Wednesday, February 25, 2015

माझ्या (समीर परांजपे) नव्या सहा इ-बुक्सची मुखपृष्ठे व तत्संबंधी माहिती.



माझी नवी सहा इ-बुक्स फेब्रुवारी २०१५मध्ये न्यूजहंट या इ-बुक्स वेबसाइटवर प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या मुखपृष्ठांची छायाचित्रे पुढे देत आहे.
ही पुस्तके ऑनलाइन वाचकांना
http://ebooks.newshunt.com/Ebooks/
या वेबलिंकवर sameer paranjape असा किंवा माझ्या पुस्तकाच्या नावाने सर्च करुन शोधता येतील. पुस्तके मोबाईलवर किंवा टॅबवर वाचायची असल्यास न्यूजहंट अॅप डाऊनलोड करुन मग तेथे त्या ऑनलाइन पुस्तकाचे पेमेंट करुन ती वाचायला मिळतील.
माझ्या सहा पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छायाचित्रे याप्रमाणे.






Sunday, February 15, 2015

आत्मरंग लोपला! - आत्माराम भेंडे यांना आदरांजली वाहणारा माझा लेख. दै. दिव्य मराठीच्या १५ फेब्रुवारी २०१५च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला.


ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांना आदरांजली वाहाणारा दै. दिव्य मराठीच्या १५ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा हा लेख. त्या लेखाची टेक्स्ट व इ-पेपर लिंक व जेपीजी फोटो सोबत दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-article-on-atmaram-bh…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/15022015/0/6/
---
आत्मरंग लोपला!
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
----
मराठी रंगभूमीवरील फार्सिकल नाटकांचे आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू हे दोन बादशहा. त्यापैकी बबन प्रभू यांनी यापूर्वीच जगाच्या रंगभूमीचा निरोप घेतलेला. दुसरे बादशहा आत्माराम भेंडे हेदेखील नुकतेच ७ फेब्रुवारी रोजी काळाच्या पडद्याआड गेले. मराठी फार्सिकल नाटकांचा आत्मरंग ख-या अर्थाने लोपला. १९६०-७०च्या दशकांत मराठी रंगभूमीवर नानाविध प्रवाह एकवटलेले होते. त्यामध्ये विजय तेंडुलकर, विजया मेहताप्रणीत वास्तववादी नाटकांचा जसा एक सशक्त प्रवाह होता, तसेच आत्माराम भेंडे, बबन प्रभू आदी मंडळींनी पाश्चात्त्य रंगभूमीवरील फार्सिकल नाटकांनी प्रेरित होऊन तो प्रवाह मराठी रंगभूमीवर अधिक सशक्त करण्याचा जणू विडा उचलला होता.
सावंतवाडी संस्थानमधील आरोंदे हे आत्माराम भेंड्यांचे गाव असले, तरी त्यांच्या पूर्वजांची पाळेमुळे ही गोव्याच्या भूमीतच होती. गोव्यामधील कलाकार, गायक आदी सा-या देशभर आपले नाव गाजवत होते. कलेचा हा सुदूर वारसा घेऊनच आत्माराम भेंडे हे लहानपणी आपल्या आई व भावंडांसमवेत मुंबईत आले. १९३०-४०च्या दशकातील मुंबई ही एकीकडे गो-या साहेबाने दिलेल्या कलावारशाचा आनंद उपभोगत होती. दुस-या बाजूला मुंबईत नोकरीधंद्यासाठी आलेला गावोगावचा मराठी माणूस नाटक, चित्रपट आदी कलांतून आपल्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देऊ लागला होता. या सा-याचा परिणाम आत्माराम भेंडे यांच्यासारख्या नाटकप्रेमी माणसावर होणारच होता. कोकणी, मराठी, इंग्लिश, हिंदी अशा चारही भाषा अगदी लहानपणापासूनच परिचित असलेल्या भेंडे यांनी पुढे मराठी, इंग्लिश, हिंग्लिश रंगभूमी गाजवली, ती बहुसांस्कृतिक मूल्याधारित संस्कारांच्या बळावरच... आत्माराम भेंडे यांच्या अभिनयशैलीबद्दल त्यांचे समकालीन अभिनेते आवर्जून सांगत की, भेंडे यांना जबरदस्त टायमिंग सेन्स होता आणि मुद्राभिनयातील कसब वाखाणण्यासारखे होते. भेंडे असे कलाकार होते की, जे विनोदी व गंभीर, खलनायकी वळणाची भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारायचे. कोणतीही भूमिका करताना त्यांच्यातील दिग्दर्शक व कोणतेही नाटक, मालिका दिग्दर्शित करताना त्यांच्यातील अभिनेता जागा असायचा. याचा दुहेरी फायदा त्या कलाकृतीला होत असे.
इंडियन नॅशनल थिएटर या नामवंत संस्थेतून आत्माराम भेंडे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आयएनटीमधून भेंडे यांनी विविध प्रकारच्या नाटकांत कामही केले, आणि काही नाटके दिग्दर्शितही केली. ख्यातनाम साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या तीन एकांकिका एकत्र करून 'वेड्यांचा चौकोन' हे एक नाटक लिहिले होते. या नाटकातील विनोद फार्सिकल पद्धतीचा आहे, असे गंगाधर गाडगीळांनी या नाटकाच्या निवेदनात आवर्जून लिहिले होते. आयएनटीमध्ये सक्रिय असणा-या आत्माराम भेंडे यांनी काही कारणास्तव हे नाटक भारतीय विद्याभवनच्या मराठी विभागातर्फे करायला घेतले. ‘सशाची शिंगे’ या आयएनटीकडून केलेल्या नाटकानंतर लगेचच 'वेड्यांचा चौकोन' हे नाटक करायला मिळणे, ही आत्माराम भेंडे यांना सुर्वणसंधीच वाटली होती. १९५८मध्ये इंडियन नॅशनल थिएटरतर्फे ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक करताना प्रेक्षकांना एक ध्वनिमुद्रित निवेदन ऐकविले जाई. ‘अभिनेते गणपतराव जोशी करीत असत त्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ या फार्सचा उल्लेख करून फार्सची मराठी रंगभूमीवरील परंपरा खंडित होऊ नये, म्हणून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा आमचा प्रयत्न आहे', असे आत्माराम भेंडे या निवेदनात आवर्जून सांगत असत. शिवाय या नाट्यप्रकाराला भेंडे यांनी नाटक म्हणण्याचे टाळले. सुरुवातीपासूनच त्याचा फार्स असा उल्लेख केला. त्यानंतर आत्माराम भेंडे यांनी गाजविलेले नाटक म्हणजे, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई.’ जसे चित्रपटात सिक्वेल काढला जातो तसेच "झोपी गेलेला जागा झाला' या नाटकाचा ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हा सिक्वेल होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दिनूच्या सासूबाई राधाबाई करताना प्रमुख पात्रांची नावे ‘झोपी...'तीलच घेतलेली होती, इतकेच नव्हे तर काही ठिकाणी कथानकातही हे तेच लोक आहेत, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. १९७३च्या ऑगस्ट महिन्यामध्ये आत्माराम भेंडे यांनी पूर्णिमा या संस्थेतर्फे ‘पळा पळा कोण पुढे पळे तो' हा फार्स सादर केला. "पिलूचं लग्न' हा फार्सही असाच गाजला.
आत्माराम भेंडे यांचे व्यक्तिमत्त्व केवळ कलाकार, दिग्दर्शकाचेच नव्हते, तर या नाट्यसाधनेसाठी ते नेटके वाचनही करीत. नाट्यशास्त्रात खूपच मोलाची समजली जाणारी रशियन नाट्यतज्ज्ञ स्टानिस्लाव्हस्की यांची पुस्तके वाचून भेंडे त्यावर मनन-चिंतन करीत असत. भूमिकेत अवहगान करण्याबाबत स्टानिस्लाव्हस्की याने केलेल्या विश्लेषणाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आत्माराम भेंडे यांनी केलेली चिकित्सक झटापट हा त्यांच्यातील अभ्यासकाचा आविष्कार होता. फार्सिकल नाटके हा त्यांच्या रंगाभिनयाचा एक आविष्कार होता. त्याशिवाय मन पाखरू पाखरू, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी अशा नाटकांमधून भेडेंनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. हिंदी, मराठी, हिंग्लिश नाटकांमधून भेंडे नव्या पिढीबरोबर तितक्याच ताकदीने उभे राहिले. भरत दाभोळकर यांच्या हिंग्लिश नाटकांत कामे करताना बहुसांस्कृतिकत्वाचा बाज भेंडेंनी ज्या अचूक रीतीने पकडला होता, त्याला तोड नव्हती. त्यांच्या या आविष्काराची आठवण दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान यांच्यासारखी मंडळी आजही काढतात. आत्माराम भेंडे यांनी दूरदर्शनसाठी काही मालिकांचे दिग्दर्शन केले होते. गेल्या काही वर्षांत जाहिरातपटांमध्ये त्यांनी केलेली कामे, आजच्या पिढीलाही आवडली होती. 'यंदा कर्तव्य आहे' या सिनेमात त्यांनी आजोबांची छोटेखानी भूमिका एकदम चोख बजावली होती. "लगे रहो मुन्नाभाई' या हिंदी सिनेमात त्यांनी साकारलेला 'आत्माराम' सा-यांच्याच काळजाला भिडला होता.
आत्माराम भेंडे यांनी आपले नाट्यजीवन व जीवननाट्याविषयी 'आत्मरंग' या आत्मचरित्रात सविस्तर सांगून ठेवलेच आहे. त्यांनी दिग्दर्शन, भूमिका केलेली नाटके, चित्रपट, मालिका, जाहिराती यांची यादी खूप मोठी आहे. कारण, तो सहा दशकांतील त्यांच्या कामगिरीचा व्यापक पट आहे. पण तरीही भेंडेंचा आत्मा एकरूप झाला होता तो अधिकतर नाटकांशीच... आपण नाटक का करतो, हे सांगताना भेंडे म्हणायचे, "समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारी आधुनिक नाटके व इतर नाट्यप्रकार आधुनिक तंत्राने, फायद्याकडे दृष्टी न ठेवता, शक्यतो निर्दोष स्वरूपात रंगभूमीवर आणण्याचा माझा संकल्प असायचा. नाटक हे जनताभिमुख झाल्यासच जनतेचा त्याला आश्रय मिळेल, असा विश्वास आहे. नाट्यप्रकाराचे वेगवेगळे नमुने प्रेक्षकांसमोर ठेवून त्यांचे लक्ष रंगभूमीकडे वेधणे, हा माझा हेतू आहे.' हे नाट्यतत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनातही मुरवलेले आत्माराम भेंडे यांच्या जाण्याने रंगभूमीभक्तांचा आत्मरंग आता लोपला आहे!

