Saturday, June 28, 2014

कुस्तीपटूंच्या सेक्युलर तालमी - पी. साईनाथ यांचा मी अनुवादित केलेला लेख - दै. दिव्य मराठी २९ जून २०१४



  पी. साईनाथ या प्रख्यात पत्रकाराने लिहिलेला व मी अनुवादित केलेला महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेविषयीचा लेख दै. दिव्य मराठीच्या २९ जून २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या दोन लिंक्स व जेपीजी फाईल.
divyamarathi.bhaskar.com/article/MAG-p-sainath-article-about-kushti-4662959-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/29062014/0/4/
---
कुस्तीपटूंच्या सेक्युलर तालमी
-------
पी. साईनाथ
----
ती आहे कुस्तीचे प्रशिक्षण मिळण्याची जागा. त्या वास्तूच्या प्रवेशद्वारावरील फलकावर लिहिलेले असते, ‘तालीम’ (शिक्षणाला उर्दूतील प्रतिशब्द) आणि कुस्तीगिरांचे आराध्यदैवत असलेल्या हनुमानाची प्रतिमाही दिसते. यातून घडते, संस्कृतीच्या बहुढंगी पैलंूचे दर्शन. जिथे कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते, त्या स्थानाला पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘आखाडा’ नव्हे तर ‘तालीम’ म्हणतात. त्यातून थेट नाळ जुळते, ती फाळणीपूर्व पंजाब प्रांतातील शंभर वर्षांपूर्वीच्या तालमींशी. या नात्याची वीण विशेष घट्ट झाली ती, कोल्हापूर संस्थानचे महाराज व अग्रणी समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीत. फाळणीपूर्व भारतामधील विविध भागांतून विशेषत: पंजाब प्रांतातील कुस्तीगिरांना शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सन्मानाने बोलावले होते व त्यांना आश्रय दिला होता.
तेव्हापासून आजपावेतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार्‍या कुस्ती स्पर्धांमध्ये पाकिस्तान, इराण, तुर्कस्थान तसेच आफ्रिका खंडातल्या काही देशांमधील कुस्तीगीरही सहभागी होतात. या कुस्ती स्पर्धा बघायला येणार्‍या पुरुष प्रेक्षकांमधील अनेक जण पाकिस्तान व इराणमधील कुस्तीगिरांचेही चाहते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील आमदार विनय कोरे म्हणाले, ‘विदेशांतील कुस्तीगिरांना आमच्या भागात मोठी पसंती आहे.’ वारणानगर येथे देशातील सर्वात मोठे कुस्तीचे मैदान आहे. येथे दरवर्षी 13 डिसेंबरला कुस्तीची जंगी स्पर्धा होते. मॅटवर खेळली जाणारी कुस्ती दोन मिनिटांतही निकाली निघू शकते, पण मातीत खेळली जाणारी कुस्ती तब्बल 25 मिनिटांपर्यंत सलग चालू शकते.
महाराष्ट्रातील तालमींमधल्या गुरूंना वस्ताद म्हणतात. कुस्तीच्या प्रशिक्षणाबरोबरच आपल्या शिष्यांना ते देत असलेली नैतिक शिकवण ही आध्यात्मिक व सेक्युलर स्वरूपाची असते. अनेक वस्ताद आपल्या शिष्यांना गामा या कुस्तीगिराचा (आयुष्यात एकाही कुस्ती स्पर्धेत न हरल्याने गामा हा जगातला सर्वश्रेष्ठ कुस्तीगीर ठरला.) आदर्श डोळ्यासमोर ठेवायला सांगत असतात. पंजाब प्रांतातील रहिवासी असलेला गामा फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिला. फाळणीच्या वेळी दंगे उसळलेले असताना, गामा आपल्या शेजारील हिंदू कुटुंबांच्या रक्षणासाठी एखाद्या पहाडासारखा दंगेखोरांसमोर उभा ठाकला होता. कोणताही कुस्तीगीर गामासारखाच निधड्या छातीचा असला पाहिजे, ही भावना कुस्तीप्रेमींमध्ये खोलवर रुजली ती तेव्हापासून.
