Wednesday, May 25, 2016

दिल्लीतील पाव व ब्रेडमध्ये कर्करोगकारक घटक असल्याचा आक्षेप सीएसई या संस्थेने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. २५ मे २०१६च्या अंकात मी लिहिलेल्या लेखाची ही फाइल



दिल्लीतील पाव व ब्रेडमध्ये कर्करोगकारक घटक असल्याचा आक्षेप सीएसई या संस्थेने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. २५ मे २०१६च्या अंकात मी लिहिलेल्या लेखाची ही फाइल व मुळ लेखाचा मजकूर व वेब पेज लिंक.
----
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/25052016/0/6/
---
दर्जा ठरविण्याची आलेली `सुसंधी'
---
दिल्लीतील ब्रेड व पावाच्या नमुन्यांमध्ये कर्करोगकारक रसायने सापडल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेन्ट (सीएसई) या स्वयंसेवी संस्थेने एका पाहाणीतून काढल्यामुळे खळबळ माजणे स्वाभाविकच आहे. केएफसी, डॉमिनोज, स्लाइस ऑफ इटली, हार्वेस्ट गोल्ड, ब्रिटानिया, पिझ्झाहट, मॅकडोनाल्डसह एकुण ३८ कंपन्यांच्या पाव, बन, ब्रेड यांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक पॅकबंद पावांमध्ये पॉटॅशियम आयोडेट, पोटॅशियम ब्रोमेट ही कर्करोगकारक रसायने सापडली या सीएसइने केलेल्या दाव्याची केंद्रीय आरोग्य खाते सर्वंकष चौकशी करणार आहे. त्यातून जे निष्कर्ष सरकारच्या हाती येतील ते त्वरित जनतेच्या माहितीसाठी जाहीर झाले पाहिजेत. सीएसईने आक्षेप घेतलेल्या पाव, ब्रेडच्या उत्पादनांमधील अनेक ब्रँड हे बहुराष्ट्रीय आहेत. त्यांच्या उत्पादनांविरुद्ध सीएसईने केलेला दावा जर खरा ठरला तर या कंपन्यांविरोधात भारतामध्ये वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र या दाव्यात फारसे तथ्य न आढळल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नजरेत भारताबद्दलची प्रतिमा अजून खालावण्याची शक्यता आहे. सीएसईने ज्यांच्या उत्पादनांवर आक्षेप घेतला आहे त्यांत देशी उत्पादकही अाहेत. त्यांच्यावरील आक्षेप खोटे ठरले तर, तेही सरकारला घरचा आहेर देऊ शकतात. नेस्टले कंपनी बनवत असलेल्या मॅगी नूडल्सबाबत केंद्र सरकार व विविध राज्ये कशी तोंडावर आपटली होती हा इतिहास तर ताजा आहे. मॅगीच्या नूडल्सच्या उत्पादनात शिसे व अन्य घटकांचे मानवी आरोग्यास अपायकारक ठरु शकेल इतके प्रमाण असल्याचा दावा उत्तर प्रदेशच्या अन्न व औषधी नियंत्रण प्राधिकरणाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मॅगी नूडल्सची दोन लाख पाकिटे विक्रीप्रक्रियेतून माघारी बोलावण्याचा आदेश नूडल्स कंपनीला या प्राधिकरणाने दिला होता. त्यानंतर मॅगी नूडल्सच्या विरोधात जे वादळ उठले त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरले. विदेशी कंपन्यांची नूडल्स कशी विषारी असतात असा प्रचार करत एका अध्यात्मिक बाबाने आपली स्वदेशी नूडल्स बाजारात आणली. मॅगी नूडल्सच्या वादात दिल्ली, उत्तर प्रदेशपासून विविध प्रयोगशाळांचे अहवाल हे काही वेळेस परस्परभिन्न आल्याने आपल्याकडे वस्तुंच्या दर्जा ठरवण्याबाबत समान धोरण नसल्याचेही लक्षात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी नूडल्सवरील िवक्री बंदी हटविल्यानंतर या उत्पादनाच्या विक्रीमध्ये भारतात आणखी वाढ झाली. याचा अर्थ स्पष्ट होता की, मॅगीच्या विरोधात काही संस्था किंवा प्रयोगशाळांनी घेतलेले आक्षेप सामान्य जनतेने फारसे मनावर घेतले नव्हते इतका या ब्रँडच्या दर्जाबाबत तिच्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे. भारतात सध्या वातावरण असे आहे की, कोणतीही व्यक्ती, संस्था उठते व नावडत्या उत्पादनांच्या दर्जाबाबत आक्षेप घेते. भारतात विकल्या जाणाऱ्या स्वदेशी व विदेशी ब्रँडच्या सर्व लहानमोठ्या वस्तू, खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मानके आहेत ती आपल्या देशातही अत्यंत काटेकोरपणे पाळली जातील याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. किंवा अशी मानके स्वत: तयार केली पाहिजेत की ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मि‌‌‌ळेल. पण यापैकी फारसे काही करण्यास केंद्र सरकार उत्सुक नसल्याने व राज्य सरकारेही आंधळेपणाने निर्णय घेत असल्याने मॅगी प्रकरणात जी नाचक्की झाली त्याचीच पुनरावृत्ती ब्रेड, पाव यांच्या दर्जाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत त्याबाबतही होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. पिठावर प्रक्रिया करण्यासाठी पोटॅशियम आयोडेट तर पाव लुसलुशीत करण्यासाठी पोटॅशियम ब्रोमेट वापरले जाते. या दोघांच्याही वापरावर जगातील अनेक देशांत बंदी आहे. हे घटक आपण पाव बनवताना वापरत असल्याचा दावा मॅकडोनाल्ड, ब्रिटानिया आदी उत्पादकांनी केला आहे. मॅगीच्या प्रकरणात तोंडघशी आपटलेली भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएअाय) ही केंद्र सरकारची संस्था पाव, ब्रेड उत्पादनांबाबत सीएसइने घेतलेल्या आक्षेपांबाबत नेमकी काय भूमिका घेते हेही महत्वाचे ठरणार आहे. पाव, ब्रेड यांच्याबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके निश्चित करण्याची मोठी संधी सरकार व एफएसएसएआयकडे चालून आली आहे. या दोघांनीही ही संधी वाया दडवू नये.

Monday, May 2, 2016

१ मे २०१६ रोजी दै. दिव्य मराठीच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख - सफाईदूत



