Thursday, December 3, 2015

मस्तानी: असतानाची. नसतानाची - समीर परांजपे- दिव्य मराठी, रसिक पुरवणी - २९ नोव्हेंबर २०१५




दै.दिव्य मराठीच्या 29 नोव्हेंबर 2015च्या अंकात रसिक या रविवारच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाची वेबलिंक, टेक्स्ट तसेच लेखाची जेपीजी फाइल सोबत जोडली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/29112015/0/1/
------------------------------------------
असूया, कुतूहल, गैरसमज, निंदा-नालस्ती असं सगळं वाट्याला आलेल्यांपैकी मस्तानी ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा. खऱ्या-खोट्या कहाण्या, वदंता, आणि आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने आगामी ‘बाजीराव-मस्तानी’साठी घेतलेलं कला-स्वातंत्र्य या गदारोळात हरवून गेलेल्या अनन्यसाधारण मस्तानीचा हा शोध...

मस्तानी: असतानाची. नसतानाची
----------------------------------
- समीर परांजपे
--sameer@Dbcorp.in
----------------------------------
शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची कल्पनाशक्ती होती तोकडी. ‘देवदास’ ही कादंबरी त्यांनी अर्धवटच लिहिली होती. ती पूर्ण केली, संजय लीला भन्साळीने ‘देवदास’ चित्रपट बनवून. ‘डोला रे डोला’ या गाण्यात पारो व चंद्रमुखीला एकत्र नाचवून त्याने कल्पनाशक्तीच्या मनोऱ्याचा पाया रचला होता.
आता तर त्याने मनोऱ्यावर कळस बांधलाय...
बाजीराव पेशव्यांच्या काशीबाई आणि मस्तानी या दोन बायका. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या ‘हिंदीराठी’ गाण्यात काशीबाई, मस्तानी लावणी नृत्यांगनांच्या आवेशात नाच नाच नाचतात.
कधीही युद्ध न हरलेला बाजीराव असा त्याचा लौकिक, पण तो काही खरा नाही. बाजीराव त्याच्या पश्चात एक युद्ध मात्र हरला आहे. ते म्हणजे, ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ने लादलेले युद्ध. शुद्ध मराठीत ‘चित्रपटीय स्वातंत्र्य.’ बाजीरावाच्या काळात चित्रपट वगैरे भानगड नव्हती. होती ती लावणी, पोवाडा वगैरे. तेच नेमके हेरून संजयने ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात अशी काही ‘लीला’ दाखविली, की मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमान वगैरे बाळगणाऱ्यांना त्याने पुरते ‘चितपटीय’ करून टाकले...
काही महिन्यांपूर्वी मुंबईत येऊन भन्साळीचा पाहुणचार घेणारे पेशव्यांचे सध्याचे वंशज मग खडबडून जागे झाले. त्यांनी भन्साळींना एक खुला खलिता धाडून कानउघडणी केली. १७व्या शतकात पेशव्यांचे असलेले पोशाख, त्यांच्या स्त्रियांची वेषभूषा असे सगळे तपशील या खलित्यात आहेत. बाजीरावाची पहिली पत्नी काशीबाई क्षयरोग, संधिवाताने ग्रस्त होती, तसेच एका पायाने अधूसुद्धा. समजा काशीबाई आरोग्याने धडधाकट जरी असती, तरी तिने जाहीरपणे नाच वगैरे करणे अशक्यच होते. कारण तशी रीतभात नव्हती पेशवेकाळात. मस्तानी ही बाजीरावाची द्वितीय पत्नी. मस्तानी काही दरबारी नृत्यांगना नव्हती, की नर्तिका. ती बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल यांची मुलगी होती. बाजीरावाबरोबर तिचे लग्न झाल्यानंतर ती पुण्यात आली. तिथे तिने आयुष्य कसे घालवले, याच्या बऱ्याचशा नोंदी आहेत, जुन्यापुराण्या कागदपत्रांत... पण ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ ही कवी केशवसुतांची ओळ भन्साळीच्या साहाय्यकांनी त्याला अशी समजावून सांगितली, की त्याने आपली सारी कल्पनाशक्ती पणाला लावून नवा इतिहासच घडविला.