कोल्हापूर शहरातल्या एका तालमीतले प्रख्यात वस्ताद आप्पासाहेब कदम यांनी सांगितले की, ‘कुस्तीगिरांना देण्यात येणारे नैतिकतेचे धडे त्यांच्या प्रशिक्षणाचे आवश्यक अंग आहे. नीतिमूल्यांचे धडे न मिळालेला कुस्तीगीर बिघडण्याची शक्यता अधिक असते.’ त्यामुळे महाराष्ट्रातील कुस्तीगिरांची प्रतिमा इतर राज्यांतील कुस्तीगिरांपेक्षा नक्कीच चांगली आहे. खेळांबद्दल असलेले प्रेम व आदरातिथ्याचे संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजले आहेत. मग ते कुंडल असो वा वारणानगर येथे होणार्‍या कुस्तीच्या महास्पर्धा. लोकांच्या वागण्यातून आपल्याला त्यांचे क्रीडाप्रेम जाणवत राहते. तालमींमधील वस्ताद, कुस्तीगीर हे सारे ग्रामीण भागातील शेतकरी किंवा मजूर कुटुंबातून आलेले असतात. निदान पश्चिम महाराष्ट्रापुरते तरी हे खरे आहे, असे माजी ऑलिम्पिक कुस्तीगीर व कुस्ती क्षेत्रातील गुरुवर्य गणपतराव आंधळकर यांनी सांगितले. एशियाड, कॉमनवेल्थ, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये कुस्तीत पदके जिंकलेले काका पवार म्हणाले की, कुस्ती, उसाचे मळे व तमाशा यांचे अतूट असे नाते आहे. काका पवार यांची पुण्यामध्ये तालीम आहे.
तमाशा आणि कुस्तीसाठी शिस्तबद्ध अदाकारी व लोकाश्रय आवश्यक असतो. कुस्ती पाहायला येणारे बहुसंख्य प्रेक्षक हिंदूधर्मीय असतात. पूर्वीपेक्षा कुस्तीमध्ये आता अधिक वैविध्य आले आहे. पूर्वी कुस्तीमध्ये मराठा समाजातील कुस्तीगीरांचे वर्चस्व होते. मात्र, आता धनगर समाजातील कुस्तीगीरही आपला ठसा उमटवत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या मुस्लिम समाजातील कुस्तीगिरांनाही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये कुस्तीला सध्या कमी महत्त्व देण्यात येत असल्याबद्दल बहुतांश वस्ताद चिंता व्यक्त करतात. आम्ही ज्या ज्या तालमींना भेटी दिल्या, तिथे या चिंतेचे सावट दिसले. ‘मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेल्या महाराष्ट्रापेक्षा पंजाब, हरयाणामध्ये कुस्तीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. पंजाब व हरियाणामध्ये कुस्तीगिरांना पोलिस व सुरक्षा दलांमध्ये मोठ्या पदांवर नियुक्त केले जाते. महाराष्ट्रात मात्र कुस्ती खेळातून बाहेर पडल्यानंतर कुस्तीगिरांना मजुरी करणे नशिबी येते. महाराष्ट्रात काही नामवंत कुस्तीगिरांना पोटापाण्याकरिता सरतेशेवटी साखर कारखान्यांमध्ये रखवालदाराची नोकरी पत्करावी लागली होती.’ अशी करुण कहाणीही कुस्ती क्षेत्रातील वस्तादांनी ऐकविली. राजकीय नेते हे संधीसाधू असतात. ‘कुस्ती पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. तो जनाश्रय पाहून राजकारण्यांचे पायही कुस्तीच्या मैदानाकडे वळतात. काही राजकीय नेते कुस्ती संघटनांचे प्रमुख आहेत. तरीही या खेळाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. मा
जी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राज्यातील कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. पण आपण त्या पदावर आहोत, हे त्यांना आठवत तरी असेल का?’ असे उपहासाने विचारून एका वस्तादाने सांगितले की, कुस्तीचे मैदान पूर्वी गाजविलेले दोन कुस्तीगीर आता विद्यमान आमदार आहेत. पण त्यांचेही कुस्ती व कुस्तीगीरांकडे लक्ष नाही.