१ मे २०१६ रोजी दै. दिव्य मराठीच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख - सफाईदूत
----------
१ मे २०१६ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिन होता. त्यानिमित्त दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवार पुरवणीत १ मे २०१६ रोजी मी सफाई कामगारांच्या स्थितीबद्दल एक रिपोर्ताज लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाइल, तो लेख प्रसिद्ध झालेल्या पानाची तसेच लेखाच्या मजकुराची लिंक पुढे दिली आहे तसेच सविस्तर लेखही....
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-samir-paranjape-about…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/01052016/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/01052016/0/6/
----
सफाईदूत
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
आनंद व्यक्त व्हावा, पण प्रसंगावधान राखून... या माफक अपेक्षेला "रसिक’च्या संवेदनशील वाचकांचा आक्षेप असू नये. तसा तो असणारही नाही, याची खात्री आहे. याच विश्वासाच्या बळावर यंदाचा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा प्रयत्न आहे. एरवी, ढोल-ताशे बडवून, इतिहासाचे गोडवे गाऊन, रोशणाई आणि आतशबाजी करून दिवस साजरा करता येतो, पण यंदाच्या महाराष्ट्र दिनाला किनार आहे ती, मराठवाडा-विदर्भातल्या भीषण दुष्काळाची आणि कामगार दिनाला संदर्भ आहे तो, वर्षागणिक बेदखल होत चाललेल्या संघटित-असंघटित श्रमिकांचा. याच श्रमिकांमधला सर्वात तळाचा, दर दिवशी जीव धोक्यात घालून शहर-गाव स्वच्छ ठेवणाऱ्यांचा वर्ग आहे, सफाई कामगारांचा. आज प्रातिनिधिक स्वरूपात त्याची दखल घेणे, हे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे आहे. या घटकेला दुष्काळी भागातून उद्याच्या आशेवर शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या चिंताग्रस्त कुटुंबांची संख्या वाढतेच आहे. महाराष्ट्र दिनाचा आनंद साजरा करताना त्यांच्या कष्टप्रद जगण्याची दखल घेणे, हे सहवेदना जपणे आहेे...
वेळ पहाटे साडेपाचची. रेल्वे स्थानकातून कांदिवली पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर थोडे उजवीकडे वळून कोणा बजाजांचे नाव दिलेली महानगरपालिकेची शाळा. शाळेच्या पुढे एक अरुंद गल्ली. तिथे मुंबई महानगरपालिकेच्या किमान १० ते १२ कचरागाड्या जणू एका शिस्तीत उभ्या. म्हणजे एकदम चिडीचूप उभ्या.
ती चिडीचूप शांतता चिरत गाड्यांच्या दिशेने निघालो. तिथे सुमारे पन्नास एक कामगारांचा घोळका उभा होता. त्यांच्या मधोमध उभा राहून एक जण काहीतरी भाषण केल्यासारखे त्वेषाने बोलत होता. घोळक्याच्या जवळ गेलो. विचारले, अालमुत्तु आहे का? ज्याला विचारले, त्याची नजर माझ्याकडून त्या भाषण करणाऱ्याकडे गेली. तसा निरोपही गेला. आलमुत्तु आमच्या दिशेने आला. येतायेताच आलमुत्तु म्हणाला, ‘मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांपैकी मोटरलोडिंगच्या हंगामी कामगारांनी अाता अचानक काही तासांचा संप सुरू केला आहे.’
आलमुत्तु सांगत होता, ‘मुंबई महानगरपालिकेच्या कायमसेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांचे हाल कुत्रा खात नाही. वर्षातील २४० दिवस जर एखाद्याने काम केले तर त्याला त्या नोकरीत कायम करणे, कायद्याने बंधनकारक आहे. कायद्यातील याच पळवाटेचा फायदा घेत महापालिका हंगामी कामगाराला वर्षभरात २१० दिवस काम देते आणि त्याला कायम हंगामीच ठेवते. आता आता कुठे हंगामी सफाई कामगाराला दर दिवसाची ३५० ते ६०० रुपये मजुरी मिळू लागली आहे. २००४मध्ये मी याच खात्यात हंगामी म्हणून लागलो, तेव्हा दिवसाची ५० रुपये मजुरी मिळायची. आता ती वाढली असली तरी प्रत्यक्ष हंगामी कामगाराच्या हातात किती पैसे पडतात? मधला कंत्राटदार आणि महापालिकेतील अधिकारी पैसे खातो.
आलमुत्तू तामीळ. त्याचे आईवडील तामीळनाडूचे. मात्र त्याचा जन्म मुंबईतील मालवणीतला. तो मुंबईतून तामीळनाडूला शिकण्यासाठी गेला. तेथील त्याची शिक्षणकमाई म्हणजे दहावीत येऊन नापास. या बळावर तो महानगरपालिकेत २००४मध्ये हंगामी सफाई कामगार म्हणून लागला. आलमुत्तू हा कामगार नेते मिलिंद रानडे यांच्या ‘कचरा वाहतूक श्रमिक संघा’चा पहिल्यापासून सदस्य. चळवळ्या व अस्वस्थ. त्यामुळे कांदिवली भागातील हंगामी सफाई कर्मचाऱ्यांचे पुढारपण त्याच्याकडे आपसूकच आले. त्याला नाव विचारले, तर त्याने ठसक्यात पूर्ण नाव सांगितले, ‘आलमुुत्तू दुराईस्वामी हरिजन.’ हसून म्हणाला, हे ‘हरिजन’ नाव म. गांधींनी दिलेले. तामीळनाडूत आमच्या जातीला परायन म्हणतात. तामीळनाडूत आमच्या वाडवडिलांवर अन्याय झाले, म्हणून मुंबईसारख्या शहरांत आलो; पण कचरा, सफाई कामाची साथसंगत काही सुटली नाही. त्याच बरोबर हंगामी कामगार म्हणून होणारी पिळवणूकही टळली नाही. पूर्वी जातीच्या नावावर छळले जायचे, आता पदाच्या आधारे तेच होतेय...’
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई खात्यात जे हंगामी कामगार आहेत त्यांना हक्कांच्या सुट्ट्यांचे पैसे, वेतनात मिळालेली वाढ, अशा तीन-चार गोष्टींचे पैसे गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेलेच नाहीत. ही रक्कम पालिकेने मंजूर केलेली असली तरी ती त्यांना द्यायची असते, कंत्राटदारांनी. मुंबईतील इतर महापालिका वॉर्डांंमध्ये उशिरा का होईना कंत्राटदारांनी कुंथत कुंथत ही रक्कम हंगामी कामगारांना नुकतेच देणे सुरू केले होते. पण कांदिवली भागातील कंत्राटदार ती द्यायचेही नाव काढेना. त्यामुळेच संपाचे हत्यार कांदिवलीच्या कामगारांनी अचानक उपसले होते. नेमके या संघर्ष प्रतलाभोवती अचानक आम्ही जाऊन पोहोचले होतो.
या हंगामी सफाई कामगारांत एक चुणचुणीत कामगार होता. वय ३५ वर्षे. त्याचे नाव उमाकांत कदम (नाव बदलले आहे.) तो मूळचा रत्नागिरीचा. पण म्हणाला की, माझेही कोणी कोकणात नाही. गाव फक्त सांगायला आहे. माझाही जन्म मुंबईतलाच. दहावी झालो अाणि पालिका सफाई खात्यात कंत्राटदाराकडे हंगामी कामगार म्हणून लागलो. १५ वर्षं झाली आता.’ उमाकांत सांगत होता, ‘पालिकेमध्ये जे कायमसेवेतील सफाई कामगार आहेत, त्यांना आता किमान ३० हजारांपर्यंत वेतन आहे. त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेणाऱ्या, मरमर काम करणाऱ्या हंगामी कामगारांना मात्र ९ ते १२ हजार रुपयांपर्यंतच वेतन देऊन गप्प केले जाते? हा कसला न्याय आहे?’
“आम्ही मोटरलोडिंग करतो म्हणजे वाड्यावस्ती, सोसायट्यांमधून कचरा गोळा करून कचरा गाड्यांमध्ये भरतो. तो मग डंपिंग ग्राउंडला रवाना होतो. या कचऱ्यात फुटक्या काचांपासून ते प्रसंगी मानवी विष्ठेपर्यंत वाट्टेल ते असते. ही सगळी घाण मनावर साचवत काम करताना टीबी, त्वचारोग असे सगळे सगेसोयरेही आमच्याकडे वस्तीला येतात...लोकांना वाटते, गटारात उतरून घाण उपसणाऱ्यालाच रोग होतात. असे नाहीये... घाण कुठेही असो, उघड्यावर की जमिनीच्या पोटात, ती साफ करणाऱ्याच्या आरोग्याचे बारा वाजतातच. हंगामी कामगार आजारी पडला की, महापालिका कायमसेवेतील कर्मचाऱ्याला जशा सुविधा देते, त्या प्रमाणात आम्हाला सुविधा देत नाही. एखाद्याला उपचार झेपत नसतील तर तो तसाच धडपडत परवडेबल हॉस्पिटल धुंडा‌ळत राहतो...’ उमाकांत बोलतच होता. त्याला बोलताना अडवणे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे होते...
म्हणून एवढेच विचारले की, ‘चांगले बोलतोस... नेतृत्व का करत नाहीस संघटनेत...’ त्यावर दिवसा हंगामी सफाई कामगार आणि संध्याकाळी मुकादम म्हणून काम करणाऱ्या उमाकांतने दिलेले उत्तर काळीज चिरून गेले... म्हणाला, मी लिडरगिरी करायला लागलो तर मुकादमाचे काम पहिले हातातून जाईल.
आणि काम नीट करत नाही, अशी सबब दाखवून कंत्राटदार कधीही कामावरून काढून टाकेल. त्यासाठी तो कायदा नीट राबवतो... म्हणून मी लिडरगिरीत पडत नाही...’ हे सांगताना उमाकांत मिश्कील हसला... त्याच्या तोंडातला एक चांदीचा दात उठून दिसला.
बोलण्याची ही लांबण सुरू असतानाच आलमुत्तू आम्हाला सोडून पुन्हा कामगारांकडे वळला. ते मग घोळक्याने कांदिवली महानगरपालिका विभागीय कार्यालयात आपल्या मागण्यांसाठी चर्चा करण्याकरिता निघून गेले...
दिवस तोच. वेळ दुपारी दोन वाजताची. ठिकाण होते, कांदिवली पश्चिमेला असलेली शंकर गल्ली. तिथे नव्याने बांधलेल्या फुटपाथवरील गटारांची झाकणे उघडून काही हंगामी कामगार आतली घाण बाहेर काढत होते. गटारात डोकावून पाहिले, तर सगळा सुका कचरा होता...आलमुत्तूने माझी नजर ओळखली. म्हणाला, ‘पुढे चल.’ शंकर गल्लीत एक देऊळ आहे. तिथे रस्त्यावरली चार-पाच गटारे उघडून ठेवली होती. आत वाकून बघितले तर आजूबाजूच्या इमारतींमधून वाहून आलेला मैला गटारात पसरलेला. गटारे साफ करणाऱ्या कामगारांपर्यंत पोहोचलो. गटारात उतरलेला प्रत्येक कामगार उघडा होता. पायात काहीही नव्हते. हाफ चड्डीवर असलेला तो हातात फावडे घेऊन आतली घाण गटाराच्या टोकावर ठेवलेल्या घमेल्यात ओतत होता. त्याचा दुसरा साथीदार ते घमेले गटारीच्या बाजूला रिकामे करत होता. घाणीचे छोटे छोटे डोंगर साचत होते... तेवढ्यात गटाराच्या समोरच्या सोसायटीत राहणारी एक बाई कामगारांपाशी आली. म्हणाली, ‘ओ ती तुम्ही घाण बाहेर काढताय ना ती सोसायटीच्या थोडी पुढे नेऊन टाका... आम्हाला त्रास होतो याचा...’ हे ऐकताच गटारात काम करणारा तो कामगार तिला पटकन म्हणाला, ‘ही तुमच्या सोसायटीचीच घाण आहे...’ तशी ती बाई फणकाऱ्याने पुढे निघून गेली.
तो गटारात काम करणारा कामगार तसाच पुढे निर्विकारपणे काम करत राहिला. हातात हँडग्लोव्हज नव्हते, तोंडाला मास्क नव्हता, पायात गमबूट नव्हते. कारण कंत्राटदाराने या कामगारांना ते कधी दिलेलेच नाही. कंत्राटदार वर्षातून एकदाच त्यांना या ‘चैनीच्या’ वस्तू पुरवतो, असेही कळले. ऋतू बदलला की तुम्ही आम्ही लगेच कपड्यांचा पॅटर्नपण बदलतो. उन्हाळ्यात कॉटनचे कपडे, डोक्यावर टोपी, थंडी आली की कानटोपी, स्वेटर आणि पावसाळ्यात नानारंगी छत्री काय आणि विंडशिटर, रेनकोट असे बरेच काहीबाही घालतो आपण... गटारात काम करत असलेला तो कामगार पाहताना माझ्या डो‌ळ्यासमोर सगळे ऋतू झळकून गेले. हा इतका ‘निचले तपके का’ माणूस आहे का जगाच्या दृष्टीने, की याला ऊन, पाऊस, थंडी यापैकी कशाकशाचा म्हणून त्रास होत नाही? ज्या शहर, गावाने केलेली घाण हा नोकरी म्हणून का होईना साफ करतोय, त्याला त्या घाणीपासून वाचण्यासाठी संरक्षक साधने पालिकेने द्यायला नकोत? ती मिळतात की नाही याकडे दक्षतेने पाहणे, हे दक्ष लोकांच्या राजवटीत व्हायला नको? मोठमोठ्या विकासाच्या, तत्त्वाच्या उजव्या-डाव्या गप्पा मारतो, पण या देशात हजारो-लाखो सफाई कामगार जीवावर उदार होऊन रोज आपण केलेली घाण काढत असतात. आपण त्यांना माणूस म्हणून प्राथमिक सुविधाही देत नाही. विकासाच्या दिव्यदृष्टीत या सफाई कामगारांचे स्थान काय, हे सत्ताधारी कधी सांगत नाहीत, असे नाना तऱ्हेचे विचार येत होते मनात. माझ्यासमोरचा तो हंगामी कामगार मात्र निर्विकार होता. गटारात उतरून काम करत असल्याने त्याचे पाय घाणीने माखलेले होते. फक्त पायच का तर जवळजवळ सारे अंगच... घाणीमुळे गंधाशी जोडलेल्या संवेदना हरवलेला तो कामगार मध्येच आजूबाजूला नजर फिरवत होता. कारण घरातले सर्व बाहेर गेले होते म्हणून त्याने आज आपल्या मुलाला कामाच्या ठिकाणी सोबत आणले होते... आपला बाप काय काम करतोय, याकडे त्याच्या पोराचे लक्षही नव्हते. ते त्या गटाराच्या भोवती मस्त हुंदडत, खेळत होते. भूक लागली म्हणून मध्येच बॉनबॉर्न बिस्किटाचा पुडा घेऊन खात होते, गटाराला चकरा मारत होते...आपल्या भविष्याच्या परिघाभोवती ते पोर नकळत घुमत होते का? स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई असे ठळकपणे रंगविलेली एक भिंत आमच्या समोर होती. त्या भिंतीसमोरच पब्लिकने केलेल्या घाणीत हे वेगळे चित्रही उमटले होते...
मुंबईतील असो वा नागपूर-सोलापूरमधील असो, कायमसेवेतील असो वा हंगामी सफाई कामगार असो, त्यांच्या पगारात जो असायचा तो फरक असेल, पण घाणीच्या संपर्काची व त्यामुळे ओढवणाऱ्या आपत्तींची त्यांच्यावरील संकटतीव्रता मात्र एकच आहे. शेवटी, मनुष्यदेह हा कायम व हंगामी सेवा अशी काही फारकत आरोग्याबाबत करत नाही. कामगार दिन, महाराष्ट्र दिन एकाच दिवशी १ मे रोजी येतो. चांगले आहे. पण ज्यांच्या नावाने हा दिवस पाळला जातो, त्यांच्यावर वर्षभर अन्यायच होताना दिसतो आहे. ही अन्यायाची घाण हंगामी नव्हे तर कायमस्वरूपी साफ व्हायला हवी. अर्थात, घाण तर साफ व्हायलाच हवी; पण मनेही साफ व्हायला हवीत... कायमची...!

Wednesday, March 2, 2016

अणुऊर्जानिर्मिती हाच पर्याय - - समीर परांजपे ( दै. दिव्य मराठी ३ मार्च २०१६)



