Monday, August 11, 2014

सिरियाची असह्य होरपळ - दै. दिव्य मराठीच्या १० अाॅगस्ट २०१४च्या अंकामधील माझा लेख




दै. दिव्य मराठीच्या १० अाॅगस्ट २०१४च्या अंकात सिरिया या देशासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाची लिंक.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sameer-paranjape-article-about-syria-4709022-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/10082014/0/4/
---------
सिरियाची असह्य होरपळ
------
- समीर परांजपे.
paranjapesamir@gmail.com
-----------
इराक आणि सिरिया हे दोन्ही देश ज्वालामुखीच्या तोंडावर आहेत. या स्थितीस कारणीभूत आहे एकच दहशतवादी संघटना- ती म्हणजे आयएसआयएस. तिचे पूर्ण रूप आहे ‘इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया.’ आयएसआयएसच्या नावातच तिचे उघड उद्दिष्ट आहे. इराकवर चर्चा खूप होते, पण सिरियामधील घडामोडी तितक्याच गंभीर आहेत. सिरियातील सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेल्या रक्वा प्रांतावर आयएसआयएसने आपली पकड मजबूत केली आहे. हा प्रांत आता इस्लामी राज्य झाल्याचे ही संघटना सांगू लागली आहे. सिरियामधील बुद्धिजीवी वर्गात कट्टरपंथीयांच्या या शिरजोरीमुळे खळबळ माजणे स्वाभाविकच होते. सिरियाला अनेक आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत. तेथील सामान्य माणसांचे पोटापाण्यापासून पायाभूत सुविधांपर्यंतचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे तेथील जनमानस त्रस्त आहे. कावलेल्या मनाला कब्जात घेण्यासाठी आगखाऊ व जातीयवादी धार्मिक विचारांसारखे घातक हत्यार दुसरे नाही. नेमका त्याच हत्याराचा वापर आयएसआयएसने करून सिरियाला विळखा घातला आहे.
हे होण्याआधी रक्वा शहरातील वातावरण खूप मोकळे होते. तेथील अल अमसी चौकामध्ये पूर्वी तरुण जोडपी संध्याकाळी प्रेमगुंजन करताना दिसत. मात्र आता या चौकामध्ये दिसतात आयएसआयएसचे काळे झेंडे... हेच आयएसआयएसचे लोक चोरीचा केवळ आळ असलेल्यांचे जाहीरपणे हात छाटताहेत. महिलांना बुरखा घालण्याची सक्ती केली जातेय. धार्मिक बंधनांच्या नावाखाली स्वातंत्र्यावरच गदा आणली जात असल्याने सिरियातील नागरिकांचे आतल्या आत घुसमटणे होते. पण मन शेवटी कट्टरपंथी विचारांकडेच ओढ घेते. सिरियातून अनेक जण नोकरीधंद्यासाठी विदेशांत स्थलांतर करतात. त्यातून एक नवीन समस्या उद्भवली आहे. हे नागरिक जेव्हा काही काळासाठी मायदेशात परत येतात, त्या वेळी त्यांच्याशी दहशतवादी संपर्क साधतात. त्यातील जे गळाला लागतील त्यांना घातपाती कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. असे सिरियाचे नागरिक मग विदेशात गेल्यानंतर तेथे हिंसक कृत्ये घडवतात. अमेरिकेत राहणार्‍या सिरियाच्या नागरिकांकडे तेथील तपासयंत्रणा कायम संशयाने पाहत असतात.
जगात जिथे जिथे दहशतवाद फैलावला आहे, त्यामागे अमेरिकेचा छुपा हात असतो, ही आता उघड गोष्ट आहे. सिरियातील आयएसआयएसच्या कारवायांमागे अमेरिकेचे काही हितसंबंध दडले आहेत का, याचा प्रसारमाध्यमे कायम शोध घेत असतात. सिरियामध्ये गेल्या मे महिन्यात मोनेर मोहंमद अबुसल्हा या 22 वर्षांच्या युवकाने स्फोटकांनी भरलेला ट्रक एका रेस्टॉरंटवर धडकवून भीषण आत्मघाती हल्ला केला. हा मोनेर राहायचा अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये. तेथे उत्तम बास्केटबॉलपटू म्हणून