समाजामध्ये झालेले बदल, संस्कृतीचे बदललेले रुपडे, पाण्याची तीव्र टंचाई, तसेच राज्यपातळीवर होत असलेला कानाडोळा यामुळे कुस्ती खेळाची सध्या परवड सुरू आहे. गणपतराव आंधळकर म्हणतात, ‘कुस्तीगिरांचे आयुष्य हे अदृश्य तपश्चर्येप्रमाणेच असते. क्रिकेटपटूला छोटीशी जरी जखम झाली, तरी प्रसारमाध्यमे त्याचा प्रचंड गवगवा करतात. पण एखादा कुस्तीगीर निधन पावला, तर त्या घटनेची साधी दखलही घेतली जात नाही.’ कुस्ती व कुस्तीगिरांचे आयुष्य सध्या महाराष्ट्रात खडतर आहे ते असे...
psainath@gmail.com
(अनुवाद - समीर परांजपे)

Thursday, June 19, 2014

यादवीचे चरक - दै. दिव्य मराठीच्या १५ जून २०१४च्या अंकातील रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.



आफ्रिकेतील कोंगो या देशात सुरु असलेल्या यादवी संघर्षाचे विश्लेषण करणारा माझा लेख दै. दिव्य मराठीच्या १५ जून २०१४च्या अंकातील रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या पेज व टेक्स्ट लिंक्स व जेपीजी फोटो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-samir-paranjpe-about-africa-congo-4647455-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/15062014/0/4/
-----
यादवीचे चरक
-------
- समीर परांजपे
----
गेली अनेक दशके यादवी युद्धाच्या चरकात पिळून निघालेला आफ्रिका खंडातील कोंगो हा देश. दुसर्‍या महायुद्धानंतर ते आजवरच्या काळात यादवी युद्धामुळे सगळ्यात जास्त मानवी संहार जिथे झाला तोच हा देश. आजपावेतो तेथील 54 लाख लोक या संघर्षात ठार झाले आहेत.
रवांडामध्ये झालेल्या यादवी युद्धानंतर भयभीत झालेल्या हजारो नागरिकांनी स्थलांतर करून शेजारच्या कोंगोमध्ये आश्रय घेतला. रवांडातील हुतू व तुत्सी यांच्या संघर्षात 1994मध्ये सुमारे 80 हजार तुत्सींची कत्तल झाली. रवांडातील हुतू राज्यकर्त्यांचे पाठबळ लाभलेली एक सशस्त्र संघटना, रवांडा लष्कर यांचा यामागे हात होता. 1994मधील जून-जुलै महिन्यात रवांडाची राजधानी किगालीवर तुत्सी जमातीच्या रवांडा पेट्रिऑटिक फ्रंट या संघटनेचा वरचश्मा निर्माण झाला. त्यांनी हुतू यांच्यावर सूड उगवायला सुरुवात केली. त्यामुळे हजारो हुतू रवांडातून परागंदा होऊन कोंगोच्या आश्रयाला गेले. हुतू जमातीचे निर्वासित मग कोंगोच्या भूमीतून रवांडातील तुत्सींच्या विरोधात कारवाया करू लागले. कोंगोमध्ये ज्या भागात हे हुतू निर्वासित स्थायिक झाले, तो भाग आधीपासूनच हिंसाचारग्रस्त होता. त्यामुळे कोंगोमध्ये तुत्सी, हुतू यांच्यात यादवी सुरू झाली. याची परिणती म्हणजे कोंगोतील सुमारे 38 हजार तुत्सी रवांडामध्ये आश्रयाला गेले. कोंगो, रवांडामधील वांशिक संघर्षाचे चटके अंगोला, नामिबिया, झिम्बाब्वे यांनाही बसले आहेत.