Tuesday, February 3, 2015

भारतीय मुशीतला राजकीय विचारवंत रजनी कोठारी - दै. दिव्य मराठीच्या ३ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.



प्रख्यात राजकीय विचारवंत रजनी कोठारी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा कार्याचा आढावा घेणारा लेख मी दै. दिव्य मराठीच्या ३ फेब्रुवारी २०१५च्या अंकात मी लिहिला आहे. त्या लेखाची जेपीजी फाईल, टेक्स्ट व वेबपेज लिंक व मजकूर खाली दिला आहे.
----
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/03022015/0/6/
----
भारतीय मुशीतला राजकीय विचारवंत
--------
-समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
---
स्वातंत्र्यपूर्व भारत व स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय स्थिती तसेच राजकीय प्रवाहांची अचूक जाण असणारे जागतिक कीर्तीचे राजकीय विश्लेषक रजनी कोठारी यांच्या निधनामुळे या अभ्यास क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विविध जाती, पंथ, धर्म यांच्यात विभागला गेलेला अन् तरीही एकसंध असलेला भारतीय समाज ही राजकीय विषयांचे अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार यांच्या दृष्टीने खूप अजब अशीच गोष्ट आहे. कोणत्याही समाजवर्तनाला एकच एका सूत्रात बांधणे शक्य होत नाही. विविध क्षेत्रांतील घटनांची प्रतिक्रिया व परिणाम होऊन समाजाचे मत तयार होत असते.
बर्‍याचदा समाज हिणकस व उदात्त असे दोन्ही मतप्रवाह उराशी बाळगून मार्गक्रमण करीत असतो. या वर्तनाला भारतीय समाजही अपवाद नाही. मात्र भारतीय समाजाच्या प्रगतीत वा अधोगतीत येथील विविध जात, धर्म, पंथ असे अनेक घटक आपापली भूमिका बजावत असतात. त्यामुळे भारतीय मुशीचे राजकारण अमेरिका, युरोपीय देशांपेक्षा वेगळे आहे.
भारतीय समाजाच्या राजकीय वर्तनाचे नेमके आकलन रजनी कोठारी यांना झालेले होते. हस्तिदंती मनोर्‍यात बसून सखोल विचार करणार्‍या विचारवंतांचे एक जग आहे आणि त्यांचा पवित्रा काही प्रमाणात बरोबरही आहे. याचे कारण लोकांत फार मिसळल्याने आपल्या विचारांतील तटस्थता गमावण्याचा धोका अशा मनोवृत्तीच्या विचारवंतांना नेहमी वाटत असतो. लोकांत मिसळणारे व लोकांपासून विलक्षण अलिप्त राहणारे या दोन्ही प्रकारच्या विचारवंतांमधील मध्यममार्ग राजकीय तज्ज्ञ रजनी कोठारी यांना पसंत होता. केवळ लोकानुनयी धोरणे, लोकभावना यांचाच अभ्यास करून कोणताही राजकीय सिद्धांत मांडता येत नाही, तर विविध कालखंडात साधर्म्य वाटणार्‍या परिस्थितीत समाज राजकीयदृष्ट्या त्याच त्याच पद्धतीने वागला का, त्यातून राजकारणाने कुठले वळण घेतले याचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे रजनी कोठारी यांना महत्त्वाचे वाटत असे.
राजकीय प्रवाह व समाजाचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने त्यांचा एकत्रित अभ्यास व्हावा, असेही त्यांचे मत होते. त्यातूनच रजनी कोठारी यांनी ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ (सीएसडीएस) ही संस्था स्थापन केली होती. समाजशास्त्र व मानव्यशास्त्रांमध्ये प्रगत संशोधन करण्यासाठी ही संस्था त्यांनी उभारली होती. रजनी कोठारी यांचा पिंड हा कार्यकर्ता विचारवंताचा होता. अभ्यासकाच्या विचारमांडणीला एक शिस्त व परीघ असतो. त्या परिघाच्या बाहेरही अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा विचार अभ्यासकाने निराळ्या अंगाने करणे अपेक्षित असते. तिथे त्याचे कार्यकर्तापणही कामाला येते. रजनी कोठारी यांनी स्थापन केलेल्या सीएसडीएस या संस्थेने अशाच प्रकारचे काम उभे केले होते. सामाजिक चळवळींचे बहुशाखीय दृष्टिकोनातून विश्लेषण करणे ही सीएसडीएसची खासियत आहे. आपल्या संस्थापकाच्या गौरवार्थ लोकशाहीच्या अभ्यासासाठी सीएसडीएसने २००४ मध्ये रजनी कोठारी अध्यासनाची स्थापना केली. २० नोव्हेंबर २०१२ रोजी सीएसडीएसला तेव्हा पन्नास वर्षे पूर्ण झाली.
सीएसडीएसच्या माध्यमातून या कालावधीत रजनी कोठारी यांनी राजकीय विश्लेषणाला नवा आयाम देण्याचे जे मोठे कार्य केले होते त्याचा संस्थेच्या सुवर्णमहोत्सवात धांडोळा घेण्यात आला. रोमिला थापर, टी. एन. मदन, घनश्याम शहा, जी. एस. ओबेरॉय, सुरेश शर्मा, हरबन्स मुखिया, आशिष नंदी, सुधीरचंद्र यांसारख्या जाणत्या अभ्यासकांची प्रभावळ सीएसडीएसशी जोडली गेली ती केवळ रजनी कोठारी यांच्या विजिगीषू वृत्तीमुळेच.