आता या सगळ्या वादात गोम अशी आहे की, काशीबाईची बाजू उचलून धरणारे पुण्यनगरी व उर्वरित महाराष्ट्रात असंख्य आहेत... मात्र मस्तानीला न्याय मिळाला नाही, अशी ओरड करणारे आवाज खूपच क्षीण आहेत.
कारण काय असावे बरे?
पेशव्यांचा इतिहास चाळून बघा. मस्तानीच्या प्रतिमेवर बदनामीची पुटे चढलेली दिसतील. तिच्या सौंदर्यापेक्षा तिचे यावनीपण पुण्यातील ब्रह्मवृंदाच्या कायमच डोळ्यात खुपले. एका इतिहासकाराने केलेला उल्लेख इथे सहज आठवला. ते म्हणतात, ‘महाराष्ट्रातील एकाही घरात, एकाही नवजात बालिकेचे नाव ‘मस्तानी’ असे ठेवलेले आढळून आले नाही. मस्तानी हे नाव कुटुंबापेक्षा बाजारातच जास्त दिसले. चटपटीत पदार्थांना ठसठशीतपणा आणण्यासाठी या नावाचा उपयोग झाला. म्हणजे मस्तानी भेळ, मस्तानी मिसळ, मस्तानी कुल्फी, मस्तानी उदबत्ती.. मस्तानीच्या नावाची विरूपता झाली, ती अशी. पण, ते असो.’
मस्तानीला बाजीरावापासून समशेर बहादूर नावाचा मुलगा झाला होता. बाजीरावानंतर समशेरला पेशवेपद मिळेल, म्हणून पेशव्यांच्या कुटुंबीयांच्या पोटात गोळा आला होता. मस्तानीच्या बदनामीची मोहीम त्या वेळी सुरू होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण होते. समशेर बहादूर याला कृष्णराव किंवा कृष्णसिंह या नावानेही संबोधले जात असे. बाजीरावाच्या मृत्यूनंतर काही काळातच मस्तानीही मरण पावली. त्या वेळी हा समशेर अवघा सहा वर्षांचा होता. बाजीरावांची प्रथम पत्नी काशीबाईने समशेरला आपल्या घरी नेऊन त्याचा योग्य प्रतिपाळ केला. मस्तानी व काशीबाईमध्ये असलेले नाते हे असे होते. या दोघींना लावणीनृत्य करायला लावण्याऐवजी भन्साळींच्या संजयने दोघींतले हे मायाबंध अधोरेखित करणे अधिक चांगले झाले असते. समशेर बहादूर मोठा झाल्यानंतर त्याला बांदा आणि काल्पी प्रांताच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली. बांदाचा नवाब म्हणूनही तो ओळखला जाऊ लागला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात समशेर बहादूरला वीरमरण आले. समशेरच्या वंशजांनी म्हणजे समशेर बहादूर दुसरा यानेही १८०३मध्ये मराठे विरुद्ध इंग्रज असे जे युद्ध झाले त्यात मराठ्यांच्या बाजूने समशेर गाजविली होती. १८५७च्या उठावात बांद्याचे नवाब अली बहादूर (द्वितीय) यांनी झाशीच्या राणीबरोबर इंग्रजांशी लढा दिला. त्यात ते जखमी झाले. पराभवानंतर इंग्रजांनी नवाबांना इंदूरला धाडले. त्यांना तनखा सुरू केला. तेव्हापासून पेशवे व मस्तानीच्या वंशजांत संबंध राहिला नाही. ज्या मस्तानीला पेशव्यांच्या कुटुंबाने हीन वागणूक दिली होती, त्याच मस्तानीच्या वंशजांनी मराठा साम्राज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्याची किंमत अाजही लोकांना कळत नाही, याचे दु:ख होते.
‘बाजीराव मस्तानी’ या विषयाची भुरळ पडलेला भन्साळी हा चित्रपटसृष्टीतला काही पहिलाच व्यक्ती नव्हे. १९५५मध्ये ‘मस्तानी’ नावाचा चित्रपट झळकला होता. त्याचे दिग्दर्शक होते, धीरुभाई देसाई. आगा, मनहर देसाई, शाहू मोडक, रत्नमाला, निरंजन शर्मा, निगार सुल्ताना असे तारे-तारका त्यात चमकले होते. तोच विषय घेऊन आता संजय लीला भन्साळी मैदानात उतरला आहे.