वांशिक हिंसाचार, लोकांचे विस्थापित होणे, साथींनी घातलेले थैमान या संकटाच्या घेर्‍यात अडकलेल्या कोंगोमध्ये सगळ्यात जास्त धूळधाण उडाली आहे ती तेथील महिलांची. तिथे आजवर हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आले, प्रसंगी ठारही मारण्यात आले. यादवी युद्धाला या देशात जी लैंगिक अत्याचारांची काळी किनार आहे, ती कोणाचेही मन सुन्न करणारी आहे. कोंगोमध्ये मौल्यवान खनिज संपत्तीचे प्रमाण लक्षणीय आहे. विविध खनिजांच्या खाणी आपल्या कब्जात कशा राहतील, यासाठी कोंगोचे लष्कर, तेथील सत्ताधारी, तसेच परस्परविरोधी गट यांच्यात साठमारी चालते, एकमेकांवर सूड उगवण्यासाठी विरोधी गटातल्या बायकांना पळवले जाते. कोंगोमध्ये दर तासाला किमान 48 महिलांवर बलात्कार होतात. लैंगिक अत्याचारांना आजवर या देशातील चार लाख महिला बळी पडल्या आहेत. ही आकडेवारी व स्थिती कोणाही सुबुद्ध माणसाला हादरवून सोडेल. लैंगिक अत्याचार करताना ती महिला लहान मुलगी आहे की वृद्धा, हे काहीही पाहिले जात नाही. अशा भयंकर दुर्दशेतून जावे लागलेल्या महिलांपैकी अनेक जणी मनोविकारग्रस्त झाल्या आहेत.
ज्या महिलांवर बलात्कार होतो, त्यांना आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून सहकार्य मिळणे दूरच; पण अवहेलनेचे क्षणच अधिक वाट्याला येतात. आपल्या कुटुंबातील महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याने आपली प्रतिष्ठा बुडीत खाती गेली आहे, अशी कोंगोतील बहुतांश कुटुंबांची विचारसरणी असते. अशा पीडित महिलेला पुन्हा कुटुंबात सामावून घेतले गेले तरी तिला एक तर हलक्या दर्जाची वागणूक दिली जाते किंवा तिच्या नवर्‍याने केलेला पुनर्विवाह तिला नाइलाजाने सोसावा लागतो. बलात्कार झालेल्या अविवाहित मुलींची अवस्था तर त्याहूनही वाईट असते. जगात मातृदिन उत्साहाने साजरा होतो. पण असे अनेक दिवस येतात, जातात; कोंगोमधील मातांच्या ललाटी असलेला दुर्दशेचा शाप काही पुसला जात नाही.
बाईला बाईपण निभवणेही या देशात कठीण होऊन बसले आहे. महिलांच्या प्रगतीची ऐशीतैशी झालेलीच आहे. त्याशिवाय कोंगोतील पुरुषप्रधान संस्कृतीने माता बनू इच्छिणार्‍या महिलांच्या मार्गातही अनेक काटे पसरलेले आहेत. कोंगोतील फक्त सहा टक्के महिलाच संततिनियमनाची आधुनिक साधने वापरतात. महिलांना कुटुंब नियोजनासंदर्भातील उपचार करून घेण्यासाठी आपल्या नवर्‍याची परवानगी घ्यावी लागते. महिलांच्या स्वत:च्या इच्छेला काडीचीही किंमत देण्यात येत नाही. या देशातील 64 टक्के महिलांना हिंसाचाराची या ना त्या कारणाने झळ लागलेली आहे. या महिलांच्या हक्करक्षणासाठी कार्यरत असणार्‍यांवरही हल्ले चढवण्यात येतात. कोंगोतील सरकार वांशिक हिंसाचार आटोक्यात आणण्यात जसे अयशस्वी ठरले आहे, तसेच आपल्या देशातील महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार रोखण्यातही...जगात कुठेही संघर्षाची ठिणगी पडली की पहिला बळी जातो तो महिला व लहान मुलांचा... कोंगोसह आफ्रिकेतील काही देश तोच कित्ता दशकानुदशके गिरवताना दिसत आहेत.
