Thursday, October 12, 2017

पु. ल. देशपांडे यांच्यावर बनतोय `भाई : व्यक्ती की वल्ली' हा मराठी बायोपिक - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 5 आँक्टोबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 5 आँक्टोबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली माझी ही विशेष बातमी. तिची वेबपेजलिंक व टेक्स्ट पुढे दिले आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/05102017/0/5/
--
पु. ल. देशपांडे यांच्यावर बनतोय `भाई : व्यक्ती की वल्ली' हा मराठी बायोपिक
महेश मांजरेकर करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन
८ नोव्हेंबर २०१८ रोजी पुलंच्या जयंतीदिनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार
- समीर परांजपे
मुंबई, दि. 5 ऑक्टोबर - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर `भाई : व्यक्ती की वल्ली' हा मराठी चित्रपट बनविण्यात येणार असून त्याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. हा चित्रपट २०१८ साली पु. ल. देशपांडे यांच्या ८ नोव्हेंबर या जयंतीदिनी प्रदर्शित करण्याचा विचार आहे. पु. ल. देशपांडे यांच्यावरील हा पहिलावहिला मराठी जीवनपट (बायोपिक) असणार आहे.
महेश मांजरेकर, वैभव पंडित, अमोल परचुरे यांनी फाळकेज फॅक्टरी ही नवी कंपनी स्थापन केली असून तिच्यामार्फत `भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येईल. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, व्यक्तित्व वाचकांच्या मनात घर करुन आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रत्येक पिढीमध्ये वाचकप्रिय आहेत. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे यांनी स्वत: लिहिलेल्या व सादर केलेल्या बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात यासारख्या साहित्यकृतींच्या सीडी, डीव्हीडींना आजही मोठी मागणी आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर मराठी चित्रपट बनविला तर तो आजच्या पिढीलाही नक्कीच आवडेल याविषयी शंका नाही. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्यासाठी महेश मांजरेकर सज्ज झाले आहेत. अशा रितीने पु. ल. देशपांडे यांच्यावर मराठीत पहिल्यांदाच जीवनपट (बायोपिक) बनणार आहे.
यासंदर्भात महेश मांजरेकर यांनी `दिव्य मराठी'ला सांगितले की, पु. ल. देशपांडे यांनी विविध क्षेत्रात कामगिरी केली आहे. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदी लेखक, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दुरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले. इतके विविधांगी आयुष्य जगलेल्या पु. ल. देशपांडे यांचा कामानिमित्त मुंबई, पुणे, दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरांतही निवास झालेला आहे. त्यांच्या आयुष्यात संघर्ष ही आहे. या साऱ्यांचा ताळमेळ घालून पु. ल. देशपांडे यांच्यावर एक उत्तम जीवनपट बनवायचा विचार आम्ही केला. पु. ल. देशपांडे यांना भाई या टोपणनावाने सर्वजण हाक मारायचे. त्यामुळे आम्ही या चित्रपटाचे शीर्षक `भाई : व्यक्ती की वल्ली' असे ठेवले आहे.
फाळकेज फॅक्टरी या कंपनीच्या संचालकांपैकी एक असलेले अमोल परचुरे यांनी `दिव्य मराठी'ला सांगितले की, `भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचे काम आता सुरु झाले आहे. ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीदिनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे.
पुलंच्या साहित्यावर येऊन गेले गोळाबेरीज, म्हैस हे मराठी चित्रपट...
पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर चित्रपट निर्मिती करण्याचे प्रयत्न याआधीही काही निर्माता-दिग्दर्शकांनी केलेले होते. जीवनात सुखाबरोबर दुःखाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याचे अस्तित्व रेखाटणाऱ्या पुलंच्या अनेक विविधरंगी व्यक्तिरेखा 'गोळाबेरीज' या चित्रपटातून मांडल्या आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे क्षितिज झारापकर यांनी केले होते. पु.ल. देशपांड्यांच्या लेखणीतून जिवंत झालेल्या विविध व्यक्तिरेखा पडद्यावर एकत्र या चित्रपटात दिसल्या होत्या. गोळाबेरीज या चित्रपटाद्वारे अडीच तासांत, पुलंना त्यांच्याच साहित्यातून साकारण्याचा प्रयत्न `गोळाबेरीज'मध्ये करण्यात आला होता. या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका निखिल रत्नपारखी व सुनीताबाई देशपांडे यांची भूमिका नेहा देशपांडे कामत यांनी साकारली होती. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य वाचकप्रिय असले तरी त्यांच्या साहित्यावर आधारित हा चित्रपट मात्र रसिकांना फारसा पसंत पडला नव्हता. पु. ल. देशपांडे याच्या म्हैस या कथेवर आधारित म्हैस याच शीर्षकाचा मराठी चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला. शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, यतीन कार्येकर आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. पण या चित्रपटालाही प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता.

No comments:

Post a Comment