दै. दिव्य मराठीच्या दि. ३ मार्च २०१६च्या अंकामध्ये मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची टेक्स्ट लिंक, मजकूर व जेपीजी फाइल तसेच वेब लिंक सोबत दिल्या आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-samir-paranjape-article-about-nuclear-power-generation-5263514-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/02032016/0/6/
----
अणुऊर्जानिर्मिती हाच पर्याय
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
येत्या दशकभरात देशातील अणुऊर्जानिर्मितीचे प्रमाण तिप्पट करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले अाहे. त्या अनुषंगाने २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जानिर्मितीसाठी दरवर्षी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. पुढील वीस वर्षांत दरवर्षी अणुऊर्जानिर्मितीसाठी इतका निधी राखून ठेवण्यात येणार आहे. प्रसंगोपात या निधीत पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल. त्या कालावधीपर्यंत देशात सर्वांनाच चोवीस तास वीज उपलब्ध करून देता येईल अशी धोरणे आखून पावले टाकण्याचे नरेंद्र मोदी सरकारने ठरवले आहे. कागदावर ही घोषणा खूप आकर्षक वाटत असली तरी देशात विजेची असलेली मागणी व होत असलेली वीजनिर्मिती यांच्यात बरीच तफावत आहे. अणुऊर्जानिर्मितीचे महत्त्व पं. नेहरूंनी सर्वप्रथम जाणले. त्यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळेच या क्षेत्रात भारताची वाटचाल सुरू झाली. जगात पारंपरिक स्रोतांतून करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीला काही मर्यादा निश्चितच आहेत. त्यामुळे अणुऊर्जानिर्मितीचे क्षेत्र विस्तारणे हितावह ठरेल हे या क्षेत्रातील तज्ज्ञ वारंवार सांगत असतात. अर्थसंकल्पात अणुऊर्जानिर्मितीसाठी देण्यात आलेला वाढीव निधी हे त्याचेच निदर्शक आहे.
वीजनिर्मितीची आकडेवारी पाहायला मिळते त्यात भारत नेहमीच अग्रेसर दिसतो. २०१३ मध्ये जगातील सर्वात जास्त वीजनिर्मिती करणाऱ्या देशांत भारताचा तिसरा क्रमांक लागला. याबाबत भारताने जपान व रशिया या दोघांनाही मागे सारले आहे. भारतातील एकूण वीजनिर्मितीपैकी रिन्युएबल पॉवर प्लँटमधून २८ टक्के व नॉनरिन्युएबल पॉवर प्लँटमधून ७२ टक्के वीजनिर्मिती होते. भारतामध्ये सध्या १,२५,००० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते. राष्ट्रीय वीजप्रकल्पांतून ५०,००० मेगावॅट तर राज्यातील वीज प्रकल्पांतून ७५,००० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते. लहानसहान प्रकल्पांतून ४ ते ५ हजार मेगावॅट वीज तयार होते. पुढील दहा वर्षांचा आढावा घेतल्यास २०२० पर्यंत २ ते अडीच लाख मेगावॅटपर्यंत विजेची गरज पोहोचण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोळसा, नाफ्था, बंकर फ्युएल, डिझेल, एलएनजी या वीजनिर्मितीसाठी उपयोगांत येणाऱ्या घटकांच्या किमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण होऊ लागली होती. या घटकांचा भारतातील वीजनिर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या घटकांच्या किमती अधिक असल्यामुळे वीजनिर्मितीसाठी भारतात कोळसा वापरण्याची प्रथा पहिल्यापासून होती. परंतु आता या घटकांच्या किमती घसरत असल्याने कोळशापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पांना तगडी स्पर्धा निर्माण होऊ शकते. हे खरे असले तरी अणुऊर्जानिर्मितीला पर्याय नाही व या प्रकल्पांची क्षमता वाढवणे निकडीचे झाले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जानिर्मितीसाठी वाढीव निधीची तरतूद सरकारने केल्यामुळे काही पावले टाकणे शक्य होणार आहे. पहिले पाऊल म्हणजे अणुऊर्जा कायद्यामध्ये काही सुधारणा करणे आता अपरिहार्य ठरणार आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्राप्रमाणेच खासगी कंपन्यांनाही अणुऊर्जानिर्मिती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे अधिक सुलभ होईल. देशामध्ये ७७०० मेगावॅट वीजनिर्मिती करू शकतील इतक्या क्षमतेच्या १० अणुभट्ट्या कार्यान्वित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. भारत स्वदेशात बनवणार असलेल्या अणुभट्ट्या उभारण्यासाठी लागणाऱ्या निधीपैकी ३० टक्के निधी समभागांतून तर बाकीचा निधी कर्जरूपाने उभारण्यात येईल. भारतात ज्या विदेशी कंपन्या अणुभट्ट्या उभारतील त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून कर्ज घेण्यात येईल. अणुभट्ट्यांच्या जागा आधी निश्चित केल्याने त्या प्रकल्पांसाठी लागणारा खर्चही कमी होण्यास मदत हाेईल. येत्या २० वर्षांत फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या उभारण्याचाही भारताचा संकल्प आहे. त्यामुळे जितकी विजेची मागणी आहे त्यापेक्षा जास्त वीजनिर्मिती होऊ शकेल.
भारतात अणुऊर्जानिर्मिती वाढावी असा एक प्रवाह असतानाच त्याला विरोध करणाऱ्या लोकांचा गटही तितकाच प्रभावी आहे. जपानमध्ये तोहोकू येथे झालेल्या भूकंपामुळे व त्यामुळे आलेल्या सुनामीमुळे फुकुशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये ११ मार्च २०११ रोजी पूर्ण यंत्रणा बंद पडली व १२ मार्च रोजी किरणोत्सार होऊ लागला. पुढे त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. या दुर्घटनेला येत्या ११ मार्च रोजी ५ वर्षे पूर्ण होतील. त्याआधी १९८६ मध्ये रशियातील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातही दुर्घटना घडली होती. या दोन दुर्घटनांचा हवाला देऊन भारतात अणुऊर्जा प्रकल्प नकोत असा आग्रह पर्यावरणवाद्यांकडून धरला जातो. त्यामुळे कोकणात जैतापूर येथे फ्रान्सच्या अरेवा कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध केला जात आहे. रशियाच्या तांत्रिक सहकार्याने साकारत असलेल्या तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विस्तारालाही अशाच विरोधाचा सामना करावा लागत आहे. सहा हजार मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प हरिपूरजवळ उभारू देण्यास पश्चिम बंगाल सरकारनेच विरोध दर्शवला होता. हरिपूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न जसा धगधगता होता तसाच जैतापूर व कुडनकुलमचा संघर्ष अजूनही संपण्याची शक्यता दिसत नाही.
केंद्र सरकारच्या नागरी अणुऊर्जा धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही करण्यात आली होती. हे अडथळे पार करून अणुऊर्जानिर्मितीमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारला साध्य करावे लागणार आहे. मात्र असे करताना पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांतील योग्य त्या गोष्टींवर विचार करण्याचा सुज्ञपणाही केंद्र सरकारने दाखवायला हवा. भारत व अमेरिकेमध्ये नागरी अणुसहकार्य करार झाला. तसा करार रशिया व फ्रान्स या देशांशीही भारताने केला आहे. त्यामुळे अणुऊर्जानिर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान व इंधन मिळणे भारताला सोपे जाईल. भारताच्या एकूण वीजनिर्मितीपैकी ३.५ टक्के वीज ही अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे निर्माण होते. हे प्रमाण विस्तारण्यासाठी वाढीव निधीची जी तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तिचे स्वागतच करायला हवे.

Monday, January 18, 2016

स्वगत जगण्याचे, वास्तवातल्या 'बेलवलकरां'चे...दै. दिव्य मराठीच्या ३ जानेवारी २०१६च्या रसिक पुरवणीतील माझा लेख




