Sunday, December 10, 2017

जिंगलचा जादूगार - लुईस बँक्स - दै. दिव्य मराठी दि. १० डिसेंबर २०१७. - समीर परांजपे

लुईस बँक्स या भारतीय जाझ संगीतक्षेत्रातील पितामहाबद्दल त्यांचे मित्र व संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संवाद सांगून त्यावर आधारित मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या १० डिसेंबर २०१७च्या रसिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची वेबपेजलिंक व टेक्स्ट व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-HDLN-sameer-paranjape-write-about-louis-baoks-5765555-PHO.html
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/10122017/0/4/
---
जिंगलचा जादूगार
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
लुईस बँक्स म्हणजे भारतीय जॅझ संगीताचे पितामह. पाश्चिमात्य संगीतावर विलक्षण प्रभुत्व असलेल्या लुईस यांनी आपल्या संगीताने त्यांनी रसिकांना व स्वत:ला चिरतरुण ठेवले. अशा या असामीच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या बातमीवर अनेकांचा विश्वास बसला नाही. पण ते खरे होते. त्यानिमित्त मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनेक नामवंत गायक-वादकांनी आपली कला सादर करुन लुईस बँक्सच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला मानाचा मुजरा केला. त्या लुईस बँक्स यांच्या सांगितिक कारकिर्दीबद्दल त्यांचे मित्र संगीतकार अशोक पत्की यांच्याशी साधलेला हा संवाद.
---
`मिले सूर मेरा तुम्हारा...' या साडेतीन मिनिटांच्या जिंगलचे सूर निनादू लागले दूरदर्शनवरुन १९८८ साली. सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला या गाण्याने. मिले सूर मेरा तुम्हाराचे मुळ कडवे हिंदीतून लिहिले होते प्रसून पांडे यांनी. तेच कडवे आणखी १२ भाषांत अनुवादित करण्यात आले. विविध भाषांमध्ये नामवंत गायकांनी आळवलेल्या `मिले सूर मेरा तुम्हारा' या जिंगलची मुळ भैरवीतील चाल बांधली होती प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांनी. ही जिंगल जेव्हा सुरू होते तो प्रारंभीचा वाद्यमेळ, प्रत्येक भाषेतील कडव्यामध्ये येणारा तसेच हे गाणे जेव्हा अंतिम चरणापर्यंत येते तेव्हा कानावर पडणारा वाद्यसाज ही म्युझिक अॅरेंजमेंटची सगळी किमया होती लुईस बँक्स यांची. त्यांचे संगीतातील कर्तृत्व विविधांगी आहे. लुईस बँक्स म्हणजे जिंगल्सचा जादूगार. लुईस बँक्स म्हणजे भारतीय जॅझ संगीताचे पितामह. पाश्चिमात्य संगीतावर विलक्षण प्रभुत्व असलेल्या लुईस यांनी आपल्या संगीताने त्यांनी रसिकांना व स्वत:ला चिरतरुण ठेवले. अशा या असामीच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या बातमीवर अनेकांचा विश्वास बसला नाही. पण ते खरे होते. त्यानिमित्त मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उस्ताद झाकिर हुसेन, शंकर महादेवन, शिवमणी, रवी चारी, राकेश चौरसिया, जीनो बँक्स, श्रीधर पार्थसारथी, शेल्डन डिसिल्व्हा आणि कार्ल पीटर्स आदी नामवंतांनी आपली कला सादर करुन लुईस बँक्सच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला मानाचा मुजरा केला.
`मिले सूर मेरा तुम्हारा' असे लुईस बँक्सबरोबर ज्यांचे सुरेल नाते जुळले ते संगीतकार अशोक पत्की यांची सांगितिक वाटचाल एकमेकांना समांतर अशीच आहे. अशोक पत्की यांनी आजवर दहा हजार जाहिरातींच्या जिंगल्स तयार केल्या तर लुईस बँक्स यांनी पंधरा हजार जाहिरातींच्या जिंगल्स. अशोक पत्की लुईस बँक्स यांच्या नादमयी आठवणी सांगू लागले `मिले सूर मेरा तुम्हारा या जिंगलच्या १३ भाषांतील कडव्यांचे ध्वनिमुद्रण पूर्ण झाले. सगळ्या भाषांतील कडव्यांचे तुकडे आम्ही रेकॉर्ड केले होते. हे सारे मग लुईस बँक्स यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या जिंगलचे पहिल्यापासून टेक ऑफ घेणे व तिला क्लायमेक्सला नेऊन सोडणे हे काम लुईस बँक्सनी अप्रतिमरित्या केले आहे. प्रत्येक भाषेतील कडव्यांना चपखल बसेल असे म्युझिक अॅरेंजमेंट त्यांनी केले. या जिंगलसाठी जर तुम्ही मला शंभर गुण देणार असाल तर लुईस बँक्स यांना दोनशे गुण दिले पाहिजे. एखादे कमळ फुलते त्याप्रमाणे त्यांच्या म्युझिक अॅरेंजमेंटने ही जिंगल बहरली आहे.'