(sameer.p@dainikbhaskargroup.com)

Sunday, June 8, 2014

मेट्रो रेल्वे मुंबईत सुरु झाली त्यामुळे काय काय होईल?

(१) याच महिन्यात दादरच्या छबिलदास शाळेत किंवा वनमाळी हाॅलमध्ये शंभर एक मराठी माणसे जमून मुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील. त्याच्या पुढच्या जुलै महिन्यात या शंभरामधील चाळीस मराठी माणसे या संघटनेतून तत्वनिष्ठेशी तडजोड करणार नाही असे सांगत बाहेर पडतील अाणि महामुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील
(२) आमच्यासाठी स्वतंत्र महिला स्पेशल मेट्रो सकाळी आठ वाजता व संध्याकाळी सहा वाजता सोडलीच पाहिजे अशी मागणी महिला प्रवासी करतील.
(३) मेट्रो रेल्वेमध्ये बसण्यासाठी अासने खूप कमी असतात. मात्र अपंग, वृद्ध, कॅन्सरग्रस्त, महिला यांच्यासाठी राखीव अासने ठेवा अशी मागणी झाल्यास ती पूर्ण कशी करायची ही चिंता मेट्रो चालक कंपनीला सतावेल
(४) मेट्रोमध्ये भीक मागणारी मुले, गाणी गाऊन, एकतारी वाजवून पैसे मागणारे वादक यांना आपल्या पारंपारिक वेषात शिरता येणार नाही. मग ते बर्यापैकी कपडे घालून एअरकंडिशण्ड मेट्रो रेल्वे डब्यांमध्ये चढतील. आपल्या बॅगेमधून कटोरा, एकतारी वगैरे साहित्य काढून आपल्या पारंपारिक धंद्याला सुरुवात करतील.
(५) हिजड्यांसाठी तर मोठी समस्याच आहे. मेट्रोमध्ये स्त्री-पुरुष असे वेगळे डबेच नसल्याने त्यांना सर्रास कुठेही संचार करायला मिळेल. पण त्यांना आपले अस्तित्व काही लपविता येणार नसल्याने त्यांना आधी मेट्रोमध्ये चढून देतील का हा प्रश्न सतावतो आहे.
(६) मेट्रो रेल्वेमध्ये लगेजचा डबा नाही त्यामुळे वर्सोव्याच्या मासळी घेऊन जाणार्यांची पंचाईत होईल. मासे नेताना टोपलीतले खारट पाणी सांडून सांडून लोकलचे पत्रे सडविणार्यांना मेट्रोमध्ये प्रवेश माशांविनाच करावा लागेल. त्यामुळे मेट्रोची प्रवासींसंख्या घटेल असा अंदाज आहे.
(७) मेट्रो रेल्वेमध्ये सध्या वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरच वाहतूक सुरु राहाणार आहे. गुजराती बंधू जसे चर्नीरोडपासून उलटे बसून चर्चगेट ते बोरिवली-विरारपर्यंत लोकलने राजेशाही प्रवास करतात तसे ते इथेही वर्सोवा वा घाटकोपरच्या आधी्च्या स्टेशनला उलटे बसून आपल्याला जिथे जायचे तिथपर्यंत प्रवास करण्याचा बेत एव्हाना आखत असतील. व मराठी माणूस नेहमीप्रमाणे उभ्या उभ्याच प्रवास करत जात राहिल.
