दै. दिव्य मराठीच्या 3 डिसेंबर 2017च्या रसिक या रविवार पुरवणीमधे प्रसिद्ध झालेला माझा लेख. या लेखाचा मजकूर, वेबपेज लिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/03…/0/4/
---
तमाशा जगवणारा माणूस
------------------------------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----------------
इंट्रो : मधुकर नेराळे म्हणजे तमाशा कलेचा ज्ञानकोश. त्या कलेविषयी नुसते पढतपांडित्य असलेला हा गृहस्थ नाही तर प्रत्यक्ष त्या मैदानात उतरून तमाशा कला जिवंत राहावी म्हणून झगडलेली ही असामी आहे. नेराळे यांना राज्य शासनातर्फे विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने मधुकर नेराळे यांच्याशी साधलेला हा सहजसंवाद.
------------------------------
‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुनाची?’ ही लावणी कुठेही ऐकली तरी ओठांवर नाव येत, ते विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचेच. त्यांनी ही लावणीच काय तर संपूर्ण तमाशा कलाच अजरामर केली. अशा या खऱ्या अर्थाने तमाशासम्राज्ञी ठरलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या नावे महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला जीवनगौरव पुरस्कार यंदाच्या वर्षी तमाशा कलेच्या वृद्धीसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे हनुमान तमाशा थिएटरचे चालक मधुकर नेराळे यांना जाहीर करण्यात आला. तमाशा कलेत जीव ओतणाऱ्या कलावंतांच्या नावे असलेला पुरस्कार तमाशा कलेसाठी जीव पाखडणाऱ्या व्यक्तीला प्रदान होणार असल्याने जणू एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.
मधुकर नेराळे म्हणजे तमाशा कलेचा ज्ञानकोश. त्या कलेविषयी नुसते पढतपांडित्य असलेला हा गृहस्थ नक्कीच नाही. तर प्रत्यक्ष त्या मैदानात उतरून तमाशा कला जिवंत राहावी म्हणून झगडलेली ही झपाटलेली असामी आहे. त्यामुळे तत्वज्ञान व व्यावहारिक ज्ञान यांचा सुरेख संगम साधणारे त्यांचे तमाशाविषयक अनुभव ऐकणे म्हणजे बहर आणि बहार असा दुहेरी मामला आहे.
ज्यांच्या नावे त्यांना पुरस्कार जाहीर झाला, त्या विठाबाई नारायणगावकरांच्या आठवणींपासूनच संवाद सुरुवात झाली. मधुकर नेराळे गतस्मृतींना उजाळा देत सांगू लागले, `विठाबाई या तमाशा कलेतील कलंदर व्यक्तिमत्व. लावणी सादर करताना त्या स्वत:च्याच विश्वात हरवून ज्यायच्या. बापू मांग नारायणगावकर हे विठाबाईंचे वडील. त्यांचा स्वत:चा तमाशा फड होता. भाऊंच्या निधनानंतर मात्र विठाबाईंनी स्वत:चा तमाशा फड उभा केला. माझ्या वडिलांचाही एकेकाळी तमाशाफड होता. त्यामुळे भाऊ बापू मांग नारायणगावकरांपासून विठाबाईंपर्यंत साऱ्यांचेच नेराळे कुटुंबियांशी स्नेहाचे संबंध होते.'
`मी लहानपणी पं. राजारामजी शुक्ल यांच्याकडे काही वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले होते. मला गाण्याचे अंग आहे हे विठाबाईंना माहिती होते. कधी त्यांचा रंगभवनमध्ये कार्यक्रम असेल तर त्या मला हातात माईक देऊन एखादी लावणी गायला सांगायच्या. त्या लावणीवर स्वत: अदाकारी सादर करायच्या. विठाबाई नारायणगावकर असो किंवा महाराष्ट्रातील कोणताही तमाशा फड त्यांना मदत करणे हे मी माझे कर्तव्यच समजत आलेलो आहे. विठाबाईंना मी कधीही आर्थिक मदत केलेली नाही. मात्र त्यांना कधी मुंबईत असताना त्यांच्या फडासाठी काही सामान लागले, वस्त्रेप्रावरणे लागली तर ती ते आमच्याकडून घेऊन जात असत. काम झाले की ते सामान त्या परत आणून देत.'
