ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांना आदरांजली वाहाणारा दै. दिव्य मराठीच्या १५ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा हा लेख. त्या लेखाची टेक्स्ट व इ-पेपर लिंक व जेपीजी फोटो सोबत दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-article-on-atmaram-bh…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/15022015/0/6/
---
आत्मरंग लोपला!
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
----
मराठी रंगभूमीवरील फार्सिकल नाटकांचे आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू हे दोन बादशहा. त्यापैकी बबन प्रभू यांनी यापूर्वीच जगाच्या रंगभूमीचा निरोप घेतलेला. दुसरे बादशहा आत्माराम भेंडे हेदेखील नुकतेच ७ फेब्रुवारी रोजी काळाच्या पडद्याआड गेले. मराठी फार्सिकल नाटकांचा आत्मरंग ख-या अर्थाने लोपला. १९६०-७०च्या दशकांत मराठी रंगभूमीवर नानाविध प्रवाह एकवटलेले होते. त्यामध्ये विजय तेंडुलकर, विजया मेहताप्रणीत वास्तववादी नाटकांचा जसा एक सशक्त प्रवाह होता, तसेच आत्माराम भेंडे, बबन प्रभू आदी मंडळींनी पाश्चात्त्य रंगभूमीवरील फार्सिकल नाटकांनी प्रेरित होऊन तो प्रवाह मराठी रंगभूमीवर अधिक सशक्त करण्याचा जणू विडा उचलला होता.
सावंतवाडी संस्थानमधील आरोंदे हे आत्माराम भेंड्यांचे गाव असले, तरी त्यांच्या पूर्वजांची पाळेमुळे ही गोव्याच्या भूमीतच होती. गोव्यामधील कलाकार, गायक आदी सा-या देशभर आपले नाव गाजवत होते. कलेचा हा सुदूर वारसा घेऊनच आत्माराम भेंडे हे लहानपणी आपल्या आई व भावंडांसमवेत मुंबईत आले. १९३०-४०च्या दशकातील मुंबई ही एकीकडे गो-या साहेबाने दिलेल्या कलावारशाचा आनंद उपभोगत होती. दुस-या बाजूला मुंबईत नोकरीधंद्यासाठी आलेला गावोगावचा मराठी माणूस नाटक, चित्रपट आदी कलांतून आपल्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देऊ लागला होता. या सा-याचा परिणाम आत्माराम भेंडे यांच्यासारख्या नाटकप्रेमी माणसावर होणारच होता. कोकणी, मराठी, इंग्लिश, हिंदी अशा चारही भाषा अगदी लहानपणापासूनच परिचित असलेल्या भेंडे यांनी पुढे मराठी, इंग्लिश, हिंग्लिश रंगभूमी गाजवली, ती बहुसांस्कृतिक मूल्याधारित संस्कारांच्या बळावरच... आत्माराम भेंडे यांच्या अभिनयशैलीबद्दल त्यांचे समकालीन अभिनेते आवर्जून सांगत की, भेंडे यांना जबरदस्त टायमिंग सेन्स होता आणि मुद्राभिनयातील कसब वाखाणण्यासारखे होते. भेंडे असे कलाकार होते की, जे विनोदी व गंभीर, खलनायकी वळणाची भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारायचे. कोणतीही भूमिका करताना त्यांच्यातील दिग्दर्शक व कोणतेही नाटक, मालिका दिग्दर्शित करताना त्यांच्यातील अभिनेता जागा असायचा. याचा दुहेरी फायदा त्या कलाकृतीला होत असे.
इंडियन नॅशनल थिएटर या नामवंत संस्थेतून आत्माराम भेंडे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आयएनटीमधून भेंडे यांनी विविध प्रकारच्या नाटकांत कामही केले, आणि काही नाटके दिग्दर्शितही केली. ख्यातनाम साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या तीन एकांकिका एकत्र करून 'वेड्यांचा चौकोन' हे एक नाटक लिहिले होते. या नाटकातील विनोद फार्सिकल पद्धतीचा आहे, असे गंगाधर गाडगीळांनी या नाटकाच्या निवेदनात आवर्जून लिहिले होते. आयएनटीमध्ये सक्रिय असणा-या आत्माराम भेंडे यांनी काही कारणास्तव हे नाटक भारतीय विद्याभवनच्या मराठी विभागातर्फे करायला घेतले. ‘सशाची शिंगे’ या आयएनटीकडून केलेल्या नाटकानंतर लगेचच 'वेड्यांचा चौकोन' हे नाटक करायला मिळणे, ही आत्माराम भेंडे यांना सुर्वणसंधीच वाटली होती. १९५८मध्ये इंडियन नॅशनल थिएटरतर्फे ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे नाटक करताना प्रेक्षकांना एक ध्वनिमुद्रित निवेदन ऐकविले जाई. ‘अभिनेते गणपतराव जोशी करीत असत त्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ या फार्सचा उल्लेख करून फार्सची मराठी रंगभूमीवरील परंपरा खंडित होऊ नये, म्हणून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा आमचा प्रयत्न आहे', असे आत्माराम भेंडे या निवेदनात आवर्जून सांगत असत. शिवाय या नाट्यप्रकाराला भेंडे यांनी नाटक म्हणण्याचे टाळले. सुरुवातीपासूनच त्याचा फार्स असा उल्लेख केला. त्यानंतर आत्माराम भेंडे यांनी गाजविलेले नाटक म्हणजे, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई.’ जसे चित्रपटात सिक्वेल काढला जातो तसेच "झोपी गेलेला जागा झाला' या नाटकाचा ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हा सिक्वेल होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दिनूच्या सासूबाई राधाबाई करताना प्रमुख पात्रांची नावे ‘झोपी...'तीलच घेतलेली होती, इतकेच नव्हे तर काही ठिकाणी कथानकातही हे तेच लोक आहेत, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. १९७३च्या ऑगस्ट महिन्यामध्ये आत्माराम भेंडे यांनी पूर्णिमा या संस्थेतर्फे ‘पळा पळा कोण पुढे पळे तो' हा फार्स सादर केला. "पिलूचं लग्न' हा फार्सही असाच गाजला.
