Thursday, October 12, 2017

कासव', `हलाल'सह एकाच दिवशी झळकलेले सातही मराठी चित्रपट ठरले फ्लॉप! - समीर परांजपे -दै. दिव्य मराठी दि. १० ऑक्टोबर २०१८


दै. दिव्य मराठीच्या दि. १० ऑक्टोबर २०१८ रोजी मी केलेली व प्रसिद्ध झालेली विशेष बातमी. त्या बातमीची लिंक, जेपीजी फाइल व मजकूर पुढे दिला आहे.
कासव', `हलाल'सह एकाच दिवशी झळकलेले सातही मराठी चित्रपट ठरले फ्लॉप!
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/ahmed…/…/10102017/0/7/
--
भरमसाठ संख्येने चित्रपटनिर्मिती होत असल्याचाही बसतोय व्यवसायाला फटका
---
- समीर परांजपे
मुंबई, दि. १० ऑक्टोबर - गेल्या शुक्रवारी म्हणजे सहा ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट `कासव' व त्रिवार तलाक या प्रथेविरोधात आवाज उठविल्याने वादग्रस्त ठरलेला `हलाल' यासह एकुण सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. पण प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने रविवारी रात्रीच्या शोपर्यंत या सातही मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे हे सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.
कासव, हलाल, लादेन आला रे आला, भविष्याची ऐशी तैशी, निर्भया, आदेश, द सायलेन्स असे सात मराठी चित्रपट गेल्या शुक्रवारी झळकले. नेमके त्याच दिवशी शेफसह आठ हिंदी चित्रपटही झळकले. शेफने गेल्या रविवार रात्रीपर्यंत म्हणजे पहिल्या आठवड्यात याचे कारण हे मराठी चित्रपट झळकले त्यांच्या स्पर्धेत शेफ सहित आठ हिंदी चित्रपट ३.३५ कोटीचा गल्ला जमा केला. मात्र तू है मेरा संडे, मुआवजा - जमीन का पैसा, २०१६ द एन्ड, कॉल फॉर फन, रक्तधर, द इंटरनॅशनल प्रॉब्लेम, राज-ए-शैतान हे हिंदी चित्रपटही फ्लॉप ठरले. ड्रीम जिंदगी, इसीस, सीआरडी या हिंदी चित्रपटांचे पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर खूपच कमी कलेक्शन झाल्याने ते फ्लॉप श्रेणीत ढकलले गेले. जुडवा२ या हिंदी चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात एकुण ११२ कोटी तर न्यूटनने दुसऱ्या आठवड्यात एकुण १९ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. त्यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहेत असे म्हणता येईल.
दसरा, दिवाळी या सणांचे दिवस असल्याने मराठी व हिंदी चित्रपट जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शित करण्याचा त्या त्या निर्मात्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी आधीच पुरेशी चित्रपटगृहे मिळत नाहीत त्यातच गेल्या शुक्रवारी झळकलेले सातही मराठी चित्रपट रविवार रात्रीपर्यंतच्या कलेक्शननूसार फ्लॉप श्रेणीत गेल्याने मराठी चित्रपटनिर्माते अजूनच कोंडीत सापडले. 
कासव या चित्रपटाला २०१६ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. आशयघन असलेल्या या चित्रपटाला तरीही वितरक मिळत नव्हता. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा चित्रपट अखेर गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण मुंबईत या चित्रपटाला माहिम येथील सिटीलाईट हे एकच चित्रपटगृह मिळू शकले. त्रिवार तलाक प्रथेला विरोध करणारे कथानक असल्याने वादग्रस्त ठरलेल्या हलाल या मराठी चित्रपटाला मुंबई व परिसरात फक्त १९ चित्रपटगृहे मिळाली आहेत. काही मुस्लिम संघटनांनी हलाल चित्रपटाला तीव्र विरोध केल्याने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास सांगली, मिरज, विदर्भ, मराठवाडा, नाशिक अशा ठिकाणी चित्रपटगृहमालकांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे निर्माते कातावले होते.होती. 
२०१३ पासून दरवर्षी होतात शंभराहून अधिक मराठी चित्रपट सेन्सॉर
२०१३ पासूनची आकडेवारी लक्षात घेतली दरवर्षी शंभरहून जास्त नवे मराठी चित्रपट सेन्सॉर होत आहेत. 
या चित्रपटांच्या निर्मितीत कित्येक कोटींची उलाढाल होते. २००५ साली ५८ चित्रपट सेन्सॉर झाले होते आणि अवघे १३ चित्रपट सिनेमागृहांत झळकले होते. तर हीच संख्या २०१६ साली अनुक्रमे ११५ आणि ८५ इतकी होती. या ११ वर्षांत सेन्सॉर झालेले मराठी चित्रपट ११५१ इतके आहेत. आणि त्यातील फक्त ६८७ चित्रपट चित्रपटगृहांपर्यंत पोहोचले. २०१६ साली ११५ मराठी चित्रपट सेन्सॉर झाले होते व त्यातील ८५ चित्रपट प्रदर्शित झाले. २०१५मध्ये १२० मराठी चित्रपट सेन्सॉर झाले होते पण ९८ चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र यातील खूपच कमी चित्रपट हिट ठरले. बाकीचे मराठी चित्रपट तोट्यातच जमा झाले. सैराट या चित्रपटाने ८० कोटींहून जास्त गल्ला जमविला हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अनेक नवे चित्रपट निर्माते मराठी चित्रपट बनविण्यासाठी पु़ढे येतात. मात्र दरवर्षी भरमसाठ संख्येने बनणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये दर्जाच्या दृष्टीने चांगल्या चित्रपटांची संख्या मोजकीच असते. खूप चित्रपट बनत असल्यानेच गेल्या शुक्रवारी एकदम सात मराठी चित्रपट झळकले व त्यांचा बॉक्स ऑफिसवर एकदम बेंडबाजा वाजला.

No comments:

Post a Comment