`लुईस हे मुंबईत येण्यापूर्वी कोलकातात हॉटेलमध्ये जॅझ बँडमध्ये वाजवायचे असे मला कळले होते. मनोहरीसिंग हे आर. डी. बर्मन यांचे अॅरेंजर होते. ते व लुईस बँक्स हे नातेवाईक. मनोहरीसिंग यांनी लुईसना मुंबईत आणले. तेव्हा आर. डी. बर्मन यांचा जमाना होता. आर. डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्यांमधे वाद्यवादन करण्याचे काम लुईस करु लागले. मीही आर.डी. कडे दहा वर्षे काम केले आहे. शोलेपर्यंत मी आरडीकडे होतो. आरडीकडेच माझी लुईस बँक्सशी ओळख झाली. मला स्वतंत्रपणे जिंगल करण्याचे काम मिळाले की मग लुईसला सांगायचो की जरा माझ्याकडे वाजवायला ये. तेव्हा या वाद्यवादनाचे मानधन मिळायचे साडेसातशे रुपये. १९८०चा हा काळ होता. तेव्हा ही मानधनाची रक्कम मोठीच होती. लुईस काय किंवा फ्रँको, झरीन दारुवाला, हरिप्रसाद चौरसिया असे त्यावेळचे अनेक वादक माझ्याकडे काम करायला प्रेमाने तयार व्हायचे. लुईस बँक्सचे यांचे वैशिष्ट्य असे की ते पाश्चिमात्य संगीतात माहिर होते. संगीतात जे जे नवीन तंत्रज्ञान यायचे ते बँक्स लगेच आत्मसात करायचे. पाश्चिमात्य वाद्य कसे वाजवायचे हे शिकण्यासाठी लोक लुईस यांच्याकडे आवर्जून यायचे. बँक्स सिंथेसायझरची कॉड कसे देतात हे पाहाणेही खूप काही शिकवून जायचे. लुईस बँक्स व केरसी लॉर्ड हे आर.डी.कडे सिंथेसायझर वाजवायचे. लुईस बँक्स यांना संगीतातल्या नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. आपल्याला पाश्चिमात्य संगीत उत्तम येते या गोष्टीवरच ते समाधानी राहिलेत असे कधी झालेले नाही. त्यांना आपल्याकडील संगीताचे ज्ञान दुसऱ्यांना देण्यात आनंद वाटतो. मीही त्यावेळी थोडेफार सिंथेसायझर वाजवायचो. त्यावेळी मग ते मला आवर्जून सांगायचे की सिंथेसायझरची अमुक एक कॉड वाजविली की हा स्वर मिळतो, दुसरी कॉड वाजविली की अजून वेगळा स्वर मिळतो वगैरे...जेव्हा ते मी संगीत दिलेल्या जिंगलमध्ये वाद्यवादनासाठी यायचे तेव्हा आवर्जून विचारायचे की ही जिंगल कोणत्या रागात बनविली आहे? कोणत्या पद्धतीने ती गायली जाणार आहे? लुईस बँक्स हे ज्या जिज्ञासूपणे हे प्रश्न विचारायचे त्याचे कारण त्यांची विनम्रता व सतत वेगळे शिकत राहाण्याचा स्वभाव. नाहीतर एखादा म्हणाला असता की, मला या जिंगलमध्ये वाजविण्याचे अमुक इतके पैसे मिळत आहेत. मी कशाला बाकीच्या चौकशा करीत बसू? पण असा व्यवहारी विचार लुईस बँक्स यांनी कधीच केला नाही. या सगळ्या गुणांमुळे आम्हा दोघांची चांगली गट्टी जमली होती.'
अशोक पत्की सांगत होते ` एकदा लुईस बँक्सना मी म्हटले की माझ्या जिंगलसाठी तुम्ही वाजवता. खरे तर तुम्हाला तुमच्या कामाचे जास्त पैसे मिळाले पाहिजेत पण माझे बजेटच कमी असते. मी तुम्हाला वाद्यवादनाचे इतर नामवंत देतात त्याप्रमाणे दोन ते तीन हजार रुपये मानधन देऊ शकत नाही. त्यावर लुईस बँक्स मला म्हणाले त्याची चिंता करु नका. मी तुमच्यासाठी वेळप्रसंगी मोफतही काम करेन. पण त्यांच्याकडून कमी पैशात काम करुन घेणे मलाही आवडत नव्हते. त्यामुळे नंतर मी त्यांना वाजविण्यासाठी बोलाविण्याचे कमी केले. मी संगीत दिलेल्यापैकी किमान १०० जिंगलमध्ये तरी लुईस बँक्स यांनी वाद्यवादन केले असेल.'
