Monday, June 27, 2016

‘स्टँडिंग ओवेशन’चा ‘कोडमंत्र’! नाटक. दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी २६ जून २०१६



दै. दिव्य मराठीच्या २६ जून २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीत कोडमंत्र या नवीन मराठी नाटकाविषयी प्रसिद्ध झालेला हा माझा लेख. त्याची लिंक, टेक्स्ट लिंक, टेक्स्ट व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-article-in-marathi-5358209-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/26062016/0/6/
----
"कोडमंत्र' हे गुजराती नाटक मराठी रंगभूमीवर आणणे हे भरतभाई ठक्कर, दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे या तिघांचेही ड्रीम प्रोजेक्ट बनले होते. नाटक संपताना टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओवेशन यासारखी प्रेक्षकांकडून मिळणारी दुसरी दाद नाही. ‘कोडमंत्र’च्या पहिल्या, दुसऱ्या व त्यानंतर सर्वच प्रयोगांना हा अनुभव निर्मात्यांसह सर्व कलाकारांनी घेतला आहे व घेत आहेत...
----
‘स्टँडिंग ओवेशन’चा ‘कोडमंत्र’!
------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-----
र्वतराजीचे भव्य नेपथ्य... त्यातच सैनिकी छावणीमधील बैठकींचा बाज समाविष्ट... नाटकात वावरणारे ११ कलाकार व त्यांना एकाच वेळी तेवढीच मोलाची साथ देणारे एनसीसीचे अठरा ते वीस कॅडेट... या कॅडेट‌्सनी साकारलेली श्वास रोखून धरायला लावणारी, थरार निर्माण करणारी युद्धदृश्ये, त्यांचे रंगमंचावर होणारे शिस्तबद्ध संचलन, नाट्यगृहात घुमणारे लष्करी इशारे, जयहिंदचा टिपेचा जयघोष या गोष्टींनी वातावरणात चैतन्य निर्माण होतेच, परंतु इतक्या कलाकारांसह नाटक नव्हे तर एक लक्षवेधी चित्रपटच पाहतो आहोत, असा भव्यदिव्य आणि मराठी रंगभूमीवर दुर्मीळ म्हणता येईल असा अनुभव आपण घेत असतो. ‘कोडमंत्र’च्या निमित्ताने आलेली ही भव्यता क्षणोक्षणी रसिकांना सुखावत राहते...
तसे पाहता मराठी रंगभूमी ही आदानप्रदानाची भूमी आहे. गुजराती, पारशी, उर्दू, हिंदी भाषांमध्ये होणारी काही उत्तम नाटके जशी पूर्वी मराठी रंगभूमीवर अनुवादित करून साजरी झाली, त्याचप्रमाणे मराठी व्यावसायिक रंगमंचावरील लोकप्रिय नाटकं गुजराती व अन्य भाषांतील रंगमंचावर नेहमीच येत राहिली आहेत. गुजराती नाटकांचे सर्वात जास्त प्रयोग अहमदाबादमध्ये नव्हे तर मुंबईत होतात. याचे कारण मुंबई ही बहुसांस्कृतिक पैलूंनी घडलेली आहे. इथे मराठीबरोबरच अनेक भाषांतील कलांनाही आपला विकास साधण्याची संधी मिळाली आहे.
गुजराती रंगमंचावर अलीकडच्या काळात जी नाटके सादर झाली, ती पाश्चात्त्य नाटकांची रूपांतरे आहेत. ऑक्टोबर २०१५ पासून गुजराती रंगमंचावर सादर होणारे ‘कोडमंत्र’ हे नाटकदेखील ‘ए फ्यू गुड मेन’ या अॅरॉन सोर्किन लिखित इंग्रजी नाटकावर बेतलेले आहे.
