच्या बंगल्याजवळ आजही एक मोठी विहीर आहे. खोल खोल विहीर, जिचा तळ पटकन िदसत नाही. पण खून करण्यासाठी आसुसलेल्या रामन राघवने या विहिरीत त्या वेळी डोकावून पाहिले असेल का? त्याला स्वत:चे हिंसक प्रतिबिंब या पाण्यात दिसले असेल का? असेही विचार मनात येऊन गेले. मंडलिकांच्या बंगल्यावरून पुढे आलो, ते चिंचोली नाक्यावर. समोर एक पेट्रोल पंप दिसत होता. त्याच्या शेजारी प्रशस्त हनुमान मंदिर होते. रामन राघव खटल्याच्या कागदपत्रांमध्ये वाचले होते की, या पेट्रोलपंपाच्या समोर त्या वेळी म्हणजे १९६८च्या सुमारास जय हनुमान नावाचे एक उडुपी हॉटेल होते. आता तिथे वृंदावन नावाचा रेस्टॉरंट बार सुरू आहे. मात्र रामन राघव पूर्वीच्या या जागी असलेल्या जय हनुमान हॉटेलमध्ये नेहमी चहा प्यायला यायचा. रामनला पकडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या ओळख परेडमध्ये जय हनुमान हॉटेलच्या संजीवा शेट्टी या मालकाने त्याला बरोबर ओळखले होते. पुढे या शेट्टीने तशी साक्षही न्यायालयात दिली होती...
मालाडच्या चिंचोली नाक्याहून रेल्वे स्टेशनकडे परतताना मंडलिकांचा बंगला, ते वृंदावन हॉटेल असे सारे डोळ्यासमोर तरळून गेले. रामन राघवचा चेहरा तेवढा आ‌ठवत नव्हता. तसेही त्याला कधी पाहिलेही नव्हते. एरवी हिंसक, रक्ताळलेले वास्तव कुणाला आठवायला आवडेल?
paranjapesamir@gmail.com
-----------
वन टाइट स्लॅप !
- विनोद तळेकर
‘रामन राघव २.०’ येतोय... दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि गुणाढ्य नट नवाजुद्दिन सिद्दिकी त्याचे रुपेरी पडद्यावरचे कर्ता-धर्ता आहेत...
आजची पिढी एक थ्रीलर म्हणून हा सिनेमा एन्जॉय करील, पण १९६०च्या दशकाच्या अखेरीस राघव हे मुंबई शहरातलं थरकाप उडवणारं वास्तव होतं...
एका पाठोपाठ एक ४२ खून करणारा राघव मुंबई पोलिसांसाठी सर्वार्थाने आव्हान ठरला होता. त्याची केस पोलिस दल आणि कायद्याच्या दृष्टीने ‘लँडमार्क’ केस ठरली होती. आज जवळपास ५० वर्षांनंतर या सिनेमाच्या निमित्ताने जुन्या पिढीतल्या अनेकांच्या या मनोरुग्ण गुन्हेगाराशी जोडलेल्या आठवणी जाग्या झाल्या आहेत...
या पार्श्वभूमीवर रामनला जेरबंद करणारे आणि आता वयाच्या नव्वदीत असलेले निवृत्त अधिकारी अॅलेक्स फियालो, त्या वेळी बचाव पक्षाचे वकील असलेले अॅड. एस. आर. चिटणीस, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद पाटकर आणि राघवने केलेल्या शेवटच्या दोन खुनाच्या आठवणी मनात आजही ताज्या असलेले किरण इनामदार, नीला पटवर्धन यांना भेटून रामन राघवचा भूूतकाळ नव्याने जिवंत करणारी, ही स्पेशल कव्हरस्टोरी...