रजनी कोठारी हे उजव्या विचारसरणीचे पाईक होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचे राजकारण हे डावी व समाजवादी विचारसरणी यांच्या मिश्रणाला प्रमाण मानून करण्यात येत होते. नेहरूवाद हा याच विचारांचा अाविष्कार होता. नेहरूवादाने भारलेल्या पिढीचे रजनी कोठारी हे प्रतिनिधी होते, परंतु त्यांचा नेहरूंबद्दल आंधळा भक्तिभाव नव्हता. पं. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत ज्या उत्तम गोष्टी घडल्या त्यांचे रजनी कोठारी यांनी जसे कौतुक केले आहे तसे नेहरूंच्या घोडचुकांचे कोठारी यांनी कधीही समर्थन केले नाही. देशाचा कारभार हा एकाच राजकीय घराण्याच्या हातात असू नये अशी त्यांची आग्रही भूमिका होती. मात्र असेच मत मांडत असलेल्या संघ परिवार किंवा भाजपच्या विचारसरणीशी कोठारी यांची नाळ कधीही जुळली नाही.
रजनी कोठारी यांनी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये अध्यापक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. तेथे कार्यरत असताना कोठारी यांनी ‘फॉर्म अँड सबस्टन्स इन इंडियन पॉलिटिक्स' ही सहा मुद्द्यांवर आधारित राजकीय मीमांसा करणारी निबंधमाला ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’मध्ये लिहिली होती. हे वर्ष होते १९६१. हे त्यांचे लेखन त्या काळात खूप गाजले होते. रोमेश थापर संपादित करीत असलेल्या सेमिनार या नियतकालिकातही कोठारी पुढे लिहीत असत. राजकीय विश्लेषणातील त्यांची ही सखोलता बघून प्रा. श्यामाचरण दुबे यांनी रजनी कोठारी यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट या संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून बोलावले. मात्र त्यानंतर ते दिल्लीला परतले. सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेची स्थापना केल्यानंतर रजनी कोठारी यांच्यातील कार्यकर्ता विचारवंताच्या आगळ्यावेगळ्या प्रवासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. सामाजिक शास्त्रांतील मूलभूत संकल्पनांचा परिघाबाहेर जाऊन विचार करून लेखन करणे ही या सीएसडीएसची खासियत होती. काँग्रेस हा एक पक्ष नसून ती पद्धती आहे, असा दृष्टिकोन घेऊन १९७० मध्ये रजनी कोठारी यांनी लिहिलेले ‘पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक वस्तुनिष्ठ अभ्यासाचे मोठे उदाहरण आहे. कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, फुटस्टेप्स इन टू द फ्यूचर या त्यांच्या पुस्तकांतून भारतीय राजकारणातील धुमारे वाचकांना विश्लेषक नजरेने पाहता आले.
नेहरूंपेक्षा इंदिरा गांधी यांचे राजकारण रजनी कोठारी यांना अधिक भावले होते. १९७० च्या दशकाच्या प्रारंभी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना गुजरातमध्ये भ्रष्टाचाराविरोधातील नवनिर्माण आंदोलनाने उसळी घेतली होती. त्या वेळी गुजरातचे तत्कालीन राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये बोलणी घडवून आणण्यासाठी रजनी कोठारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण अखेर इंदिरा गांधी यांनी गुजरातचे सरकार बरखास्त केले. इंदिरा गांधी यांच्या राजकारणात कालांतराने संजय गांधी यांचा प्रवेश झाला. संजय गांधी यांच्या अनेक उद्योगांनी अस्वस्थ झालेल्या इंिदरा गांधी निकटवर्तीयांत रजनी कोठारीही होते.
कोठारी यांनी काँग्रेसशी नाळ तोडून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाची कास धरली. आणीबाणीच्या काळात मात्र कोठारी राजकारणापासून अलिप्त होऊन कार्यकर्त्याच्या भूमिकेत स्थिरावले. कार्यकर्ता, विचारवंत, बुद्धिमंत यांच्यात सहज संवाद घडावा या उद्देशाने रजनी कोठारी यांनी १९८० मध्ये ‘लोकायन’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. धर्म, राजकारण, आरोग्य, शेती, शिक्षण यांच्यातील सकारात्मक बदलांबाबत या संस्थेत झालेली चर्चा खूपच मोलाची आहे. सिटिझन्स फॉर डेमोक्रसी, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थांशीही ते संलग्न होते. या सार्वजनिक जीवनातील आठवणी त्यांनी आपल्या ‘मेमॉयर्स : अनइझी इज द लाइफ ऑफ माइंड’ या पुस्तकात ग्रंथित केल्या आहेत.
भारतीय राजकारणाचा बाज ज्याला समजून घ्यायचा आहे त्याने रजनी कोठारी यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ डेव्हलपमेंट, टुवर्ड्स ए जस्ट वर्ल्ड, रिथिंकिंग डेव्हलपमेंट : इन सर्च ऑफ ह्यूमन अल्टरनेटिव्हज, ट्रान्सफॉर्मेशन अँड सर्व्हायव्हल : इन सर्च ऑफ ह्यूमन वर्ल्ड ऑर्डर आदी पुस्तके मिळवून वाचायला हवीत. भारतीय राजकारण कोणत्या मातीतून घडलेय याचे चौफेर भान जितके रजनी कोठारी यांच्या लिखाणात दिसायचे तितके खूपच कमी लोकांमध्ये दिसते. म्हणूनच रजनी कोठारी हे अस्सल भारतीय मुशीतले राजकीय विचारवंत होते असे म्हणायचे ते त्याचसाठी.

Sunday, January 18, 2015

वास्तुवैभवाची मुंबापुरी - दै. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीमध्ये दि. १८ जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध झालेला माझा लेख.


