Sunday, May 4, 2014

एव्हरेस्ट चढाईचा जीवघेणा धंदा - दै. दिव्य मराठीची रसिक रविवार पुरवणी - ४ मे २०१४.

लेखाचा मूळ भाग



लेखाचा उर्वरित भाग



एव्हरेस्टवरील कचरा हटविण्याच्या प्रयत्नांत शेर्पांची बहुमोल मदत असूनही नेपाळ सरकारला त्याची फारशी कदर नाही असे शेर्पांना वाटतेधंदेवाईक वृत्तीच्या दुश्चक्रात सापडलेल्या एव्हरेस्ट मोहिमांमध्ये शेर्पांपासून गिर्यारोहकांपर्यंतचे सारेच घटक सध्या असंतुष्ट आहेतत्यात नैसर्गिक आपत्तीही आपला रंग दाखवून जातातत्या विळख्यातून एव्हरेस्टची सुटका कधी होणार

एव्हरेस्ट चढाईचा जीवघेणा धंदा ( दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी - ४ मे २०१४)

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-everest-trekking-by-sameer-paranjape-divya-marathi-4602137-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/04052014/0/1/


- समीर परांजपे


एव्हरेस्ट. हिमालयाच्या कुशीत विसावलेले जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर - ८८४८ मीटर. जगातील गिर्यारोहकांनी त्याचा माथा सर करण्याचे १९ व्या शतकापासून पाहिलेले स्वप्न अखेर २९ मे १९५३ रोजी पूर्ण झाले. त्या दिवशी एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोरगे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला. या घटनेला येत्या २९मे रोजी ६१ वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत जगभरातील असंख्य कसलेले गिर्यारोहक, साहसी वृत्तीचे व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले पर्यटक यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यात विविध वयोगटाच्या स्त्राe-पुरुष गिर्यारोहकांचा समावेश आहे. दरवर्षी एव्हरेस्टच्या मोहिमांदरम्यान विविध प्रकारचे विक्रमही नोंदविले जातात. गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आहे की नाही याबद्दल जगभर जरी वाद सुरु आहे. मात्र निसर्गातील प्रतिकुलतेशी गिर्यारोहणात झुंजल्याशिवाय कोणत्याही शिखर किंवा सुळक्याचा माथा सर करताच येत नाही या वस्तुस्थितीबाबत मात्र कोणाचेही दुमत नक्कीच नाही. एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी एप्रिल ते जून महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत अनेक चढाई मोहिमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सहभागी होणाऱया गिर्यारोहकांची सरासरी संख्या दरवर्षी तीनशे ते चारशे इतकी असते. त्यातील काही जणांच्या हाती यश किंवा अपयश लागते. काही जणांचा चढाई दरम्यान अपघातात मृत्यू ओढवितो. मात्र एव्हरेस्टचा माथा सर करायचाच ही जिद्द अनेकांच्या मनात अभंग उरते. यंदाच्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमांचा हंगाम सुरु होण्याच्या प्रारंभीच गेल्या १८ एप्रिल रोजी या शिखराच्या पश्चिम धारेवरील एक मोठा हिमनग कोसळून या शिखराच्या कॅम्प एक खाली खुंबु हिमनदीत हिमप्रपात झाला. त्यामुळे बर्फाखाली गाडले जाऊन १६ शेर्पा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. एव्हरेस्ट शिखराला स्थानिक शेर्पांनी देवत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे एव्हरेस्टदेव यंदा चढाई मोहिमांना अनुकूल नसल्यानेच हा अपघातरुपी अपशकून झाला अशी धार्मिक समजूत या शेर्पांनी करुन घेतली. त्यातूनच मग यंदाच्या वर्षी नेपाळमार्गे एव्हरेस्ट मोहिमांमध्ये सहभागी होण्यास शेर्पांनी स्पष्ट नकार दिला. धार्मिक कारणांची ढाल या पवित्र्यासाठी पुढे करण्यात आली असली तरी त्यामागे शेर्पांची अनेक आर्थिक कारणेही दडलेली आहेत.