दै. दिव्य मराठीच्या ३ जानेवारी २०१६च्या रसिक पुरवणीत कलाकार किशोर नांदलस्कर व दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांच्यावर मी व विकास नाईक यांनी कलाकार जनार्दन परब यांच्यावर पुढील लिहिलेली व्यक्तिचित्रे आज प्रसिद्ध झाली आहेत. त्याची लिंक सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-samir-paranjape-rasik…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/03012016/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/03012016/0/4/
-------------
स्वगत जगण्याचे, वास्तवातल्या 'बेलवलकरां'चे...
---------
समीर परांजपे/विकास नाईक
-------
‘टु बी ऑर नॉट टु बी दॅट इज द क्वेश्चन…’
हे वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ नाटकातले आप्पा बेलवलकरांच्या तोंडचे तुटलेपणाच्या- एकटेपणाच्या भावनेला वाट मोकळी करून देणारे अजरामर स्वगत. एकेकाळी नाट्यसृष्टी गाजवलेला हा ‘नटसम्राट’ नुकताच चित्रपटरूपात झळकला आहे. त्याच्याच वेदनेशी नातं सांगत नाटक-सिनेमांत ठसा उमटवलेले काही कलावंत काळाच्या ओघात स्वत:चं अस्तित्व जपू पाहताहेत. त्यांचे एकटेपण नात्यांतील दुराव्यातून अथवा आजारपणातून आलेले असले तरीही, समाज म्हणून आपणही या गुणीजनांचं देणं लागतो, या भावनेतून मराठी चित्र-नाट्यसृष्टीतल्या वास्तवातल्या ‘आप्पा बेलवलकरांच्या’ जगण्याचा हा अंतर्मुख करणारा पट…
---------
समाधानी, तरीही एकटा ‘‘सन्नाटा’’
कलाकार किशोर नांदलस्कर यांचे व्यकितचित्र
- समीर परांजपे
‘कुणी या तुफानाला घर देता का घर’ या ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकर यांच्या स्वगताच्या धर्तीवर बोलायचे, तर ‘कुणी या विनोदाला घर देता का घर’ अशी माझी काही काळ अवस्था होती... परळमधील भोईवाडा येथे दहा बाय दहाच्या घरात माझा उभा जन्म गेलेला... माझा परिवारही तिथेच वाढला. कुटुंबातल्या सदस्यांची संख्या वाढली, त्यामुळे जागा अपुरी पडू लागल्याने परळच्या घराजवळील राममंदिरामध्ये मी रोज रात्री झोपत असे. हे एका वार्ताहराच्या लक्षात आले आणि वर्तमानपत्रात तशी बातमी ठळकपणे झळकली.
त्यानंतरच काय ती सूत्रे हलली आणि कलावंतांसाठी असलेल्या दहा टक्के कोट्यातून मला हा बोरिवलीचा फ्लॅट मिळाला...
अलीकडे गाजलेल्या ‘सिंघम’ चित्रपटात राजकारण्याची ऐशीतैशी करून बाहेर पडणाऱ्या इन्स्पेक्टर अजय देवगणला सलाम ठोकणाऱ्या काही सेकंदाच्या भूमिकेतही चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे, मराठी-सिनेमांत आपल्या सहजसुंदर अभिनयाने वावरलेले किशोर नांदलस्कर गतआयुष्यातलं एक एक पान उलगडत होते... आवाजात कंप होता... शब्दांत ओलावा... आणि साथीला घर भरून राहणारे एकटेपण...
‘एकलेपणाची आग लागली या जीवा’ हे नाट्यगीत मनात सारखे घोळवतच मुंबईच्या बोरिवली उपनगरातील चिकूवाडी परिसरातल्या एका सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटकडे मोर्चा वळविला होता. बंद दार उघडण्यासाठी बेल वाजवून आपण आल्याची वर्दी द्यावी, अशा तयारीने थोडा पुढे सरसावलो. फ्लॅटचे दार सताड उघडे होते.
‘जिस देश मे गंगा रहता है’ या चित्रपटात ‘सन्नाटा’ची भूमिका साकारणारे, ‘वास्तव’मध्ये लक्षवेधी भूमिका साकारलेले किशोर नांदलस्कर साक्षात समोर उभे होते. साधासा शर्ट, लेंगा या वेषात. वन बेडरुम हॉल अशी रचना असलेल्या या छोट्या फ्लॅटमध्ये अ‌वघे पाऊणशे वयोमानाचे, मिश्कील स्वभावाचे नांदलस्कर सध्या एकटेच राहतात. घरात शिरताच भिंतीला टेकून ठेवलेली सतार नजरेला पडते. तर भिंतीवर संत ज्ञानेश्वर आणि एका योगी महाराजांची तैलचित्रे लावलेली. सन्नाटा म्हणजे, नीरव शांतता. त्यालाच छेद देत व माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून नांदलस्कर म्हणाले, ‘माझ्या मर्जीनेच एकटा राहतो इथे. तीन मुले आपापल्या प्रपंचात व्यग्र आहेत. विवाहसौख्य फारसे नाही लाभले. मानसिक-भावनिक क्लेशही झाले खूप. पण तक्रार नाही माझी कोणाबद्दल. माझा एक मुलगा येऊन-जाऊन असतो इथे. मला काही हवे-नको ते पाहायला. काही वर्षांपूर्वीपासून माझा कल अध्यात्माकडे झुकलाय. आयुष्यभर नाटक-चित्रपटांतून अनेक भूमिका केल्या. आताही अधूनमधून असतो. पण आता स्वत:च्या पसंतीने भूमिका स्वीकारतो.’
एकलेपणाच्या आगीने या विनोदसम्राटाच्या जिवाची खरंच खूप तगमग होत असेल का? एकटेपणाचं-तुटलेपणाचं दु:ख मनातच साठून राहात असेल का? काही अंदाज येत नव्हता. आपल्या घराकडे चौफेर नजर फिरवून स्वगत म्हटल्यासारखे किशोर नांदलस्कर म्हणाले, ‘२००८पासून इथे राहायला आलोय. आयुष्यातले हे नवे पर्व सुरू झाले, तेही वयाच्या उतरणीला.’ पण हे सांगताना त्यांच्या आवाजातील कातरता काही लपत नव्हती. बोलता बोलता नांदलस्कर जुन्या आठवणींत रंगून गेले. त्यात त्यांनी वडील खंडेराव नांदलस्कर हे केशवराव दात्यांच्या नाटक कंपनीत स्त्रीपार्टी करायचे, हे सांगून अभिनयाच्या गोडीमागचं रहस्य उलगडलंच; पण कमाल काश्मिरी नावाच्या दिग्दर्शकाने ‘दर्द-ए-दिल’ नावाचा िहंदी चित्रपट बनवायला घेतला, त्यात तीन नायक होते, त्यापैकी एक आंधळा नायक मी साकारत होतो, त्या चित्रपटाचे चार-पाच दिवस चित्रीकरण झाले आणि ते बंदच पडले... असेे फारसे कुणाला ज्ञात नसलेले तपशील सांगून आश्चर्याचा धक्काही दिला.
बोलण्याच्या ओघात गतस्मृतींना उजाळा देताना त्यांनी कारकिर्दीचा पट उलगडला.
त्यातून आपल्याला ध्यानात येतं की, पोलिसनामा, विच्छा माझी पुरी करा, चल आटप आता पुरे, नवरे सगळे गाढव अशा व्यावसायिक नाटकांबरोबरच सुमारे शंभर चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यातले बावीस-तेवीस चित्रपट हिंदी आहेत. ‘जिस देश मे गंगा रहता है’मधील ‘सन्नाटा’ असो, वा ‘वास्तव’मध्ये संजय नार्वेकरच्या वडिलांची केलेली भूमिका; त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले. पण त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर ते चमकले अजय देवगणच्या गाजलेल्या ‘सिंघम’मध्ये. त्यांना शिपायाच्या काही सेकंदाच्या संवादविरहित रोलमध्ये बघितल्यानंतर, ‘अरे, हे आपले नांदलस्कर’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांच्या परिचितांमध्ये-चाहत्यांमध्ये उमटली होती.
आठवणींत रमलेल्या नांदलस्करांनी या भेटीत मनातली एक सलही बोलून दाखवली. म्हणाले, ‘अॅटेनबरोच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आपल्याकडे गांधी फंड योजना सुरू झाली होती. त्यात तुटपुंजे मानधन मला मिळत होते. त्यानंतर हे मानधन मिळायचे बंद झाले. त्यानंतरच्या काळात ज्येष्ठ कलावंतांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती-वेतनासाठी राज्याच्या सांस्कृतिक खात्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र कुणास ठाऊक, त्याचे पुढे काहीही झालेले नाही’...अर्थात, हे सांगताना त्यांचा सूर कटू नव्हता, तर त्यात विनम्रता होती. ही विनम्रता एकटेपणाच्या अपरिहार्य सोबतीमुळे येत असेल का एखाद्यात? हा प्रश्नही मनात येऊन गेला.
मनासारखं बोलून झाल्यावर नांदलस्करांचा निरोप घेऊन निघणार, इतक्यात त्यांचा मुलगा आला. तो येताच नांदलस्करांचा चेहरा चांगलाच खुलला. बाबांना भेटायला आलो, असे तो मला म्हणाला. आता त्यांच्या सोबतीला कुणीतरी त्यांचा जिवाभावाचा आहे, या समाधानाने घराबाहेर पडलो... तोवर ‘सन्नाटा’ने एकलेपणा बोलका केलेला होता...
---------
तरीही ‘प्रकाश’ उमेदीचा
दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांचे व्यक्तिचित्र
- समीर परांजपे
अर्धांगवायूच्या आजारपणातून थोडं सावरल्याचा त्यांचा तो काळ होता... वर्षभराचे थकलेले मानधन मिळावे, या हेतूने ते निर्मात्याच्या भेटीला गेले होते. निर्मात्याने त्यांची भेट तर घेतली; पण ‘तुझं नाव तेवढं नाटकांच्या बोर्डवर लिहिलंय त्यात समाधान मान, पैसे वगैरे काही मिळणार नाहीत.’ अशी अपमानास्पद वागणूक देऊन त्यांची बोळ‌वण केली... दिग्दर्शक या नात्याने बावन्नहून अधिक नाटकं खात्यावर जमा असलेले ते एकटेपणा आणि तुटलेपणाची भावना मनात घेऊन घरी परतले...
वन रुम किचनच्या भाड्याच्या घरातला हा दोघांचा संसार... घरात शिरलं की तिथे समोरच्या टेबलावर मांडलेली काही सन्मानचिन्हं नजरेस पडतात. पण जागा अपुरी असल्याने बाकीची सन्मानचिन्हं स्वयंपाकघरामध्ये छतालगत माळ्याचा काँक्रिटचा ओटा आहे, त्यावर मांडून ठेवलेली... बाकीच्या जागेत घरातले सामानसुमान आणि असंख्य पुस्तके... मुंबईतल्या गोरेगाव उपनगरातल्या या साध्याशाच घरात राहताहेत, फार्सिकल नाटकांचे बादशाह अशी एकेकाळी ख्याती मिळवलेले व नाट्य दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर आणि त्यांची पत्नी नीना... नाट्यसृष्टीतल्या असंख्य नवोदितांना यशाची वाट दाखवलेले बुद्धिसागर आता अर्धांगवायूच्या आजारपणातून सावरताहेत... पुन्हा एकदा उमेदीनं नव्या आयुष्याला सुरुवात करू पाहताहेत... परंतु, आजारपणाच्या काळात आप्तस्वकीयांनी दिलेल्या वागणुकीतून वाट्याला आलेल्या एकटेपणाची साथ अजूनही सुटलेली नाही... तुटलेपणाची सल आजही मनातून पुरती गेलेली नाही... नाटक हाच बुद्धिसागरांचा व्यवसाय, श्वास, आणि आयुष्यही.
