Wednesday, June 4, 2014

गोपीनाथ मुंडेजी,....




गोपीनाथ मुंडेजी,
धक्कातंत्र हा तुमची खास शैली होती. तुमच्या निधनाची बातमी हा बहुधा या धक्कातंत्राचा अखेरचा अविष्कार असावा. बातमी ऐकल्यानंतर काही क्षण सुन्न झालो. तुम्ही नुकतेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झालात, त्याबद्दल अभिनंदनाचा दूरध्वनी केला असताना दिल्लीत यायचे निमंत्रण दिले होते. हा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण विकासाच्या कोणत्या नवीन योजना राबविता येतील याविषयी तुमच्या मनात विचार घोळत होते. त्यातल्या काही गोष्टी तुम्ही दूरध्वनीवर सांगितल्यातही. महाराष्ट्राचे दिल्लीत प्रतिनिधीत्व कायम कमी असते. तुमच्या पक्षाचे सरकार केंद्रात अाल्यानंतर मंत्री म्हणून तुम्ही दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व बुलंद किल्ल्यासारखे कराल यात कोणालाच शंका नव्हती. अगदी शरद पवारांनाही याबाबत विश्वास होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने तुमचे अर्धे लक्ष राज्यात व अर्धे लक्ष केंद्रात असणे स्वाभाविक होते. राज्य विधानसभा निवडणुका तुमच्या नेतृत्त्वाखालीच भाजप लढणार होता. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अाहात अशी चर्चाही प्रसारमाध्यमांनी सुरु केली होती. हा सारा डाव सुरु होऊन रंगण्याअाधीच तुम्हाला मृत्यूने गाठून हा सारा पटच उधळून लावला. मृत्यू हा किती क्रूर, निर्दयी असतो याचे भयाण दर्शन याहून अधिक ते कोणते असेल? गोपीनाथजी तुमच्या तमाम चाहत्यांना सोडून कायमचे निघून जाण्याचे वय तरी होते का तुमचे? अवघे नव्वदीचे वयोमान असे म्हणत सत्तेला चिटकून राहाण्याचा सोस असलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्ही तरुणच होतात. दिल्लीत आपल्या कार्यशैलीने आगळे स्थान निर्माण करण्याची अालेली सुवर्णसंधी काळाने तुमच्यावर झडप घालून हिरावून घेतली. तुम्ही सत्तेत असा वा नसा तुमच्या उमद्या स्वभाव नेहमी तजेलदार होता. कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते, सामान्य माणसे यांच्याशी समभावाने वागणारा नेता म्हणून तुमची ओळख होती. गावपातळीच्या राजकारणात रुजून देशपातळीवर स्वकर्तृत्वाने फुलारलेला नेता, अांदोलनातील भाजपला महाराष्ट्रव्यापी करणारा नेता म्हणून तुमची ओळख ही भाजपच्या संस्कृतीसाठीही नवीन होती. केंद्रात भाजप सत्तेवर अाल्यानंतर हे कर्तृत्व अधिक वृद्धिंगत झाले असते पण अाता ते होणे नाही. फार वैयक्तिक अाठवणी इथे लिहिवत नाही. ती मानसिक स्थितीही अाता नाही. एक अाठवण फक्त सांगावीशी वाटते. तुम्ही कोणाशीही बोलताना ऐका ना...असे म्हणायची तुम्हाला सवय होती. तसेच बोलताना हातातील कोणतीही वस्तू टेबलावर आदळत बोलायची तुमची लकब होती. मग तो तुमचा चष्मा असो वा चष्म्याचे घर. एकदा विधिमंडळाच्या तुमच्या दालनात तुमच्यासमोर गप्पा मारायला बसलेलो असताना, डोळ्यात काहीतरी गेले म्हणून चष्मा काढून मी तो तुमच्या टेबलावर ठेवला व डोळे चोळून अात काही कचरा गेलाय का बघत होतो. ते झाल्यानंतर मी पुन्हा चष्मा उचलून तो घालायला गेलो तर तो ठेवल्या जागी सापडेना. तेव्हा तुमच्याकडे बघितले तर माझा चष्मा तुमच्या हातात. अाणि ऐका ना म्हणत तो चष्मा हलकेच टेबलावर अादळला जात होता. मी हे लक्षात अाणून देताच ते खळाळून हसले. चष्मा परत दिला व पुन्हा ऐका ना म्हणत बोलणे सुरु केले. अाज सकाळी तुमच्या निधनाची बातमी ऐकताना तोच चष्मा मी खणातून काढून बघितला. अाता नवीन फ्रेम असल्याने हा जुना चष्मा वापरत नाही. पण तो जुना चष्मा पाहाताना या गंमतीदार प्रसंगाची मला आठवण झाली. त्या जुन्या चष्म्यातून मला दिसलेले गोपीनाथराव तुम्ही, अाजही तसेच होतात. चष्मा बदलला होता पण समोरचा माणूस तोच होता....पण अाता निष्टेच मृतदेहाच्या रुपात होता...डोळ्याच्या कडा पाणावल्या माझ्या....राजकारणी नेत्यापेक्षा माणूस अधिक मोलाचे होतात तुम्ही...फार लिहिवत नाही...तुमच्या स्मृतिंना भावांजली.
- समीर परांजपे

No comments:

Post a Comment