मस्तानीविषयी असूया व कुतूहल अशा दोन्ही भावना जनमानसात दिसतात. त्याचेच प्रतिबिंब बाजीराव-मस्तानीच्या नात्यावर लिहिलेल्या कादंबऱ्या व इतर पुस्तकांत जसे दिसते तसे मालिकांमध्येही दिसते. ना. स. इनामदार यांची बाजीरावांच्या कर्तृत्वावरील "राऊ' ही कादंबरी प्रचंड गाजली. त्या कादंबरीवर आधारित "राऊ' ही मालिकाही तितकीच लोकप्रिय झाली. प्रख्यात चित्रकार व नेपथ्यकार द. ग. गोडसे यांच्या "मस्तानी' या पुस्तकातून मराठी मनाला मस्तानी अधिक जास्त कळली, असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही. मस्तानी या विषयाचा गोडसे सुमारे २५ वर्षे अभ्यास करीत होते, असे त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. ईटीव्ही मराठीवर "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' अशी थेट विषयाला हात घालणारीच मालिका कालांतराने सुरू झाली. असे ठायी ठायी भेटणारे मस्तानी आणि बाजीराव...
पण मुळात, मस्तानी होती तरी कोण? बुंदेलखंडमधील पन्ना संस्थानचे संस्थापक महाराज छत्रसाल यांना रुहानीबाई या उपपत्नीपासून झालेली मुलगी, म्हणजे मस्तानी. रुहानीबाई हैद्राबादच्या निजामाच्या दरबारी नृत्यांगना होती. १७२७-२८चा सुमार असेल. महंमद खान बंगश छत्रसालांच्या राज्यावर चालून गेला. त्या वेळी बाजीरावाने केलेल्या मदतीमुळे बंगशाचे आक्रमण मोडून काढता आले. बाजीरावाने केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून, महाराज छत्रसालांनी त्याचे मस्तानीशी लग्न लावून दिले. इतकेच नव्हे, तर काही लाख महसुली उत्पन्नाचा मुलुखही त्याला देऊ केला. महाराज छत्रसालांनी बाजीरावाला आपला मुलगाच मानले होते.
मस्तानी छत्रसाल राजाच्या कुटुंबकबिल्यात राजकन्येसारखीच वाढली होती. घोडेस्वारी, तलवारबाजी, इतर शस्त्रे चालविण्याचे कौशल्य यात मस्तानी पारंगत होती. मस्तानीने पान खाल्ले की, त्याची गुलाबी पिंक तिच्या गळ्यातून उतरताना दिसायची इतकी ती आरस्पानी होती, असे म्हणतात. तिच्या सौंदर्याच्या वर्णनात हा अतिरंजित रंगही मिसळलेला आहे. परंतु ते त्या काळच्या पुण्याचे वैशिष्ट्यच होते, नाही का? मस्तानीच्या रक्तात रुहानीबाईच्या रूपाने मुस्लिम रक्त असल्याने ते त्या वेळच्या पेशवाई ब्रह्मवृंदाला कसे रुचावे बरे?
