दै. दिव्य मराठीच्या २१ जून २०१६च्या अंकामध्ये संपादकीय पानावर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची वेबपेज लिंक व टेक्स्ट, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/21062016/0/6/
--------
डॉक्टरांना जाहिरात करु द्या!
-------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
वैद्यकीय व्यवसाय हा व्यापार नव्हे तर सेवाभावी स्वरुपाचा व्यवसाय समजला जातो. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा पैसे कमावू नयेत, रुग्णसेवेकडे सर्वाधिक लक्ष द्यावे अशी आजपर्यंतची धारणा होती. मात्र आता बदलत्या काळानूसार डॉक्टरांना ही बंधने मान्य नाहीत. डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी द्या असे मत देशामध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ७० टक्के डॉक्टरांनी नोंदविलेले आहे. १९५६च्या इंडियन मेडिकल कौन्सिलच्या कायद्याद्वारे या कौन्सिलचे सदस्य असलेल्या डॉक्टरांना काही विशिष्ट प्रसंग वगळता अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास बंदी आहे. या कायद्यात २००१ सालापर्यंत तीन दुरुस्त्या झाल्या पण ही बंदी हटविली गेली नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही अॅलोपथी डॉक्टरांची संघटना आहे. होमिओपथी व आयुर्वेद डॉक्टरांच्या संघटना वेगळ्या आहेत. आता कायदेशीर गुंता असा आहे की, एमसीआयचे सदस्य नसलेल्या व इतर पथीच्या डॉक्टरांना १९५६चा वैद्यकीय कायदाच लागू होत नाही. त्यामुळे इतर पथीचे डॉक्टर प्रसारमाध्यमांतून स्वत:ची बिनदिक्कतपणे जाहिरात करताना दिसत आहेत. यातील काही जाहिराती या बोगस उपचार पद्धतींच्या असून त्यामुळे रुग्णांची दिशाभूल होत असते. पण त्याविरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अॅलोपथीच्या डॉक्टरांपैकी ज्याने नव्याने प्रॅक्टिस सुरु केली असेल अथवा विशिष्ट कारणामुळे काही काळ त्याला प्रॅक्टिस बंद ठेवायची असेल, प्रॅक्टिसची वेळ किंवा पद्धत बदलली असेल तर ठराविक नमुन्यामध्येच हे डॉक्टर प्रसारमाध्यमांत स्वत:ची जाहिरात करु शकतात. मात्र अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास त्यांना १९५६च्या कायद्याद्वारे बंदी आहे. नेमकी हीच बाब अॅलोपथी डॉक्टरांना खटकत असल्याने त्यांनी सदासर्वकाळ स्वत:ची जाहिरात करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. विविध पथीच्या मोठमोठाल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या जाहिरातीही प्रसिद्ध होताना दिसतात. ही हॉस्पिटल्स एमएसीआयचे सदस्य नसल्याने त्यांनाही जाहिरात करण्यापासून कायद्याने रोखता येणे कठीण आहे. मात्र डॉक्टर मालक असलेल्या नर्सिंग होमने जाहिरात केल्यास ते बेकायदेशीर ठरते. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असतात. पण त्यांच्या कौशल्याची माहिती रुग्णांना न होता फक्त हॉस्पिटलचा ब्रँड मोठा होत जातो. हे देखील आपल्या क्षेत्रात असाधारण कौशल्य मिळविलेल्या डॉक्टरांना खटकू लागले आहे. त्यातूनच अॅलोपथीच्या डॉक्टरांनी जाहिरातींच्या बाजूने चढा सुर लावला आहे. विशिष्ट आजार व त्यावरचे उपाय याबाबत कौशल्य वाढविलेल्या डॉक्टरांपैकी सगळेच डॉक्टर हे काही मोठमोठाल्या हॉस्पिटलशी संलग्न नसतात. काहीजणांचे स्वत:चे रुग्णालय व प्रॅक्टिस असते. आपला ब्रँड मोठा करावा ही प्रत्येकालाच इच्छा असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट आजारावरील उपायांबाबतची कौशल्यवृद्धी करण्यात तसेच स्वत:चा दवाखाना थाटून प्रॅक्टिस सुरु करण्यापर्यंत मजल गाठेपर्यंत डाॅक्टर वयाची पस्तीशी नक्की गाठतो. दवाखाना सुरु करण्यासाठी येणारा भांडवली खर्चही खूप मोठा असतो. मोठमोठाल्या रुग्णालयांच्या नावाखाली स्वत:चे अस्तित्व झाकून टाकण्यापेक्षा स्वतंत्रपणे व स्वबळावर वैद्यकीय व्यवसायात पाय रोवू इच्छिणाऱ्या डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करु देणे हे उपकारक ठरु शकेल. या जाहिरातीत आपल्या वैद्यकीय कौशल्यासंदर्भात डॉक्टर जी माहिती देईल त्यातून रुग्णांना नेमके कोणत्या डॉक्टरकडे उपचारांसाठी जावे याचेही वाढीव भान येईल. त्याशिवाय जाहिरातीत नमुद केलेल्या कौशल्याप्रमाणेच डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार न केल्यास डॉक्टरांवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दशकापूर्वी झालेल्या सर्वेक्षणानूसार एकुण ५२ मेडिकल स्पेशालिटिज होत्या. आता या स्पेशालिटिजमध्ये खूपच वाढ झाली आहे. त्यातून अचूक निदान व उपायांची शक्यताही वाढली आहे. वाढलेल्या स्पेशालिटिजमुळे वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धाही निर्माण झाली. सुपरस्पेशालिटिज हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढू लागला. या बदललेल्या मानसिकतेकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया तसेच संसद सदस्यांना कानाडोळा करता येणार नाही. अॅलोपथी डॉक्टरांनी स्वत:ची जाहिरात केली तर तिचा खर्च ते रुग्णांच्या फीतून वसूल करतील अशीही भीती व्यक्त होते. पण या जाहिरातींमुळे रुग्णांना डॉक्टरांचे कौशल्य समजण्यास जी मदत होते तीही नजरेआड करुन चालणार नाही. त्यामुळे अॅलोपथी डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात सर्वकाळ करु देण्यास परवानगी देण्याचे पाऊल आता संबंधितांनी उचलायला हवे.
----
No comments:
Post a Comment