`एकदा मी दिल्लीला काही कामासाठी गेलो असताना संगीत नाटक अकादमीत गेलो होतो. तेथील गृहस्थांना मला बघताच आनंद झाला. ते म्हणाले की, आम्ही विठाबाई नारायणगावकरांना अकादमीचा पुरस्कार देण्याचे ठरविले आहे पण त्यांचा पत्ताच आमच्याकडे नाही! तो तुम्ही द्याल का? मलाही ही बातमी ऐकून आनंद झाला. मी संगीत नाटक अकादमीला विठाबाई नारायणगावकरांचा नारायणगावचा पत्ता दिला मग त्यांना पुरस्काराचे अधिकृत पत्र संगीत नाटक अकादमीने पाठविले. संगीतकार भास्कर चंदावरकर हे संगीत नाटक अकादमीवर होते. त्यांनी अकादमीच्या पुरस्कारासाठी विठाबाईंचे नाव सुचविले होते हे नंतर मला कळले. संगीत अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी नारायणगावला विठाबाईंकडे गेलेलो असताना त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कार सोहळ्यासाठी मी दिल्लीला त्यांच्याबरोबर यावे. पण त्यांनी या सोहळ्यासाठी स्वत:च्या कुटुंबियांना सोबत घेऊन जावे असे नम्रपणे सांगून मी त्यांना नकार दिला.'
विठाबाईंच्या नावाने राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार एका वर्षी त्यांच्या कन्या मंगला बनसोडे करवडीकर यांनाही मिळाला होता ही आठवण करुन देताच मधुकर नेराळे यांच्या चेहऱ्यावर आनंदछटा उमटली. विठाबाईंच्या आठवणींमध्ये रंगलेला हा संवाद आता महाराष्ट्रातील तमाशा कलेची परंपरा व सध्याची स्थिती या विषयावर आला होता.
मधुकर नेराळे यांचे वडिलोपार्जित हनुमान तमाशा थिएटर असल्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशासोबत नेराळे यांची नाळ आपोआप जोडली गेली. त्यांच्या या थिएटरमध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत अनेक तमाशा फडांनी रसिकांना मोहविले आहे. सन १९६९ मध्ये मधुकर नेराळे यांनी जसराज थिएटर ही संस्था स्थापन करुन तिच्या मार्फत ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून किर्तन वरुन तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पुनवेची रात्र’, ‘काजळी’ या सारख्या वगनाटयांचे सादरीकरण केले. मुंबई महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी कला प्रदर्शन केले. १९९० ते १९९६ पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या शिबिरांतून त्यांनी सुमारे १५० हून अधिक तमाशा कलावंत घडविले आहेत. अनेक तमाशा कलावंतांना कारकिर्द सुरु करण्यासाठी मोलाची मदत केली आहे. लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्याबरोबर रंगमंचावर काम करण्याची संधी मधुकर नेराळे यांना संधी लाभली होती. हे सारे अनुभव गाठीशी बांधून मधुकर नेराळे तमाशाचे वर्तमान व भविष्य याकडे पाहात असतात.