दोन अमेरिकन सैनिकांवर खुनाचा आरोप दाखल झाल्यामुळे त्यांचा बचाव करण्यासाठी कोर्टमार्शलच्या दरम्यान दोन वकील या प्रकरणाच्या मुळाशी जातात. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या सैनिकांना आरोपी ठरविण्यासाठी रचलेले कारस्थान हे वकील उघडकीस अाणून न्यायालयासमोर सत्यस्थिती सादर करतात, असे ‘ए फ्यू गुड मेन’ या नाटकाचे कथानक आहे. ‘ए फ्यु गुड मेन’वरून गुजरातीत ‘कोडमंत्र’ हे नाटक लिहिताना लेखिका स्नेहा देसाई यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य घेत काही बदलही केले. भरत ठक्कर यांची निर्मिती व राजेश जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटकाने गेले वर्षभर गुजराती रंगभूमी दणाणून सोडली आहे. हे नाटक मराठीत कधीतरी येणार, हे नक्कीच होते. भरत ठक्कर, दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे या तिघांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘कोडमंत्र’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवरही अवतरले आहे. या नाटकातील महिला वकिलाची महत्त्वाची भूमिका मुक्ता बर्वे करीत आहे.
इथे सहज एक आठवण झाली की, ‘कानजी व्हर्सेस कानजी’ हे गुजराती नाटक काही वर्षांपूर्वी सुयोग नाट्यसंस्थेने ‘कृष्णकन्हैया’ या नावाने मराठीत आणले होते. त्यात मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत होता. त्याही आधी गुजराती नाटककार मधु राय यांच्या ‘कोई भी फुल का नाम ले लो’ या नाटकाचे मराठी रूपांतर ‘आणि म्हणून कुणीही’ या नावाने मराठीत सादर झाले होते. त्या वेळी त्याचे दिग्दर्शन दिलीप कुलकर्णी यांनी केले होते. अलीकडेच पुन्हा मधु राय यांच्या ‘कोई भी फुल का नाम ले लो’ याच नाटकावरून ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ नावाने नवीन मराठी नाटक भद्रकाली प्रॉडक्शनने आणले असून त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
‘कोडमंत्र’ या मराठी नाटकाचेही रसिकांनी स्वागत केले आहे. हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणे हे दिनेश उर्फ दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे, भरत ठक्कर यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट बनले होते. त्यापैकी दिनू पेडणेकर यांनी सांगितले, “कोडमंत्र या मराठी नाटकाचा पहिला प्रयोग बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात गेल्या १८ जून रोजी झाला. नाटक संपताना टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओवेशन यासारखी प्रेक्षकांकडून मिळणारी दुसरी मोठी दाद नसते. ‘कोडमंत्र’च्या पहिल्या प्रयोगाला हा अनुभव माझ्यासकट सर्व कलाकारांनी घेतला. मी तर दुहेरी आनंदात आहे, एक स्टँडिंग ओवेशनचा आणि दुसरा स्वप्नपूर्तीचा... भरतभाई ठक्कर हे गुजराती भाषेतील ‘कोडमंत्र’चे निर्माते. ऑक्टोबर २०१५मध्ये या नाटकाचा शुभारंभ झाल्यापासून मी हे नाटक पाहावं यासाठी भरतभाई आठवड्यातून एक तरी फोन करायचेच, पण काही कारणांमुळे नाटक पाहण्याचा योग येत नव्हता. अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘कोडमंत्र’ पाहिलं आणि मी भारावूनच गेलो. मुक्ताला नाटकाच्या मध्यंतरातच फोन करून आपण हे प्राॅडक्शन मराठीत करणार आहोत, असं सांगून तिला नाटक लवकरात लवकर पाहायला सांगितलं. त्यानंतर हे नाटक पाहिल्यानंतर मुक्ताचीही सेम रिअॅक्शन.”