ते दिवसच असे होते की, फक्त पोलिसच नव्हे तर सर्वसामान्य लोकही चोवीस तास या एका सिरियल किलरचाच विचार करत. नाक्यावर-घरात-ऑफिसात लोकांच्या शिळोप्याच्या गप्पांमध्येही त्याचाच विषय असे. कुणी म्हणे त्याच्याकडे मायावी शक्ती आहे, तर कुणी म्हणे तो प्राण्याचे रूपही घेतो, आणखी कुणी तरी त्याला उंच झाडावर झोप घेताना पाहिल्याचे सांगे. एका अनामिक भीतीने संध्याकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यावर सामसूम होई. आया आपल्या मुलांना लवकर झोपा नाहीतर ‘तो’ येईल, अशी भीती घालत. तरणीताठी पोरं हातात लाठ्याकाठ्या घेऊन रात्री-बेरात्री रस्त्या-रस्त्यांवर गस्त घालत. सोबतीला शहरभरात तब्बल दोन हजार पोलिस रोज डोळ्यात तेल घालून त्याचा शोध घेत, पण पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डमधल्या फोटोतला तो काही हाती लागत नव्हता. मात्र, कुणी त्याच्याचसारखा दाढीधारी संशयास्पद हालचाली करताना आढळला की, पोलिस त्याला पोलिस ठाण्यात आणून चोप देत...
त्याने लोकांचे चश्मे चोरले, कुणाच्या तरी बिड्या चोरल्या, इतकंच नव्हे तर हातशिलाई करताना सुई टोचून इजा होऊ नये म्हणून बोटावर लावण्याची टोपणं म्हणजे अंगुस्तानंही त्याने चोरली... असा हा भुरटा चोर मरेपर्यंत तुरुंगात होता. विशेष म्हणजे, त्याला पकडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यालाही त्याची केस आपल्या पोलिस कारकिर्दीतली सर्वात मोठी कामगिरी असल्याचे वाटत होते... कारण काय, तर या चोराने या भुरट्या चोऱ्या करताना निर्घृणपणे खून केले होते. थोडेथोडके नव्हे तर चक्क ४२ खून... आणि त्या आरोपीचे नाव होते, रामन राघव... ज्याने सत्तरच्या दशकात मुंबईची झोप उडवली होती, तोच हा सिरियल किलर रामन राघव उर्फ सिंधी दलवाई उर्फ थंबी...
“माझ्या पोलिस कारकिर्दीत मी हाताळलेल्या केसेसपैकी ही सर्वांत बेस्ट. कारण ज्याच्या मागे संपूर्ण पोलिस खाते लागले होते, त्या सिरियल किलरला मी पकडले होते...’ वयापरत्वे सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील सोनेरी चश्म्याआडच्या हसऱ्या आणि चमकदार डोळ्यांचे अॅलेक्स फियालो सांगत होते... वय नव्वद वर्षे. बरेचसे विरळ झालेले पांढरे केस... ओठांच्या शेवटाकडे उतरत जाणाऱ्या पांढऱ्या मिशा... काळा-पांढरा चेक्सचा शर्ट आणि राखाडी रंगाची ट्राऊझर घातलेल्या फियालोंच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता...
२७ अॉगस्ट १९६७ची ती एक पावसाळी सकाळ होती... दक्षिण मंुबईच्या भेंडी बाजार नाक्यावर सकाळची नेहमीची वर्दळ... कामावर जाणाऱ्यांच्या गर्दीतच फूटपाथवरच्या ठेलेवाल्यांची दुकान मांडण्याची लगबग सुरू होती. ताज्या फुलांचा, गरमागरम भजीचा, कोऱ्या वर्तमानपत्रांचा, दुकानांमधील अगरबत्त्यांचा आणि कसल्याशा धुराचा, असे सगळे गंध एकमेकांमध्ये मिसळून सकाळचे वातावरण तयार झाले होते... मधूनच अंडी आणि पाववाल्यांच्या सायकलची ट्रिंग ट्रिंगही ऐकू येत होती आणि गर्दीतून वाट काढणाऱ्या हातगाडीवाल्यांचे किनाटी आवाजही…
बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने सकाळी आठ वाजताही वातावरणात उष्मा जाणवत होता... अशा बाष्पयुक्त वातावरणात त्या वेळी वयाच्या चाळिशीत असणारे डोंगरी पोलिस ठाण्यातले डे पीएसआय म्हणून अॅलेक्स फियालो आपल्या बीटमध्ये सकाळच्या गस्तीला एकटेच चालत निघाले होते... एसव्हीपी रोडच्या नाक्यावरून ते मुख्य रस्त्याच्या दिशेने ‌‌वळले, तोच समोरून निळा शर्ट आणि खाकी हाफ पँट घातलेला, हातात लांबलचक छत्री धरून चाललेला इसम त्यांच्या दृष्टीस पडला. त्याने तपकिरी रंगाचे कॅनव्हास शूज घातले होते. एरवी, त्या माणसाकडे पाहिल्या न पाहिल्यासारखे करत कदाचित फियालो पुढे गेले असते; पण त्याच्या हातातील छत्रीमुळे त्यांचे कुतूहल चाळवले. गेले पंधरा-वीस दिवस पावसाने दडी मारलेली असतानाही हा इसम छत्री घेऊन का बाहेर पडला, अशी सहज शंका त्यांच्या डोक्यात येऊन गेली. आता तो अगदी दहा-बारा पावलांच्या अंतरावर येऊन ठेपला. जवळ येताच त्याची शरीरयष्टी चांगलीच मजबूत असल्याचे फियालोंच्या लक्षात आले. अखेर त्या माणसाची आणि फियालोंची नजरानजर झाली.