वर्तमानपत्रातल्या नाटकांच्या जाहिरातींत कलावंतांबरोबरच या दिग्दर्शकाचे नाव पाहून आवर्जून त्याच्या नाटकाला जाणारे प्रेक्षक होते. ज्या वेळेस ‘बायकोच्या नकळत’, ‘लफडा सदन’, ‘जागो मोहन प्यारे’ ही प्रकाश बुद्धिसागर यांनी दिग्दर्शित केलेली मराठी व्यावसायिक नाटके रंगमंचावर तुफान सुरू होती, त्याच काळात बुद्धिसागरांना अचानक अर्धांगवायूचा पहिला झटका आला. त्यातून ते बरे झाले. मात्र २००८मध्ये आलेल्या दुसऱ्या झटक्याने त्यांंच्या आयुष्याची दिशाच पार विस्कटली. मागचे काही आठवेनासे झाले. आपण लिहिलेल्या एकांकिका, दिग्दर्शित केलेली व्यावसायिक नाटके, नातेवाईक सगळे विस्मृतीत गेले. ओळख होती फक्त पत्नीची. म्हणजे, तिचे नाव-गावही ते विसरले होते. पण त्या विस्मृतीच्या काळात ते फक्त पत्नी नीनालाच ओळख दाखवत होते. या बिकट काळात आप्तस्वकीयांकडून त्यांची फसवणूकही झाली. एरवी सतत मागे-पुढे करणाऱ्यांनी त्यांच्यापासून अंतर राखले; पण अभिनेता मोहन जोशी, प्रशांत दामले, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि अनेक अनोळखी नाट्यरसिकांनी त्यांना मदतीचा हातही पुढे केला. माणूस एकटा असतो म्हणजे कसा असतो आणि आपल्या माणसांपासून दुरावतो म्हणजे कोणत्या अवस्थेत राहतो, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना या बिकट क्षणांनी दिला. प्रकाश बुद्धिसागर हे आता ६२ वर्षांचे आहेत.
एक वेळ तर अशी आली होती की, संकटांची मालिकाच बुद्धिसागरांवर कोसळत होती. वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्काचा वाटा प्रकाश यांना मिळू नये, यासाठी त्यांच्या सख्ख्या नातेवाइकांनी कारस्थाने केली. या कारस्थानांना वाचा फोडण्यासाठी त्याचा दोन पाने भरतील इतका तपशील अभिनेता मोहन जोशी यांनी आपल्या ‘नटखट’ या आत्मचरित्रात दिलेला आहे. मधल्या काळात विस्मृतीच्या गर्तेत सापडलेल्या प्रकाश बुद्धिसागरांची स्मृती उपचारांनंतर हळूहळू परत आली. ते हिंडू-फिरू लागले. आजारपणातून उठल्यावर त्यांच्याकडे काही नाटके दिग्दर्शनासाठी आली. पण नाटकाच्या तालमींना सुरुवात व्हायची आणि पाच-सहा दिवस उलटले की, निर्माता ते सारे बंद करायचा. कारण ‘नाटक काढून घ्या त्यांच्याकडून, नाहीतर निर्माता म्हणून तुम्ही साफ बुडाल.’ असे निर्मात्यांचे कान भरले जायचे. पुन्हा उभे राहू पाहणाऱ्या बुद्धिसागरांना हे सारेच अनपेक्षित होते... तरीही नेटाने त्यांनी परिस्थितीशी सामना केला. बरे झाल्यानंतर बुद्धिसागर यांनी अनेक नाट्यस्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही काम पाहिले. पुन्हा पहिल्याइतकी नव्हे, पण नाट्यक्षेत्राशी संबंधित गोष्टींत त्यांची थोडी लगबग सुरू झाली. प्रकाश व नीना बुद्धिसागर यांच्याशी बोलताना एखाद्या नाटकाची आठवण निघाली की, प्रकाश काही वेळ विचार करायचे.
नाटकाबद्दल आठवून सांगायला लागायचे. एखाद्या तपशिलापाशी ते अडकले की, नीना तो तपशील पूर्ण करायच्या. त्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट नक्की जाणवली की, बुद्धिसागर आता कोणत्याही व्यावसायिक नाटक, मालिकेचे दिग्दर्शन करण्यासाठी पूर्ण सक्षम आहेत. ‘नटसम्राट’ चित्रपटाचा विषय गप्पांच्या ओघात आला, त्या वेळी बुद्धिसागर सहज सांगून केले की, ‘आईशपथ’ या एकेकाळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात नाना पाटेकरांनी भूमिका केली होती. अर्थात, आजही वर्तमानपत्रात नाटकांच्या संपूर्ण पानभर पसरलेल्या जाहिराती बघितल्या की, आपलेही एकेकाळी या जाहिरातींमध्ये नाव होते, या विचाराने ते अस्वस्थ होतात. निरोप देताना अगदी ऑटोरिक्षापर्यंत सोबत येतात. तिथून निघताना माझ्या मनात विचार आला, हे अंधाराचे जाळे लवकर फिटू दे आणि प्रकाशाचे राज्य नाट्यसृष्टीत पुन्हा येऊ दे..
-------------- संघर्ष जगण्याचा
कलाकार जनार्दन परब यांचे व्यक्तिचित्र.
- विकास नाईक
ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नं. २च्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमध्ये ते एकटेच उभे होते... आपल्याच विचारात... ना गर्दीचं त्यांच्याकडे लक्ष, ना त्यांचं गर्दीतल्या कुणाकडे. ‘नमस्कार परबदादा’ म्हटल्यावर ते भानावर आले. भरदार पांढरी मिशी, तुळतुळीत टक्कल, फिकट निळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा खादीचा सदरा, किरमिजी रंगाची पँट, खांद्यावर बऱ्यापैकी जड काळ्या रंगाची बॅग, पायात साध्याशा चपला... खोल आवाजात नमस्काराचा प्रतिसाद...
‘क्रांतिवीर’ चित्रपटातील ‘उजडे चमन’ ही भूमिका साकारणाऱ्या जनार्दन परबांना पाहताच नाना आणि त्यांचा तो ‘बता ये किसका खून है? इसमें हिंदू का कौनसा और मुसलमान का कौनसा?’ हा गाजलेला मेलोड्रॅमॅटिक सीन झर्रकन डोळ्यांपुढे सरकून गेला. ओळख झाल्यावर जवळच्याच एका हॉटेलात पोहोचलो. हातानेच खुणा करून हल्ली बोलताना आणि चालताना दम लागतो, असे सांगून काही क्षण ते शांत बसून राहिले. पाणी पिऊन झाल्यावर हॉटेलच्या आढ्याकडे पाहात म्हणाले, ‘माझ्याकडे काय काम काढलंत? हल्ली कुणालाच आमची आठवण होत नाही.’ ‘काहीही नाही, सहज. नवीन काय सुरू आहे?’ या माझ्या प्रश्नावर उसासा सोडत परबदादांनी, ‘झी’ मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची आठवण सांगितली. म्हणाले, ‘त्या कार्यक्रमात मी दिसलो आणि अनेकांना धक्का बसला. कारण मी ढगात गेलो, अशीच अनेकांनी इतरांची समजूत करून दिली होती. तेव्हाही मी हेच म्हणालो होतो की, माझा स्ट्रगल मी जिवंत आहे, हे सांगण्यासाठी सुरू आहे...’ शंभर टक्के कोकणी व्यक्तिमत्त्व शोभणारे परबदादांचे वडील गिरणीत काम करीत असताना दशावतारी नट होते. हीच आवड परबांनी विल्सन महाविद्यालयातून पदवीधर होताना जोपासली आणि हळूहळू मराठी रंगभूमी-चित्रपटांतून ते भूमिका साकारू लागले. महिंद्रा युजिन्समधील नोकरी आणि अभिनय ही कसरत बरीच वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली... विजयाबाई मेहतांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करताना परब म्हणाले, विजयाबाईंनी ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकामुळे माझ्यासारख्या छोट्या अभिनेत्याला ओळख दिली. भारतातील हे पहिले नाटक जे भारताच्या सीमा ओलांडून जर्मन, इग्लंड या देशांमध्ये सादर करण्यात आले. या नाटकामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारच्या सहा भूमिका साकारण्यास मिळाल्या होत्या.
अशोक सराफ, नाना पाटेकर यांच्यासोबत ‘मुद्राराक्षस’, ‘अभिज्ञान शाकुंतलम’मध्ये भूमिका साकारणारे जनार्दन परब काही क्षण भूतकाळात रमले. काशिनाथ घाणेकर वगळता मराठी रंगभूमी किंवा चित्रपटातील सर्व आघाडीच्या कलाकारांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे, असे ते म्हणाले. मात्र, ऐन उमेदीत असताना पत्नीचा मृत्यू आणि त्यानंतर आलेले आजारपण परबांना आयुष्याची खरी ओळख देऊन गेले. २००२मध्ये जनार्दन परब यांना अर्धांगवायूचा झटका आला. याच काळात ते मुंबई सोडून आपल्या गावी निघून गेले. एकटेच देवघरात बसून असायचे. स्वत:शीच संवाद चालायचा. गतआयुष्याची उजळणी व्हायची. या सहा वर्षांच्या अज्ञातवासात शरीराने अधू असले तरीही जात्याच तैलबुद्धीच्या परबांनी ‘देवाक काळजी आसा’ या मालवणी-मराठी चित्रपटाची कथा लिहिली. सामान्य माणसाच्या मनात असलेल्या परमेश्वर या संकल्पनेवर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे परब सांगतात. तर ‘वयल्याची तुटली दोरी, खायलो बोंब मारी’ या नाटकात कोकणातील देव-देवस्कीवर भाष्य केले आहे.
आज वयाच्या सत्तरीत असलेल्या या अभिनेत्याला ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या ब्रेख्तियन थिअरीवर आधारित नाटकातील अनुभवातून जावे लागत आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षा जपणूक केलेली नाती अधिक घट्ट असतात, हे वास्तव परब प्रत्येक क्षणी अनुभवत आहेत. आयुष्यात एक क्षण असा आला की, नात्यांत आलेल्या कटुतेमुळे परब यांच्यावर स्वत:च्या मालकीच्या घरातून बाहेर पडण्याची वेळ ओढवली, हक्काचं छप्पर सोडावं लागलं. तेव्हा खरं तर काही क्षण त्यांनी ‘अप्पा बेलवलकरांची’च वेदना जणू अनुभवली...
नाट्यपरिषदेचे अध्यक्ष असताना मोहन जोशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्याला चालले होते, परंतु वाटेत आवर्जून कणकवलीस थांबले. परबांचं घर शोधलं. सपत्निक घरी जाऊन तातडीची मदत म्हणून त्यांनी पंचवीस हजार रुपये देऊन परबांना मुंबईला येण्यास विनवले.
सध्या जोगेश्वरीला बहिणीकडे राहात असलेले परब म्हणतात, जीवनातील हीसुद्धा एक मजा आहे, सत्याला सामोरे जाताना हसत हसत जायलाच हवे. मी तर एक सामान्य माणूस आहे. आंधळे प्रेम आणि माझे संस्कार कदाचित कमी पडले असावेत... असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मनोमन त्यांनी एकटेपणाचा स्वीकार केल्याचेही जाणवते. अर्थात, एकटेपणातही स्वाभिमानी आयुष्य जगण्याचा आग्रह धरणारे जनार्दन परब शूटिंगच्या निमित्ताने आजही सकाळची साडेसहाची शिफ्ट करण्यासाठी पहाटे साडेचारला घर सोडतात...

