Saturday, July 26, 2014

सनातन हिंसाचाराची गाझापट्टी - दै. दिव्य मराठीच्या २७ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख.




इस्रायल अाणि पॅलेस्टाईनमधील हमास ही दहशतवादी संघटना यांच्यातील संघर्ष पुन्हा टीपेला पोहोचला अाहे. त्याची माहिती देणारा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या २७ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या टेक्स्ट व पेज लिंक तसेच जेपीजी फोटो पुढे दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sameer-paranjpe-article-about-gaza-attack-4694004-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/27072014/0/4/
----------------
सनातन हिंसाचाराची गाझापट्टी
---------------
समीर परांजपे | Jul 27, 2014,
----------------
इस्रायल व पॅलेस्टाइनमधील सनातन संघर्षाला पुन्हा उकळी फुटली. ‘पॅलेस्टाइनमधील हमास संघटनेचे दहशतवादी आमच्या प्रदेशावर क्षेपणास्त्र हल्ले चढवत आहेत. त्यामुळे स्वरक्षणासाठी गाझा पट्टीवर प्रतिहल्ले चढविणे क्रमप्राप्त आहे,’ अशा शब्दांत इस्राएलने स्वसमर्थन केले. गाझा पट्टीवर 15 जुलैच्या रात्रीपासून इस्राएलने क्षेपणास्त्र हल्ले चढविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर इस्रायली लष्कराच्या पायदळाने आक्रमक कारवाई सुरू केली. गाझा पट्टीतील शौजिया येथे इस्रायली पायदळाने 18 जुलै रोजी आणखी जोरदार चढाई केली. गाझा हे शहर दाटीवाटीच्या लोकसंख्येचे आहे. सुमारे 20 लाख पॅलेस्टाइन नागरिक तिथे राहतात. इस्राएलने गाझा पट्टीवर हल्ले चढविण्याआधी लष्करी विमानांतून काही हजार पत्रके त्या भागात फेकली. त्या पत्रकांत लिहिले होते, ‘गाझा शहरातील काही भागांचा हमास दहशतवाद्यांनी कब्जा केला असून तेथून ते इस्रायली हद्दीत क्षेपणास्त्रे डागतात. ज्या भागात दहशतवादी आहेत, तो भाग सोडून गाझाच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे. असे न केल्यास इस्राएलने केलेल्या प्रतिहल्ल्यात जी मनुष्यहानी होईल त्याची जबाबदारी गाझा नागरिकांवरच असेल. आमचे लक्ष्य आहेत फक्त ‘हमास’चे दहशतवादी.’ गाझा पट्टीवर इतका मोठा प्रतिहल्ला इस्राएलने गेल्या पाच वर्षांत केलेला नव्हता. गाझा पट्टीतील भूभागात ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी जमिनीखाली मोठमोठाली भुयारे खणली आहेत. इस्राएलवर हल्ले चढवून दहशतवादी आपल्या संरक्षणासाठी या भुयारांचा आश्रय घेतात. ही भुयारे उद्ध्वस्त करण्यासाठीही इस्राएलने क्षेपणास्त्रांचा मारा केला. गाझा पट्टीवर चढविण्यात आलेल्या हल्ल्यांच्या कारवाईत काही हजार इस्रायली सैनिक सहभागी आहेत. 15 जुलैच्या आधी दहा दिवसांपासून हमास दहशतवाद्यांनी इस्राएलवर क्षेपणास्त्रे डागायला सुरुवात केली होती. इस्राएलनेही त्या हल्ल्यांना उत्तर दिले. मात्र नंतर इस्राएलने प्रतिहल्ले अधिक तिखट केले. हा संघर्ष तुंबळ होऊ लागला. हमास व इस्राएल यांच्यामध्ये शस्त्रसंधी व्हावी म्हणून 2012मध्ये इजिप्तने केलेल्या प्रयत्नांना तेव्हा यश आले होते. पण त्या शस्त्रसंधीचे कंबरडे गेल्या काही दिवसांत मोडले गेले आहे. इजिप्तने पुन्हा दोन्ही बाजंूमध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. इस्राएल व पॅलेस्टाइनमध्ये शस्त्रसंधी पुन्हा होईल किंवा न होईल यापेक्षा तिथे भविष्यात कायमची शांती प्रस्थापित होईल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुंबळ संघर्ष किती व्हावा, याला काही प्रमाण नसते. अधिकाधिक हिंसाचार हीच या संघर्षामागची रक्तरंजित कहाणी असते. ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांत इस्रायली प्रांतामध्ये दीड हजार रॉकेटचा तर इस्राएलने गाझा पट्टीत दोन हजारांहून अधिक रॉकेटचा मारा केला. त्यात गेल्या काही दिवसांत गाझा पट्टीमध्ये मोठी मनुष्यहानी झाली. तेथील 700हून अधिक लोक प्राणाला मुकले व 4000हून अधिक जखमी झाले. इस्राएलचा सीमावर्ती भाग व गाझा पट्टीमध्ये मृत्यूचे तांडव अधूनमधून सुुरूच असते. इतिहासातील अनेक दुखणी काढून वर्तमानात माणसे मारली जातात. पुन्हा शांततेच्या नावाखाली दोन्ही बाजू काही काळ गपगार होतात. पुन्हा कोणीतरी कळ काढते. मग एकमेकांची माणसे मारण्याचा क्रूर खेळ सुरू होतो. धुमसत्या प्रदेशांचे असेच असते. दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. इस्राएलमधील येहूद शहरात द्रोर खेनीन हा 37 वर्षांचा गृहस्थ हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात मारला गेला. हल्ला झाला तेव्हा तो इस्राएली सैनिकांना जेवण पुरविण्याच्या सेवेत गर्क होता. इस्राएलमध्ये हे दृश्य होते, तर गाझा पट्टीतही वेगळे चित्र नव्हते. इस्राएलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार निष्पाप पॅलेस्टाइन मुले मारली गेली. गाझा पट्टीतील शाळा, सरकारी कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये आदी भरवस्तीतील सार्वजनिक इमारतींच्या आड हमास दहशतवाद्यांनी तळ उभारले आहेत. तेथून हमास दहशतवादी इस्राएलवर रॉकेट हल्ले चढवितात. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राएलने चढविलेल्या हल्ल्यात या इमारती लक्ष्य ठरणे हे ओघाने आलेच. त्यामुळे हमास दहशतवाद्यांनी कब्जा केलेल्या भागांतून हजारो पॅलेस्टाइन नागरिकांनी गाझा पट्टीतीलच जरा अधिक सुरक्षित जागी स्थलांतर केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी गाझा पट्टीत उभारलेल्या 49 छावण्यांमध्ये 61 हजार विस्थापितांनी आसरा घेतला आहे. इस्राएल-पॅलेस्टाइनमध्ये पुन्हा हिंसाचाराची आग पेटली म्हटल्यावर अमेरिका, संयुक्त राष्ट्रे नेहमीप्रमाणे ती विझवायला धावली. मुळात पॅलेस्टाइनची भूमी बळकावून इस्राएलला जन्माला घालून आग लावली अमेरिकेने. त्या वेळी अमेरिकेच्या दादागिरीसमोर संयुक्त राष्ट्रांची दातखीळ बसली होती. आताही अमेरिकेचे वर्चस्व सोसतच संयुक्त राष्ट्रे हिंसाचाराविरोधात निषेधाचा कणसूर लावत आहेत. अशा इशार्‍यांना इस्राएल जुमानणार नाही आणि इस्राएलला धडा शिकविण्याची हमासच्या दहशतवाद्यांच्या हृदयातील आग लवकर काही विझणार नाही, हे मागच्या हमरीतुमरींवरून दिसून आले आहे. वाद भूप्रदेशाचा, अस्मितेचा... बराच काळ चिघळत राहिलेला.... म्हणूनच तो आता सनातन बनला आहे.
(sameer.p@dbcorp.in)

No comments:

Post a Comment