Monday, October 2, 2017

ठाकरेबंधुंची साठमारी - दै. दिव्य मराठीच्या २ ऑक्टोबर २०१७च्या अंकात संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला हा अग्रलेख. - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या २ ऑक्टोबर २०१७च्या अंकात संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला हा अग्रलेख. त्याची वेबपेज व टेक्स्टलिंकही सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/o…/263/02102017/0/6/
---
ठाकरेबंधुंची साठमारी
---
मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील अरुंद पुलावर चेंगराचेंगरी होऊन त्यात २३ जणांचा बळी गेला व कित्येक जखमी झाले. मुंबईच्या नागरी इतिहासात किंवा उपनगरी लोकल सेवेच्या इतिहासात रेल्वेपुलावर चेंगराचेंगरी होऊन माणसे मरण पावल्याची ही पहिलीच घटना होती. याचा अर्थ मुंबईतील लोकल गाड्यांची यंत्रणा एकदम कार्यक्षम व सुव्यवस्थित आहे असा होत नाही. मुंबईतील लोकसंख्या भरपूर वाढली असून त्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. ब्रिटिशकाळात मुंबईत लोकल रेल्वे जाळ्यासह ज्या पायाभूत सुविधा उभारल्या त्यात मलमपट्टी सुधारणा करुन वेळ मारुन नेली जाते. याबाबत सर्वात जास्त चालढकल देशावर साठ वर्षांहून अधिक काळ राज्य केलेल्या काँग्रेसच्याच कारकिर्दीत झाली. काँग्रेसेतर पक्ष जेंव्हा केंद्रात किंवा राज्यात सत्तेवर आले तेव्हा त्यांचे वर्तनही काँग्रेसपेक्षा वेगळे नव्हते. हे सारे माहित असूनही एल्फिन्स्टनच्या दूर्घटनेनंतर काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी साव बनत भाजप व नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर तुफानी टिका केली. रेल्वे प्रवाशांना मुुलभूत सुविधा मिळत नसताना विनाकारण बुलेट ट्रेनचा नागोबा डोक्यावर बसविला जात अाहे असे उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात विचारांचे सोने उधळताना सांगितले. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गर्जना केली की, मुंबईत लोकल सेवा सुधारत नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची वीटही रचू दिली जाणार नाही. ते आता ५ ऑक्टोबरला चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चाही काढणार आहेत. शिवसेना असो वा मनसे यांचा मुंबईविषयी असलेला कळवळा दांभिक आहे. मुंबई महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेना व भाजप युतीची सत्ता आहे. त्यातही शिवसेनेला भाजपपेक्षा नेहमीच जास्त जागा पालिकेत मिळाल्या आहेत. या इतक्या वर्षांत मुंबई शहराच्या विकासासाठी शिवसेना व भाजपने कोणत्याही महत्वाच्या योजना राबविलेल्या नाहीत. मुंबईकरांच्या नशिबी फक्त रस्त्यावरचे खड्डे, जागोजागी तुंबलेले ट्रॅफिक आणि बकाल नगरनियोजन व्यवस्था आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा आर्थिक स्तर गेल्या अनेक वर्षांत नक्कीच सुधारला पण मुंबईची मात्र पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने भिकार अवस्था आहे. एकेकाळच्या सुनियोजित मुंबई शहराची अशी लक्तरे का निघाली याचे उत्तर सर्वप्रथम उद्धव ठाकरे व ते ज्यांच्याशी साठमारी करतात त्या भाजपनेही दिले पाहिजे. मुंबई महानगरपालिकेची भाजपकडे एकहाती सत्ता द्या म्हणजे आम्ही या शहराचे प्रश्न गतिमानतेने सोडवू अशी भाषणे जे भाजपवाले करतात तेही जनतेला मूर्ख समजतात काय?
मुंबईत लोकसंख्येचा इतका बोझा वाढणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची त्यामुळे पार दैना उडणे, नगरनियोजनाची बोंब असणे या सगळ्या गोष्टींना केंद्रातील काँग्रेस व बिगरकाँग्रेसची सरकारेही जबाबदार आहेत. त्यांच्यासाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. प्रत्येकाने मुंबईला वापरुन घेतले पण फारसे काही तिला दिले नाही. या कृत्यांमध्ये शिवसेनाही सामील आहे हे उद्धव ठाकरे यांना बरोबर माहित आहे पण त्यांना मोदीविरोधाचे राजकारण पुढे रेटायचे आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनीही नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले. त्यांचे तर दोन निशाणे होते. एक मोदी व दुसरी शिवसेना. दसऱ्याच्या दिवशी सकाळीच शिवाजी पार्कला आपल्या घरी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. बुलेट ट्रेनविरोधात इशारे दिले. हा मुद्दा पळवून त्यांनी शिवसेनेचे नाक कापण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांचे इशारे आता लुटुपुटूचे वाटतात. कारण याच राज ठाकरे यांच्या हाती नाशिकच्या महानगरपालिकेची एकहाती सत्ता तेथील जनतेने सोपविली होती. पण या कालावधीत नाशिक शहराचा आमुलाग्र कायापालट करणे सोडा पण आहे त्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करणेही राज ठाकरे यांना जमले नाही. त्यामुळे नाशिककरांनी पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत मनसेला घरी पाठवले व भाजपकडे सत्ता सोपविली. ठाकरे बंधूंची ही जी साठमारी सुरु असते त्याचा फायदा घेऊन सत्तेचे लोणी ओरपायला नरेंद्र मोदींचा भाजप नावाचा बोका टपलेला आहे. पण भाजपलाही त्याच्या आजवरच्या नाकर्तेपणाची उत्तरे द्यावीच लागतील. बुलेट ट्रेनचा प्रकल्प नरेंद्र मोदी सरकार तडीला नेत आहे म्हणून या प्रकल्पाला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे आहे. ठाकरे बंधूंची नरेंद्र मोदींविषयीची मते धरसोडीची व राजकीय सोय पाहून केलेली असतात. त्यामुळे ती गंभीरपणे घेण्यात अर्थ नाही. मूळ प्रश्न सोडवायचे नाहीत, आणि हुल्लडबाजी करायची याला निबरपणा म्हणतात. त्याचेच दर्शन सध्या महाराष्ट्राला घडतेय.

No comments:

Post a Comment