लेखाचा मुळ भाग.
लेखाचा उर्वरित भाग.
दै.
लोकसत्ताच्या विवा पुरवणीमध्ये मी ४ जून २०१० ते आँक्टोबर २०१० या कालावधीत यंग
अचिव्हर नावाचे सदर चालवित असे. सर्वसामान्यांपेक्षा करिअरमध्ये वेगळी व चमकदार
कामगिरी करणार्या युवतींचा या सदरात परिचय करुन देण्यात आला होता. दै.
लोकसत्ताच्या ४ जून २०१०च्या विवा पुरवणीतील यंग अचिव्हर काँलममध्ये प्रसिद्ध
झालेला हा पहिला लेख. त्याची जेपीजी फाईल वर दिली आहे. बरखा चव्हाण या कुशल
नृत्यांगनेची ही कहाणी आहे.
नटखट
सुंदरा
-
समीर परांजपे
ढोलकीवर
कडाडून पडणारी थाप. घुंगरांची छुनछुन आणि विलोभनीय अदाकारीने नखरेल लावण्यवती सादर
करीत असलेली लावणी. अशा माहोलमध्ये अस्सल मराठी माणूस नादावला नाही असे होणारच नाही...महाराष्ट्रात
तमाशाला मोठी परंपरा आहे. ग्रामीण भागात अस्सल तमाशाचे फड रंगतात. पिटातल्या
प्रेक्षकापासून चे लब्धप्रतिष्ठितांनी दिलेल्या आश्रयामुळेच ही कला अद्याप जिवंत
आहे. तमाशा रडतखडत चाललाय. अनेक समस्या आहेत...पण तमासगीर त्या अडचणींतूनही वाट
काढून कलेला पुढे नेत आहेत. तिचे त्यांनी कलेवर होऊ दिलेले नाही. अस्सल मातीतली
लावणी विविधांगी आहे. त्यातील शृंगारिक लावणीच आपल्या अधिक परिचयाची...ग्रामीण
मराठी चित्रपटांतून वारंवार दिसणारी...तमाशा कलावंतांना गेल्या काही वर्षांत आता शहरांतील
पांढरपेशा वर्गही मोठ्या प्रमाणावर दाद देऊ लागलाय. महाराष्ट्रातल्या अनेक
नाट्यगृहांत होणारे लावणीचे कार्यक्रम तुफान गर्दी खेचत आहेत. अस्सल तमाशा
कलावंतांबरोबरच शहरात वाढलेल्या, बर्यापैकी शैक्षणिक, कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच
नृत्याची उत्तम जाण असलेल्या मुलीही लावणीचे दिलखेचक कार्यक्रम करताना दिसतात....खास
महिलांसाठी लावणीचे कार्यक्रम होतात. थोडक्यात लावणी म्हटले की कोणी नाक मुरडत
नाही. उलट ती कला सादर करणार्या नृत्यांगनेच्या मुरडण्याचे कौतुकच करताना दिसतात.
सध्या शहरी भागात जोरात सुरु असलेले काही लावणी कार्यक्रमच त्याची साक्ष देतील. लावणी
कार्यक्रमात नृत्य सादर करणार्या मुली नसतील कदाचित ग्रामीण भागातून आलेल्या...काही
जण त्यांच्या कार्यक्रमांना आँर्केस्ट्रा म्हणून हिणवत असतील...हरकत नाही....त्यामुळे
त्यांच्या नृत्यकौशल्य व अदाकारी यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. अशा नटखट सुंदरींमध्ये
गाजणारे अजून एक नाव आहे ते म्हणजे बरखा चव्हाण...ही आहे अस्सल शहर भागात वाढलेली
मुलगी...ताल, लय यांच्यासाठी हिचे पाय पहिल्यापासून नादावलेले होते. अस्सल
इंग्रजीत बोलून वेळप्रसंगी समोरच्याला गार करणारी ही मुलगी आहे विलक्षण
नृत्यनिपुण...लावणी सादर करणारे आसुसलेले असतात प्रेक्षकांकडून मिळणार्या
वन्समोअरसाठी. ती असते अस्सल दाद. बरखा चव्हाणशी बोलतानाही हाच वन्समोअर मनात येत
राहातो...
बरखाचे
वय आहे अवघे २० वर्षांचे. इयत्ता आठवीत असल्यापासून तिने प्रोफेशनल शोमध्ये काम
करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक आवड म्हणून आणि नंतर मग तेच तिचे करिअर बनले.
ती एक उत्तम कलाकारही आहे. लवंगी मिरची या कार्यक्रमातील अदाकारीने बरखा चव्हाणने
एक उंची गाठली. केवळ लावणी नृत्यांगना अशी ओळख तिला नको होती. `चल लव कर’, `मराठी माणसे’ `सदा
सर्वदा’ या सारख्या नाटकांतूनही तिने भूमिका केल्या.
`जल्दी कर कोई जोई जोसे’ या गुजराती नाटकाचे एकूण चार हजारापेक्षा
जास्त प्रयोग झाले. त्यातील २००हून अधिक प्रयोगांमध्ये बरखा चव्हाणने महत्त्वाची
भूमिका केली. ई टीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवर प्रसारित होणार्या `क्राईम डायरी’ या मालिकेत काही भागांमध्येही बरखाने काम
केले आहे. आता तिचे नाव गाजते आहे ते `टाँपच्या
नटखट सुंदरा’ या लावणी कार्यक्रमातील
अदाकारीने...इतक्या लहान वयात मिळालेले हे यश सहजी तिच्या पदरात पडले का? उत्तर अर्थातच नाही असेच आहे...