१८ एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर एव्हरेस्टच्या १९ हजार फुट उंचीवर असलेल्या बेसकॅम्पवर सुमारे ४०० शेर्पा जमले होते. त्यांनी शिखर चढाई मोहिमांसाठी देशा-विदेशांतून आलेल्या गिर्यारोहकांबरोबर सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिल्याने अनेक गिर्यारोहक अत्यंत निराश भावनेने माघारी फिरले.
१९९०च्या दशकाच्या मध्यापासून एव्हरेस्ट चढाई मोहिमांचे मोठय़ा प्रमाणावर व्यापारीकरण झाले आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा अनेक गिर्यारोहण संस्था आहेत की ज्या एखाद्या गिर्यारोहकाकडून हजारो डॉलर मानधनाच्या रुपात घेऊन त्याच्या एव्हरेस्ट मोहिमेची संपूर्ण तयारी करुन देतात. ही आखणी करुन देण्यामध्ये नेपाळमधील गिर्यारोहण संस्था वा एखादी व्यक्ती मध्यस्थ म्हणून भूमिका बजावतात. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया प्रत्येक गिर्यारोहकाकडून नेपाळ सरकार दहा हजार डॉलर इतकी रॉयल्टी आकारत असते. अठरा एप्रिल रोजी झालेल्या अपघातात मरण पावलेल्या शेर्पांच्या अंत्यविधीसाठी नेपाळ सरकारने प्रत्येकी फक्त ४०० डॉलर इतकी तुटपुंजी रक्कम देण्याचे जाहीर केल्याने शेर्पा समुदाय संतप्त झाला होता. दरवर्षी एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर मदतनीस व मार्गदर्शकाच्या रुपाने सहभागी होणाऱया शेर्पांना दर हंगामात प्रत्येकी सरासरी दोन ते आठ हजार डॉलरचीच कमाई होत असते. त्याची परिणती म्हणजे एव्हरेस्ट बेसकॅम्पला सुमारे ४०० शेर्पांनी जमून यंदा एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी न होण्याचा निर्णय एकमुखाने जाहीर केलाकातावलेल्या शेर्पांपैकी काही जणांनी गेल्या वर्षी एव्हरेस्ट चढाईसाठी गेलेल्या तीन युरोपीयन गिर्यारोहकांच्या तंबूंवर दगडफेक तसेच त्यांना मारहाणही केली होती.
एडमंड हिलरी व शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला, त्या व त्या आधीच्या एव्हरेस्ट चढाई मोहिमांच्या आखणीत साधेपणा होता. हिलरी व नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखरावर ज्या साऊथ कोलमधून चढाई केली तो मार्ग आता चढणीच्या दृष्टीने बराचसा सोपा झालेला आहे. त्या मार्गाने चढाई करणाऱया गिर्यारोहकाबरोबर मदतीसाठी प्रशिक्षित गिर्यारोहक सोबत असतात. त्याशिवाय हवामानाचा अचूक अंदाज अत्याधुनिक साधनांद्वारे त्वरित कळतो. एव्हरेस्ट चढाईदरम्यान काही जीवघेणा प्रसंग उद्भवलाच तर मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर त्वरित उपलब्ध असते. संपर्कासाठी सॅटेलाईट फोन तसेच अतिउंचावर प्रकृतीसंदर्भात निर्माण होणाऱया समस्या टाळण्यासाठी प्रभावी औषधे व उपकरणेही गिर्यारोहकांना आता उपलब्ध असतात.
