Sunday, June 8, 2014

मेट्रो रेल्वे मुंबईत सुरु झाली त्यामुळे काय काय होईल?

(१) याच महिन्यात दादरच्या छबिलदास शाळेत किंवा वनमाळी हाॅलमध्ये शंभर एक मराठी माणसे जमून मुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील. त्याच्या पुढच्या जुलै महिन्यात या शंभरामधील चाळीस मराठी माणसे या संघटनेतून तत्वनिष्ठेशी तडजोड करणार नाही असे सांगत बाहेर पडतील अाणि महामुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील
(२) आमच्यासाठी स्वतंत्र महिला स्पेशल मेट्रो सकाळी आठ वाजता व संध्याकाळी सहा वाजता सोडलीच पाहिजे अशी मागणी महिला प्रवासी करतील.
(३) मेट्रो रेल्वेमध्ये बसण्यासाठी अासने खूप कमी असतात. मात्र अपंग, वृद्ध, कॅन्सरग्रस्त, महिला यांच्यासाठी राखीव अासने ठेवा अशी मागणी झाल्यास ती पूर्ण कशी करायची ही चिंता मेट्रो चालक कंपनीला सतावेल
(४) मेट्रोमध्ये भीक मागणारी मुले, गाणी गाऊन, एकतारी वाजवून पैसे मागणारे वादक यांना आपल्या पारंपारिक वेषात शिरता येणार नाही. मग ते बर्यापैकी कपडे घालून एअरकंडिशण्ड मेट्रो रेल्वे डब्यांमध्ये चढतील. आपल्या बॅगेमधून कटोरा, एकतारी वगैरे साहित्य काढून आपल्या पारंपारिक धंद्याला सुरुवात करतील.
(५) हिजड्यांसाठी तर मोठी समस्याच आहे. मेट्रोमध्ये स्त्री-पुरुष असे वेगळे डबेच नसल्याने त्यांना सर्रास कुठेही संचार करायला मिळेल. पण त्यांना आपले अस्तित्व काही लपविता येणार नसल्याने त्यांना आधी मेट्रोमध्ये चढून देतील का हा प्रश्न सतावतो आहे.
(६) मेट्रो रेल्वेमध्ये लगेजचा डबा नाही त्यामुळे वर्सोव्याच्या मासळी घेऊन जाणार्यांची पंचाईत होईल. मासे नेताना टोपलीतले खारट पाणी सांडून सांडून लोकलचे पत्रे सडविणार्यांना मेट्रोमध्ये प्रवेश माशांविनाच करावा लागेल. त्यामुळे मेट्रोची प्रवासींसंख्या घटेल असा अंदाज आहे.
(७) मेट्रो रेल्वेमध्ये सध्या वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरच वाहतूक सुरु राहाणार आहे. गुजराती बंधू जसे चर्नीरोडपासून उलटे बसून चर्चगेट ते बोरिवली-विरारपर्यंत लोकलने राजेशाही प्रवास करतात तसे ते इथेही वर्सोवा वा घाटकोपरच्या आधी्च्या स्टेशनला उलटे बसून आपल्याला जिथे जायचे तिथपर्यंत प्रवास करण्याचा बेत एव्हाना आखत असतील. व मराठी माणूस नेहमीप्रमाणे उभ्या उभ्याच प्रवास करत जात राहिल.
(८) मेट्रो रेल्वेमध्ये गर्दी इतकी होईल की, तिचे आपोअाप उघडमीट करणारे दरवाजे काढून लोकल ट्रेनसारखे सताड उघड दरवाजे बसवावे लागतील. या ट्रेनच्या फुटबोर्डावर उभे राहून लटकता येत नाही, स्टेशनवरच्या फुलपाखरांना बघून शिट्या मारत हवेवर डोईवरचे केस सावरायची सवलत मिळत नाही तो काय प्रवास झाला?
(९) मेट्रो रेल्वेच्या खिडक्यांना संपूर्ण काच आहे. तिथे खिडक्यांना जाळ्या नाहीत. त्यामुळे जलारामबापा, आणि कोणकोणते संत-महंत यांचे फोटो तात्पुरते लटकाविण्याची सोय नाही. या संतांची भजने म्हणताना जोरजोरात गाडीचा पत्रा बडवायची सोय नाही. ही असली काय ट्रेन असते का, त्यामुळे डोकेबाज भक्त काहीतरी युक्ती काढून कुठेतरी बाप्पांचे फोटो लटकावतील आणि झांजा वगैरे घेऊन मेट्रोमध्ये जोरजोरात भजने सुरु करतील. त्यांच्या शेजारी पत्तेवाले बँग मध्ये धरुन आपला गेम साजरा करतील.
(१०) पान, गुटका खाणार्यांसाठी मेट्रोमध्ये पिकदाणी ठेवा अशी सूचनाही पुढे येईल...
(११) बंगाली बाबा, कमी व्याजावार कर्ज मिळेल, भूतखेत प्रेत पिच्छा सोडविणार अशा जाहिरातींसाठी मेट्रो रेल्वेमध्ये नक्कीच चांगली जागा मिळेल. कारण प्रत्येक डब्यात जाहिरातींचे फलक लावण्याची चांगली सोय आहे. तरीही गनिमी काव्याने या जाहिरातींची पोस्टर कोणी ना कोणी मेट्रोमध्ये चिटकवूनच जाईल व मेट्रोवाल्यांना काम वाढवून ठेवेल.
असे बरेच काय एका मेट्रोरेल्वेच्या मुंबईतील अागमनाने घडू पाहातेय..
मोनो रेल सध्या हार्बरला एकांतवासात धावत असल्याने अजून तिला हा जाच सुरु झालेला नाही. पण ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे रेल्वे हा शब्द लागलेला आहे त्यांना हा वनवास काही चुकलेला नाही.....

- समीर परांजपे

No comments:

Post a Comment