(८) मेट्रो रेल्वेमध्ये गर्दी इतकी होईल की, तिचे आपोअाप उघडमीट करणारे दरवाजे काढून लोकल ट्रेनसारखे सताड उघड दरवाजे बसवावे लागतील. या ट्रेनच्या फुटबोर्डावर उभे राहून लटकता येत नाही, स्टेशनवरच्या फुलपाखरांना बघून शिट्या मारत हवेवर डोईवरचे केस सावरायची सवलत मिळत नाही तो काय प्रवास झाला?
(९) मेट्रो रेल्वेच्या खिडक्यांना संपूर्ण काच आहे. तिथे खिडक्यांना जाळ्या नाहीत. त्यामुळे जलारामबापा, आणि कोणकोणते संत-महंत यांचे फोटो तात्पुरते लटकाविण्याची सोय नाही. या संतांची भजने म्हणताना जोरजोरात गाडीचा पत्रा बडवायची सोय नाही. ही असली काय ट्रेन असते का, त्यामुळे डोकेबाज भक्त काहीतरी युक्ती काढून कुठेतरी बाप्पांचे फोटो लटकावतील आणि झांजा वगैरे घेऊन मेट्रोमध्ये जोरजोरात भजने सुरु करतील. त्यांच्या शेजारी पत्तेवाले बँग मध्ये धरुन आपला गेम साजरा करतील.
(१०) पान, गुटका खाणार्यांसाठी मेट्रोमध्ये पिकदाणी ठेवा अशी सूचनाही पुढे येईल...
(११) बंगाली बाबा, कमी व्याजावार कर्ज मिळेल, भूतखेत प्रेत पिच्छा सोडविणार अशा जाहिरातींसाठी मेट्रो रेल्वेमध्ये नक्कीच चांगली जागा मिळेल. कारण प्रत्येक डब्यात जाहिरातींचे फलक लावण्याची चांगली सोय आहे. तरीही गनिमी काव्याने या जाहिरातींची पोस्टर कोणी ना कोणी मेट्रोमध्ये चिटकवूनच जाईल व मेट्रोवाल्यांना काम वाढवून ठेवेल.
असे बरेच काय एका मेट्रोरेल्वेच्या मुंबईतील अागमनाने घडू पाहातेय..
मोनो रेल सध्या हार्बरला एकांतवासात धावत असल्याने अजून तिला हा जाच सुरु झालेला नाही. पण ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे रेल्वे हा शब्द लागलेला आहे त्यांना हा वनवास काही चुकलेला नाही.....

- समीर परांजपे

Wednesday, June 4, 2014

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे संभाव्य राजकीय चित्र.

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे संभाव्य राजकीय चित्र.
----
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये जननेता म्हणावा असा एकही नेता दिसत नाही. विनोद तावडे, देवेंद्र फडवणीस, नितीन गडकरी हे नेते जननेते नव्हेत, ते दिवाणखानी राजकारण करणारे नेते म्हणून अधिक ओळखले जातात जसे शिवसेनेचे मनोहर जोशी. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा लौकिकही दिवाणखानी राजकारण्याचाच आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राज्य भाजपाचे छत्र शोभावे असे मुंडेंचे नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या ऐवजी आता महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उद्भवला आहे. माझ्या मते नितीन गडकरी यांना लवकरच विधानसभा निवडणुकांमध्ये राज्य भाजपचे नेतृत्व करा असा संदेश नरेंद्र मोदींकडून दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात भाजपमध्ये नितीन गडकरी यांचे नेतृत्व जुनेजाणते आहे. पण गडकरी यांना विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात फारशी लोकप्रियता नाही. मुंडे यांच्या जाण्याने विरोधी पक्षांच्या रिंगणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे भरुन काढू शकतात. राज ठाकरे स्वत:च विधानसभा निवडणुकीस उभे राहाणार आहेत. ते