नेपाळ आणि चीनचा प्रांत असलेल्या तिबेटच्या सीमेवर एव्हरेस्ट शिखर उभे असून त्याच्यावरील चढाई मोहिमांत आजवर २७५हून अधिक गिर्यारोहक विविध अपघातांत मरण पावले आहेत. या शिखरावर १९९०च्या दशकात झालेल्या अपघातांमध्ये २०००च्या दशकात मात्र काही प्रमाणात घट झाली होती. ही गोष्टही एव्हरेस्टचा माथा सर करणाऱया गिर्यारोहकांसाठी उत्साहवर्धक ठरली होती. पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहिम मार्गदर्शक कंपन्या गिर्यारोहकांकडे क्लायंट या दृष्टीनेच बघत असतात. एखाद्या एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर किती शेर्पा व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत, त्यानूसार त्या गिर्यारोहकांना ४० ते ९० हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यातही स्थानिक शेर्पा मार्गदर्शकांपेक्षा पाश्चिमात्य मार्गदर्शकांचे शुल्क अधिक असते. एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकाबरोबर सहभागी होण्यासाठी पाश्चिमात्य मार्गदर्शक १० ते ३५ हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारु शकतो. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया व्यक्तीने गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक समजले जाते. मात्र हाती आलेले गिऱहाईक सहजासहजी सोडावयाचे नाही या धंदेवाईक हेतूने एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या पर्वतारोहणाचा कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींनाही एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी करुन घेत असल्याची तसेच एव्हरेस्टवर जाऊ इच्छिणाऱयांपैकी काही लोक आपण प्रशिक्षित गिर्यारोहक असल्याचे खोटे दाखले सादर करीत असल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. या गोष्टींकडे कानाडोळा करणाऱया एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या धंदेवाईक वृत्तीवर एडमंड हिलरी यांनीही २००८ साली केलेल्या एका भाषणात कोरडे ओढले होते.
एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या व नेपाळमधील मध्यस्त संस्था यांच्यामध्ये जे एखाद्या चढाई मोहिमेसंदर्भात होणाऱया काँन्ट्रक्टमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत याकडे बऱयाच गिर्यारोहकांचे बारीक लक्ष नसते. पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या गिर्यारोहकांकडून मोहिमेसाठी ५० हजार डॉलर इतके शुल्क घेत असतील तर त्यातील फक्त ३५ हजार डॉलर इतकीच रक्कम नेपाळमधील मोहिम आखणी करणाऱया मध्यस्थाला दिली जाते. प्रत्यक्ष मोहिमांत सहभागी होणाऱया शेर्पांना मिळणारा मोबदला तुटपूंजा वाटल्याने काही शेर्पांनी मोहिम आखणीसाठी नेपाळमध्ये मध्यस्थी करणाऱया कंपन्या सुरु केल्या आहेत. या कंपन्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी प्रत्येक गिर्यारोहकाकडून सुमारे ३७००० डॉलर मोबदला घेतात. त्यात या गिर्यारोहकाला मोहिमेत आपल्या बरोबर दोन शेर्पा मदतनीस घेऊन जाण्याची सुविधा असते. या कंपन्यांना या व्यवहारात प्रत्येक गिर्यारोहकामागे किमान २ ते ३ हजार डॉलर इतका नफा मिळतो. यात एव्हरेस्टचा माथा सर करु पाहाणाऱया नवख्या गिर्यारोहकांची मानसिकताही काही वेळेस समस्या निर्माण