बाजीरावाने मस्तानीच्या नादी लागून आपली पहिली पत्नी काशीबाईकडे दुर्लक्ष केले, असे म्हटले जाते. ते काही खरे नाही. मस्तानी आयुष्यात आल्यानंतरही बाजीरावांना काशीबाईपासून तीन अपत्ये झाली होती. काशीबाईकडे होणाऱ्या कथित दुर्लक्षाकडे पाहून काशीबाईची आई राधाबाई संतापाने लालेलाल झाल्या, राधाबाई आणि चिमाजीअप्पा यांनी मस्तानीला बाजीरावापासून दूर करण्यासाठी कारस्थाने रचली, तिला पुण्यापासून दूर विजनवास वाटेल अशा ठिकाणी पाठविण्याचे प्रयत्न चालविले, असेही म्हटले जाते. बाजीरावाचा मुलगा बाळाजीनेही मस्तानीला आपल्या वडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. बाजीराव लष्करी मोहिमेवर असताना मस्तानीला नजरकैदेतही ठेवण्याचा पराक्रम पेशवे कुटुंबीयांनी करून पाहिला... पण मस्तानी कशालाच बधली नाही. कारण तिचे जिवापाड प्रेम होते, आपल्या ‘राऊ’वर. बाजीरावाचा मृत्यू झाल्यानंतर मस्तानीही फार काळ जिवंत राहिली नाही. बाजीरावापासून झालेला मुलगा समशेरला काशीबाईच्या हाती सोपवण्याची अखेरची इच्छा सांगून मस्तानीने (कोणी म्हणतात, तिने विष पिऊन आत्महत्या केली.) प्राण सोडला. ‘समशेरचा सांभाळ काशीबाईच करतील,’ अशी तिला खात्री होती. मस्तानीची इच्छा खरी ठरली. काशीबाईंनी समशेरला शनिवारवाड्यात स्थान दिले. नानासाहेब पेशव्यांनी समशेरची जबाबदारी सदाशिवभाऊंवर सोपवली. बाजीरावांचे धाकले पुत्र राघोबादादा आणि समशेर समवयस्क. राघोबाच्या बरोबरीने समशेर वाढला.
पुण्यात असताना पेशवे कुटुंबीयांच्या विरोधामुळे मस्तानीला कधीच शनिवारवाड्यामध्ये वास्तव्य करू देण्यात आले नाही. याच शनिवारवाड्यात एका दरवाजाला मस्तानी दरवाजा असे नाव मिळालेले आहे. आजही तेच नाव रुढ आहे. आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात शनिवारवाडा असून तेथे मस्तानी दरवाजाजवळ या खात्याने लावलेल्या फलकावरील मजकूर आता अस्पष्ट झाला आहे. तो नीट वाचून इथे दिला आहे. हा मजकूर असा `जुन्या नोंदीप्रमाणे मस्तानी दरवाजाला नाटकशाळेचा दरवाजा असे म्हणत असत. परंतु पहिल्या बाजीरावाची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर या दरवाजाचे नाव मस्तानी दरवाजा पडले. मस्तानीचा नातू अली बहादूर याने बुंदेलखंड जिंकून राज्य स्थापन केल्यानंतर नाना फडणवीसांनी या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले. या दरवाजावर दहा शिपाई तैनात असत.' शनिवारवाड्यात कधीच स्थान न मिळालेल्या मस्तानीला बाजीरावाने पुण्याच्या कोथरुड भागात एक वाडा बांधून दिला होता. तिथे ती राहायची. तरीही शनिवारवाड्याच्या पूर्व भागाला ‘मस्तानी महाल’ आणि ‘मस्तानी दरवाजा’ अशी नावे रूढ झालेली आहेत. कोथरुडला मस्तानीचा जो वाडा होता, तो पुढे जीर्णशीर्ण झाला. त्याचे काही अवशेष राजा केळकर वस्तुसंग्रहालयात ‘मस्तानी महाल’ नावाने जतन करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये सहकार नगर भागात पेशवेकाळात मस्तानीसाठी एक उपवन विकसित करण्यात आले होते. पण तेही कधीचेच इतिहासजमा झाले व त्या जागी सिमेंट-काँक्रिटच्या इमारतींचे जंगल फोफावले.
पुण्याच्या जवळ पाबळ येथेही मस्तानीचा वाडा होता. मस्तानीची आजची स्मृती म्हणजे पाबळ‌ इथली समाधी. ही समाधी तीन-चार वेळा चोरट्यांनी उकरून काढली. समाधीच्या आत काही दागदागिने मिळतील, या लालसेने. पण काही हाती लागले नाही. मस्तानी ही बाजीरावाचा कंठमणी होती. तोच दागिना मूल्यवान होता. तो मातीत मिसळला, तेव्हा चोरट्यांनाही हिऱ्याऐवजी हाती मातीच लागणे स्वाभाविकच नाही का? पुण्याजवळ दिवेघाट परिसरात मस्तानी तलाव आहे. तिथे मस्तानी म्हणे, स्नानासाठी जात असे...व्यक्तीला जिवंत असताना छळायचे आणि मग ती गेल्यानंतर तिच्या स्मृतींचे कढ काढायचे, ही नेहमीचीच जनरीत आहे. मस्तानीचे समकालीन कोणते चित्र आहे का? जी चित्रे उपलब्ध आहेत, त्यांच्या अस्सलतेबद्दल इतिहासकारांमध्येच वाद आहेत. भुजच्या ‘आयना महल’मध्येही तिचे एक चित्र आहे, म्हणतात. पण तेही असेच खऱ्याखोट्याच्या धुक्यात सापडलेले. जिवंतपणी ती जसे जगली, तसेच तिच्या मृत्यूनंतर तिच्याशी संबंधित गोष्टींनाही तेच प्राक्तन लाभले...
