Thursday, October 12, 2017

द सायलेन्स - वास्तववादी घटनेचा चुरगळलेला कॅनव्हास - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी मराठी सिनेकट्टा सेगमेंट

दै. दिव्य मराठीच्या मराठी सिनेकट्टा सेगमेंटसाठी द सायलेन्स या चित्रपटाचे दि. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी मी केलेले हे परीक्षण. त्याची वेबपेज लिंक व मजकूर पुढे दिला आहे.
----
द सायलेन्स - वास्तववादी घटनेचा चुरगळलेला कॅनव्हास
--
- समीर परांजपे
---
रेटिंग - दोन स्टार
--
कलाकार - नागराज मंजुळे, अंजली पाटील, कादंबरी कदम, रघुवीर यादव. मुग्धा चाफेकर, बालकलाकार वेदश्री महाजन
कथा - अश्विनी सिदवानी
निर्माते - नवनीत हुल्लाद मोरादाबादी, अरुण त्यागी, अश्विनी सिदवानी, अर्पण भुखानवाला
पटकथा, संवाद, दिग्दर्शन - गजेंद्र अहिरे
चित्रपट प्रकार : फॅमिली ड्रामा
--
कथा - या चित्रपटाची सुरुवात होते एका मध्यरात्री धावत्या लोकल ट्रेनधील दृश्याने. चीनी ही मुलगी लेडिज डब्यात बसलेली असते. कानाला हेडफोन असतो. मोबाइलमध्ये तिचे सारे लक्ष केंद्रित झालेले असते. तिच्या शेजारच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या तरुणीवर एक माणूस धावत्या लोकल ट्रेनमध्येच बलात्कार करतो. त्या लैंगिक अत्याचारग्रस्त तरुणीच्या आरडाओरड्याने चिनीचे लक्ष तिथे वेधले जाते. ती त्या तरुणीवर बलात्कार होताना पाहाते पण ती तो गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तिला एका अनामिक भितीने ग्रासलेले असते. तो प्रसंग पाहून ती इतकी भेदरलेली असते की या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करावी असेही तिला सुचत नाही किंवा तेवढे धैर्य होत नाही. तो सगळा प्रकार आठवतच ती आपल्या घरी येते. त्या प्रकरणाने तिला आपल्या आयुष्यातील एका जुन्या दर्दनाक गोष्टीची आठवण होते. चीनी व तिची मोठी बहिण मंजू यांचा जन्म एका गावातील गरीब कुटुंबात झालेला. चिनीच्या लहानपणीच तिची आई वारलेली. त्यामुळे तिच्या वडिलांनी खूप काळजीने या दोन्ही मुलींचा सांभाळ केलेला असतो. तिचे वडिल एक छोटा व्यवसाय करीत असतात. त्यांचे हातावर पोट असते. मोठी मुलगी मंजू ही मुंबईत आलेली असते. आपल्या मामाच्या ओळखीच्या माणसामुळे तिला चित्रपटसृष्टीत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम मिळते. त्या कामातून जे पैसे मिळतात त्याचा तिच्या कुटुंबालाही आधार असतो. चिनी ही धाकटी मुलगी असल्याने सगळ्यांची लाडकी असते. ती शाळेत जायची. तिचे वडिल तिची सर्वतोपरी काळजी घ्यायचे. त्यांच्यात अतूट भावनिक बंध होते. चीनीचा मामा हा एक दिवस तिला आपल्या गावी चार दिवसांसाठी घेऊन जातो. हा मामा लंपट असतो. त्याची स्त्रियांवर फार वाईट नजर असते. हीच नजर तो एक दिवस आपल्या भाचीकडे वळवतो व या अल्पवयीन मुलीवर तो बलात्कार करतो. लहानपणी झालेल्या या अत्याचाराने चीनी संपूर्णपणे भेदरुन गेलेली असते. तिला तो प्रसंग सातत्याने आठवत राहातो. मामाने केलेले हे घाणेरडे कृत्य जेव्हा चीनीच्या वडिलांना कळते तेव्हा ते मामाला जाब विचारायला जातात. त्यावेळी मामा त्यांना बेदम मारहाण करतो. अखेर मामाने चीनीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे केली जाते. पोलिस मामाला ताब्यात घेऊन त्याच्यावर खटला भरतात. पण चीनीच्या मामाची बायको नेमकी खोटी साक्ष देते. आपल्या पतीने असे काही कृत्य केलेलेच नाही असे ठासून सांगते. त्यामुळे मामा या प्रकरणातून सुटतो. मामा हा अतिशय विचित्र स्वभावाचा आहे. आपल्या पत्नीला मूल होत नाही म्हणून तो सातत्याने तिला घालूनपाडून बोलत असतो. तिला तो मारहाणही करायचा. त्यामुळे त्याची पत्नीही कातावलेली असते. आपल्या खोट्या साक्षीने आपला नवरा बलात्काराच्या आरोपातून सुटला या पापाचे ओझे ती मनावर वागवत असते. असा रडतखडत संसार सुरु असताना ती एक दिवस त्याला आपण गर्भवती असल्याचे सांगते. त्यावर मामा उखडतो. आपल्यात