दै. दिव्य मराठीच्या दि. १८ जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये मी पुढील लेख लिहिला आहे. त्या लेखाचा हा मजकूर व त्या लेखाच्या वेब व टेक्स्ट लिंक पुढे दिल्या आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-article-on-heritage-s…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/18012015/0/3/
---
वास्तुवैभवाची मुंबापुरी
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
----
जुनी मुंबई म्हटले, की डोळ्यासमोर येतो तो फोर्ट, चर्चगेट, व्हीटी ते मुंबई सेंट्रलपर्यंतचा विभाग. व्हिक्टोरियन, गॉथिक, आर्ट डेको इमारतींची रेलचेल ही या भागांची खासियत. ‘मुंबई कोणाची? मराठी माणसाची’, अशी सवंग घोषणा लोकप्रिय असली तरी खरी मुंबई घडविली, जोपासली आणि वाढविली गो-या साहेबाने. त्याने विविध जात, पंथ, धर्माच्या लोकांना मुंबईत येऊन व्यापारउदीम, नोकरी-व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. त्यातून आजची एकजीव मुंबई आकाराला आली.
जुन्या मुंबईत गो-या साहेबाने विविध कलात्मक इमारती उभ्या केल्या आहेत, त्यांच्यातले सौंदर्य अवर्णनीय आहे. १९व्या शतकात दक्षिण मुंबईत ज्या व्हिक्टोरियन शैलीतील इमारती बांधल्या गेल्या, त्यासाठी कावसजी जहांगीर, प्रेमचंद रायचंद, डेव्हिड ससून अशा नामवंत मुंबैकरांचे सहकार्यही ब्रिटिश सरकारने घेतले होते. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को)च्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील सांस्कृतिक ठेवा म्हणून मुंबईच्या दक्षिण भागातील या उत्तमोत्तम ऐतिहासिक इमारतींचा समावेश होण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून नुकतीच केली. त्यांची ही कृती वारसा जतनाची इच्छा जाहीर करणारी, म्हणूनच स्वागतार्हसुद्धा.
फोर्ट, व्ही.टी., मुंबई सेंट्रल, भायखळापर्यंतच्या जुन्या मुंबईत १८व्या व १९व्या शतकात ब्रिटिशांनी सर्वात आधी ज्या इमारती उभ्या केल्या, त्या निओ-क्लासिकल शैलीतील होत्या. युरोपात वास्तुकलेतही त्या काळी नवनवे प्रवाह अवतरत होते. त्यांचे प्रतिबिंब या काळात मुंबईतील वास्तुउभारणींमध्येही दिसत होते. गॉथिक शैलीतील इमारती या अत्यंत
बोलक्या, लॅन्सेट विंडोज आणि स्टेन्ड ग्लासेसनी नटलेल्या असतात. या इमारती जणू काही विविध रंग अंगी लेऊन उभ्या आहेत असे वाटावे, असा त्यांचा साज असतो. दमट हवामानाच्या मुंबई शहराच्या जीवनशैलीला मानवतील अशा गॉथिक शैलीतील इमारती गो-या साहेबाने या शहरात उभारल्या. त्यातून बॉम्बे गॉथिक ही नवी शैलीच विकसित झाली.
ब्रिटिश साम्राज्यामध्ये जी शहरे व्हिक्टोरियन, गॉथिक अशा शैलीतील इमारतींनी नटली त्यात मुंबईचा अग्रक्रम आहे. जुन्या मुंबईतील ऐतिहासिक इमारतींमध्ये जर्मन गॅब्लेज, डच रुफ, स्वीस टिंबरिंग, रोमन शैलीतील आर्च, ट्युडर केसमेंट अशा विविध वास्तुवैशिष्ट्यांचीही भर पडली आहे. मुंबईचा टाऊन हॉल, सेंट झेवियर कॉलेज, मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट
संकुलातील ग्रंथालय व तेथील राजाबाई टॉवर, सचिवालय, मुख्य तार व टपाल कार्यालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस यांच्या इमारती ही गॉथिक शैलीतील वास्तूंची अप्रतिम उदाहरणे आहेत.
भारताचे प्रवेशद्वार म्हणजे, गेट वे ऑफ इंडिया ही जुन्या मुंबईतील एक अत्यंत देखणी वास्तू. मुस्लिम, हिंदू वास्तुशैलीचे प्रतिबिंब गेट वे ऑफ इंडियाच्या बांधणीत पाहायला मिळते. या वास्तूचा प्रचंड मोठा घुमट आपली नजर खिळवून ठेवतो. असाच घुमट छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीतही पाहायला मिळतो. राजस्थानी वास्तुशैलीचा प्रभावही
मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये थोड्या प्रमाणात जाणवत राहतो. जुन्या मुंबईतील आर्ट डेको इमारतींचाही डौल वेगळाच आहे. १९३०च्या दशकात आर्ट डेको इमारती या शहरात बांधण्यात
येऊ लागल्या. आर्ट डेको इमारती बहुसंख्येने असलेले मुंबई हे जगातील दुस-या क्रमांकाचे शहर आहे. मुंबईतील अनेक गाजलेली चित्रपटगृहे आर्ट डेको पद्धतीने बांधलेली आहेत. मेट्रो सिनेमा, इरॉस, लिबर्टी सिनेमा, रिगल सिनेमा ही त्यातील काही गाजलेली उदाहरणे. आर्ट डेको इमारतींच्या अग्रभागी अँग्युलर शेप दिलेले बांधकाम केलेले असते. जुनी मुंबई ही
आता ब-याच अंशी नव्या वळणाची होत चाललेली आहे. फोर्ट, व्हीटीचा काही भाग वगळता त्या परिसरातही गगनचुंबी इमारती गेल्या तीन-चार दशकांत मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या आहेत. एकेकाळी जुन्या मुंबईचे क्षितिज मोकळे आणि म्हणूनच विस्तारलेले वाटायचे. पण आता टोलेजंग इमारतींनी हे क्षितिज आक्रसले आहे. तरीही या भाऊगर्दीत मुंबई उच्च
न्यायालय, क्रॉफर्ड मार्केट, ताजमहाल हॉटेल, फ्लोरा फाऊंटन, अफगाण चर्च अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आपले आगळे वैशिष्ट्य घेऊन उभ्या आहेत.
१९९५मध्ये स्थापन झालेल्या हेरिटेज कमिटीने मुंबईतील ऐतिहासिक वारसा वास्तूंची एक यादी तयार केली. हे सारे वास्तुवैभव नीट जतन करण्याबरोबरच त्याचे जगातील पर्यटकांना सुनियोजित दर्शन घडावे, म्हणूनही या समितीने काही प्रयत्न केले. पण त्याला फारसे यश आले नाही. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मुंबईतील ऐतिहासिक इमारतींचा समावेश झाला तर या शहराच्या झळाळीत भरच पडेल. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी तसा आग्रह मोदींकडे धरला आहे. लंडन ही व्हिक्टोरियन, गॉथिक शैलीतील वास्तूंनी सजलेली रमणीय नगरी. तिथल्या वास्तू जशा पर्यटकांना मोहिनी घालतात, तेच सामर्थ्य देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वास्तुवैभवात आहे. ते जर जगासमोर नीट उलगडून दाखविले तर देशाला पर्यटनातून मिळणा-या उत्पन्नातही भर पडल्याशिवाय राहणार नाही.