मधुकर नेराळे सांगू लागले, ‘तमाशा कलावंतांचे आर्थिक प्रश्न आहेतच पण सरकारी जे नियम आहेत तेही अडथळा बनून उभे आहेत. त्या नियमांपैकी रात्री १० वाजता लाऊडस्पीकर बंद करणे हा एक मोठा अडथळा आहे. तमाशाच्या फडाचे तंबूमध्ये जे कार्यक्रम चालतात तिथे लाऊडस्पीकर लावले तरी त्याचा आवाज बाहेर जातोच ना. हे लाऊडस्पीकर रात्री दहा वाजता बंद करायलाच हवेत म्हणून पोलिसांनी केलेली दादागिरी सहन करावी लागते. मग पोलिसांना मॅनेज करुन कसातरी तो तमाशा फडाचा कार्यक्रम दहानंतर पुढे चालवायचा असे सगळे करावे लागते ही सध्याची मोठी समस्या आहे. दुसरी समस्या आहे ती म्हणजे तमाशा फडाच्या प्रत्येक दिवसाचे लायसन्स वेगळे काढावे लागते. परफॉर्मन्स लायसन्स, तिकिट सेलिंग लायसन्स, प्रिमायसेस लायसन्स असे बरेच असते. आम्ही मागे मागणी केली होती की, तिकिट सेलिंग लायसन्स हे एकाच जिल्ह्यामध्ये अख्ख्या जिल्ह्याचे द्यावे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिकिट सेलिंग लायसन्स वेगळे काढावे लागते त्याऐवजी अख्ख्या जिल्ह्याला दिल्यानंतर ते कुठेही चालण्यासारखे आहे. परफॉर्मन्स लायसन्स जिथे कार्यक्रम असतो त्या तहसीलदाराकडून काढून घ्यावे लागते हे ठीक आहे. पण तिकिट सेलिंग आणि प्रिमायसेस लायसन्स जे आहे ते अख्ख्या जिल्ह्याचे एकाच ठिकाणी द्यावे किंवा महाराष्ट्रातून अशी लायसन्स मिळण्याची एकाच ठिकाणी सोय व्हावी. म्हणजे त्याकरिता जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लायसन्स काढावी लागतात, त्याच्यासाठी जी माणसे गुंततात, पैसा अडकतो व शेवटी पैसा दिल्याशिवाय लवकर काम होतच नाही ते सारे व्याप वाचतील. कारण तमाशाचे कार्यक्रम कसे आहेत की जरी आधी ठरवलेले असले तरी ऐनवेळी कार्यक्रमाचे ठिकाण बदलले की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नव्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करावे लागतात. तिथे लायसन्स नसतेच. मग त्यासाठी पुन्हा सरकारी अधिकाऱ्याला जाऊन भेटायचे म्हटले की भ्रष्टाचार आलाच. या साऱ्या मागण्या सरकारकडे करुनही १५ वर्षे झाली पण त्याचा विचार काही झाला नाही.'
नेराळे म्हणाले `तमाशा कलावंत आणि फड मालक असे दोन वेगवेगळे घटक दिसतात पण १९५७ पर्यंत ते एकत्र होते. त्यावेळी ते सहकारी तत्वावर तमाशा चालवायचे. म्हणजे जे काही उत्पन्न येईल ते सगळेजण सारखे वाटून घ्यायचे. पण १९५७ नंतर फड मालक व कलावंत हे वेगवेगळे घटक झाल्याने कलावंत हे पगारी झाले. फडमालक कलावंतांना पगार देणार व त्यांना कामाला ठेवणार. तमाशा फडांचा सीझन असतो त्यात त्यांचा २१० दिवस धंदा असतो म्हणजे दसऱ्यापासून अक्षयतृतीयेपर्यंत. ते त्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करतात. या २१० दिवसांमध्ये कलावंतांना जो पगार मिळतो त्यात हे २१० दिवस सोडल्यानंतर उरलेले जे दिवस आहेत त्यातील चार महिने म्हणजे पावसाळ्यात तमाशा फडांचे कार्यक्रम होत नाहीत. गणेशोत्सवाच्या काळात दहा पंधरा दिवस झाले कार्यक्रम झाले तर. त्यामुळे या चार महिन्यांसाठी तमाशा फड मालक कलावंतांना जी रक्कम देत असतात त्याला तमाशा क्षेत्रात उचल असे म्हणतात. ती रक्कम फेडायची असते. दसऱ्यापासून ते अक्षयतृतीयेपर्यंतच्या २१० दिवसांमध्ये जो पगार कलावंतांना मिळतो त्यातून ही उचल रक्कम फेडायची असते. पण ही रक्कम कलावंतांकडून फेडली जात नाही. म्हणून पुढच्या वर्षासाठी पुन्हा कलावंतांना रक्कम द्यावी लागते. असे केल्यामुळे तमाशा फड मालकाकडून घेतलेल्या पैशाचे ओझे कलावंतांच्या डोक्यावर वाढत जाते. या सगळ्या दुश्चक्रामुळे