दोष असताना बायको गर्भार कशी राहिली या विचाराने तो संतप्त होतो. तिला मारहाण करतो. त्यावर मी वांझ नाही हे मला सिद्ध करायचे होते असे मामाची पत्नी त्याला उत्तर देते. व त्याच रात्री ती त्याच्या कोयत्याने खून करते. या खून प्रकरणी मामाच्या पत्नीला कारावास होतो. चीनीच्या बलात्काराच्या प्रकरणात खोटे बोलून मामाची सुटका होण्यास आपण कारणीभूत ठरलो होतो या कृत्याचे प्रायश्चित ती अशा पद्धतीने घेते. चीनीच्या मामीला गर्भार राहिल्याने जी मुलगी होते ती तिच्या नातेवाईकांकडे वाढत असते. तुरुंगवासातून मामी सुटल्यानंतर चीनी त्या दोघींची भेट घडवून आणते. त्यावेळी तिला एक गोष्ट लक्षात येते की, लोकल ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार होत असताना आपण पाहिला पण त्याची तक्रार पोलिसांकडे जाऊन केली नाही. आपल्यावर अन्याय झाला तेव्हा न्याय मिळाला नव्हता पण तशाच एका पिडित महिलेला आपण जर पोलिसांकडे जाऊन खरा प्रकार कथन केला तर कदाचित तिला न्याय मिळेल असा विचार तिच्या मनात चमकून जातो. चीनी पोलिस स्टेशनला जाऊन लोकलमधील बलात्कार घटनेची मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे निवेदन देते. एका अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळविण्याची वाट मोकळी करते. आजवर चीनीने जे मौन बाळगले होते त्याचा असा शेवट होतो.
अभिनय - द सायलेन्स या चित्रपटात मामाची भूमिका नागराज मंजुळे यांनी केली आहे. मामाचा लंपटपणा, बेदरकारपणा त्यांनी दिग्दर्शकाने सांगितलेल्या सूचनांनूसार साकारला आहे. नागराज हे एक उत्तम अभिनेताही आहेत. मात्र त्यांनी केलेली दृश्ये फारशी पकड घेत नाहीत. कारण त्यांनी साकारलेले मामाचे पात्र फारच ढोबळ आहे. रघुवीर यादव यांनी चीनीच्या वडिलांच्या भूमिका गहराईने केलेली आहे. ती लक्षात राहाण्यासाठी आहे. अंजली पाटील, कादंबरी कदम, अंजली पाटील, कादंबरी कदम, मुग्धा चाफेकर, बालकलाकार वेदश्री महाजन यांच्या भूमिकांना पोत चांगला आहे पण त्या भूमिकेला नीटसे पैलू दिग्दर्शनाने न पाडल्याने ही पात्रे फारशी विकसित झालेली नाहीत. या चित्रपटात वर्तमानातून भूतकाळात, भूतकाळातून पुन्हा वर्तमानात अशा दृश्यांची सततची मालिका असल्याने तो चित्रपट सलग अनुभव देत नाही. चित्रपटाची कथा ओघवत्या पद्धतीने सांगणे दिग्दर्शकालाच न जमल्याने पात्रेही गोंधळलेली आहेत. 
दिग्दर्शन - वास्तववादी कथानक असूनही गजेंद्र अहिरे यांना चित्रपटात तिची मांडणी नीटसपणे करता आलेली नाही. परिणामी हा चित्रपट काही ठिकाणी अनाकलनीय तर काही ठिकाणी भरकटलेला आहे. तो प्रेक्षकांच्या मनाची पुरेशी पकड घेऊ शकत नाही. या चित्रपटाची पटकथा मुळात विस्कळीत आहे. त्याचबरोबर संवादातही प्रगल्भता फारशी जाणवत नाही. त्यामुळे खूप पुरस्कार मिळालेले असूनही हा चित्रपट अल्सो रन कॅटॅगरीतलाच आहे हे स्पष्टपणे म्हणावेसे वाटते. या चित्रपटाचे छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांचे असून चित्रपटाचे संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. या चित्रपटाची ही मोठी जमेची बाजू आहे. एक वास्तववादी घटना पडद्यावर ज्या प्रगल्भतेने साकारायला हवी त्याचे अभावानेच दर्शन या चित्रपटात दिसते. वास्तववादी घटनेचे चित्रण करताना तो कॅनव्हासच चुरगळून गेला आहे.
संगीत - द सायलेन्स चित्रपटाचे संगीत इंडियन ओशन या रॉकबँडने दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली गाणी ही या चित्रपटातील जमेची बाजू आहे. या निमित्ताने इंडियन ओशन राॅकबँडने पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे.                                                                                                                    https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-the-silence-marathi-movie-review-5713764-PHO.html?seq=1

No comments:

Post a Comment