बहुधा नाशिक किंवा दादर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवितील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. राज ठाकरे हे वेगळ्या पक्षातील असले तरी ते गर्दी खेचणारे नेते अाहेत. त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद हा जननेत्याला जसा मिळतोच तसाच असतो. मुंडे हे ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व आहे तर राज ठाकरे हे अस्सल शहरी नेतृत्व आहे. ग्रामीण भागातील मतदारांना अापलेेसे वाटावे असे मुद्दे मांडण्यावर राज ठाकरे यांनी येत्या चार महिन्यांत भर दिल्यास त्यांचे नेतृत्व काही उभारी घेऊ शकेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपूर्ण शहरी तोंडवळा असलेला राजकीय पक्ष आहे. ही त्याची मर्यादाच या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम यश मिळवून देण्यात अडसर आहे. राज ठाकरे यांनी शहरी व ग्रामीण मतदारांना जवळचे वाटतील असे मुद्दे प्रचारात घेऊन या दोन्ही भागांतील जनतेला आपल्याबरोबर आणायला हवे. तरच त्यांना या निवडणुकीत काही भवितव्य आहे. शिवसेना व भाजप आघाडीमध्ये अजून जागावाटपाची बोलणी व्हायची आहेत. मात्र या पक्षांनी विधानसभा निवडणुकीत मनसेबाबत गाफील राहून पुन्हा मोदी लाटेची अपेक्षा करु नये. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोदी लाट येईल असे दिसत नाही. शिवाय विधानसभा या स्थानिक प्रश्नांवर जास्त लढल्या जातात. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे गड उदध्वस्त करायचे असतील तर शेतकरी, कामकरी यांचे गावगाड्यातील प्रश्न शिवसेना, भाजपने येत्या चार महिन्यांत लावून धरायला हवेत. तरच त्यांना काही आशा आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना -भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळतील पण बहुमतासाठी त्यांना मनसेचा पाठिंबा घ्यावा लागेल. मुंडे यांच्या जाण्याने मराठवाडामध्ये सहानुभूतीची लाट भाजप-सेेनेच्या बाजूने जाऊन तिथे काँग्रेसचे पतन होईल असे दिसते. महाराष्ट्र विधानसभेच्या २८२ जागांपैकी किमान १२४ जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील व मनसेला ५० जागा मिळतील, ८० काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळतील तसेच बाकीच्या जागा अपक्ष व इतर पक्ष जिंकतील असा माझा अंदाज आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र साधारणपणे असे असेल.
- समीर परांजपे

गोपीनाथ मुंडेजी,....




गोपीनाथ मुंडेजी,
धक्कातंत्र हा तुमची खास शैली होती. तुमच्या निधनाची बातमी हा बहुधा या धक्कातंत्राचा अखेरचा अविष्कार असावा. बातमी ऐकल्यानंतर काही क्षण सुन्न झालो. तुम्ही नुकतेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झालात, त्याबद्दल अभिनंदनाचा दूरध्वनी केला असताना दिल्लीत यायचे निमंत्रण दिले होते. हा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण विकासाच्या कोणत्या नवीन योजना राबविता येतील याविषयी तुमच्या मनात विचार घोळत होते. त्यातल्या काही गोष्टी तुम्ही दूरध्वनीवर सांगितल्यातही. महाराष्ट्राचे दिल्लीत प्रतिनिधीत्व कायम कमी असते. तुमच्या पक्षाचे सरकार केंद्रात अाल्यानंतर मंत्री म्हणून तुम्ही दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व बुलंद किल्ल्यासारखे कराल यात कोणालाच शंका नव्हती. अगदी शरद पवारांनाही याबाबत विश्वास होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने तुमचे अर्धे लक्ष राज्यात व अर्धे लक्ष केंद्रात असणे स्वाभाविक होते. राज्य विधानसभा निवडणुका तुमच्या नेतृत्त्वाखालीच भाजप लढणार होता. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अाहात अशी चर्चाही प्रसारमाध्यमांनी सुरु केली होती. हा सारा डाव सुरु होऊन रंगण्याअाधीच तुम्हाला मृत्यूने गाठून हा सारा पटच उधळून लावला. मृत्यू हा किती क्रूर, निर्दयी असतो याचे भयाण दर्शन याहून अधिक ते कोणते असेल? गोपीनाथजी तुमच्या तमाम चाहत्यांना सोडून कायमचे निघून जाण्याचे वय तरी होते का तुमचे? अवघे नव्वदीचे वयोमान असे म्हणत सत्तेला चिटकून राहाण्याचा सोस असलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्ही तरुणच होतात. दिल्लीत आपल्या कार्यशैलीने आगळे स्थान निर्माण करण्याची अालेली सुवर्णसंधी काळाने तुमच्यावर झडप घालून हिरावून घेतली. तुम्ही सत्तेत असा वा नसा तुमच्या उमद्या स्वभाव नेहमी तजेलदार होता. कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते, सामान्य माणसे यांच्याशी समभावाने वागणारा नेता म्हणून तुमची ओळख होती. गावपातळीच्या राजकारणात रुजून देशपातळीवर स्वकर्तृत्वाने फुलारलेला नेता, अांदोलनातील भाजपला महाराष्ट्रव्यापी करणारा नेता म्हणून तुमची ओळख ही भाजपच्या संस्कृतीसाठीही नवीन होती. केंद्रात भाजप सत्तेवर अाल्यानंतर हे कर्तृत्व अधिक वृद्धिंगत झाले असते पण अाता ते होणे नाही. फार वैयक्तिक अाठवणी इथे लिहिवत नाही. ती मानसिक स्थितीही अाता नाही. एक अाठवण फक्त सांगावीशी वाटते. तुम्ही कोणाशीही बोलताना ऐका ना...असे म्हणायची तुम्हाला सवय होती. तसेच बोलताना हातातील कोणतीही वस्तू टेबलावर आदळत बोलायची तुमची लकब होती. मग तो तुमचा चष्मा असो वा चष्म्याचे घर. एकदा विधिमंडळाच्या तुमच्या दालनात तुमच्यासमोर गप्पा मारायला बसलेलो असताना, डोळ्यात काहीतरी गेले म्हणून चष्मा काढून मी तो तुमच्या टेबलावर ठेवला व डोळे चोळून अात काही कचरा गेलाय का बघत होतो. ते झाल्यानंतर मी पुन्हा चष्मा उचलून तो घालायला गेलो तर तो ठेवल्या जागी सापडेना. तेव्हा तुमच्याकडे बघितले तर माझा चष्मा तुमच्या हातात. अाणि ऐका ना म्हणत तो चष्मा हलकेच टेबलावर अादळला जात होता. मी हे लक्षात अाणून देताच ते खळाळून हसले. चष्मा परत दिला व पुन्हा ऐका ना म्हणत बोलणे सुरु केले. अाज सकाळी तुमच्या निधनाची बातमी ऐकताना तोच चष्मा मी खणातून काढून बघितला. अाता नवीन फ्रेम असल्याने हा जुना चष्मा वापरत नाही. पण तो जुना चष्मा पाहाताना या गंमतीदार प्रसंगाची मला आठवण झाली. त्या जुन्या चष्म्यातून मला दिसलेले गोपीनाथराव तुम्ही, अाजही तसेच होतात. चष्मा बदलला होता पण समोरचा माणूस तोच होता....पण अाता निष्टेच मृतदेहाच्या रुपात होता...डोळ्याच्या कडा पाणावल्या माझ्या....राजकारणी नेत्यापेक्षा माणूस अधिक मोलाचे होतात तुम्ही...फार लिहिवत नाही...तुमच्या स्मृतिंना भावांजली.
- समीर परांजपे