काही पावले पुढे भेंडीबाजार जंक्शनच्या दिशेने निघून गेलेल्या त्या माणसाकडे वळून फियालाेंनी हाक मारली... ‘अरे, भाईसाब जरा रुको’ त्यांच्या या वाक्यावर तो माणूस जागीच थबकला.. ‘जरा इधर आओ’ किंचत दरडा‌वणीच्या सुरात फियालो पुन्हा बोलले. तसा तो माणूस फियालोंच्या जवळ आला. तो ज‌वळ येताच त्याच्या शर्टवरील खांद्याच्या वर मघाशी लांबून न दिसलेला रक्ताचा एक डाग फियालोंंच्या दृष्टीस पडला. ‘चलो जरा मेरे साथ, तुमसे काम है’ असे उद‌्गारत फियालो जवळच असलेल्या आपल्या पोलिस क्वार्टर्सच्या दिशेने चालू लागले. तो माणूसही पाऊलभर अंतर ठेवून त्यांच्या मागोमाग येऊ लागला. चालता चालता फियालोंच्या मनात पुन्हा विचारांचे थैमान सुरू झाले. हा तोच आहे का? ज्याने तमाम पोलिसांची झोप उडवलीय... सिरियल किलर रामन राघव…पण त्याला तर दाढी होती… विचारांच्या तंद्रीत असताना ते आपल्या घराच्या इमारतीच्या खाली पोहोचलेसुद्धा... पाठोपाठ तो माणूसही...
कुलाब्याच्या नाजू मेन्शनमधील घराच्या प्रशस्त दिवाणखान्यात बसून फियालो आपल्या आयुष्यातील सर्वात थरारक, रोमांचक नि यशस्वी दिवसाचे वर्णन करत होते. उत्साहपूर्ण आवाजात ते पुढची कहाणी सांगू लागले... ‘माझ्या घराखाली त्या वेळी एक टेलिफोन बुथ होता. त्याच्या मागच्या बाजूला उभे करून मी त्याची अंगझडती घेतली. त्याच्या अंगझडतीनंतर त्याच्याकडे छत्री वगळता दुसरे कोणतेही हत्यार नाही, अशी माझी खात्री पटली आणि मी निश्चिंत झालो. खरे तर रामन राघवचा फोटो त्या वेळी माझ्या युनिफॉर्मच्या वरच्या उजव्या खिशात होता. तो पडताळून मी खात्री करून घेऊ शकलो असतो; पण मी त्याला अोळखले आहे, हे मी त्याला जाणवू देऊ इच्छित नव्हतो... म्हणून तसे न करता मी त्याचे नाव विचारले, त्यावर तो उत्तरला, ‘साब मेरा नाम सिंधी दलवाई है...’ बस्स... त्याने हे शब्द उच्चारताच माझी खात्री पटली... आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. मग मी त्याच टेलिफोन बुथवरून डोंगरी पाेलिस ठाण्यात फोन लावला. पोलिस व्हॅन आल्यानंतर रामन राघवला गाडीत घातला. एव्हाना रामन राघव पकडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने पोलिस ठाण्याभोवती हजारो लोक जमले होते. आत जाताच मी ड्युटी ऑफिसरला पोलिस ठाण्याची दोन्ही गेट बंद करण्याचे आदेश दिले. कारण ठाण्याबाहेर जमलेले लोक रागाच्या भरात आत येण्याचा धोका होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब फिंगर प्रिंट एक्सपर्टला फोन केला. काही वेळातच एक्सपर्टने पडताळणी करत सांगितले की, ‘फियालो साब यू हॅव गॉट द राईट मॅन... हा रामन राघवच आहे.’