दिनू पेडणेकर म्हणाले, “कोडमंत्र नाटकाची निर्मिती करण्याचं निश्चित झाल्यानंतर भरतभाईंनी आम्हाला फक्त एकच अट घातली ती म्हणजे, नाटकाचं दिग्दर्शन ज्यांनी गुजराती ‘कोडमंत्र’चं दिग्दर्शन केलंय, ते राजेश जोशीच करतील. मी आणि मुक्ताने या विषयावर कोणतीही चर्चा न करता राजेश जोशी यांच्या नावाला लगेच मान्यता दिली. गुजराती भाषेतील लेखिका स्नेहा देसाईने लिहिलेलं एक दमदार नाटक ज्या दिग्दर्शकाने फक्त तीस बाय वीस फुटाच्या रंगमंचावर ब्रॉडवेवर दाखवल्या जाणाऱ्या नाटकांसारखं बसवून दाखवलं असेल, त्या दिग्दर्शकाच्या नावाला नाकारायचं काही कारणच नव्हतं. राजेशसरांनी किमान दोन महिने तालीम करून नाटकाचा आरंभ करायचं, असं सांगितलं. पहिला अंक बसवला की सेट लावून चार दिवस आणि दुसरा अंक झाला की परत सेट लावून चार दिवस. यानंतर परत छोट्या तालीम हाॅलमध्ये आणि शेवटचे पाच दिवस एखाद्या नाट्यगृहातील रंगमंचावर रंगीत तालीम. यात राजेशसरांची शेवटची पण महत्त्वाची अट होती, निर्मितीमूल्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. भरतभाईंना गुजराती ‘कोडमंत्र’च्या निर्मितीचा अनुभव असल्यामुळे आणि आम्हीही निर्मितीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे राजेशसरांच्या सर्व अटी मान्य करून मिटिंग संपवली...”
कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक ह्यामधील पातळ सीमारेषा असलेल्या ‘कोडमंत्र’मध्ये अजय पुरकर कर्नल निंबाळकर, तर मुक्ता बर्वे महिला वकील अहिल्या हिच्या भूमिकेत आहेत. लष्करातील नियम, त्या लोकांची विचारसरणी, जीवनपद्धती, कोर्टमार्शलची यंत्रणा या सगळ्याचे दर्शन या नाटकातून प्रेक्षकांना घडते. हे नाटक गुजरातीतून मराठीत आणताना काही बदल करण्यात आले. गुजराती नाटकात राजपूत रेजिमेंटचा उल्लेख आहे, त्या ऐवजी मराठा रेजिमेंटचा उल्लेख करण्यात आला. पात्रांची नावे मराठमोळी करण्यात आली. मात्र नाटकाच्या कथानकात काहीच बदल करण्यात आलेला नाही. लष्करी नियम हे सारखेच असल्याने नाट्यरूपांतर करताना भाषेचा अडसर येण्याचा प्रश्नच नव्हता. गुजरातीप्रमाणेच मराठीतील `कोडमंत्र' नाटकात एकही ब्लॅकआऊट नाही. नाटकातील दृश्यांचा प्रवाह सलग सुरू राहतो. म्हटले तर मराठी नाटकांत हा एक आगळावेगळा प्रयोगही आहे.
----
एन.सी.सी.कॅडेट्सचाही सहभाग
‘कोडमंत्र’ नाटकाच्या मराठी आवृत्तीत ११ कलाकारांसोबत डोंबिवलीच्या के. व्ही. पेंढारकर कॉलेजमधील एन.सी.सी.चे १८ ते २० कॅडेट‌्सही काम करत आहेत. ‘कोडमंत्र’ची तालीम सुरू झाल्यानंतर विलेपार्ले येथील एका कॉलेजमधील एनसीसी विभागातील मुलांनी या नाटकात भूमिका करावी, म्हणून निर्मात्यांनी बोलणे केले होते. पण काही कारणाने ते बोलणे पुढे सरकू शकले नाही. आयत्या वेळी उद‌्भवलेल्या या प्रश्नावर मात करण्यासाठी मिलिंद अधिकारी पुढे सरसावले. त्यांनीच पेंढारकर कॉलेजमधील एनसीसीचे प्रमुख लेफ्टनंट उदय नाईक यांच्याशी संपर्क साधून तेथील काही कॅडेट‌्स नाटकात काम करतील, अशी व्यवस्था करून दिली.
----

No comments:

Post a Comment