संजय लीला भन्साळीने काशीबाई आणि मस्तानीला एकत्र पिंगा घालायला लावला, म्हणून मस्तानीचे वंशजही संतापले आहेत. मस्तानीचा आठव्या पिढीतला वंशज, उमर अली बहादूर २०१२मध्ये पुण्यात आला होता. पाबळ येथे मस्तानीचे स्मारक दिमाखात उभे राहावे, ही त्याची धडपड. बाजीरावांची पत्नी काशीबाईंपासून वाढलेल्या वंशापैकी तीन वंशज यात आहेत. त्यातील उदयसिंह पेशवेंना उमर अली बहादूर पुण्यात भेटला. अंतरीच्या गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितल्या. बाजीराव-मस्तानी यांचे वंशज इंदूर, भोपाळ, सिहोर अशा परिसरात पूर्वीपासूनच स्थायिक झालेले आहेत. त्यापैकीच उमर अली बहादूर. मस्तानीचा मुलगा समशेर बहादूर पानिपताच्या लढाईत कामी आला, आणि महाराष्ट्राशी तिची रक्ताच्या नात्याची असलेली नाळ तेव्हाच तुटली. मात्र बांदा संस्थानािधपती असलेले मस्तानीचे वंशज महाराष्ट्राला विसरणे शक्यच नव्हते.
‘मस्तानीचा मुलगा समशेर काशीबाईच्या देखरेखीखाली वाढला. पेशव्यांच्या कोकणस्थ ब्राह्मण परिवाराने समशेरच्या ‘मुस्लिम’ असण्यावर आक्षेप न घेता त्याला सामावून घेतले. त्याचा धर्म बदलणे पेशव्यांना सहज शक्य होते; मात्र, समशेरला त्यांनी धर्मापासून तोडले नाही. त्यामुळे मीही माझी जात ‘कोकणस्थ ब्राह्मण मुसलमान’ अशी सांगतो’, असे मस्तानीचे वंशज उमर अली बहादूर यांनी उदयसिंह पेशवेंना भेटल्यावर सांगितले होते. उदयसिंहांना भेटून मोठा भाऊ भेटल्याचा आनंद उमरना झाला होता. पाबळला मस्तानीचे भव्य स्मारक उभे राहावे, असा उमर अली बहादूरचा प्रयत्न आहे. पाबळला मस्तानीच्या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी खूप मोठमोठ्या घोषणा आजवर झाल्या. मात्र अद्याप फारसे काहीही झालेले नाही. मस्तानीच्या समाधीजवळ आजही दिवाबत्ती केली जाते, स्थानिकांकडून. किमान ‘नाही चिरा नाही पणती’ अशी तरी अवस्था तिच्यावर आली नाही. आता ती पुन्हा भन्साळीच्या चित्रपटातून बाजीरावासह आपल्यासमोर येते आहे. मस्तानी कशी होती, यावर जंगी शब्दयुद्धे होतील, पानिपतावर माजला तसा गदारोळही माजेल...पण यातून एक काय दिसतेय माहीती आहे का? मस्तानी तिच्या जिवंतपणीही कोपऱ्यातच ढकलली गेली होती... आता काशीबाईला पुढे करून पुन्हा मस्तानीला कोपऱ्यात ढकलले जाते आहे... मस्तानीचे हे दुर्दैव; दुसरे काय?
sameer.p@dbcorp.in

No comments:

Post a Comment