Wednesday, October 18, 2017

रवींद्र साठे यांची जैत रे जैत या चित्रपटाबद्दल मी घेतलेली मुलाखत - समीर परांजपे


जैत रे जैत या अविस्मरणीय चित्रपटाला नुकतीच 40 वर्षे पूर्ण झाली. त्या चित्रपटाच्या अनेक आठवणी रसिकांच्या मनात आहेत. दिवाळी विशेष म्हणून दै. दिव्य मराठीने दि. 15 आँक्टोबर 2017च्या रसिक या रविवार पुरवणीची चारही पाने जैत रे जैत या चित्रपटाबद्दलच केली आहेत. त्या रसिक पुरवणीमधे मी प्रख्यात गायक रवींद्र साठे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेजलिंक पुढे दिली आहे.
---
`पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं...'ने घेतला ठाव
--
- रवींद्र साठे
प्रख्यात पार्श्वगायक
satheravindra@gmail.com
--
(शब्दांकन - समीर परांजपे)
----
१९७७ सालची गोष्ट आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरची वास्तू. तिथे हृदयनाथ मंगेशकर, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल होते. त्या बैठकीला मीही उपस्थित होतो. या बैठकीमध्ये जैत रे जैत हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या सुवर्णक्षणाचा मी साक्षीदार आहे. आजही मला तो प्रसंग जसाच्या तसा मला आठवतो. जैत रे जैत या इतिहास घडविणाऱ्या चित्रपटाचा मी त्या क्षणापासून एक भागच बनलो. 
मी मुळचा पुण्याचा. एफटीआयआयमध्ये साऊंडचा डिप्लोमा मी केला होता. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये श्रीराम रानडे हे सूत्रधार होते तर मी व चंद्रकांत काळे त्यात परिपार्श्वक होतो. सूत्रधार व हे दोन परिपार्श्वक हे या नाटकाचे कथानक गाण्यांच्या माध्यमातून पुढे नेतात. त्या नाटकात काम करीत असल्याने गायक, अभिनेता अशा दोन्ही अंगानी रंगभूमीवर वावरणे होत होते. मी आयुष्यातील पहिले पार्श्वगायन केले `गारंबीचा बापू' या चित्रपटासाठी. मी पार्श्वगायन केलेला दुसरा चित्रपट होता तो म्हणजे `सामना'. पण घटनाक्रम असा घडला की `सामना' चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला व `गारंबीचा बापू' हा चित्रपट मात्र १९८१ साली झळकला. त्यामुळे चित्रपट पार्श्वगायक म्हणून मी `सामना' या चित्रपटातून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आलो. पुण्यातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मुंबईत राहायला आलो. १९७१ ते ८१ या काळात दूरदर्शनला साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून कार्यरत होतो. हा सगळा काळ विलक्षण धडपडीचा होता. स्वत:ला सिद्ध करण्याचा होता. घाशीराम कोतवालमध्ये ज्याप्रमाणे एक सूत्रधार व त्याचे दोन परिपार्श्वक कथानकाला पुढे नेतात, नेमका तोच फॉर्म जैत रे जैत चित्रपटामध्ये होता. फरक इतकाच होता की, जैत रे जैतमध्ये दोन सूत्रधार होते. घाशीराम कोतवालची अदाकारी डॉ. जब्बार पटेल यांच्या डोळ्यासमोर असल्याने चंद्रकांत काळे व श्रीराम रानडे यांची त्यांनी या चित्रपटाचे सूत्रधार म्हणून निवड केली. या सूत्रधारांच्या तोंडी जी गाणी आहेत त्यात एक गंमत आहे. चंद्रकांत काळे यांच्या तोंडी चित्रपटात जी गाणी आहेत ती मी गायलेली आहेत व चंद्रकांत काळे यांनी गायलेली गाणी पडद्यावर श्रीराम रानडेंच्या तोंडी आहेत. 