Wednesday, December 17, 2014

निखळ (निखिल) रत्नपारखी व त्याची नाट्य(भक्ती) - (प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार निखिल रत्नपारखी व त्याची सहचारिणी व अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांचा कलापरिचय)



निखळ (निखिल) रत्नपारखी व त्याची नाट्य(भक्ती)
----------
(प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार निखिल रत्नपारखी व त्याची सहचारिणी व अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांचा कलापरिचय)
--------------
बेगम मेमरी, आठवण गुलाम हे नाटक बघायचे, बघायचे आहे म्हणताना काहीना काही कारणामुळे राहूनच जातेय...हे नाटक त्यातील आशय, विषय आणि सादरीकरणासाठी बघायचे आहे. नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, नाटककार जयंत पवार यांनी या नाटकाविषयीची लिहिलेली परीक्षणे वाचल्यानंतर नाटकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हे नाटक बघायचे आहे प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, लेखक निखिल रत्नपारखी, त्याची सहचारिणी भक्ती रत्नपारखी, माझी बेस्ट फ्रेंड व कुशाग्र कलाकार लतिका गोरे व अन्य कलावंतांच्या नाटकातील अदाकारीसाठी...हे नाटक बघूनच निखिल व भक्ती या नाट्यवेड्या दांपत्याबद्दल लिहावे असे वाटत होते. मात्र ते होऊ शकले नाही. पण त्यामुळे काही अडत नाही. निखिल असो वा भक्ती हे काही याच नाटकामुळे माहिती झाले असे नाही.
निखिल रत्नपारखी हा मुळ पुण्याचा. नाट्य, चित्रपट, मालिका, जाहिरातींतील नेमके मुल्यवान रत्न कोणते व नुसतेच खडे कोणते याची पारख निखिलला आता चांगलीच झाली आहे. पण त्याचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. तो पुण्यातील समन्वय या नाटकगटामध्ये सक्रिय झाला. तिथे त्याने राजीव नाईक लिखित साठेचं काय करायच?, विजय तेंडुलकर लिखित मसाज या नाटकांमध्ये कामे केली. कोवळी उन्हे या नावाने विजय तेंडुलकरांचे सदर एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असे. त्याच्यावर आधारित नाट्याविष्कार समन्वय संस्थेने निर्मिला होता. त्याचा दिग्दर्शक होता संदेश कुलकर्णी. त्यात निखिल अफलातून परफाँर्मन्स द्यायचा. त्यातील अभिनेत्याचा कस लागायचा तेव्हा. पुण्यामधील नाट्यक्षेत्रामध्ये काही एक कामगिरी बजावल्यानंतर कोणत्याही कलाकाराला मुंबईचे वेध लागतात. तसे निखिलला लागले यात नवल नाही. एक व्यावसायिक अभिनेता म्हणून कारकिर्द करण्यासाठी तो या शहराच्या रोखाने निघाला. मुंबईत एका जाहिरीतीची संकल्पना विकसित करत असताना जाहिरातीच्या निर्मात्यांना त्यात काम करण्यासाठी हवा तसा कलाकार मिळत नव्हता. त्यावेळी त्यांच्या मनात निखिल भरला. त्याने या जाहिरातीत काम केले. तिथून सुरु झाला त्याचा मुंबईतील व्यावसायिक कलाकार म्हणून खर्या अर्थाने प्रवास. सर्वाधिक जाहिरातींत झळकलेला मराठी कलाकार म्हणून निखिलची नोंद घ्यावी लागेल. थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे १५० जाहिरातींमध्ये निखिलने काम केले आहे. तो दिसायलाही गोंडस आहे म्हणून बहुतेक सार्या जाहिरात निर्मात्यांचा तो लाडका असावा. तो जाहिरातींतील लाडके व्यक्तिमत्वच बनला. कालांतराने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वही त्याला चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर साकारायला मिळाले. जाहिरातींसाठीच बनलाय निखिल अशी त्याची प्रसिद्धी होऊ लागली. त्याची दुसरी बाजू अशी की, जाहिरातींमध्ये खूप व्यस्त झाल्यामुळे त्याने व्यावसायिक नाटके तशी खूप कमी केली.
त्याने केलेले पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित आम्हाला वेगळ व्हायचयं. या नाटकाचे निर्माते होते सुयोग संस्था. त्या नाटकानंतर तो बराच काळ व्यावसायिक नाटकांकडे वळला नाही. कारण साधे होते. तो जाहिरातींमध्ये व्यस्त होता अत्यंत.