आत्माराम भेंडे यांचे व्यक्तिमत्त्व केवळ कलाकार, दिग्दर्शकाचेच नव्हते, तर या नाट्यसाधनेसाठी ते नेटके वाचनही करीत. नाट्यशास्त्रात खूपच मोलाची समजली जाणारी रशियन नाट्यतज्ज्ञ स्टानिस्लाव्हस्की यांची पुस्तके वाचून भेंडे त्यावर मनन-चिंतन करीत असत. भूमिकेत अवहगान करण्याबाबत स्टानिस्लाव्हस्की याने केलेल्या विश्लेषणाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आत्माराम भेंडे यांनी केलेली चिकित्सक झटापट हा त्यांच्यातील अभ्यासकाचा आविष्कार होता. फार्सिकल नाटके हा त्यांच्या रंगाभिनयाचा एक आविष्कार होता. त्याशिवाय मन पाखरू पाखरू, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी अशा नाटकांमधून भेडेंनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. हिंदी, मराठी, हिंग्लिश नाटकांमधून भेंडे नव्या पिढीबरोबर तितक्याच ताकदीने उभे राहिले. भरत दाभोळकर यांच्या हिंग्लिश नाटकांत कामे करताना बहुसांस्कृतिकत्वाचा बाज भेंडेंनी ज्या अचूक रीतीने पकडला होता, त्याला तोड नव्हती. त्यांच्या या आविष्काराची आठवण दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान यांच्यासारखी मंडळी आजही काढतात. आत्माराम भेंडे यांनी दूरदर्शनसाठी काही मालिकांचे दिग्दर्शन केले होते. गेल्या काही वर्षांत जाहिरातपटांमध्ये त्यांनी केलेली कामे, आजच्या पिढीलाही आवडली होती. 'यंदा कर्तव्य आहे' या सिनेमात त्यांनी आजोबांची छोटेखानी भूमिका एकदम चोख बजावली होती. "लगे रहो मुन्नाभाई' या हिंदी सिनेमात त्यांनी साकारलेला 'आत्माराम' सा-यांच्याच काळजाला भिडला होता.
आत्माराम भेंडे यांनी आपले नाट्यजीवन व जीवननाट्याविषयी 'आत्मरंग' या आत्मचरित्रात सविस्तर सांगून ठेवलेच आहे. त्यांनी दिग्दर्शन, भूमिका केलेली नाटके, चित्रपट, मालिका, जाहिराती यांची यादी खूप मोठी आहे. कारण, तो सहा दशकांतील त्यांच्या कामगिरीचा व्यापक पट आहे. पण तरीही भेंडेंचा आत्मा एकरूप झाला होता तो अधिकतर नाटकांशीच... आपण नाटक का करतो, हे सांगताना भेंडे म्हणायचे, "समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारी आधुनिक नाटके व इतर नाट्यप्रकार आधुनिक तंत्राने, फायद्याकडे दृष्टी न ठेवता, शक्यतो निर्दोष स्वरूपात रंगभूमीवर आणण्याचा माझा संकल्प असायचा. नाटक हे जनताभिमुख झाल्यासच जनतेचा त्याला आश्रय मिळेल, असा विश्वास आहे. नाट्यप्रकाराचे वेगवेगळे नमुने प्रेक्षकांसमोर ठेवून त्यांचे लक्ष रंगभूमीकडे वेधणे, हा माझा हेतू आहे.' हे नाट्यतत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनातही मुरवलेले आत्माराम भेंडे यांच्या जाण्याने रंगभूमीभक्तांचा आत्मरंग आता लोपला आहे!
No comments:
Post a Comment