जैत रे जैतची कथा आहे ठाकर या जमातीची. हा चित्रपट संपूर्ण म्युझिकल करायचा असे ठरवण्यात आले. या चित्रपटाची कथा या संगीतामधून सांगितली जाते. मराठीत तोपर्यंत असा म्युझिकल चित्रपट झालेला नव्हता. त्यामुळेही या चित्रपटातील गाण्यांना खूप महत्व आहे. आदिवासी लोकांची कथा असल्याने त्या संगीताला लोकसंगीताचा बाज आहे. जैत रे जैतची गाणी लिहिली जाण्यापासून ते रेकॉर्डिंग होईपर्यंतच्या साऱ्या प्रक्रिया मी जवळून बघितलेल्या आहेत. दूरदर्शनला साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम करीत असलो तरी आमचे काम आऊटफिल्डवर असायचे. त्यावेळी दूरदर्शनमध्ये सात आठ साऊंड रेकॉर्डिस्ट होते. हे सारे जण सहकार्यासाठी तत्पर असायचे. त्यांच्यामुळेच मी संध्याकाळी चार वाजता दूरदर्शन कार्यालयातून ड्युटी संपल्यानंतर प्रभूकुंज येथे मंगेशकरांच्या घरी जात असे. तिथे या गाण्यांच्या रात्री अकरा वाजेपर्यंत रिहर्सल होत असत. जैत रे जैत हा सांगितिक चित्रपट असल्याने त्यात अनेक गाणी आहेत. पण त्यातील `मी रात टाकली, मी कात टाकली', `नभ उतरुं आलं', `जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजतो', `डोंगर काठाडी ठाकरवाडी', `वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी' ही गाणी पहिल्यांदा रेकॉर्ड करण्यात आली. त्यानंतर जैत रे जैतचे सारे युनिट चित्रीकरणासाठी पनवेल नजिकच्या कर्नाळा किल्ला परिसरात गेले. हे चित्रीकरण जसजसे पुढे सरकू लागले तसतसे पुढची गाणीही रेकॉर्ड झाली. माझा काही या चित्रीकरणामध्ये सहभाग नव्हता. चंद्रकांत काळे हे चित्रपटात भूमिकाही करत होते.
जैत रे जैतच्या गाण्यांपैकी पहिली काही गाणी रेकॉर्ड झाली त्यावेळचा एक प्रसंग मला आठवतो. "मी रात टाकली' हे गाणे लतादिदी गाणार होत्या. त्याकाळी लाइव्ह रेकॉर्डिंग होत असे. म्हणजे आधी गाण्याची नीट रिहर्सल करुन मग ते गाणे रेकॉर्ड व्हायचे. रेकॉर्डिंग दरम्यान समजा एखादा वादक चुकला किंवा गायकाने काही चुक केली की पुन्हा टेक घेतला जायचा. म्हणजेच ते गाणे पुन्हा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत म्हणावे लागायचे. लतादिदी जे गाणे म्हणणार होत्या त्या गाण्यात मी व चंद्रकांत काळे कोरसमध्ये होतो. जर कोरसमध्ये आम्ही काही चुकलो असतो तर लतादिदींना पुन्हा ते गाणे पहिल्यापासून म्हणावे लागले असते. त्या गोष्टीचे दडपणही माझ्यावर होतेच. तसा नवीनच होतो मी या क्षेत्रात. पण ते गाणे कुठली चुक न होता वन टेकमध्ये रेकॉर्ड झाले. त्यावेळी लतादिदींनी आमचे कौतुक केले व म्हणाल्या की खूप वर्षांनी मला इतका चांगला कोरस ऐकायला मिळाला. माझी व चंद्रकांत काळे यांची गुणवत्ता अशा रितीने प्रकर्षाने लक्षात आल्यानंतर जैत रे जैतमधील पुढच्या गाण्यांतील आमचा सहभाग संगीतकारांनी अजून वाढविला असावा.