निखिलला लेखणीचीही देणगी आहे. तो एक असा कलाकार आहे की ज्याला नाटक लिहिता येत, ते कस साकारायचे हे तो दिग्दर्शक म्हणून पाहू शकतो. आणि प्रत्यक्ष रंगमंचावर तो त्या नाटकातील भूमिकाही उत्तम वठवू शकतो. हे थ्री इन वन पॅकेज त्याने सर्वप्रथम वापरले ते टाँम अँड जेरी या नाटकात. त्याने हे नाटक लिहिले. दिग्दर्शित केले व त्यात भूमिका करुन प्रेक्षकांनाही रिझविले.असा बहुगुणी अवलिया बर्याच वर्षांनी रंगभूमीला लाभलाय. अगदी हेच त्याने पुन्हा सगळे केलेय बेगम मेमरी आठवण गुलाम या नाटकात. तो या नाटकात सर्व पात्रांबरोबर प्रेक्षकांसमोर येतो, दिग्दर्शक म्हणून स्वत:सह सर्व कलाकारांना रंगमंचावर वावरायला लावतो व लेखक म्हणून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतो. हे नाटक विनोदी असले तरी नाटकाचा बाज खूप वेगळा आहे असे माझ्या मित्रपरिवारातील ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांनी आवर्जून सांगितले आहे. मी एक दुर्देवी जीव ज्याला हे नाटक बघण्याची संधीच अजून मिळत नाहीये.
निखिल रत्नपारखी याने काही चित्रपटांत कामे केली. त्यामध्ये ओ माय गाँड, मोड, घो मला असला हवा, तेरे बिन लादेन, नारबाची वाडी, गोळाबेरीज असे काही चित्रपट आहेत. ते बहुतेक चित्रपट मी बघितलेले आहेत.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरच असलेल्या गोळाबेरीज या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका निखिल रत्नपारखीनेच साकारली होती. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यापेक्षाही हा विनोदी चित्रपट झाला होता. या चित्रपटात नेमके कधी काय घडत राहाते याची गोळाबेरीज व्हायच्या ऐवजी गोळावजाबाकी होऊन या चित्रपटाचे क्षितिज आक्रसले आणि हा चित्रपट झारापकन (क्षमस्व झपकन) आपटला. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य कधी असे पडले नव्हते इतका त्यांच्यावरचा चित्रपट अपयशाच्या खोल दरीत पडला. नायकाच्या भूमिकेत असलेल्या निखिल रत्नपारखीच्या या चित्रपटाविषयी नेमक्या भावना काय आहेत माहित नाही पण अशा चित्रपटांमध्ये पुन्हा त्याने काम करु नये ही विनंती. हा चित्रपट बघण्याच्या भीषण अनुभवाला सामोरे जाऊन जो सुखरुप पुन्हा चित्रपटगृहाबाहेर आला होता तो खरा भाग्यवान प्रेक्षक...मी प्लाझामधून सहीसलामत बाहेर पडलो होतो हा चित्रपट पाहून....म्हणून आज हे लिहू शकतोय...
निखिलच्या समग्र कलाकारकिर्दीचा आलेख इथे मांडणे शक्य नाही. पण तो एक मनस्वी कलाकार आहे व यशस्वी आहे. त्याच्या या यशामागे नाट्यभक्ती आहे. म्हणजे नाट्यही आहे आणि भक्ती (त्याची पत्नी) जिला आपण अभिनेत्री भक्ती रत्नपारखी म्हणून ओळखतो ती. भक्ती ही पुण्यातलीच. त्यामुळे पुणेकर मुलालाच तिची पहिली पसंती असणे स्वाभाविक होते. निखिलला वरल्यानंतर ती देखील आता मुंबईत त्याच्या समवेत येऊन आपली कलाकारकिर्द उजळ करीत आहे. मुळात भक्तीने पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेटर या प्रायोगिक नाट्यसंस्थेतून तिने काही नाटकांत कामे केली. त्याआधी स्पर्धांमध्ये काही एकांकिकांत कामेही केली, आणखी एका नाट्यसंस्थेतून भक्तीने विजय तेंडुलकर मित्राची गोष्ट या कथेवर आधारित एकांकिकेत काम केले. होते. सवाईच्या स्पर्धेत चेतन दातारच्या नाटकातही तिने भूमिका केली. आसक्त ही संस्था आहे ना त्यांच्याबरोबर फक्त तू नावाचे नाटक एक नाटक तिने केलेल. मोहित टाकळकरने हे नाटक दिग्दर्शित केले होते. खुप वेगळा अनुभव होता हा तिच्यासाठी...भक्ती रत्नपारखीचे पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे दुर्गाबाई जरा जपून. हे नाटक विजय केंकरेनी दिग्दर्शित केले होत टाँम अँड जेरी नाटकात तिने निखिलला असिस्ट केले होते. आता तिचे नवेकोरे नाटक बेगम मेमरी आठवण गुलाम हे रंगभूमी गाजवते आहे. त्या शिवाय भक्ती रत्नपारखीने कंपनी, ओ माय गाँड, देऊळ अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.माझी अभिनय कारकिर्द खूप मोठी नाही असे ती सांगत असली तरी तो तिचा विनम्रपणा आहे.
पुण्यातला कलावंत इतका नम्र असतो यावर विश्वासच बसत नाही. नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रात अखिल स्तरावरचा कलाकार म्हणून निखिल रत्नपारखी भविष्यात आणखी पुढे यावा व त्याने जसे जाहिरात क्षेत्र व्यापले आहे (व्यापले आहे असे निखिलच्या शारीरव्यापकतेकडे बघून लिहिलेले नाही) तशी अभिनयकलेची बाकीची क्षेत्रेही आपल्या कसदार लेखन, दिग्दर्शन, अभिनयाने व्यापून टाकावीत हीच सदिच्छा. त्याची नाट्यभक्ती व सहचारिणी भक्ती या त्याच्यावर प्रसन्न आहेतच. अभिनयातील या दोन रत्नांवर पारखी नजर ठेवून लिहिल्याचा आव जरी मी आणलेला असला तरी तो काही खरा नाही....हे या दोन रत्नपारखींना बरोबर लक्षात येईल. भक्तिभावाने त्यांचा आता निरोप घेतो. नाहीतर ते माझी पारख एक रत्न (व्यंगात्मक अंगाने) अशी करतील,,,,,हाहाहा
- समीर परांजपे.
paranjapesamir@gmail,com