`लुईस बँक्स व वनराज भाटिया यांना पाश्चिमात्य संगीताबद्दल लेक्चर देण्यासाठी अमेरिका, इंग्लंड अशा अनेक देशांत बोलाविले जाते. भारतीयांसाठी ही बाब निश्चितच अभिमानाची आहे. लुईस बँक्स यांचा स्वभाव गोड आहे. ते कुणाशीही स्पर्धा करत नाही. सिंथेसायझर वादनाचे त्यांनी मला स्वत: बोलावून धडे दिले. हा त्यांचा मोठेपणा आहे. दुसऱ्याला शिकविण्यात त्यांना आनंद वाटतो. अशा या सुस्वभावी माणसाला आमच्या संगीतक्षेत्रात काही लोकांनी खूप छळले आहे. आता मी त्यांची नाव घेत नाही. दुसरा कोणी येऊन आपल्या पुढे जाऊ नये म्हणून मत्सरी लोकांकडून असा त्रास एखाद्याला दिला जातो. लुईस बँक्स उत्तम सिंथेसायझर वाजवतात अशी किर्ती पसरलेली होती. पूर्वी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत वादकांची रिहर्सल व्हायची. अकरा वाजता गायक किंवा गायक यायचे. तोपर्यंत वादकांनी नाश्ता वगैरे करुन घेण्यासाठी त्यांना स्टुडिओबाहेर जाऊ दिले जायचे. हे सगळे वादक बाहेर गेले की कोणीतरी लुईस बँक्सच्या सिथेंसायझरचे एखादे बटन बदलून ठेवायचा. त्यामुळे त्या वाद्याचा आवाज बदलायचा. सेटिंग बदलायचे. लुईस बँक्स रडवेले होतील इथपर्यंत असा त्रास काही जणांनी त्यांना दिला. त्यामुळे नंतर लुईस बँक्सनी फिल्म लाईनच काही काळ सोडून दिली होती. आपले काहीतरी स्वतंत्र करायला हवे या विचाराने मग ते जिंगल्सकडे वळले. तेथे त्यांनी जे भव्य काम केले ते आज आपल्यापुढे आहे.'
`आजही कोणतीही जिंगल वाजून संपली की एक सिग्नेचर ट्यून येते. तिचे चार नोट वाजतात. ती लुईस बँक्स यांनी तयार केली आहे. लुईस बँक्सचा स्वभावही चांगला आहे, वादनही चांगले आहे. अशा गुणांमुळे लोक त्यांना मान देतात. आताच्या संगीताचे बिघडलेले स्वरुप बघून लुईस बँक्सनाही नक्कीच त्रास होत असेल. आता नवीन तंत्रज्ञानामुळे संगीतातही सगळे रेडिमेड मिळते आहे. त्यामुळे क्रिएटिव्हीटी मारली जात आहे.' असे सांगून अशोक पत्की यांनी या संवादाला पूर्णविराम दिला. लुईस बँक्स व अशोक पत्की हे दोघेही प्रसिद्धीपराड्मुख. काहीसे अबोलही. या दोघांमधील स्नेहबंध जाणून घेताना कधी त्यात गुंतून व गुंगून गेलो हे कळलेच नाही.
हमारा लुईस बँक्स...
भारतीय जॅझ संगीतातील गॉडफादर असा ज्यांचा गौरव होतो त्या लुईस बँक्स यांनी संगीतकार म्हणून या क्षेत्रातील प्रत्येक बाजू आत्मसात केली आहे. चित्रपटांच्या गाण्यांची रचना ते ध्वनिमुद्रण यांपासून सर्वच अंगांमध्ये ते वाकबगार आहेत. पण त्यांची संगीत जगातला ओळख आहे ती ‘की-बोर्ड किंग’ म्हणून. इंडीपॉप, प्रागतिक आणि समकालीन जॅझ तसेच इंडो जॅझ फ्युजनमध्ये त्यांनी लीलया काम केले आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन झालेला लुईस बँक्स यांनी ज्या जाहिरात जिंगल्स बनविल्या त्यातील गोल्ड स्पॉट- द झिंग थिंग, कॅडबरी– क्या स्वाद है, हमारा बजाज यांसारख्या जाहिरातींच्या जिंगल खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. बँक्स यांनी हम, हुकुमत, बरसात, डुप्लिकेट, औजार, दिव्यशक्ती आणि सुर्यवंशी आदी चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत तयार केले आहे. चित्रपट, टीव्ही मालिका आणि टीव्ही टॉक शो, जाहिराती, नाटके, राष्ट्रीय एकात्मता चित्रपट, लघुपट आणि फॅशन शो यांसारख्या वैविध्यपूर्ण माध्यमांमध्ये काम करणारे ते एकमेव संगीतकार आहेत. ही कलात्मक कामगिरी पाहून `हमारा लुईस बँक्स...' असेच प्रत्येक रसिकाला त्यांच्याबद्दल वाटत असेल हे नक्की.

No comments:

Post a Comment