Wednesday, August 6, 2014

स्मिता तळवलकर यांच्या स्मृतिंना आदरांजली, त्यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक अाठवणी...




स्मिता तळवलकर यांच्या स्मृतिंना आदरांजली, त्यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक अाठवणी...
---------------
प्रख्यात अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे ५ अाॅगस्ट रोजी पहाटे मुंबईत निधन झाले. त्यांच्या स्मृतिंना आदरांजली. स्मिता तळवलकर यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक आठवणी मनात रुंजी घालत अाहेत.
(१) स्मिता तळवलकर या पुण्याच्या हुजुरपागा शाळेच्या माजी विद्यार्थीनी. या शाळेच्या माजी उपमुख्याध्यापिका सुशीलाताई बापट या माझ्या नातेवाईक. त्या १९४०च्या दशकातल्या राष्ट्रीय कबड्डीपटू देखील होत्या. सुशीलाताई यांना अाम्ही एबी मावशी या घरगुती नावाने हाक मारायचो. त्यांना भेटण्यासाठी पुण्यात बापट वाडीतील त्यांच्या घरी मी नेहमी जात असे. ही घटना फार जुनी नाही. २००७ सालातील असेल. असेच एकदा सुशीलाताईंकडे सकाळी गेलो असताना त्या म्हणाल्या, अाता माझी एक माजी विद्यार्थीनी येणार अाहे. थोड्या वेळाने पाहातो तर साक्षात स्मिता तळवलकर अापल्या शिक्षिकेस भेटण्यासाठी अावर्जून अाल्या होत्या. त्या दोघींच्या गप्पा रंगू लागल्या. मी फक्त श्रोत्याचे काम करीत होतो. थोड्या वेळाने सुशीलाताईंनी स्मिता तळवलकर यांच्याशी माझी ओळख करुन दिली. मी स्मिताताईंना पहिल्यांदाच भेटत होतो. त्यावेळी स्मिताताईंनी माझी विचारपूस केली. मी पत्रकार अाहे असे म्हटल्यावर त्या म्हणाल्या तुझे अावडते लेखक कोण? त्यावर मी उत्तरलो, की गो. नी. दांडेकर व त्यांच्या नंतरच्या पिढीतले भालचंद्र नेमाडे. स्मिता तळवलकरांचेही हे दोन्ही लेखक अावडते. तळवलकर यांनी गो. नी. दांडेकर यांच्या विषयी बर्याच अाठवणी मला सांगितल्या. त्यांच्या पुस्तकांची वैशिष्ट्येही त्या मला सांगत होत्या. गो. नी. दांडेकर हे प्रभावी किर्तनकारही कसे होते याविषयी स्मिताताईंनी त्यांच्या अाईकडून ऐकलेल्या आठवणीही त्यांनी समरसून सांगितल्या. आम्ही साधारण एक तास बोलत होतो. त्यानंतर त्या जायला निघाल्या. चतुरस्त्र स्मिताताईंचे त्यावेळी जवळून दर्शन झाले. सुशीला बापट या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या खास मैत्रिण. लतादिदिंच्या आठवणीही या गप्पांमध्ये सुशीलाताई व स्मिताताईंनी मला सांगितल्या. अामच्या नातेसंबंधातले श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे पाहिलेले चित्रपट व त्यांच्याशी झालेली भेट याचीही आठवण स्मिताताईंनी या गप्पांतच आवर्जून सांगितली होती. दिग्गजांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक नवा पैलू त्यानिमित्ताने मला कळला होता त्यावेळी. स्मिता तळवलकर गेल्या हे वृत्त जेव्हा कानी अाले त्यावेळी मी अाज सकाळी प्रख्यात साहित्यिका तसेच गो.नी. दांडेकर यांच्या सुपूत्री तसेच मृणाल देव-कुलकर्णी हिच्या मातोश्री वीणा देव यांच्याशी दूरध्वनीवर बोललो व त्यांना बापट वाडीतील वर उल्लेखलेल्या गप्पांची अाठवण सांगितली. त्या ही या सर्वांना ओळखत असल्याने त्यांनाही एकदम भरुन अाले. स्मिताताई तुम्ही दिलेल्या सुंदर अाठवणी मी कायम जपून ठेवेन.
(२) स्मिता ताईंशी दुसरी भेट झाली ती रुईया महाविद्यालयाने सादर केलेल्या रुईया नाका या कार्यक्रमाच्या निमित्ताने. स्मिता तळवलकर या रुईया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी. रुईया नाका हा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या दिग्गज कलाकारांनी सादर केला. त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी स्मिता तळवलकर महाविद्यालयात अालेल्या असताना अामची भेट रुईया नाक्यावरच झाली. तिथे डीपी हाॅटेलच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून अाम्ही २० मिनिटे पुन्हा गप्पा मारल्या होत्या. त्या गप्पांमध्ये त्यांचे रुईयातील दिवस, पुण्याच्या सुशीला बापट या त्यांच्या शिक्षिका अशा अाठवण निघाल्या. त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या चर्येवर अाजारपणाने अालेला थकवा काहीसा जाणवत होता. ते बघून मन चिंताग्रस्त झाले होते. अाणि अाज अखेर ती वाईट बातमी अालीच....
(३) स्मिता तळवलकर दादरला मातोश्री हाईटस या इमारतीत राहात होत्या. दादर पश्चिमेला असलेल्या डी. एल, वैद्य मार्गावर ही इमारत अाहे. याच परिसरात मी लहानाचा मोठा झाल्याने व अामच्याच इमारतीत सतीश पुळेकर हे दिग्गज अभिनेते राहात असल्याने त्यांच्याकडे येणारे कलाकार पाहाण्याची सवय तेव्हापासून होती. स्मिताताई अामच्या इमारतीत एक-दोनदा सतीश पुळेकरांकडे अाल्याचे मला चांगले स्मरते. त्या दादरकर असल्यानेही त्यांच्याविषयी वेगळा जिव्हाळा होताच. स्मिताताई तुमची आठवण सतत ताजी राहिल मनात...

No comments:

Post a Comment