जैत रे जैतची गाणी ही अवीट आहेत. चित्रपटाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तो चित्रपट व त्यातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. `मी रात टाकली, मी कात टाकली', `जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो' या गाण्यांच्या कोरसमध्ये मी आणि चंद्रकांत काळे होतो. `नभ उतरु आलं'च्या या गाण्याच्या वेळी कोरसमधील एक गायिका अनुपस्थित होती. त्यावेळी लतादिदी यांच्या भगिनी मीना खडीकर या कोरसमध्ये आमच्याबरोबर गायला उभ्या राहिल्या. जैत रे जैतचे संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे तर लतादिदी, आशा भोसले, उषाताई व मीना खडीकर अशी सारी मंगेशकर भावंडे या चित्रपटाच्या संगीताशी जोडली गेली होती. सर्व मंगेशकर भावंडांचा एखाद्या चित्रपटाच्या संगीतात एकत्रित सहभाग आहे असा एकमेव मराठी चित्रपट आहे. जैत रे जैत हा त्यातील एक अत्यंत महत्वाचा चित्रपट. `गोऱ्या देहावरची कांती' हे गाणे मी व उषा मंगेशकर यांनी गायले तर "आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं', "पीक करपलं' ही आणि `तांबडा हनुमान', `झाडांचा देव असतो, दगडांचा देव' ही या चित्रपटातील माझी सोलो गाणी आहेत. या चित्रपटात गाण्यांबरोबर साँगलेट््सही होती. साँगलेट म्हणजे दीड दोन मिनिटांची छोटी गाणी. `डोंगर काठाडी ठाकर वाडी', `वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी', `लिंगुबाचा डोंगर आभाळी गेला', `हा देव नुसता चोंबडा' यासारखी साँगलेट मी व चंद्रकांत काळे यांनी मिळून गायली आहेत.
जब्बार पटेल, मंगेशकर भावंड, स्मिता पाटील, मोहन आगाशे अशा सगळ्या दिग्गजांबरोबर जैत रे जैत या चित्रपटात काम करायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्याचे होते. हा चित्रपट माझ्या करिअरसाठी एक उत्तम वळण देणारा ठरला. या चित्रपटातील सर्वच गाणी उत्तम आहेत. पण त्यातील `पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं' हे गाण माझे सर्वात आवडते आहे. जैत रे जैत चित्रपटाचा नायक नाग्या हा उदास मनस्थितीत असताना त्या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रपटात वाजते. ते मी गायले आहे. जैत रे जैतचे कथानक पुढे सरकते, ते वेगाने एक एक पायरी वर चढत जाते. त्यावेळी मध्येच नेमके हे गाणे अाल्याने चित्रपटाचा टेम्पो जात होता. त्यामुळे हे गाणे चित्रपटातून वगळावे असे हृदयनाथ मंगेशकर तसेच मलाही वाटत होते. त्यामुळे हे दोघांचे अत्यंत अावडते गाणे चित्रपटातून नाइलाजास्तव काढावे लागले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात १९७८ साली या चित्रपटाची जी प्रत परीक्षणासाठी पाठवली त्यात मात्र हे गाणे समाविष्ट केले होते. आणि याच गाण्याला मला उत्कृष्ट पार्श्वगायकासाठीचा पुरस्कार मिळाला. हा माझ्या आयुष्यातला पार्श्वगायक म्हणून पहिला पुरस्कार होता. `पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं' या गाण्याची नजाकतच वेगळी आहे. जैत रे जैत चित्रपटासह हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मी एकुण सहा चित्रपटांमध्ये गायलो. एक छान सांगितिक प्रवास झाला. 
जैत रे जैत प्रदर्शित झाला. तो प्रचंड गाजला. त्याची एचएमव्ही डिस्क अमेरिकेतही पोहोचली. तेथील रसिकांनी ही सर्व गाणी आवडल्याचे पत्र मंगेशकरांना लिहिले. हृदयनाथ मंगेशकरांनी हे पत्र मला दाखविले. त्यात मी म्हटलेली गाणीही आवडल्याचा उल्लेखही या रसिकांनी आवर्जून केला होता. इतिहास घडविणाऱ्या एका चित्रपटात गायक म्हणून माझाही खारीचा वाटा होता या भावनेने आजही मन सुखावते.

No comments:

Post a Comment