Tuesday, December 2, 2014

सूर्व्या उगवलाय ....म्हणजे समीर रमेश सुर्वे....श्री पार्टनर चित्रपटाचा गाजलेला दिग्दर्शक...



सूर्व्या उगवलाय ....म्हणजे समीर रमेश सुर्वे....श्री पार्टनर चित्रपटाचा गाजलेला दिग्दर्शक...त्याच्या सहवासाच्या या माझ्या काही अघळपघळ नोंदी...अपयशाला आईबाप नसतात, यशाला असतात असे सांगणार्यांना सूर्व्या कळण्यासाठी,,,,,,
----------------
किती पण कोंबडे झाका, सूर्व्या उगवलाय असे गावात कधी कधी ऐकायला मिळायचे. अर्थ नाही लागायचा तेव्हा. त्यासाठी शहराचाच दरवाजा खुला व्हावा लागला. दादर पश्चिमेला बबन चहावाला नावाचे एक मोठे प्रकरण २००७ सालापर्यंत असायचे. त्यांचे साम्राज्य रात्री नऊ ते सकाळी सात पर्यंत चालायचे. त्यांच्या साम्राज्यातले चहा प्यायला येणारे मानकरी म्हणजे नाना पाटेकर, सतीश पुळेकर आणि पत्रकारितेतले दिग्गज अंबरीष मिश्र आणि असे असंख्य मान्यवर. त्यात मी आपला कोपर्यात कुठेतरी अंग चोरुन. बबनरावांकडे चहा प्यायला संवेदना परिवार या नाटकग्रुपचे बरेचसे सदस्य यायचे. त्यांची ओळख १९९५ साली झाली. त्यात एक त्यावेळी हडकुळा असलेला, दाढीचे खुंट वाढलेला, पौराणिक नाटकात ठेवतात तसे कानावर येतील इतके डोईवरचे केस राखलेला पोरगाही होता. मराठी भाषा लालबाग, परळच्या बोलीशी जवळीक साधणारी, पण डोळे, शारीरभाव खूप काही सांगू पाहाणारे. सांगण्याचा आशय अर्थवाही होता की निरर्थक इतका काही मी त्याच्या जवळ गेलो नव्हतो. तो एकांकिका, लिहितो, दिग्दर्शित करतो, भूमिका करतो असे हळुहळु त्याच्याशी बोलायला लागल्यानंतर कळायला लागले. कधीमधी तो त्याच्या दोस्तांबरोबर रुईया काँलेजच्या नाक्यावर यायचा तेव्हा तिथेही आमच्या भेटीगाठी व्हायच्या. कारण आँफिसनंतर रात्रीपर्यंत मी नाक्यावर पडीक. आताही कधीकधी असतो...
आता एकदम ट्रान्सफर सीन.......
श्री पार्टनर हा चित्रपट...तो मी पाहिला...त्याच्या दिग्दर्शकाचे नाव पाहिले समीर रमेश सुर्वे...नाव वाचले आणि आठवू लागले हाच तो पोरगा...मी व तो बबन चहावाल्यांकडे कधीमधी भेटायचो. काहीबाही बोलायचो. मग तो संवेदना परिवारात मश्गुल, मी माझ्या नादात...होय हाच तो समीर रमेश सुर्वे. प्रख्यात साहित्यिक व. पु. काळे यांच्या प्रसिद्ध पार्टनर या कादंबरीवर श्री पार्टनर हा चित्रपट दिग्दर्शित करणारा. श्रीपार्टनर हा चित्रपट त्यातील अभिनय, कथेचा गर आणि सुज्ञ दिग्दर्शन यामुळे गाजला. आणि मग या मराठी चित्रपटसृष्टीने दखल घेतली...
सूर्व्या (म्हणजे समीर रमेश सुर्वे) उगवलाय....उपेक्षेने प्रशंसेचे कोंबडे कितीही झाकून ठेवायचे येथील अनेकांनी ठरविले तरी सूर्व्या उगवलाच...
समीर सुर्वेला बघून हा सरळमार्गी असेल असे वाटतच नाही. कायम वाकड्या मार्गाने जाणार...म्हणजे वाकड्यात नाही शिरणार. पण सरधोपट सरळ मार्ग त्याला आवडतच नाही. तो वाकड्या मार्गाने जाऊन सरळ यश खेचून आणतो पण त्यासाठी मोठी किंमतही मोजतो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी आपल्या घरातील सोनेनाणे प्रसंगी गहाण ठेवून चित्रपट काढले इतकी त्यांना या गोष्टीची असोशी होती. फाळके यांची असोशी माहिती आहे सगळ्यांना पण सर्वस्व पणाला लावून जे चित्रपट उभे करतात त्या पूर्वजांचा समीर हा खरा वारसदार आहे. श्री पार्टनर हा चित्रपट बनविण्यासाठी सगळ्या प्रकारचे सहकार्य देऊ अशी आश्वासने देणार्यांपैकी बरेचजण मध्येच हात सोडून निघून गेले. पण समीर आपली वाट चालत राहिला. कर्जाचे मोठे डोंगर खांद्यावर पेलून त्याने श्री पार्टनर हा चित्रपट पूर्ण केला. व झळकवलाही. या चित्रपटाला जे यश मिळाले ते त्यातील कलाकार, तंत्रज्ञांचे होतेच पण यशाच्या या गौरीशंकराच्या शिखरावर बसण्याचा मान फक्त समीर सुर्वेलाच आहे.
आता तो चार्ली या ब्लँक हाँरर काँमे़डी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतलाय... .भरत जाधव. नेहा पेंडसे. विजय पाटकर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत....हा चित्रपट करताना येणार्या समस्यांनाही समीर हसत हसत सामोरा जातोय. हा चित्रपटही खूप वेगळा होणार आहे हे मी त्याचे चित्रीकरण, प्रोमो बघून आत्ताच सांगतो....
मराठी असो वा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक उसुल आहे. अपय़शाला आईबाप नसतात, यशाला असतात...श्रीपार्टनर जोवर पूर्ण होत नव्हता तोवर समीर रमेश सुर्वे हा अश्वत्थाम्यासारखा भळभळती जखम घेऊन फिरायचा. पार्टनर पूर्ण झाला तेव्हा समीरचा आत्मा शांत झाला. चित्रपट बनविण्यासाठी काढलेल्या कर्जाचे डोंगर चढत असतानाही हा पुन्हा चार्ली चित्रपटात गुंतला. शेवटी चित्रपट करणे, बघणे, काढणे ही एक नशा आहे. त्या नशेच्या अमलात प्रेक्षक म्हणून मी राहाणार आहेच. त्याचबरोबर रसिकांवर समीर रमेश सुर्वे याचा सुरु असलेला दिग्दर्शकीय अमलही असा बराच काळ टिकू दे. समीर सुर्वे व मी काहीवेळा रुईया काँलेज नाका किंवा दादर स्टेशनला उभे राहूनही गप्पा मारल्या आहेत भररात्री. पण त्या अंधारातही माझ्या डोळ्यासमोर काजवे नव्हे तर हा सुर्व्याच चमकायचा....
मी काय लिहिणार आहे हे त्याला आधी सांगण्याचा प्रश्न नाही.. समीर रमेश सुर्वे हा मराठीतला प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आहे...त्याच्याकडे मराठी, हिंदी चित्रपटांतील मान्यवरांनी, वितरकांनी, फायनान्सरनी बारीक लक्ष द्यायला हवे. समीर सुर्वे प्रसिद्धीच्या मागे धावत नाही म्हणून चित्रपटसृष्टीतील इतर लोकांनी अशा गुणवानांच्या मागे स्वत:हून धावणे सोडून द्यायचे असा याचा अर्थ होत नाही.....या लोकांनी किमान एवढे तरी करावे, उगवलेल्या सूर्व्याकडे बघावे....
- समीर परांजपे

शेखर सरतांडेल की शेखरसर तांडेल? ---------- (जोशी की कांबळे, निर्माल्य, माय डिअर यश या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल याच्या व्यक्तित्वाचा वेध या पोस्टमध्ये घेतला आहे.)


