Saturday, July 12, 2014

वनराजीतील ग्रंथालय - पी. साईनाथ - मी अनुवादित केलेला लेख दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख

 

प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी केरळच्या वनक्षेत्रातील एका ग्रंथालयावर लिहिलेला व मी अनुवादित केलेला लेख दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१४च्या अंकात रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या लिंक्स व टेक्स्ट फाईल व जेपीजी फोटो पुढे दिले आहेत.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-p-sainath-in-rasik-divya-marathi-4677996-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/13072014/0/4/
-----
वनराजीतील ग्रंथालय
- पी. साईनाथ
-------
केरळमधील वनक्षेत्राने वेढलेल्या अतिदुर्गम भागात मुथवन आदिवासी समाजातील चिन्नातंबी यांचे ग्रंथालय आणि त्यांची कार्यप्रवणता पाहून आम्ही कमालीचे प्रभावित झालो. लोकांची वाचनभूक भागावी, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची चिन्नातंबी यांची धडपड विलक्षण असल्याचेही आम्हाला जाणवले...
केरळमधल्या घनदाट वनक्षेत्राने वेढलेल्या इडुक्की जिल्ह्यातल्या इदमलाकुडी नावाच्या दुर्गम गावात मुथवन आदिवासी समाजाचे 73 वर्षे वयाचे पी. व्ही. चिन्नातंबी एक अनोखे ग्रंथालय चालवतात. ते चालवत असलेल्या या ग्रंथालयामधल्या पुस्तकांची संख्या आहे, एकशेसाठ. अभिजात सदरात मोडणारी ही सगळी पुस्तके स्थानिक मुथवन आदिवासी नियमितपणे घरी वाचायला नेतात. न चुकता परतही आणून देतात. मुळात चिन्नातंबींचे हे ग्रंथालय वसले आहे, ते त्यांनी सुरू केलेल्या चहाच्या दुकानात. मातीच्या भिंतींचा आधार असलेल्या या वास्तूवर एक छोटासा कागदी फलकही आहे. त्यावर हाताने लिहिलेला मजकूर पुढीलप्रमाणे आहे-

अक्षरा आर्ट्स अँड स्पोर्ट्स लायब्ररी
इरुप्पुकल्लाकुडी
इदमलाकुडी
पी. व्ही. चिन्नातंबी, 73, चहा विक्रेता, स्पोर्ट्स क्लब ऑर्गनायझर आणि लायब्रेरियन.

देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेले राज्य म्हणून ख्याती असलेल्या केरळमधील साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या या भागात मुथवन आदिवासींची फक्त 28 गावे आहेत. परंतु त्यातील या आदिवासींची संख्या जेमतेम अडीच हजारही भरणार नाही. त्यातील काहीशे लोक इदमलाकुडीमध्ये राहतात. केरळमधील सर्वात कमी म्हणजे अवघे दीड हजार मतदार असलेली पहिली आदिवासी ग्रामपंचायत याच गावात आहे. मुन्नारजवळ असलेल्या पेट्टीमुडी येथून इदमलाकुडी येथे पोहोचण्यासाठी सुमारे 18 कि.मी.ची पायपीट करावी लागते. चिन्नातंबींचे ग्रंथालय तर अजून आतल्या ठिकाणी आहे. आम्ही आठ जण चिन्नातंबी यांच्याकडे गेलो
होतो, त्या वेळी त्यांची पत्नी कामावर गेली होती. चिन्नातंबींच्या या चहा विक्रीच्या छोट्याशा दुकानात नानाविध वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. बिस्किट, आगपेटी आणि असे बरेच काही...
...‘तुम्ही बनवलेला छान चहा तर प्यायलो, तुमचे चहाचे दुकानही बघितले. पण तुमचे ग्रंथालय कुठे आहे?’ असे मी विचारताच चिन्नातंबींनी स्मितहास्य केले आणि आम्हाला ते आतल्या छोटेखानी खोलीत घेऊन गेले. तेथील अंधार्‍या कोपर्‍यातून त्यांनी दोन चामडी बॅगा बाहेर काढल्या. या बॅगांमध्येच 160 पुस्तके भरलेली होती. चिन्नातंबींनी पुढे आणलेल्या बॅगांमधील पुस्तके आम्ही चाळायला सुरुवात केली. रहस्यकथा, बेस्टसेलर पुस्तके किंवा बालसाहित्य असे काही त्यात नव्हते. मात्र, अभिजात दर्जाच्या उत्तमोत्तम साहित्यकृती होत्या. राजकीय विचारसरणींवर आधारित काही पुस्तकेही होती. ‘सिलाप्पतीकरम’ या तामिळ काव्याचा मल्याळी भाषेत अनुवाद झालेले पुस्तक होते. वायकोम मुहम्मद बशीर, एम. टी. वासुदेवन नायर, कमला दास यांनी लिहिलेली पुस्तके होती. एम. मुकुंदन, ललितांबिका अंथरजानम आणि इतर काही प्रथितयश लेखकांची पुस्तकेही तिथे नांदत होती. सगळ्यांत आश्चर्य म्हणजे, महात्मा गांधी यांच्या साहित्याबरोबरच थोपिल बासी यांचे ‘यू मेड मी ए कम्युनिस्ट’ हे पुस्तकही आम्हाला तिथे पाहायला मिळाले होते.
इतरांच्या तुलनेत आदिवासींमध्ये गरिबी अधिक व साक्षरतेचे प्रमाण कमी असते. हे वास्तव ध्यानात घेऊन आम्ही चिन्नातंबीला विचारले, ‘इथले लोक खरंच ही पुस्तके वाचतात का?’ त्यावर त्यांनी आम्हाला ग्रंथालयाचे रजिस्टरच काढून दाखविले. ज्यांनी पुस्तके वाचायला नेली आणि परत आणून दिली त्या सगळ्यांच्या नोंदी त्यामध्ये व्यवस्थित केलेल्या होत्या. इल्लांगो यांचे सिलाप्पतीकरम हे पुस्तक एकापेक्षा जास्त वेळा लोकांनी वाचायला नेल्याचे त्यावरून दिसले. इदमलाकुडी या गावामध्ये जेमतेम 25 कुटुंबे राहत असतील, पण गेल्या वर्षी या गावातील वाचकांनी 37 पुस्तके वाचायला नेली होती. या ग्रंथालयाचे आजन्म सदस्यत्वाचे शुल्क फक्त 25 रुपये आहे, तर दर महिन्याचे शुल्क अवघे दोन रुपये आहे. याव्यतिरिक्त वाचकाला एखादे पुस्तक वाचायला नेण्यासाठी अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. दूध व साखरेविना असलेला चहा या ग्रंथालयात येणार्‍या वाचकाला मोफत दिला जातो. डोंगराळ भागातून पायपीट करीत वाचक ग्रंथालयात येतात, खूप दमतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही चहाची सोय. मात्र बिस्किट, इतर खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तर पैसे मोजावे लागतात. कधी कधी वाचकाला जेवूही घातले जाते.
लेखन हेच ज्यांच्या उपजीविकेचे साधन आहे, असे बरेच जण माझ्याबरोबर चिन्नातंबी यांच्या ग्रंथालयाला भेट देण्यासाठी आले होते. केरळ प्रेस अकॅडमीत पत्रकारिता अभ्यासक्रमात शिकत असलेला विष्णू एस. हा विद्यार्थीसुद्धा आमच्यासोबत आला होता. त्याला या ग्रंथालयात एक आगळे साहित्यरत्न गवसले. ती एक वही होती. तिच्या पानांवर हाताने काही मजकूर लिहिला होता. या मजकुराला कोणतेही शीर्षक देण्यात आलेले नव्हते. ते चिन्नातंबी यांचे आत्मचरित्र होते. या आत्मचरित्रावर आपण पुरेसे लेखनसंस्कार अजून केलेले नाहीत, असे चिन्नातंबी यांनी आम्हाला सांगितले. आम्ही आग्रह करून त्या आत्मचरित्रातील काही भाग त्यांना वाचायला सांगितला. चिन्नातंबी यांच्या ठायी असलेली समाजसेवी वृत्ती व राजकीय जागरूकता यांचे दर्शन त्यांच्या या लेखनातून होत होते. महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्या घटनेपासून चिन्नातंबी यांनी आपल्या आत्मचरित्राला प्रारंभ केला होता. गांधीहत्येची घटना घडली त्या वेळी
चिन्नातंबी अवघे नऊ वर्षे वयाचे होते. गांधीहत्येचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.
‘इदमलाकुडीला ग्रंथालय स्थापन करण्याची प्रेरणा मला मुरली ‘मॅश’ (म्हणजे शिक्षक) यांच्याकडून मिळाली’ असे चिन्नातंबी यांनी सांगितले. मुरली मॅश हे अत्यंत नाणावलेले शिक्षक होते. ते आदिवासी होते, पण मुथवन जमातीचे नव्हते. मुरली मॅश यांनी मुथवन आदिवासींच्या कल्याणासाठी अविरत कार्य केले.
केरळमधील अतिदुर्गम भागात असलेले चिन्नातंबी यांचे ग्रंथालय आणि तेथील त्यांची कार्यप्रवणता पाहून आम्ही प्रभावित झालो. या ग्रामीण भागातील रहिवाशांची वाचनभूक भागावी, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची चिन्नातंबी यांची चाललेली धडपड विलक्षण असल्याचे आम्हाला जाणवले. आम्हाला आता पुन्हा मोठी पायपीट करून आमच्या मुक्कामाला पोहोचायचे होते. त्या वाटेकडे डोळे लागले होते. पण मनात विचार फक्त पी. व्ही. चिन्नातंबी यांचाच होता... कारण एका असामान्य ग्रंथालयचालकाचे दर्शन आम्हाला त्यांच्यात झाले होते...
psainath@gmail.com
(अनुवाद - समीर परांजपे)

No comments:

Post a Comment