Thursday, December 3, 2015

मस्तानी: असतानाची. नसतानाची - समीर परांजपे- दिव्य मराठी, रसिक पुरवणी - २९ नोव्हेंबर २०१५




दै.दिव्य मराठीच्या 29 नोव्हेंबर 2015च्या अंकात रसिक या रविवारच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाची वेबलिंक, टेक्स्ट तसेच लेखाची जेपीजी फाइल सोबत जोडली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/29112015/0/1/
------------------------------------------
असूया, कुतूहल, गैरसमज, निंदा-नालस्ती असं सगळं वाट्याला आलेल्यांपैकी मस्तानी ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा. खऱ्या-खोट्या कहाण्या, वदंता, आणि आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने आगामी ‘बाजीराव-मस्तानी’साठी घेतलेलं कला-स्वातंत्र्य या गदारोळात हरवून गेलेल्या अनन्यसाधारण मस्तानीचा हा शोध...

मस्तानी: असतानाची. नसतानाची
----------------------------------
- समीर परांजपे
--sameer@Dbcorp.in
----------------------------------
शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची कल्पनाशक्ती होती तोकडी. ‘देवदास’ ही कादंबरी त्यांनी अर्धवटच लिहिली होती. ती पूर्ण केली, संजय लीला भन्साळीने ‘देवदास’ चित्रपट बनवून. ‘डोला रे डोला’ या गाण्यात पारो व चंद्रमुखीला एकत्र नाचवून त्याने कल्पनाशक्तीच्या मनोऱ्याचा पाया रचला होता.
आता तर त्याने मनोऱ्यावर कळस बांधलाय...
बाजीराव पेशव्यांच्या काशीबाई आणि मस्तानी या दोन बायका. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या ‘हिंदीराठी’ गाण्यात काशीबाई, मस्तानी लावणी नृत्यांगनांच्या आवेशात नाच नाच नाचतात.
कधीही युद्ध न हरलेला बाजीराव असा त्याचा लौकिक, पण तो काही खरा नाही. बाजीराव त्याच्या पश्चात एक युद्ध मात्र हरला आहे. ते म्हणजे, ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ने लादलेले युद्ध. शुद्ध मराठीत ‘चित्रपटीय स्वातंत्र्य.’ बाजीरावाच्या काळात चित्रपट वगैरे भानगड नव्हती. होती ती लावणी, पोवाडा वगैरे. तेच नेमके हेरून संजयने ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात अशी काही ‘लीला’ दाखविली, की मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमान वगैरे बाळगणाऱ्यांना त्याने पुरते ‘चितपटीय’ करून टाकले...
काही महिन्यांपूर्वी मुंबईत येऊन भन्साळीचा पाहुणचार घेणारे पेशव्यांचे सध्याचे वंशज मग खडबडून जागे झाले. त्यांनी भन्साळींना एक खुला खलिता धाडून कानउघडणी केली. १७व्या शतकात पेशव्यांचे असलेले पोशाख, त्यांच्या स्त्रियांची वेषभूषा असे सगळे तपशील या खलित्यात आहेत. बाजीरावाची पहिली पत्नी काशीबाई क्षयरोग, संधिवाताने ग्रस्त होती, तसेच एका पायाने अधूसुद्धा. समजा काशीबाई आरोग्याने धडधाकट जरी असती, तरी तिने जाहीरपणे नाच वगैरे करणे अशक्यच होते. कारण तशी रीतभात नव्हती पेशवेकाळात. मस्तानी ही बाजीरावाची द्वितीय पत्नी. मस्तानी काही दरबारी नृत्यांगना नव्हती, की नर्तिका. ती बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल यांची मुलगी होती. बाजीरावाबरोबर तिचे लग्न झाल्यानंतर ती पुण्यात आली. तिथे तिने आयुष्य कसे घालवले, याच्या बऱ्याचशा नोंदी आहेत, जुन्यापुराण्या कागदपत्रांत... पण ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ ही कवी केशवसुतांची ओळ भन्साळीच्या साहाय्यकांनी त्याला अशी समजावून सांगितली, की त्याने आपली सारी कल्पनाशक्ती पणाला लावून नवा इतिहासच घडविला.
आता या सगळ्या वादात गोम अशी आहे की, काशीबाईची बाजू उचलून धरणारे पुण्यनगरी व उर्वरित महाराष्ट्रात असंख्य आहेत... मात्र मस्तानीला न्याय मिळाला नाही, अशी ओरड करणारे आवाज खूपच क्षीण आहेत.
कारण काय असावे बरे?
पेशव्यांचा इतिहास चाळून बघा. मस्तानीच्या प्रतिमेवर बदनामीची पुटे चढलेली दिसतील. तिच्या सौंदर्यापेक्षा तिचे यावनीपण पुण्यातील ब्रह्मवृंदाच्या कायमच डोळ्यात खुपले. एका इतिहासकाराने केलेला उल्लेख इथे सहज आठवला. ते म्हणतात, ‘महाराष्ट्रातील एकाही घरात, एकाही नवजात बालिकेचे नाव ‘मस्तानी’ असे ठेवलेले आढळून आले नाही. मस्तानी हे नाव कुटुंबापेक्षा बाजारातच जास्त दिसले. चटपटीत पदार्थांना ठसठशीतपणा आणण्यासाठी या नावाचा उपयोग झाला. म्हणजे मस्तानी भेळ, मस्तानी मिसळ, मस्तानी कुल्फी, मस्तानी उदबत्ती.. मस्तानीच्या नावाची विरूपता झाली, ती अशी. पण, ते असो.’
मस्तानीला बाजीरावापासून समशेर बहादूर नावाचा मुलगा झाला होता. बाजीरावानंतर समशेरला पेशवेपद मिळेल, म्हणून पेशव्यांच्या कुटुंबीयांच्या पोटात गोळा आला होता. मस्तानीच्या बदनामीची मोहीम त्या वेळी सुरू होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण होते. समशेर बहादूर याला कृष्णराव किंवा कृष्णसिंह या नावानेही संबोधले जात असे. बाजीरावाच्या मृत्यूनंतर काही काळातच मस्तानीही मरण पावली. त्या वेळी हा समशेर अवघा सहा वर्षांचा होता. बाजीरावांची प्रथम पत्नी काशीबाईने समशेरला आपल्या घरी नेऊन त्याचा योग्य प्रतिपाळ केला. मस्तानी व काशीबाईमध्ये असलेले नाते हे असे होते. या दोघींना लावणीनृत्य करायला लावण्याऐवजी भन्साळींच्या संजयने दोघींतले हे मायाबंध अधोरेखित करणे अधिक चांगले झाले असते. समशेर बहादूर मोठा झाल्यानंतर त्याला बांदा आणि काल्पी प्रांताच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली. बांदाचा नवाब म्हणूनही तो ओळखला जाऊ लागला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात समशेर बहादूरला वीरमरण आले. समशेरच्या वंशजांनी म्हणजे समशेर बहादूर दुसरा यानेही १८०३मध्ये मराठे विरुद्ध इंग्रज असे जे युद्ध झाले त्यात मराठ्यांच्या बाजूने समशेर गाजविली होती. १८५७च्या उठावात बांद्याचे नवाब अली बहादूर (द्वितीय) यांनी झाशीच्या राणीबरोबर इंग्रजांशी लढा दिला. त्यात ते जखमी झाले. पराभवानंतर इंग्रजांनी नवाबांना इंदूरला धाडले. त्यांना तनखा सुरू केला. तेव्हापासून पेशवे व मस्तानीच्या वंशजांत संबंध राहिला नाही. ज्या मस्तानीला पेशव्यांच्या कुटुंबाने हीन वागणूक दिली होती, त्याच मस्तानीच्या वंशजांनी मराठा साम्राज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्याची किंमत अाजही लोकांना कळत नाही, याचे दु:ख होते.
‘बाजीराव मस्तानी’ या विषयाची भुरळ पडलेला भन्साळी हा चित्रपटसृष्टीतला काही पहिलाच व्यक्ती नव्हे. १९५५मध्ये ‘मस्तानी’ नावाचा चित्रपट झळकला होता. त्याचे दिग्दर्शक होते, धीरुभाई देसाई. आगा, मनहर देसाई, शाहू मोडक, रत्नमाला, निरंजन शर्मा, निगार सुल्ताना असे तारे-तारका त्यात चमकले होते. तोच विषय घेऊन आता संजय लीला भन्साळी मैदानात उतरला आहे.
मस्तानीविषयी असूया व कुतूहल अशा दोन्ही भावना जनमानसात दिसतात. त्याचेच प्रतिबिंब बाजीराव-मस्तानीच्या नात्यावर लिहिलेल्या कादंबऱ्या व इतर पुस्तकांत जसे दिसते तसे मालिकांमध्येही दिसते. ना. स. इनामदार यांची बाजीरावांच्या कर्तृत्वावरील "राऊ' ही कादंबरी प्रचंड गाजली. त्या कादंबरीवर आधारित "राऊ' ही मालिकाही तितकीच लोकप्रिय झाली. प्रख्यात चित्रकार व नेपथ्यकार द. ग. गोडसे यांच्या "मस्तानी' या पुस्तकातून मराठी मनाला मस्तानी अधिक जास्त कळली, असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही. मस्तानी या विषयाचा गोडसे सुमारे २५ वर्षे अभ्यास करीत होते, असे त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. ईटीव्ही मराठीवर "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' अशी थेट विषयाला हात घालणारीच मालिका कालांतराने सुरू झाली. असे ठायी ठायी भेटणारे मस्तानी आणि बाजीराव...
पण मुळात, मस्तानी होती तरी कोण? बुंदेलखंडमधील पन्ना संस्थानचे संस्थापक महाराज छत्रसाल यांना रुहानीबाई या उपपत्नीपासून झालेली मुलगी, म्हणजे मस्तानी. रुहानीबाई हैद्राबादच्या निजामाच्या दरबारी नृत्यांगना होती. १७२७-२८चा सुमार असेल. महंमद खान बंगश छत्रसालांच्या राज्यावर चालून गेला. त्या वेळी बाजीरावाने केलेल्या मदतीमुळे बंगशाचे आक्रमण मोडून काढता आले. बाजीरावाने केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून, महाराज छत्रसालांनी त्याचे मस्तानीशी लग्न लावून दिले. इतकेच नव्हे, तर काही लाख महसुली उत्पन्नाचा मुलुखही त्याला देऊ केला. महाराज छत्रसालांनी बाजीरावाला आपला मुलगाच मानले होते.
मस्तानी छत्रसाल राजाच्या कुटुंबकबिल्यात राजकन्येसारखीच वाढली होती. घोडेस्वारी, तलवारबाजी, इतर शस्त्रे चालविण्याचे कौशल्य यात मस्तानी पारंगत होती. मस्तानीने पान खाल्ले की, त्याची गुलाबी पिंक तिच्या गळ्यातून उतरताना दिसायची इतकी ती आरस्पानी होती, असे म्हणतात. तिच्या सौंदर्याच्या वर्णनात हा अतिरंजित रंगही मिसळलेला आहे. परंतु ते त्या काळच्या पुण्याचे वैशिष्ट्यच होते, नाही का? मस्तानीच्या रक्तात रुहानीबाईच्या रूपाने मुस्लिम रक्त असल्याने ते त्या वेळच्या पेशवाई ब्रह्मवृंदाला कसे रुचावे बरे?
बाजीरावाने मस्तानीच्या नादी लागून आपली पहिली पत्नी काशीबाईकडे दुर्लक्ष केले, असे म्हटले जाते. ते काही खरे नाही. मस्तानी आयुष्यात आल्यानंतरही बाजीरावांना काशीबाईपासून तीन अपत्ये झाली होती. काशीबाईकडे होणाऱ्या कथित दुर्लक्षाकडे पाहून काशीबाईची आई राधाबाई संतापाने लालेलाल झाल्या, राधाबाई आणि चिमाजीअप्पा यांनी मस्तानीला बाजीरावापासून दूर करण्यासाठी कारस्थाने रचली, तिला पुण्यापासून दूर विजनवास वाटेल अशा ठिकाणी पाठविण्याचे प्रयत्न चालविले, असेही म्हटले जाते. बाजीरावाचा मुलगा बाळाजीनेही मस्तानीला आपल्या वडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. बाजीराव लष्करी मोहिमेवर असताना मस्तानीला नजरकैदेतही ठेवण्याचा पराक्रम पेशवे कुटुंबीयांनी करून पाहिला... पण मस्तानी कशालाच बधली नाही. कारण तिचे जिवापाड प्रेम होते, आपल्या ‘राऊ’वर. बाजीरावाचा मृत्यू झाल्यानंतर मस्तानीही फार काळ जिवंत राहिली नाही. बाजीरावापासून झालेला मुलगा समशेरला काशीबाईच्या हाती सोपवण्याची अखेरची इच्छा सांगून मस्तानीने (कोणी म्हणतात, तिने विष पिऊन आत्महत्या केली.) प्राण सोडला. ‘समशेरचा सांभाळ काशीबाईच करतील,’ अशी तिला खात्री होती. मस्तानीची इच्छा खरी ठरली. काशीबाईंनी समशेरला शनिवारवाड्यात स्थान दिले. नानासाहेब पेशव्यांनी समशेरची जबाबदारी सदाशिवभाऊंवर सोपवली. बाजीरावांचे धाकले पुत्र राघोबादादा आणि समशेर समवयस्क. राघोबाच्या बरोबरीने समशेर वाढला.
पुण्यात असताना पेशवे कुटुंबीयांच्या विरोधामुळे मस्तानीला कधीच शनिवारवाड्यामध्ये वास्तव्य करू देण्यात आले नाही. याच शनिवारवाड्यात एका दरवाजाला मस्तानी दरवाजा असे नाव मिळालेले आहे. आजही तेच नाव रुढ आहे. आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात शनिवारवाडा असून तेथे मस्तानी दरवाजाजवळ या खात्याने लावलेल्या फलकावरील मजकूर आता अस्पष्ट झाला आहे. तो नीट वाचून इथे दिला आहे. हा मजकूर असा `जुन्या नोंदीप्रमाणे मस्तानी दरवाजाला नाटकशाळेचा दरवाजा असे म्हणत असत. परंतु पहिल्या बाजीरावाची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर या दरवाजाचे नाव मस्तानी दरवाजा पडले. मस्तानीचा नातू अली बहादूर याने बुंदेलखंड जिंकून राज्य स्थापन केल्यानंतर नाना फडणवीसांनी या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले. या दरवाजावर दहा शिपाई तैनात असत.' शनिवारवाड्यात कधीच स्थान न मिळालेल्या मस्तानीला बाजीरावाने पुण्याच्या कोथरुड भागात एक वाडा बांधून दिला होता. तिथे ती राहायची. तरीही शनिवारवाड्याच्या पूर्व भागाला ‘मस्तानी महाल’ आणि ‘मस्तानी दरवाजा’ अशी नावे रूढ झालेली आहेत. कोथरुडला मस्तानीचा जो वाडा होता, तो पुढे जीर्णशीर्ण झाला. त्याचे काही अवशेष राजा केळकर वस्तुसंग्रहालयात ‘मस्तानी महाल’ नावाने जतन करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये सहकार नगर भागात पेशवेकाळात मस्तानीसाठी एक उपवन विकसित करण्यात आले होते. पण तेही कधीचेच इतिहासजमा झाले व त्या जागी सिमेंट-काँक्रिटच्या इमारतींचे जंगल फोफावले.
पुण्याच्या जवळ पाबळ येथेही मस्तानीचा वाडा होता. मस्तानीची आजची स्मृती म्हणजे पाबळ‌ इथली समाधी. ही समाधी तीन-चार वेळा चोरट्यांनी उकरून काढली. समाधीच्या आत काही दागदागिने मिळतील, या लालसेने. पण काही हाती लागले नाही. मस्तानी ही बाजीरावाचा कंठमणी होती. तोच दागिना मूल्यवान होता. तो मातीत मिसळला, तेव्हा चोरट्यांनाही हिऱ्याऐवजी हाती मातीच लागणे स्वाभाविकच नाही का? पुण्याजवळ दिवेघाट परिसरात मस्तानी तलाव आहे. तिथे मस्तानी म्हणे, स्नानासाठी जात असे...व्यक्तीला जिवंत असताना छळायचे आणि मग ती गेल्यानंतर तिच्या स्मृतींचे कढ काढायचे, ही नेहमीचीच जनरीत आहे. मस्तानीचे समकालीन कोणते चित्र आहे का? जी चित्रे उपलब्ध आहेत, त्यांच्या अस्सलतेबद्दल इतिहासकारांमध्येच वाद आहेत. भुजच्या ‘आयना महल’मध्येही तिचे एक चित्र आहे, म्हणतात. पण तेही असेच खऱ्याखोट्याच्या धुक्यात सापडलेले. जिवंतपणी ती जसे जगली, तसेच तिच्या मृत्यूनंतर तिच्याशी संबंधित गोष्टींनाही तेच प्राक्तन लाभले...
संजय लीला भन्साळीने काशीबाई आणि मस्तानीला एकत्र पिंगा घालायला लावला, म्हणून मस्तानीचे वंशजही संतापले आहेत. मस्तानीचा आठव्या पिढीतला वंशज, उमर अली बहादूर २०१२मध्ये पुण्यात आला होता. पाबळ येथे मस्तानीचे स्मारक दिमाखात उभे राहावे, ही त्याची धडपड. बाजीरावांची पत्नी काशीबाईंपासून वाढलेल्या वंशापैकी तीन वंशज यात आहेत. त्यातील उदयसिंह पेशवेंना उमर अली बहादूर पुण्यात भेटला. अंतरीच्या गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितल्या. बाजीराव-मस्तानी यांचे वंशज इंदूर, भोपाळ, सिहोर अशा परिसरात पूर्वीपासूनच स्थायिक झालेले आहेत. त्यापैकीच उमर अली बहादूर. मस्तानीचा मुलगा समशेर बहादूर पानिपताच्या लढाईत कामी आला, आणि महाराष्ट्राशी तिची रक्ताच्या नात्याची असलेली नाळ तेव्हाच तुटली. मात्र बांदा संस्थानािधपती असलेले मस्तानीचे वंशज महाराष्ट्राला विसरणे शक्यच नव्हते.
‘मस्तानीचा मुलगा समशेर काशीबाईच्या देखरेखीखाली वाढला. पेशव्यांच्या कोकणस्थ ब्राह्मण परिवाराने समशेरच्या ‘मुस्लिम’ असण्यावर आक्षेप न घेता त्याला सामावून घेतले. त्याचा धर्म बदलणे पेशव्यांना सहज शक्य होते; मात्र, समशेरला त्यांनी धर्मापासून तोडले नाही. त्यामुळे मीही माझी जात ‘कोकणस्थ ब्राह्मण मुसलमान’ अशी सांगतो’, असे मस्तानीचे वंशज उमर अली बहादूर यांनी उदयसिंह पेशवेंना भेटल्यावर सांगितले होते. उदयसिंहांना भेटून मोठा भाऊ भेटल्याचा आनंद उमरना झाला होता. पाबळला मस्तानीचे भव्य स्मारक उभे राहावे, असा उमर अली बहादूरचा प्रयत्न आहे. पाबळला मस्तानीच्या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी खूप मोठमोठ्या घोषणा आजवर झाल्या. मात्र अद्याप फारसे काहीही झालेले नाही. मस्तानीच्या समाधीजवळ आजही दिवाबत्ती केली जाते, स्थानिकांकडून. किमान ‘नाही चिरा नाही पणती’ अशी तरी अवस्था तिच्यावर आली नाही. आता ती पुन्हा भन्साळीच्या चित्रपटातून बाजीरावासह आपल्यासमोर येते आहे. मस्तानी कशी होती, यावर जंगी शब्दयुद्धे होतील, पानिपतावर माजला तसा गदारोळही माजेल...पण यातून एक काय दिसतेय माहीती आहे का? मस्तानी तिच्या जिवंतपणीही कोपऱ्यातच ढकलली गेली होती... आता काशीबाईला पुढे करून पुन्हा मस्तानीला कोपऱ्यात ढकलले जाते आहे... मस्तानीचे हे दुर्दैव; दुसरे काय?
sameer.p@dbcorp.in

Saturday, August 15, 2015

मिनर्व्हाची ओसाडवाडी - दिव्य मराठी १५ ऑगस्ट २०१५. शोले प्रदर्शित होऊन ४० वर्षे झाली त्यानिमित्तचा लेख - समीर परांजपे.