त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांना वेठबिगारासारखे राबविले जाते. त्या कलावंतांच्या कलात्मक गुणवत्तेचे अस्तित्व लक्षात ठेवले जाते. या कलावंतांना कायद्याचे कोणतेही आर्थिक संरक्षण नाही. जे तमाशा फडमालक आहेत हे कलावंतांमधूनच आलेले असतात. तमाशा फड मालकांकडेही पैशाची फार सोय नसते. मग २०१ दिवसांतले जे यात्रेचे कार्यक्रम असतात ते तमाशा फड मालक ठेकेदारांना िवकतात. त्याच्या बदल्यात ते अॅडव्हान्स रक्कम ठेकेदारांकडून घेतात. हीच रक्कम तमाशा फड मालक कलावंतांना वाटतात. त्यामुळे तमाशा फड मालकाकडील रक्कमही त्यामुळे जवळजवळ संपुष्टात येते. त्यामुळे दरवर्षी ठेकेदाराकडून पैसे मिळाले तर तमाशा फड मालक कलावंतांना पैसे वाटू शकतो. ही तमाशा फड मालकाची अवस्था असते. त्यामुळे नरेंद्र तिडके कामगारमंत्री असताना आम्ही कामगार मंत्रालयाला एक कायदा करायला सांगितला होता. त्यावेळी मी तमाशा कला-कलावंत विकास मंदिर या संस्थेचा कार्याध्यक्ष होतो, अजूनही आहे. त्या कायद्यासंदर्भातील प्रस्तावात आम्ही म्हटले होते की, तमाशा कलावंतांना बारमाही पगार मिळावा म्हणजे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायला बरे पडेल. आठ महिने काम करुन त्यांना बारा महिन्याचा पगार कसा देणार? आठ महिन्यामध्ये कलावंतांना एकही सुट्टी देत नाहीत. या कलावंतांना आठवड्यातून शनिवार व रविवार अशी सुट्टी धरली तर आठ महिन्याचे ६४ दिवस सुट्टीचे होतात म्हणजे दोन महिन्यापेक्षा थोडे जास्त. त्यामुळे आठ महिन्यांसोबतच या दोन महिन्यांचा कलावंतांना अतिरिक्त पगार देण्यात यावा. शेवटी कलाकार हे कामगार म्हणूनच धरले जातात. त्यामुळे त्यांना आठवड्यातून सुट्टी ही त्यांना मिळालीच पाहिजे. आता उरलेले अजून दोन महिने. त्यात गणेशोत्सवाचे १५ दिवस कार्यक्रम होतात. त्यावेळी कार्यक्रम कितीही होवो कलावंतांना त्या महिन्याचा पगार द्यावा आणि फड मालकाला मिळालेल्या आर्थिक फायद्यातून उरलेल्या अजून एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा. असे चार महिन्याचे चार पगार वाटून दिले तर कलावंतांना तमाशा फड मालकाकडून उचल घेण्याची गरज पडणार नाही. यासाठी कायदा करावा व कलावंतांना संरक्षण द्यावे. शेवटी माणूस कायद्याला घाबरतो. पण त्यावेळच्या सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे तमाशा फडमालक व कलावंतांना आर्थिक संरक्षण नाही. आताच्या राज्य सरकारने हा कायदा करायला हवा. '
तमाशा क्षेत्रातील लोकांसाठी असलेला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार पुरस्कार फक्त तमाशा क्षेत्रातील लोकांनाच का दिला पाहिजे, इतर क्षेत्रातील लोकांना का द्यायचा नाही असा वाद यंदाच्या वर्षी सुरु होता. त्याबाबत मधुकर नेराळे म्हणाले की, या वादाशी मी सहमत नाही. तुम्ही लता मंगेशकर पुरस्कार नाट्य परिषदेच्या माणसाला द्याल का? लोककलावंतांना द्याल का? मग तमाशा क्षेत्रातील पुरस्कार तमाशा क्षेत्रातल्याच लोकांना का द्यायचा नाही? त्यामुळे यंदा याबाबत झालेला वादच चुकीचा होता असे माझे स्पष्ट मत आहे.
मधुकर नेराळे हे पठ्ठे बापूराव साहित्य संगीत लोककला अकादमीचे सदस्य व अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे कार्याध्यक्षही आहेत. नेराळे यांनी यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. तमाशा कलेविषयी बोलताना ते एखाद्या तरुणाच्या उत्साहाने बोलतात. त्यांच्या या बोलण्याला एक वजन आहे कारण त्यांनी तमाशासाठी खूप महत्वाचे कार्य केले आहे. या समर्पित व्यक्तिच्या पाया पडून तेथून जाणे मग साहजिकच होते नाही का?