शेखर सरतांडेल की शेखरसर तांडेल?
----------
(जोशी की कांबळे, निर्माल्य, माय डिअर यश या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल याच्या व्यक्तित्वाचा वेध या पोस्टमध्ये घेतला आहे.)
-----
शेखर सरतांडेल किंवा शेखरसर तांडेल
तुम्ही शेखरच्या नावाचा असा दोन्ही प्रकारे उच्चार केलात तरी तो तुम्हाला सारखाच वाटेल.
कारण शेखर सरतांडेल म्हटले की नजरेसमोर येतो अव्वल चित्रपट दिग्दर्शक
शेखरसर तांडेल म्हटले की आठवतो रचना संसद या महाविद्यालयात फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम स्वत:च्या मेहनतीतून, निढळ्या घामातून उभा करुन विद्यार्थी घडविणारा शिक्षक.
तुम्हाला जसा तो दिसत असेल तसा तुम्ही त्याला त्या त्या प्रमाणे उच्चार करुन हाक मारु शकता.
महेश मांजरेकर यांच्या सोबत निदान, वास्तव अशा सुमारे आठ हिंदी व आई या मराठी चित्रपटांमध्ये चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून कामगिरी बजावणारा शेखर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माहोलला एकदम सरावलेला.
इतक्या समृद्ध अनुभवानंतर शेखर स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनात उतरला.
त्याने स्वत:;च्या बळावर दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे जोशी की कांबळे...चित्रपटाच्या शीर्षकातच सामाजिक धग आहे. अत्यंत ज्वालाग्रही विषय पण त्या चित्रपटाची कथा अतिशय नेमकेपणाने लिहिली होती प्रख्यात समीक्षक श्रीधर तिळवे यांनी. या कथेला चित्रपटाच्या रुपात आकार देताना अतिशय संयत हाताळणी शेखरने केली होती. जातीवर आधारित आरक्षण व्यवस्था हा म्हटले तर खूप चर्चेचा विषय. त्या विषयाच्या बाजूने आणि विरोधात बोलणारे यांची संख्या सम असेल. पण जातीव्यवस्थेतून निर्माण झालेल्या विषमतेवर जोशी की कांबळे चित्रपटात खूप मार्मिक भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाची कथा काय हे रहस्य येथे उलगडण्यापेक्षा तो मिळवून बघणे हे जास्त सकस अनुभव देणारे आहे. जोशी की कांबळे या चित्रपटाने अनेकांच्या डोक्याला चांगल्या अर्थाने झिणझिण्या आल्या. आणि शेखर सरतांडेल प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाला.
शेखर सरतांडेल आणि माझी ओळख १९८९ साली झाली. ती ही रुईया नाक्यावर. त्यावेळी मी काँलेजमध्ये शिकत होतो. आणि शेखर हा प्युअर नाकाईट झालेला होता. तो मुळचा सिडनहँम काँलेजचा. तेथून बी. काँम. ची पदवी घेतल्यानंतर तो जे. जे. स्कूल आँफ आर्टस् मध्ये पार्टटाईम पेंटिंग व फोटोग्राफीच्या कोर्ससाठी दाखल झाला. तेथून त्याच्यातील विविध कलांना बहर आला. जे.जे. तसेच रुईयासाठी त्याने अनेक एकांकिका स्पर्धांना संगीत देण्याचे काम केले. त्यानंतर तो काही एकांकिकाच्या दिग्दर्शनातही गुरफटला. एखाद्या एकांकिकेत त्याने कामही केले. त्याची दोस्ती कँमेर्याशीही होतीच. नाटकाच्या माहोलमधून त्याने बाहेर पडून दुरदर्शनवर कँमेरामन म्हणूनही दीड एक वर्ष काम केले. त्यानंतर काही जाहिरात एजन्सीमध्येही कँमेरा हाताळला. मालिकांच्या काही कामातही तो गुंतला होता. तो सविस्तर तपशील इथे महत्वाचा नाही. महत्वाचे हे आहे की, शेखर स्वत:ला सतत तपासत होता. आपला अवकाश नेमका कुठे आहे याचा धांडोळा घेत होता.
त्यातूनच पुढे त्याला महेश मांजरेकर भेटले. व वास्तव, अस्तित्व, निदानसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये महेश यांचा चीफ असिस्टंट डायरेक्टर बनून शेखर स्वत:लाच सापडत गेला.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची देवकी ही कथा. या चित्रदर्शी कथेवर चित्रपट बनविण्यासाठी काही मान्यवरांनी कर्णिक यांच्याकडे कथा मागितली होती. पण काही कारणाने त्या कथेवर चित्रपट होण्याचे योग येत नव्हते. शेखर सरतांडेलला ही कथा भावली. त्याने या कथेचा स्क्रीनप्ले तयार करुन तो कर्णिक यांना दाखविला. तो पाहून कर्णिकांनी अत्यंत मोकळ्या मनाने या कथेवर चित्रपट बनविण्यास शेखरला परवानगी दिली. देवकी या कथेचे शीर्षक चित्रपट बनविताना झाले निर्माल्य. मामी इंटरनँशनल फेस्टिव्हलमध्ये निर्माल्य या चित्रपटाने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाने आणखी काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माननीय उपस्थिती लावली. हा चित्रपट रसिकांनाही सुखावून गेला.
शेखर त्यानंतर वळला आँटिस्टिक मुले व त्यांना निगुतीने वाढविणार्या त्यांच्या पालकांच्या मनोविश्वाकडे. आँटिस्टिक मुलगा व त्याचे आईबाबा हे चित्र रंगविताना बाबा अशा मुलाची जबाबदारी कदाचित सहजी टाळू शकतो. पण आपला असा हा मुलगा वाढविण्याचे आव्हान आई पेलते व त्या मुलाला चांगले दिवस दाखविते हा गाभा असलेला माय डिअर यश शेखर सरतांडेलने दिग्दर्शित केला. तो चित्रपट पाहून अनेकांना आँटिस्टिक या विकाराचे स्वरुप खर्या अर्थाने कळले. या चित्रपटात लोकेश गुप्ते, सुखदा यश यांच्या भूमिका टची होत्या. आँटिस्टिक असलेल्या लहान मुलाचे काम अथर्व बेडेकरने केले होते. त्याच्यावर मानसोपचार करणार्याचे काम उमेश कामतने केले होते. या चित्रपटाने शेखरला अधिक प्रगल्भ दिग्दर्शकाच्या यादीत नेऊन बसविले.
शेखर सरतांडेलवर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जो अमीट ठसा आहे तो राजा परांजपे यांचा. त्यांच्या जगाच्या पाठीवर, ऊन-पाऊससारख्या चित्रपटांवर बोलताना शेखर अजिबात थकत नाही. राजा परांजपे हे त्याचे आवडते दिग्दर्शक हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कारण राजाभाऊ यांचे माझ्या पत्नीच्या माहेरुन नाते आहे. त्यांच्या पुण्यातील घरी मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा स्वर्गीय राजाभाऊंना विविध चित्रपटांसाठी मिळालेले पुरस्कार, मानपत्रे तेथे एका शोकेसमध्ये ठेवली आहेत ते पाहून मन सुखावते. राजाभाऊ यांच्या पु्ण्यातील घरात ग.दि. माडगुळकर, सुधीर फडके यांच्या मैफली होऊन अनेक गाणी लिहिली गेली आहेत. त्यांना तिथेच चाली दिल्या गेल्या आहेत. त्या सगळ्या आठवणी समोर उभ्या राहातात. शेखर जेव्हा राजाभाऊंबद्दल बोलतो तेव्हा मलाही राजाभाऊंची पुण्यातील ही वास्तू आठवायला लागते. शेखर हा उत्तम लेखकही आहे. त्याने आपल्या आयुष्यात वर्तमानपत्रासाठी पहिल्यांदाच लेख लिहिला होता तो म्हणजे दै. दिव्य मराठीसाठी. मराठी चित्रपटांना सरकारने दिलेल्या अनुदानासंदर्भातील हा परखड लेख होता.
रामदास बोट बुडाल्याच्या दुर्घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त काय लिहायचे असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी शेखरच मदतीला धावून आला. शेखर सरतांडेलचे काका हे दर्यावर्दी हे खास मच्छिमारांसाठी मासिक चालवायचे. त्या दर्यावर्दी मासिकाने रामदास बोट बुडाल्यानंतर काही अप्रतिम लेख छापले होते. त्या जिवंत लेखांचा आधार घेऊन मी माझा लेख दै. दिव्य मराठीत लिहिला होता. व तसे लेखाखाली नमुदही केले होते.
शेखर सरतांडेल हा बोलण्यात खूप मिश्किल आहे. कधी कोणाची टोपी उडवेल सांगता येत नाही. माझीही तो कळत-नकळत गंमत करत असतो. शेखर आहे स्वभावाने उमदा...त्यामुळे तो व त्याच्या चित्रपटांबद्दल खूप उत्सुकता असते लोकांमध्ये.
शेखरबद्दल अनेक उत्तम गोष्टी सांगता येतील पण कुठेतरी थांबायला हे हवेच. शेखर आता काही दिवसांत एका महत्वाच्या प्रकल्पात सक्रिय होणार आहे. तो नेमका काय आहे हे प्रसारमाध्यमांतून आपल्याला योग्य वेळी कळेलच. शेखर तू विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेस. हे गुण तुझ्यात आलेत ते पेशाने शिक्षक असलेल्या आईवडिलांकडून. तुझे वडील नाटकात मुंबईत काम करायचे. तो कलेचा वारसा शेखर सरतांडेल याच्याकडे आलेला आहे. ती कला आता त्याच्या अंगवळणी पडली आहे.
त्यामुळे तुम्ही त्याला शेखर सरतांडेल म्हणा किंवा शेखरसर तांडेल, डोळ्यापुढे मूर्ती उभी राहाते ती एका कसलेल्या दिग्दर्शकाची...तीच ओळख तर त्याला प्रिय आहे आणि आम्हा त्याच्या फँन्सनाही... शेखरची गेली अनेक वर्षे ज्याच्याशी नाळ जुळली आहे तो रुईया काँलेजचा नाकाही या ओळखीला साक्षी आहे....त्या वास्तूलाच विचारा ती शेखरबद्दल अनेक किस्से सांगू लागेल...शेखर, तुझ्या भावी कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा......
- समीर परांजपे
---------