शोले चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा या चित्रपटगृहासह संपूर्ण देशात झळकला त्याला १५ ऑगस्ट २०१५ रोजी ४० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दिव्य मराठी वृत्तपत्राने १५ ऑगस्ट २०१५ रोजी शोलेच्या त्या सुवर्नादिवसांची आठवण करून देणारी दोन विशेष पाने प्रसिद्ध केली. त्यामध्ये मी मिनर्व्हा चित्रपटगृहातील शोलेचे ते सोनेरी दिवस आणि आता मिनर्व्हाच सात वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाल्यानंतर तिथे त्या सुवर्नायुग्याच्या उरलेल्या नुसत्या आठवणी यांचा धांडोळा घेणारा मुख्य लेख या पानांत लिहिला आहे. त्या माझ्या लेखाची टेक्स्ट मजकूर व त्या लेखाची व पानाची लिंक सोबत दिली आहे.
---
मिनर्व्हाची ओसाडवाडी
---------------------
- समीर परांजपे
sameerp@dbcorp.in
-----------------------
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sholay-house-full-in-…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/…/252/15082015/0/10/
---
‘कहाँ गए वो लोग’, असे आपण माणसांबद्दल बोलतो. ‘शोले’सारख्या चित्रपटांच्या गाजलेल्या आठवणींनी मिनर्व्हाची ती वास्तूही एकेकाळी जिवंत होती. आता काप गेले भोकं उरली, अशी आहे सारी अवस्था आहे...
-----
छातीत धडकी भरविणाऱ्या सॅडिस्टिक गब्बरसिंगच्या आवाजातील "कितने आदमी थे?' हा सवाल, "एक एक को चुन चुन के मारुंगा, चुन चुन के मारुंगा' असा वीरुने गब्बरसिंगला दिलेला इशारा, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना... हे मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही वीरुने आपल्या प्रियतमेला ऐकविलेले कणखर बोल... "शोले' चित्रपटातील या व अशा अनेक गाजलेल्या संवादांची भेंडोळी डोक्यात उलगडत पावले मुंबईतील ग्रँटरोड(पश्चिम) येथील मिनर्व्हा चित्रपटगृहाकडे वळली होती...
जसजसे ते ठिकाण जवळ येऊ लागले, उत्सुकता अधिकच ताणली गेली. थोडे मागचेही म्हणजे तब्बल ४० वर्षांपूर्वीचे काही तपशील आठवू लागले. असे तपशील जे कधी अनुभवले नव्हते, पण वाचण्यात आले होते. मिनर्व्हा हे भारतातील पहिले ७० एमएमचा पडदा असलेले चित्रपटगृह. १९७०च्या दशकामध्ये या चित्रपटगृहात स्टिरिओफोनिक साऊंडसिस्टिम बसविण्यात आली होती. या वैशिष्ट्यांमुळे तिथे कोणताही चित्रपट बघणे, हा भव्यतेचा साक्षात्कार असायचा. अशाच माहोलमध्ये १५ ऑगस्ट १९७५ रोजी तिथे झळकला "शोले'. देशातील बाकी चित्रपटगृहांमध्येही त्याच दिवशी शोलेच्या सुमारे २५० प्रिंट‌्स सिनेप्रोजेक्टवर चालत्याबोलत्या झाल्या होत्या. पण मिनर्व्हाची बातच काही और होती. पहिले काही आठवडे ‘शोले’ फारसा चालत नव्हता. फ्लॉप श्रेणीमध्ये तो जमा होतोय की काय, अशी भीती दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि बाकीच्या कलाकारांच्या मनात दाटून राहिली होती. तिसऱ्या-चौथ्या आठवड्यापासून मात्र चमत्कार घडला. शोलेमधील जय, वीरु, बसंती, गब्बरसिंगसह गेलाबाजार सुरमा भोपाली, मौसीपासून सगळ्यांचे संवाद सोन्याचे आहेत, हे प्रेक्षकांना पटले. शोलेतील अॅक्शन, गाणी, संवाद, फायटिंग अशा सगळ्यांची स्टिरिओफोनिक साऊंड इफेक्टमध्ये खाशी मजा घेण्यासाठी प्रेक्षकांची मुंग्यांप्रमाणे मिनर्व्हाच्या तिकिटबारीवर रांग लागू लागली आणि चित्रपटांच्या इतिहासात मिनर्व्हा म्हणजे ‘शोले’, हे समीकरणच होऊन गेले.
मिनर्व्हाच्या दिशेने पावले टाकताना याच सगळ्या वाचलेल्या, ऐकलेल्या आठवणी दाटून येत होत्या. आता त्या वैभवशाली दिवसांची एकही खूण तिथे उरलेली नाही, हे आधीपासून माहीत होते. पण जसजसे मिनर्व्हा जिथे अत्यंत दिमाखात उभे होते ते ठिकाण दृष्टिपथात येऊ लागले, तसतशी हृदयाची धडधड आणखी वाढत गेली. लहानपणी एकदा पाहिलेली ती ‘मिनर्व्हा’ची वास्तू आता तिथे नव्हतीच. ती सात-आठ वर्षांपूर्वीच संपूर्ण पाडण्यात आली. आता त्या जागेवर आहे, भरवस्तीत फक्त मोकळे मैदान. पावसाळी गवतामुळे हिरवेगार झालेले. आता बिल्डरने ठोकलेल्या पत्र्यांनी ते मैदान वेढले गेले आहे. पुरते जेरबंद झाले आहे. ‘कहाँ गए वो लोग’, असे आपण माणसांबद्दल बोलतो. ‘शोले’सारख्या चित्रपटांच्या गाजलेल्या आठवणींनी मिनर्व्हाची ती वास्तूही एकेकाळी जिवंत होती. आता काप गेले भोकं उरली, अशी आहे सारी अवस्था आहे...
शोले मिनर्व्हाला प्रदर्शित झाला. त्यानंतर सुमारे सव्वापाच वर्षं तो या चित्रपटगृहात मुक्काम ठोकून होता. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात... मिनर्व्हाच्या आजूबाजूला राहणारे बरेचसे लोक त्या काळात शोलेची तिकिटे ब्लॅकमध्ये विकून रग्गड पैसेवाले झाले होते. त्यापैकी काही जणांनी याच भागात दुकाने घेऊन नवीन धंदे सुरू केले. काहींनी आपल्या गावांतल्या घरांवर सोन्याची कौले चढविली. या सगळ्या गोष्टी आता दंतकथा वाटाव्या अशा आहेत. या कथांचे ब्लॅकनायक मात्र आता मिनर्व्हाच्या परिसरात औषधालाही सापडत नाहीत. जिथे चित्रपटगृहच नामशेष झाले, तिथे त्याच्या आजूबाजूला रेंगाळणारे लोक तरी कसे उरतील? तरीही या ब्लॅकनायकांच्या पिढीतील कोणी सापडतो का, म्हणून शोध घेतला. मिनर्व्हाच्या समोरच हॉटेल शबनम आहे. खूप जुने हॉटेल. तेथील मालकाला चाळीस वर्षांपूर्वीच्या ‘शोले’च्या सुवर्णकाळाबद्दल विचारायला गेलो, तर तो म्हणाला की, जुन्या मालकाकडून आम्ही हे हॉटेल पाच वर्षांपूर्वीच विकत घेतलेय. आम्हाला मिनर्व्हाबद्दल फारशी माहिती नाही. ‘मिनर्व्हा’च्या आजूबाजूला शोलेच्या सुवर्णकाळात वस्ती होती मराठी, गुजराती व काही प्रमाणात मुस्लिमांची. तसा हा व्यापारी परिसर. काळ अनेक बदल घडवत असतो. या परिसरातील बहुतांश मराठी माणसे आता उपनगरांकडे सरकली आहेत. मुस्लिमांची संख्याही तुरळकच आहे. मिनर्व्हाच्या आजूबाजूचा सारा परिसर आता गुजराती मंडळींनी व्यापला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अमाप दुकाने परिसरात बहरली आहेत. त्यातील दोन-तीन जुन्या दुकानांमध्ये जाऊन शोले, व मिनर्व्हा असा िवषय छेडण्याचा प्रयत्न केला, तर त्या मंडळींनी ‘सुना है पर हमको पता नही’, असा सूर लावला...
‘शोले’च्या अनेक कथा उराशी कवटाळून मिनर्व्हाच्या जागी आता जे मोकळे मैदान पसरले आहे, त्याच्या मागील अंगाला सुमारे शतकभर जुनी एक आइस फॅक्टरी आहे. तेथे मिनर्व्हातील शोले दिवसांच्या आठवणी जपणारी दोन माणसे भेटली. पण त्यांचीही उमर ५५ ते ५७ वर्षांच्या दरम्यानची. त्यांनी १०-१५ वर्षांचे असताना मिनर्व्हामध्ये जाऊन ‘शोले’ पाहिलेला. सुनील भोसले व मिलिंद पवार अशी त्यांची ओळख. मिलिंद पवार म्हणाले, ७० एम.एम.च्या भव्य पडद्यावर मी लहानपणी पाहिलेला शोले अजूनही डोळ्यासमोरून हलायला तयार नाही. तुला आठवते की नाही माहीत नाही, ‘शोले’मध्ये अमिताभ साकारत असलेला जय हा त्याच्या हातातील नाण्याने छापा व काटा करत असल्याची काही दृश्ये आहेत. एका दृश्यात हे नाणे जमिनीवर पडते, त्या वेळी त्याचा जो खणकन् आवाज येतो, तो स्टिरिओफोनिक साऊंडमध्ये ऐकायला मला आवडायचे. ‘शोले’तील बसंतीच्या टांग्याचा गब्बरचे डाकू करीत असलेला पाठलाग व पार्श्वभूमीला आर. डी. बर्मनचे संगीत, गब्बरसिंगच्या माणसांबरोबर जय आणि वीरुची चकमक उडायची, तेव्हा होणारे गोळीबारांचे आवाज, त्या चित्रपटांतील पाच गाणी या साऱ्या साऱ्या गोष्टी स्टिरिओफोनिक साऊंडमध्ये ऐकताना खूप मजा यायची. ‘शोले’मध्ये बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या जणू आपल्याच हातापायांच्या जवळून जात आहेत असा जबरदस्त इफेक्ट मिळायचा...
सुनील भोसले सांगत होते की, ‘शोले’चे एक तिकीट १९७५मध्ये ३०० रुपयांना ब्लॅकमध्ये विकले गेल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. मिनर्व्हाला शोले प्रदर्शित झाल्यावर काही आठवडे मंद गेले. त्यानंतर मात्र चित्रपटगृहाची करंट बुकिंगची खिडकी पुढे पाच वर्षं बंदच राहिली होती! कारण अॅडव्हान्स बुकिंगची खिडकी उघडली की, अवघ्या एक तासात पुढच्या दोन आठवड्यांचे बुकिंग झालेले असायचे. त्यामुळे ब्लॅकने सिनेमाची तिकिटे विकणाऱ्यांची चांदी, सोने, प्लॅटिनम जे जे काही व्हायचे ते सारे झाले... ब्लॅकवाले इतके गब्बर बनले की, गब्बरसिंगही त्यांच्यापुढे गरीब भासावा... आता ब्लॅकनायकांपैकी फारच थोडे मिनर्व्हा परिसरात उरले आहेत. जवळजवळ नाहीच म्हणा ना... त्यातील अर्धे म्हातारे झाले, कोणाचे निधन झाले आणि बाकीचे एकदम व्हाइटकॉलर झालेत... देव पावतो, तसा शोले अनेकांना पावला! मला आठवते की, शोलेच्या संवादांच्या एल. पी. रेकॉर्ड‌्स त्या काळी निघाल्या होत्या. मिनर्व्हाच्या परिसरात अनेक चिरकुट हॉटेल्स होती, तिथे रेकॉर्डरवर प्रत्येक शोच्या आधी या रेकॉर्ड लावल्या जायच्या. हॉटेलमध्ये बसून खाणारे-पिणारे तसेच हॉटेलबाहेर उत्साही फुकटे लोक असे सारे सारे शोलेचे संवाद कान देऊन ऐकायचे. हे करूनही त्यांचे कान तृप्त झालेले नसायचे. मग ते मिनर्व्हामध्ये जाऊन शोले बघायचे आणि समाधानी मनाने बाहेर यायचे. तीस-तीस वेळा मिनर्व्हामध्ये शोले बघितलेले लोक आमच्या लहानपणी माहीत होते... आता सारेच इतिहासजमा झाले आहे. मिनर्व्हा हे सिंगलस्क्रीन थिएटर आणि शोले गाजविणारे कमिटेड प्रेक्षकही...
सुनील भोसले व मिलिंद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीचे उभे केलेले शोलेयुग अनुभवतानाही वर्तमान मनात खुपत होते. मिनर्व्हा पाडून त्या जागी उरलेल्या मोकळ्या मैदानावर भविष्यात टोलेजंग इमारत होईलही...पण तिचा पाया हा ‘शोले’च्या आठवणींचा राहणार आहे. ‘शोले’नंतर मिनर्व्हामध्ये खूप वर्षांनी "सडक' हा चित्रपट खूप चालला होता. जुन्या सोनेरी दिवसांच्या आठवणी त्या वेळी पुन्हा काहीशा तरारून आल्या होत्या. त्या आठवणींचे लेणे वस्तुसंग्रहालय रूपात मिनर्व्हाच्या जागी उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत छोट्या स्वरूपात का होईना असावे, असे कोणाही सच्च्या सिनेप्रेमीला वाटणारच... मिनर्व्हाकडे पाठ करून जेव्हा पुन्हा ग्रँटरोड रेल्वेस्थानकाकडे निघालो, तेव्हा मनात द्वंद्व होते. मिनर्व्हाच्या जागी असलेली ओसाडवाडी कुठेतरी डाचत होती आणि दुसऱ्या बाजूला शोलेच्या सुवर्णस्मृतींची पाखरे भिरभिरत होती...