त्याने नाव कमावले होते. असे अचानक काय झाले, की मोनेर दहशतवादी बनला? अमेरिकेतून मोनेर काही महिन्यांसाठी सिरियात परतला होता. त्या वेळी त्याच्याशी नुसरा फ्रंटच्या दहशतवाद्यांनी संधान बांधून त्याला घातपाताचे प्रशिक्षण दिले. बहुतेक अमेरिकेत दहशतवादी कारवाया करणे त्याला शक्य झाले नाही, मग तो पुन्हा सिरियात परतला व तेथे त्याने आपले प्रताप दाखविले. मोनेर मोहंमद अबुसल्हा याच्यावर एफबीआयची करडी नजर होती, असे म्हणतात. पण त्याला जेरबंद करण्यात आले नाही. असे करण्यात अमेरिकेचे काही छुपे हेतू होते का, अशी चर्चा आता दबक्या आवाजात होत आहे.
सिरियात 2000 सालापासून बसर हफीझ अल असाद हे राष्ट्राध्यक्षपदी आहेत. त्यांची राजवट अमेरिका व युरोपीय देशांस फारशी पसंत नाही. असाद यांच्या सरकारच्या विरोधात आयएसआयएसने जो रक्तरंजित संघर्ष चालवला आहे, त्याबद्दल या संघटनेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई करण्याचे अमेरिकेने कधीच फारसे मनावर घेतलेले नव्हते. असाद यांच्या राजवटीत पोलिस खात्यात छायाचित्रकार म्हणून काम करणार्‍या एका गृहस्थाने काही दिवसांपूर्वी आपण काढलेल्या अनेक छायाचित्रांना उजेड दाखविला. अपघात, इमारतींना लागलेली आग, कधी कधी मरण पावलेले कैदी असे त्याच्या छायाचित्रांचे विषय असायचे. मात्र काही वर्षांपूर्वी तुरुंगात मरण पावणार्‍या कैद्यांची संख्या अचानक वाढू लागली. या मृत कैद्यांत लहान मुले, महिला, वयस्क नागरिकांचा समावेश होता. या कैद्यांना अचानक मृत्यूला का सामोरे जावे लागले असेल, त्यामागील कारणांचा हा छायाचित्रकार शोध घेऊ लागला. त्या वेळी असे आढळले की, असाद यांच्या राजवटीत तुरुंगात डांबलेल्या विरोधकांचा पद्धतशीररीत्या काटा काढला जात होता. त्यातूनच तेथील तुरुंगात मरण पावणार्‍यांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती.
असाद सरकार व आयएसआयएस यांच्या संघर्षात सर्वात अधिक परवड होतेय ती तेथील महिला व लहान मुलांची. ही व्यथा लिस डॉसेट यांनी सिरियावर बनविलेल्या एका लघुपटात अचूकपणे टिपली गेली आहे. सिरियात बालकांच्या हास्यापेक्षा गोळीबार, स्फोटांचे आवाजच वातावरणात भरून राहिलेत. सिरियातील मुलांचे बालपण या हिंसक वातावरणात करपले गेलेय. त्या देशातील किफाह हा तेरा वर्षे वयाचा मुलगा. तो या लघुपटात एकच गोष्ट सतत सांगताना दिसतो... ‘आम्हाला खायला पोटभर अन्न मिळत नाही...’ एका लहान मुलीला आपल्या अभ्यासातील गोष्टींपेक्षा सिरियामध्ये दहशतवाद्यांच्या हातात असलेल्या शस्त्रांची नावे तोंडपाठ आहेत, हे पाहून आपल्याला धक्का बसतो. असाद सरकारच्या राजवटीत सिरियातील मुलांवर जे अत्याचार सुरू आहेत, त्याबद्दल तेथील नागरिकांच्या मनात खंत जरूर आहे. ते असाद सरकारविरुद्ध दबक्या आवाजात तक्रारीचा सूर लावतात, पण आयएसआयएस या संघटनेच्या घातपाती कारवायांविरोधात काहीही बोलत नाहीत. ही विसंगती उबग आणणारी आहे. सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये असाद यांचे सैनिक व दहशतवादी यांच्यात चकमकी घडत असतात. थोड्याफार फरकाने सार्‍या देशभरातच हे चित्र आहे. असाद यांना अध्यक्षपदावरून हटवून सत्तेचे सुकाणू आपल्या हाती घेण्याची आयएसआयएसची धडपड आहे. कुणीही कुणावर ताबा मिळवला तरीही त्यांचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत सिरिया जळतच राहणार आहे.


No comments:

Post a Comment