२७ अॉगस्ट १९६७च्या त्याच सकाळी रामन राघवला अटक केल्याच्या दोन तासानंतर दहाच्या सुमारास तत्कालीन पोलिस आयुक्त मोडक यांच्या कार्यालयातील दूरध्वनी खणाणला. क्षणाचाही वेळ न घालवता त्यांनी रामन राघव केसवर काम करणाऱ्या वाकटकर आणि पेंडसे या आपल्या दोन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तडक डोंगरी पोलिस ठाणे गाठले. तेव्हा एका लाकडी बाकड्यावर बसलेल्या रामन राघवला एक फोटो दाखवत पीएसआय फियालो काही प्रश्न विचारत होते… बोल इसको पैचानता है तुम? खरं तर तो त्याचाच फोटो होता. पण तरीही आपण त्या व्यक्तीला जणू ओळखतच नसल्याच्या आविर्भावात रामन राघव उत्तरला, पैचानता नही, मगर अपुनके माफिकीच दिखताय… हे उत्तर संपतंय ना संपतं तोवर फियालोंनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवत, ‘वन टाइट स्लॅप’ म्हणजेच खाडकन एक थप्पड त्याच्या मुस्काटीत ठेवून दिली. हा असा बोलणार नाही, हे लक्षात येताच मोडक साहेब पुढे सरसावले आणि रामन राघवच्या पुढील चौकशीसाठी त्याला सीआयडीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले… साधारण वर्षभरापूर्वी भुरट्या चोऱ्यांच्या आरोपांखाली रामन राघवला घाटकोपर पोलिसांनी तडिपार केले होते. त्या वेळी काढलेले त्याचे फोटो आणि हातांचे ठसे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये होते. त्या फोटोत रामन राघवला दाढी होती, आता मात्र त्याने दाढी कापली होती.
मुख्यालयात येताच पुण्यातल्या जोशी अभ्यंकर खून खटल्याचा यशस्वी तपास करणाऱ्या वाकटकर-पेंडसे जोडीने रामन राघवचा ताबा घेतला. ‘हे सर्व खून तू केलेस हे आम्हाला माहीत आहे. आता ते कसे केलेस, हे सांगण्यासाठी तुला आमच्याकडून काय हवे ते सांग.’ वाकटकर यांच्या या काहीशा अडनिड्या प्रश्नावर, ‘मला एक कोंबडी हवीय खायला’ असे तितकेच चमत्कारिक उत्तर त्याने दिले. कोंबडी खाऊन झाल्यावर आता मला बाई हवीय; पण तुमचा कायदा कदाचित या गोष्टीला परवानगी देणार नाही, असे स्वत:च सांगत त्याने मग केसाला लावण्यासाठी तेल, एक कंगवा आणि आरसा मागवला. मग काही वेळ त्याने साग्रसंगीत केसांना तेल लावले, बराच वेळ केस विंचरले आणि शेवटी पोलिसांकडे वळून तो म्हणाला, ‘आता बोला काय विचारायचेय तुम्हाला? मी सगळे सांगतो...’ रामन राघवच्या अटकेनंतर मुंबईतील हत्यांचे सत्र आपोआप थांबले. सोबतच ‘रामन राघवला कधी पकडणार’ अशी पोलिसांना पाहून सर्वसामान्य करत असलेली शेरेबाजीही थांबली... या धाडसी कामगिरीसाठी फियालोंना पोलिस अायुक्त मोडक यांनी त्या वेळी तब्बल एक हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. तसेच पोलिस खात्याचे बायबल समजले जाणाऱ्या पोलिस जर्नलमध्ये एक माईलस्टोन केस म्हणून रामन राघव केसचा आणि फियालाेंच्या कामगिरीचा समावेश केला गेला...
talekarvinod@gmail.com
घटनाक्रम
१९६५ ते १९६८ :
बहिनिचा आणि एका मित्राचा खुन केल्यानंतर रामन राघवने जवळपास चाळीसएक खून हे मुंबई आणि उपनगरात केले
२५ ऑगस्ट - २६ ऑगस्ट १९६८ :
चिंचोली फाटक (मालाड-मुंबई) येथे रामन राघवकडून दुहेरी खून.