बरखा
सांगते `माझे वडील नेव्ही आँफिसमध्ये कामाला होते.
मी उरणच्या एनडी हायस्कूलमध्ये चौथीपर्यंत शिकले. त्यानंतर पाचवीपासून गुरु नानक
हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर शारदाश्रम इंग्लिश स्कूलमध्ये आले. माझी आजी
(आईची आई) परळला राहात होती. लालबाग-परळमध्ये असलेले मराठमोळे वातावरण, तेथे
उत्साहाने साजरे होणारे मराठी सण हा माहौल मला नेहमीच आवडतो. मी तीन ते चार
वर्षांची असेन. आजी राहात असलेल्या इमारतीत एका कार्यक्रमात `मी हाय कोली’ या गाण्यावर मी आयुष्यातले पहिले नृत्य
केले होते. शाळेत इयत्ता दुसरी किंवा तिसरीत असताना कार्यक्रमात केलेल्या नृत्यामुळे
बक्षिस मिळाले होते. शालेय जीवनाचा काळ हा तुमच्या जडणघडणीचा असतो. तशी मी
अभ्यासातही हुशार होते. २०००साली माझे वडील वारले. त्यामुळे माझे सारे विश्वच
बदलले. मी त्यावेळी चौथीत होते. त्यानंतरच्या काळात आम्ही शीव, वरळी कोळीवाडा असे
अनेक ठिकाणी राहिलो. वर्षे उलटत होती. आठवी इयत्तेत असताना मी परीक्षेत पास होऊ
शकले नाही. आता पुढे काय करायचे असा प्रश्न आला. त्यावेळी दहावीला बाहेरुन
(एक्स्टर्नल) बसू असा विचार केला. त्यावेळी आम्ही वरळी कोळीवाड्यात राहात होतो.
तेथे एका डान्स क्लासला जायला लागले. नृत्याचे शिक्षण घेता घेता असे वाटले की, आपण
कार्यक्रमात परफाँर्म का करु नये, माझी आईही नोकरी करीत होतीच. तिच्या ओळखीच्या
एका गृहस्थानी प्रथम एका कार्यक्रमात काम करायची संधी मला दिली.’
` माझ्या करिअरला वळण मिळाले ते प्रसिद्ध
लेखक, दिग्दर्शक जनार्दन लवंगारे यांच्यामुळे. माझे मुळ नाव स्नेहा असे आहे.
त्यांनी माझे नाव बदलून ते बरखा असे ठेवले. त्यांच्या ` लवंगी मिरची’ या कार्यक्रमात मी लावणीची अदाकारी केली.
आणि खर्या अर्थाने प्रोफेशनल करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर मी जनार्दन लवंगारे
यांच्या मार्गदर्शनाखाली चल लव कर, मराठी माणसे, सदा सर्वदा अशा नाटकांतूनही
भूमिका केल्या. त्यानंतर आता प्रदीप शिंपी यांच्या टाँपच्या नटखट सुंदरामध्ये अन्य
नामवंत नृत्यांगनांसमवेत लावणीची अदाकारी करीत आहे. टाँपच्या नटखट सुंदरा
कार्यक्रमाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद लाभतोय. या व्यतिरिक्त माझी काही सिरियल व
चित्रपटांविषयी बोलणी सुरु आहेत. बघुया काय होते ते.’
`य़ा प्रवासात माझे शिक्षण अर्धवट राहिले ही
खंत आहे. मी आता दहावीची परीक्षा एक्स्टर्नल म्हणून दिलेली आहे. मला पुढे शिकायचे
आहे. मी त्यासाठीही खूप मेहनत घेणार आहेच. लावणीचे कार्यक्रम, नाटके, सिरियल्स
यांच्या कामाचा व्याप सांभाळत मी यापुढेही शिकत राहाणार आहे. माझे वय तुलनेने
लहानच आहे. मात्र या प्रवासात माझी आई व बहीण या भक्कमपणे माझ्या पाठीशी उभ्या
राहिल्या. त्यांनी वेळोवेळी जे प्रोत्साहन दिले त्यामुळेच मी आज इथवर पोहोचले आहे.
लावणी सादर करणारी उत्तम इंग्रजीत संवाद साधते हे पाहून काही जण आश्चर्यचकित होतात
पण माझे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असल्याने मला ते शक्य होते. लहान
वयात हे सगळे अचिव्ह करणे सोप्पे आहे का हो?
तर नाही. त्यासाछी मी खूप मेहनत घेतलीय. आजवर केलेले विविध कार्यक्रम व नाटके
यांचा हिशेब मांडला तर किमान हजारहून अधिक प्रयोग मी केले असतील,
कार्यक्रमानिमित्त गावोगावी जाणे होते. लोक भरभरुन दाद देतात त्यावेळी बरे वाटते.
पण मनाला बजावित असते. मेनी माईल्स टू गो...’
बरखा
चव्हाण मनमोकळेपणाने बोलत होती. त्यातून नटखट सुंदराला किती स्पर्धा व संघर्ष
करावा लागला असेल याचेही दर्शन आपसूक घडले.
No comments:
Post a Comment