करते. एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी आपण जेवढे जास्त पैसे मोजू तितकी आपली मोहिम यशस्वी होण्याची खात्री अधिक असते असे मनाने घेतलेल्या नवख्या गिर्यारोहकांमुळे या मोहिमांना अधिक बाजारु स्वरुप आले आहे. नेपाळमधील पर्यटन व्यवसायातून मिळणाऱया एकूण उत्पन्नामध्ये गिर्यारोहणातून मिळणाऱया महसुलाचा चार टक्के वाटा आहे. एव्हरेस्टवरील चढाई मोहिमा आयोजित करुन देणाऱया संस्था नेपाळमधील मध्यस्थ संस्थांकडे मोबदला कमी करण्यासाठी तगादा लावतात. जो मध्यस्थ कमी मोबदल्यावर मोहिम न्यायला तयार होईल त्याच्याकडे आपले क्लायंट पाठविण्याकडे एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्यांचा कल असतो. या घासाघीशीच्या प्रवृत्तीमुळे प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होणाऱया शेर्पांनाही कमी मोबदला मिळतो. या व्यवहारात नेपाळमधील काही स्थानिक उद्योजक गडगंज श्रीमंत झाले. त्यांनी पर्यटकांसाठी हॉटेल उघडली. काहींनी विमाने विकत घेऊन ती गिर्यारोहकांसाठी उपलब्ध करुन दिली. मात्र शेर्पांमधील बहुसंख्य जण मात्र अपुऱया उत्पन्नामुळे नाराज आहेत. यंदाच्या वर्षी एव्हरेस्टच्या माथ्यावर जाण्यासाठी ३३४ गिर्यारोहकांनी नेपाळ सरकारकडे नोंदणी केली होती. त्यांच्याकडून रॉयल्टीच्या रुपात नेपाळ सरकारने तब्बल ३.३ दशलक्ष डॉलरचा महसुल यंदा मिळविला. त्या रकमेतील तीस टक्के भाग हा एव्हरेस्ट परिसराच्या विकासासाठी नेपाळ सरकार खर्च करणार आहे. मात्र एव्हरेस्ट मोहिमांचा फळफळलेला व्यवसाय हा नेपाळ सरकारला दुभत्या गायीसारखा वाटतो. मात्र त्या व्यवसायात गुंतलेल्या शेर्पांच्या कल्याणासाठी काही उत्तम योजना राबवाव्यात असे तेथील सरकारला वाटत नाही ही खंत शेर्पांच्या मनात आहे. गेल्या वर्षी एव्हरेस्टवर ज्या दुर्घटना घडल्या त्यानंतर प्रत्येक आरोहण तुकडीसाठी एक लायझन ऑफिसर देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र यंदाच्या वर्षी एव्हरेस्टवर जाणाऱया ३९ मोहिमांसाठी फक्त तीनच लायझन ऑफिसर सरकारने उपलब्ध करुन दिले याबद्दल शेर्पांच्या मनात राग आहे.
नेपाळच्या पूर्व भागात राहाणारे शेर्पा हे एव्हरेस्ट मोहिमांमधील महत्त्वाचा घटक असतात. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया गिर्यारोहकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे सामान वाहून नेणे. विविध चढ-उतारांवर दोर बांधणे, शिडय़ा रोवणे ही कामे शेर्पा करतात. त्याचबरोबर मोहिमेमध्ये अचूक दिशादिग्दर्शन करणे, नैसर्गिक आपत्तीत एखादा गिर्यारोहक सापडला तर त्याला मदतीचा हात देणे ही कामे शेर्पा मंडळी करतात. चढाई दरम्यान गिर्यारोहणाची साधने व अन्य सामान एका छावणीतून पुढच्या छावणीमध्ये नेण्यासाठी त्या दरम्यान शेर्पांना अनेक फेऱया माराव्या लागतात. हे लक्षात घेता गिर्यारोहकापेक्षा शेर्पांच्याच जीवाला अधिक धोका असतो. एव्हरेस्टवरील खुंबु हिमनदीतून मार्ग काढत असताना तर संकटे दत्त म्हणून उभी ठाकतात. त्यात अनेकदा पहिला बळी जातो शेर्पांचाच. या सगळ्या अडचणींतून मार्ग काढून मोहिम यशस्वी झाल्यास त्यातून शेर्पांना प्रत्येकी २ ते ८ हजार डॉलर इतकी कमाई होते. अनेकदा पाश्चिमात्य मार्गदर्शकांइतका मोबदलाही अत्यंत कुशल शेर्पांना मिळू शकतो. परदेशी गिर्यारोहक अनेकदा शेर्पांशी नीट वागत नाहीत. १९२२ साली जॉर्ज मॅलरी सहभागी असलेल्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेदरम्यान हिमप्रपातात ७ शेर्पा मरण पावले होते. त्या दुर्घटनेसंदर्भात एव्हरेस्ट तळछावणीला जो निरोप पाठविण्यात आला होता त्यात म्हटले होते सारे गौरवर्णीय गिर्यारोहक सुरक्षित आहेत!’ असे अनेक प्रसंग ओढवूनही शेर्पा मंडळींनी आपल्या मनमिळावू स्वभावाची कास कधी सोडली नव्हती. पण 18 एप्रिलच्या घटनेनंतर एव्हरेस्टच्या बेसकॅम्पला संतप्त तरुण शेर्पांचा घोळका नेपाळ सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होता, त्यांना राजकीय फूस असावी अशी शंका या हंगामात आलेल्या अनेक विदेशी गिर्यारोहकांच्या मनात डोकावली होती. यंदा एव्हरेस्ट मोहिमांवर शेर्पांनी घातलेला बहिष्कार मागे जरी घेतला गेला तरी गेल्या तीन आठवडय़ांतील घडामोडींचा विपरित परिणाम मोहिम आखणी व्यवसायावर होणार हे नक्की. त्यातून एव्हरेस्ट मोहिमांसाठी आकारण्यात येणाऱया शुल्कातही भविष्यात मोठी वाढ होण्याचा संभव आहे.
एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी जाणाऱया मोहिमांमुळे या शिखरावर कचरा साठण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सोळा वर्षांचा असलेला अर्जुन वाजपेयी हा २२ मे २०१० रोजी एव्हरेस्टचा माथा सर करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय गिर्यारोहक ठरला होता. आपल्या या अनुभवांवर आधारित ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड - माय एव्हरेस्ट ऍडव्हेंचरया पुस्तकात वाजपेयीने म्हटले आहे की, एव्हरेस्ट शिखर व त्या परिसरातील पर्यावरणाची नासाडी रोखण्यासाठी तो प्रदेश सागरमाथा नॅशनल पार्ककडे सुपूर्द करण्यात आला. तसेच १९७९ साली हा भाग राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आला. १९९८ साली एव्हरेस्ट पर्यावरण संरक्षक मोहिमेंतर्गत गिर्यारोहकांच्या एका तुकडीने सुमारे दीड टन कचरा एव्हरेस्टवरुन खाली आणला होता. त्यामध्ये गिर्यारोहकांनी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, ऑक्सिजनच्या रिकाम्या नळकांडय़ा, बॅटरी व अन्य प्रकारचा मानवी कचरा होता. या मोहिमेनंतरही अजून बराच कचरा एव्हरेस्टच्या विविध कॅम्पवरती शिल्लक होताच. एव्हरेस्टवर वाढणाऱया कचऱयाची समस्या लक्षात घेऊन नेपाळ सरकारने गिर्यारोहकांकडून चार हजार डॉलर इतकी अमानत रक्कम घेण्यास सुरुवात केली. गिर्यारोहकांनी जेवढी साधनसामुग्री बरोबर नेली असेल ती सर्व सामग्री त्यांनी एव्हरेस्टवरुन खाली येताना आणली तरच त्यांना ही अमानत रक्कम परत दिली जाते. असे उपाय योजूनही अजून एव्हरेस्टवरील कचऱयाची समस्याही दूर झालेली नाही. एव्हरेस्टवरील कचरा हटविण्याच्या प्रयत्नांत शेर्पांची बहुमोल मदत असूनही नेपाळ सरकारला त्याची फारशी कदर नाही असे शेर्पांना वाटते. धंदेवाईक वृत्तीच्या दुश्चक्रात सापडलेल्या एव्हरेस्ट मोहिमांमध्ये शेर्पांपासून गिर्यारोहकांपर्यंतचे सारेच घटक सध्या असंतुष्ट आहेत. त्यात नैसर्गिक आपत्तीही आपला रंग दाखवून जातात. त्या विळख्यातून एव्हरेस्टची सुटका कधी होणार?


No comments:

Post a Comment