Monday, July 6, 2015

डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट - - समीर परांजपे. दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख,



दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख, त्या लेखाची टेक्स्ट व इ-पेपर वेबलिंक व जेपीजी फाईल सोबत दिली आहे. 
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-book-analysis-by-same…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/05072015/0/5/
---
डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcl.co.in
---
भारतीय लष्कराला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. मात्र चीनबरोबर झालेल्या पराभवामुळे भारतीय लष्करासाठी तो कलंक ठरला. भारतीय लष्कर शौर्यामध्ये कुठे कमी पडले असे त्यावेळी झाले नाही. तर राजकीय स्तरावर घेतले गेलेले काही चुकीचे निर्णय या पराभवाच्या मुळाशी होते. भारताला चीनपासून जो धोका होता त्याची तीव्रता लक्षात येऊनही तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन व त्यांच्यावर विसंबून राहिलेल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी त्याकडे कानाडोळा केला.
--
१९६२च्या युद्धाची समग्र मीमांसा करणाऱ्या मराठी पुस्तकाची उणीव मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या `न सांगण्याजोगी गोष्ट' या पुस्तकाने भरुन काढली आहे. 
---
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची शेजारी राष्ट्रांशी जी युद्धे झाली त्यापैकी फक्त एका युद्धात आपल्याला पराभव पत्करावा लागला तो म्हणजे १९६२ साली चीनशी झालेल्या युद्धात. हा पराभव तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी खूपच मनाला लावून घेतला होता. ही हार पत्करावी पं. जवाहरलाल नेहरु, त्यावेळचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्यामुळेच पत्करावी लागली असा आरोप विरोधकांनी केला होता. `काँग्रेसमुक्त' भारत करण्याच्या नरेंद्र मोदींच्या घोषणाकाळात सध्या या आरोपाचे पडसाद जास्त तीव्रतेने ऐकायला मिळतात. चीन विरुद्ध भारत या युद्धाचे िवश्लेषण करणारी पुस्तके तुलतेने इंग्रजीत जास्त असली तरी मराठीमध्ये या विषयावर फारच तुरळक ग्रंथ आहेत. १९६२च्या युद्धाची समग्र मीमांसा करणाऱ्या मराठी पुस्तकाची उणीव मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या `न सांगण्याजोगी गोष्ट' या पुस्तकाने भरुन काढली आहे. 
भारत विरुद्ध चीन युद्धाचा आढावा घेताना पित्रे त्याआधीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करुन दोन्ही देशांतील सध्याच्या संबंधांपर्यंत या विषयाचा पट पुस्तकामध्ये िवस्तारत नेतात. तुम्ही महाराष्ट्रीय म्हणजे..., सीमावादाचा मागोवा, रुंदावणारी दरी, कलहाचा उगम, युद्धाचे पडघम, एकदाचा भ्रमनिरास, मानखंडनेची परिसीमा, लडाखचा रणयज्ञ, पाच दशकांची वाटचाल या दहा प्रकरणांतून भारत व चीनमधील युद्ध, तणाव, संबंधांबद्दल आजवर मराठीत न आलेली खूप वेगळ्या प्रकारची माहिती वाचकासमोर येते. ब्रिटिशांनी भारतामध्ये आपले साम्राज्य स्थापन केले असले तरी त्यांच्या मनात रशिया, चीनबद्दल कायम साशंकता होती. त्याच्या परिणामी चीनबरोबर ब्रिटिश इंडियाच्या सीमांची आखणी करण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न तडीस गेले नाहीत. याबाबत शशिकांत पित्रे यांनी नोंदविलेले िनरीक्षण खूपच मार्मिक आहे. ते म्हणतात की, `१९१४मध्ये आखलेल्या मॅकमहॉन रेषेतही संदिग्धता निर्माण झाली. आपले पत्ते कधीच न उलगडणाऱ्या बेरकी चिनी राजनीतीच्या हे पथ्यावर पडणे स्वाभाविकच होते. १९४७मध्ये या अधांतरी सीमा स्वतंत्र भारताच्या पदरात वारसाहक्काने पडल्या. १९५०मध्ये चीनमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या साम्यवादी सरकारने तिबेटचा ताबा घेतला. त्यापश्चात आरंभ झाला एकाधिकारवादी बेरकी चिनी राजकारणी आणि आदर्शवादाने झपाटलेले लोकशाहीवादी भारतातील राज्यकर्ते यांच्यातील सारीपाटावरील बुद्धिबळाचा खेळ. १९६२च्या युद्धाची सारी पाळेमुळे या परिस्थितीत आहेत.'
१९५६मध्ये जमीन सुधारणेचा कायदा चीनने तिबेटमध्ये लागू केला. त्यानंतर चिनी विरुद्ध तिबेटी हा संघर्ष अधिक तीव्र झाला. १९५८ मध्ये तिबेटी लोकांनी पुकारलेली क्रांती चेचून काढण्यासाठी चीनने राक्षसी कारवाईला सुरुवात केली. अखेर १७ मार्च १९५९ रोजी तिबेटींचे धर्मगुरु दलाई लामांनी आठ अनुयायांसह गुप्तपणे ल्हासा सोडले व ३१ मार्च रोजी तवांगमध्ये प्रवेश केला. दलाई लामा व त्यांच्या सहकाऱ्यांना भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी प्रथम मसुरी व नंतर हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे वास्तव्यासाठी परिसर उपलब्ध करुन दिला. तिबेट हे सार्वभौम राष्ट्र असल्याचे दलाई लामा यांनी भारतात राहून केलेले वक्तव्य चीनला अजिबात पसंत पडले नव्हते. अशा अनेक गोष्टींचा राग मनात धरुन चीन भारताच्या विरोधात एक एक पाऊल टाकत होता.
पं. नेहरु यांचे पंचशील धोरण, त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरील प्रभाव हे १९५०-६०च्या दशकात विशेषत्वाने जाण‌वत होता. भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले असावेत असे पं. नेहरुंचे प्रयत्न होते. त्यातूनच हिंदी चिनी भाई भाई या घोषणेचा उगम झाला होता. चीनबरोबर उत्तम संबंध राखण्यामागे नेहरुंची तात्विक व व्यावहारिक दृष्टी होती. मात्र त्यांच्या या धोरणाला स्वप्नाळू म्हणून हिणविले गेेले. चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर पहिले दोषाचे धनी बनले ते पं. नेहरु. या घटना नेमक्या कशा घडत गेल्या याचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात शशिकांत पित्रे यांनी केले आहे. 
भारतीय लष्कराला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. मात्र चीनबरोबर झालेल्या पराभवामुळे भारतीय लष्करासाठी तो कलंक ठरला. भारतीय लष्कर शौर्यामध्ये कुठे कमी पडले असे त्यावेळी झाले नाही. तर राजकीय स्तरावर घेतले गेलेले काही चुकीचे निर्णय या पराभवाच्या मुळाशी होते. भारताला चीनपासून जो धोका होता त्याची तीव्रता लक्षात येऊनही तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी त्याकडे कानाडोळा केला. काही साम्यवादी नेत्यांनी बहकवल्यामुळेही मेनन असे वागले असावेत असा विश्लेषकांचा होरा आहे. मेनन यांच्या मताला नेहरुंनी महत्व दिल्याने तेही अडचणीत आले. चीन अत्यंत आक्रमक पावले टाकत असून त्यापासून संरक्षण करण्यासाठी भारताने शस्त्रसज्जता तसेच इतर राजकीय बाबींकडे लक्ष द्यायला हवे असे आपल्या अहवालात लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांनी केंद्र सरकारच्या गृहखात्याला त्यावेळी दिलेल्या अहवालात नमुद केले होते. पण त्यांच्या अहवालाकडे मेनन यांनी साफ दुर्लक्ष केले. या अहवालानूसार पावले उचलली गेली असती तर चीनविरुद्धच्या युद्धात कदाचित भारताची कमी प्रमाणात हानी झाली असती. २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाख, आताच्या उत्तराखंडचा सीमाभाग, नेफा (आताचा अरुणाचल प्रदेश) या भागात हल्ले चढविले. युद्धसज्जतेत कमतरता असल्याने भारतीय लष्कराला या प्रत्येक आघाडीवर मार खावा लागला. भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख देखील या ढिलाईस तितकेच जबाबदार होते. चीनविरुद्धच्या युद्धानंतरच्या काही अहवालांत या अधिकाऱ्यांवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. 
माओ झेडाँग व जवाहरलाल नेहरु यांच्यातील संवादांचा आधार घेतला तर भारत चीनच्या बाबतीत खूपच गाफील राहिला असे म्हणता येईल. १९६२च्या युद्धामध्ये भारतीय हवाई दलाला शत्रूवर हल्ले चढविण्याची परवानगी राज्यकर्त्यांनी नाकारली. लष्कराला अन्न, पाणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इतक्या पुरतेच हवाई दलाची कामगिरी मर्यादित ठेवण्यात आली होती. भारताचे हवाई दल चीनच्या हवाई दलाच्या तुलनेत काही बाबतीत सरस होते असे त्यावेळच्या काही संरक्षणतज्ज्ञांचे मत होते. भारतीय लष्कराला चीन युद्धादरम्यान अन्नपाणी, संरक्षणविषयक सामुग्री यांची रसद ज्या नियमितपणे मिळायला हवी होती तशी ती मिळू शकली नव्हती. शस्त्रास्त्रांपासून अनेक गोष्टींचा तुटवडा होता. जवाहरलाल नेहरु यांचे कृष्ण मेनन यांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त िवसंबून राहाणे हे साऱ्या देशाच्याच मुळावर आले. या युद्धानंतर चीनने भारताचा गिळलेला भूभागही अजून आपण परत मिळवू शकलेलो नाही. त्याशिवाय भारताच्या काही भूभागावर चीन अजूनही हक्क सांगतोच आहे.
१९६२च्या चीन युद्धामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या की ज्याचे सविस्तर विश्लेषण `न सांगण्याजोगी गोष्ट' या पुस्तकामध्ये आले आहे. मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी लष्करी, राजकीय अशा साऱ्या बाजू तपासून चीन युद्धाची सांगितलेली गोष्ट डोळ्यात अंजन घालणारी आहे...त्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे...
पुस्तकाचे नाव - न सांगण्याजोगी गोष्ट, 
लेखक - मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन,
पृष्ठसंख्या - ४०२,
मुल्य - ३७५ रुपये.