२७ ऑगस्ट १९६८ :
भेंडीबाजार येथे अॅलेक्स फियालो, पोलिस उपनिरीक्षक यांनी अटक केली.
१३ ऑगस्ट १९६९ :
गिरगाव कोर्टाने देहदंडाची शिक्षा ठोठावली. आणि या शिक्षेच्या confirmation करिता उच्च न्यायालयात पाठविले.
ऑक्टोबर १९६९ :
उच्च न्यायालयाने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली आणि पॅरॉनॉइड स्किझोफ्रेनियाचे निदान झाले. आरोपीच्या विरोधात सुरू असलेला खटला आणि त्याची कार्यवाही कळत नसल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी आरोपीची येरवडा येथे रवानगी.
१९ फेब्रुवारी १९७५ :
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे म्हणणे ग्राह्य धरले व सरकारचे अपील फेटाळले.
४ ऑगस्ट १९८७ :
सत्र न्यायालयाचा रामन राघव याच्या फाशीचा निर्णय रद्दबादल करण्यात आला. त्याऐवजी आजन्म कारावास ठोठावण्यात आला.
१९९५ :
रामन राघव याचा पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू.
क्रूरतेचा कळस
१९२९मध्ये तामीळनाडूच्या एका छोट्याशा शहरात जन्मलेल्या रामनला लहानपणापासूनच भुरट्या चोऱ्या करण्याची सवय जडली होती. क्रोबार म्हणजे सब्बल नामक ‘एल’ आकाराच्या लोखंडी भरीव रॅाडने तो झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर आठ ते दहा प्रहार करत असे. त्याने आपल्या कबुलीजबाबात एका तिहेरी खुनाचे केलेले वर्णन त्याची क्रूरता स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. त्या जबाबात राघव म्हणतो, ‘ एके दिवशी मी एक नवीन झोपडी पाहिली. आत डोकावून पाहिले तर एक बाई आणि तिचे मूल झोपले होते. बाईच्या गळ्यात सोन्याची माळ दिसली. मग मी तिच्यावर नियमित नजर ठेवून राहिलो. एके रात्री तिच्या झोपडीच्या दाराची दोरी कापून मी आत घुसलो. ती, तिचा पती आणि तिचे मूल झोपले होते. मी सब्बलने तिच्या पतीच्या डोक्यावर प्रहार करू लागलो. पाच-सहा फटक्यांत तो मेला. पण झालेल्या झटापटीमुळे ती महिला आणि तिचा मुलगा उठून आरडाओरड करू लागले. मग मी त्या दोघांनाही त्याच पद्धतीने खलास केले...
रामन राघवचे वकील...
रामन राघव तुरुंगात असताना तब्बल १९ वर्षानंतर कारागृह प्रशासनाच्या मानसिक आरोग्य केंद्राच्या अधिक्षकांनी त्याच्या मानसित स्थितीबाबत एक अहवाल दिला. ज्यात रामन राघव हा आता मानसिकदृष्ट्या ठीक असून त्याचावर उच्च न्यायालयात खटला चालवण्यास हरकत नसल्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयात पुन्हा खटला उभा राहिला. बचाव पक्षाचे म्हणजे रामन राघवचे वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. आर. चिटणीस यांची नियुक्ती झाली. पहिल्या मुलाखतीत तो अगदी सामान्य वाटला. आपण केलेल्या सर्व हत्यांबाबत त्याने न अडखळता सर्व माहिती सांगितली. पण दुसऱ्या मुलाखतीत मात्र तो मनोरुग्ण असल्यासारखा जाणवला

No comments:

Post a Comment